मराठी भाषा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. त्याबाबतच्या चर्चेत या संदर्भातील पुढील निकषांकडे लक्ष वेधले गेले. '' High antiquity of its early texts/ recorded history over a period of 1500-2000years, A body of ancient literature /texts ,which is considered a valuable heritage by generations of speakers. The literary tradition be original and not borrowed from another speech community. The classical language and literature being distinct from modern, there may be a discontinuity between the classical language and its later forms of its offshoots.'' मराठी ही जगातील १० व्या क्रमाकांची भाषा असली तरी तिचा जन्म २००० वर्षापूर्वीचा नसल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसल्याचा मुद्दा पुढे आला. मराठी भाषेचा जन्म नेमका केव्हा झाला याबाबत कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, संचालक-मराठी संशोधन मंदिर, यांचा मराठी भाषा उद्गम व विकास हा १९३३ साली प्रकाशित झालेला ग्रंथ अतिशय मोलाचा समजला जातो. त्यात ते म्हणतात, सर्व प्राकृत भाषा, अपभ्रंश व संस्कृत ह्या भाषांनी आपापल्यापरिने मराठीस जन्माला आणण्यास हातभार लावलेला दिसतो. निरनिराळ्या प्राकृतभाषा बोलणारे निरनिराळे समाज निरनिराळ्या काळी वरून आर्यावर्तातून अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात उतरले आणि तेथे स्थायी झाले. त्यांच्या संमिश्र बोलण्यानेच मराठी भाषा बनली. महाराष्ट्र देश ज्याप्रमाणे गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, अश्मक, कुंतल, विदर्भ, कोकण इत्यादी लहान लहान देशविशेषांचा मिळून बनला व महाराष्ट्राची लोकवसाहत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लोकघटकांनी मिळून झाली, त्याचप्रमाणे मराठी भाषा ही निरनिराळ्या प्राकृत भाषांच्या-विशेषतः माहाराष्ट्री व अपभ्रंश ह्यांच्या मिश्रणाने बनली. महाराष्ट्र देश, मराठा समाज व मराठी भाषा ह्यांची घटना वर दिलेल्या रीतीने ख्रिस्तोत्तर ६००-७०० च्या सुमारास झाली. (पृ. १६८)
कृ.पां.कुलकर्णी यांनी आपल्या ४९६ पृष्ठांच्या या शोधग्रंथात या विषयाचा सांगोपांग वेध घेण्यात आला आहे. विषयाचे सर्व पैलू मांडण्यासाठी त्यांनी या संदर्भातील तज्ज्ञांच्या ३२ मौलीक संदर्भ ग्रंथांचा वापर केलेला आहे. कुलकर्णीच्या मते मराठी भाषेचे वयोमान १३००-१४०० वर्षाचे ठरते. असे असेल तर मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकणार नाही. याबाबत (१) डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर लिखित प्राचीन महाराष्ट्र १ व २ खंड, (२) हाल सातवाहनाची गाथा सप्तशती - संपादक, स.आ. जोगळेकर (३) गुणाढ्याचे बृहत्कथा हे व राजारामशास्त्री भागवत,दुर्गा भागवत, इरावती कर्वे, वि.का.राजवाडे, वि.ल.भावे, रा.भी. जोशी आदींचे ग्रंथ तपासून काय चित्र समोर येते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु या.
कथा सरित्सागर या महाग्रंथाचे मराठी भाषांतर श्री. ह.अ.भावे यांनी केले असून त्याच्या पाचही खंडांना ख्यातनाम विदुषी दुर्गा भागवत यांच्या पाच प्रदीर्घ आणि विवेचक प्रस्तावना आहेत. त्या म्हणतात गुणाढ्याच्या बृहत्कथेची तुलना रामायण आणि महाभारताशी करण्यात येते. प्राचीन भारतातल्या साहित्याचा एक विशेष असा आहे की, पुष्कळ ग्रंथ लुप्त झाले आहेत. आणि असंख्य ग्रंथ केवळ खंडावस्थेतच आढळतात. अशा विलुप्त ग्रंथांत गुण्याढयाच्या बृहत्कथेचा समावेश होतो. बृहत्कथेसंबंधी उल्लेख अनेक जुन्या ग्रंथात आढळून येतील. बृहत्कथेचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असलेले ग्रंथ संस्कृतात व प्राकृतात आहेत हे ग्रंथ शैव व वैष्णव मतातून निघालेले आहेत. आणि जैन मतातलाही ग्रंथ उपलब्ध आहे. तेव्हा भिन्न परंपरांना मान्य असलेला बृहत्कथा हा एक प्राचीन लोकप्रिय ग्रंथ होता यात संशय नाही.
बृहत्कथेशी प्रत्यक्ष संबंध असलेले ग्रंथ दोन आहेत ते दोन्ही काश्मीरचे असून अकराव्या शतकात उपलब्ध झालेले आहेत. दोहोंची भाषा संस्कृत व मते शैव आहेत. पहिला जागतिक ख्याती पावलेला ग्रंथ हा सोमदेवाचा कथा सरित्सागर आणि दुसरा क्षेमेद्गांची बृहत्कथा मंजिरी हे दोन्ही ग्रंथ श्लोकबद्ध असून ते वृत्त अनुष्टुभ आहे. कथा सरित्सागरची भाषांतरे युरोपिय भाषांमध्येही उपलब्ध आहेत. परंतु बृहत्कथा मंजिरी चे इंग्रजीत एकच व तेही काही भागांचेच भाषांतर झालेले आहे. अकराव्या शतकात सोमदेव शर्मा या काश्मीरचा राजा अंनत याच्या पदरी असलेल्या कवी पंडिताने अनंत राजाची राणी सूर्यवती हिला रिझवण्यासाठी पैशाची भाषेत त्याकाळी उपलब्ध असलेल्या बृहत्कथेवरुन संस्कृतात कथासरित्सागराची रचना केली. आपण हा ग्रंथ गुणाढयाच्या बृहत्कथेवरुन रचला आहे ही गोष्ट सोमदेवाने ग्रंथारंभीच सांगून गुणाढ्याचे चरित्रही सांगितले आहे. असे दुर्गा भागवत म्हणतात.
डॉ. श्री. व्यं.केतकर या ग्रंथाबाबत आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात म्हणतात, पैशाचीतील मुख्य विश्रुत ग्रंथ म्हटला म्हणजे बृहत्कथा होय. तो कुरु युद्धोत्तर इतिहासाचा संरक्षक आणि त्याबरोबरच इतिहास विपर्यासाचा संरक्षक आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथात बृहत्कथेपासून इतिहास निष्कर्षणाचा पद्धतशीर प्रयत्न केलेला आढळेल. ऐतिहासिक कथासूत्राच्या शोधाच्या अनुषगांने अनेक प्रश्न विवेचनास घेतले गेले आहेत. त्यापैकी एक प्रश्न म्हटला म्हणजे बृहत्कथेच्या कालासंबंधीचा होय. .... बृहत्कथा अखिल भारतीय कथांचा संग्रह असल्यामुळे आणि त्यामध्ये प्रतिष्ठानकथा व दक्षिणापथकथा, कुंडीनपूर कथा येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासास त्या संग्रहाचा उपयोग करणे प्राप्त झाले. हा संग्रह तयार करण्यात वररुचीचा हात असल्यामुळे आणि वररुची हा महाराष्ट्राच्या भाषेचा आद्य वैय्याकरण असल्यामुळे वररुची विषयक अधिक विधाने करणे प्राप्त झाले. ... वररुचीची माहाराष्ट्री बुद्धपूर्व आहे आणि वररुचीचे व्याकरण पाली किंवा अर्धमागधी या भाषांच्या उदयापूर्वीचे आहे, असे आमचे मत आहे. आणि पैशाची भाषेचे प्रामुख्य ज्या काळात होते तो काळ वररुचीच्या व्याकरणाने दिग्दर्शित होत आहे. वररुचीच्या काळापूर्वी काही पिढ्या पैशाची ही वाङ्मयाची भाषा होती. ...त्या काळात माहाराष्ट्री भाषा प्रगल्भ झाली होती. आणि प्राकृत भाषांत तीच प्रमुख होती हे स्पष्ट आहे. या प्रगल्भतेचा काळ अर्थात वररुचीच्या पूर्वी दोनतीनशे वर्षे इतका तरी होता असे म्हणण्यास हरकत नाही ... त्यावरुन प्राकृत प्रकाशाच्या उत्पत्तीच्या काळी चारही प्राकृत भाषांचे व्याकरण असणे, आणि महाराष्ट्र हा शब्दही अस्तित्वात असणे हे पूर्ण संभवनीय वाटते. एवंच महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक मोठा उजेडाचा कालविभाग म्हटला म्हणजे वररुचीचा व पाणिनीचा काल होय. या वररुचीचे अस्तित्व पाणिनीच्या कालाहून दूर नसावे आणि वरुरुची व पाणिनी हे दोघेही जवळजवळ समकालीन असल्यामुळे ते दोघेही एका गुरुचेच शिष्य होते ही कल्पना उद्भूत होऊन आणि विद्वान वर्गाच्या आख्यायिका संग्रहात शिरुन ती कथापीठ लंबकात समाविष्ट झाली असावी. कथापीठलंबक रचनेचा काल मौर्य राज्याच्या प्रारंभाचा असावा, असे आमचे मत आहे. (पृ ११,१२)
ते पुढे म्हणतात, महाराष्ट्र हा शब्द व भाषा वररुचीच्या काळी होती आणि वररुचीच्या काली ही भाषा सवंर्धित झाली होती आणि वररुचीचा काल खिस्तपूर्व ८०० पासून ६०० पर्यंत केव्हातरी असा धरला तर महाराष्ट्राची स्वतंत्र भाषा अगोदर दोनतीनशे वर्षे तरी विकसित होत असली पाहिजे म्हणजे खिस्तपूर्व पहिल्या सहस्त्रकांच्या पूर्वीच म्हणजे खिस्तपूर्व दुसज्या सहस्त्रकात महाराष्ट्राचा आद्यविकासाचा काल जातो. आणि या भाषेच्या नावास कारण झालेले जे महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण जे ख्रिस्तपूर्व दुसज्या सहस्त्रकात झाले असावे असे दिसते. अश्मक राजा कुरुयुद्धात पडला आणि कुरुयुद्धापासून अश्मकांचे सातत्य आहे तर महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण आणि अश्मक राजाचे सातत्य याची संगती लावण्याचा प्रयत्न अवश्य होतो... अश्मक राज्य सुरु होण्यापूर्वीच महारांच्या देशात रठ्ठांचा प्रसार होऊन महाराष्ट्र बनले असावे आणि त्यांच्या संयुक्त जनतेत अश्मक राजकुल उत्पन्न झाले असावे असाच इतिहास असावा असे दिसते (पृ.१३)
डॉ. केतकर हालांच्या सप्तशतीबद्दल म्हणतात, महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन वाङ्मय म्हणजे हालांची सप्तशती होय. तीवरुन असे दिसते की, त्या वेळेस प्रमुख जानपद हलिक होते. गोदातट आणि विंध्य पर्वत हे दोन्ही प्रदेश वाङ्मयात येत होते. भाषेला नाव प्राकृत हेच अधिक प्रिय होते (पृ. २९) केतकरांचे अनुमान आहे की, शातवाहनांच्या काळात अपभ्रंश भाषेचा उदय झाला असेल कारण शातवाहनांच्या काळी अपभ्रंशाचे अस्तित्व होते अशी साक्ष बृहत्कथा देते.
राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य दुर्गा भागवत यांनी संपादित केले असून त्याचा पहिला खंड मज्हाठ्यासंबंधाने चार उद्गार हा याविषयावर महत्त्वाचा प्रकाशझोत टाकतो. राजारामशास्त्री भागवत म्हणतात, महाराष्ट्र हा शब्द बराच जुनाट आहे. नंदाचे राज्य मगध देशावर असता म्हणजे शालिवाहन शकाचे पूर्वी सुमारे सव्वा चारशे वर्षे, वररुचि नावाचा विद्वान झाला. त्याने प्राकृत प्रकाश नावाचे प्राकृत भाषेचे म्हणजे संस्कृत नाटकातील बालभाषेचे व्याकरण केले आहे. त्या व्याकरणाचे अगदी शेवटचे सूत्र शेषं माहाराष्ट्रीवत् हे होय. अशोकाने महाराष्ट्र देशात धर्मोपदेश करण्यासाठी काही बौद्ध भिक्षुस पाठविले, अशी बौद्ध लोकांतही दंतकथा आहे. नंदाच्या नंतर चंद्गगुप्ताने राज्य केले. चंद्गगुप्ताच्या पाठीमागे त्याचा मुलगा बिंदुसार गादीवर बसला व बिंदुसाराच्या मागून त्याचा मुलगा प्रियदर्शी किंवा अशोक यांस गादी मिळाली. तेव्हा चांगला बावीसशे वर्षांचा मरहठ्ठ किंवा महाराष्ट्र शब्द आहे असे म्हणण्यास हरकत नाही (पृ ७ व ८)
ते पुढे म्हणतात, बाकी सर्व मज्हाठी भाषेप्रमाणे शौरसेनी भाषेचे नियम आहेत असे समजावे हा सूत्राचा अर्थ ज्यास आपण बालभाषा म्हणतो त्यात पूर्वीच्या काळी शौरसेनीही होती. शूरसेना म्हणजे मथुरामंडळ या प्रांताची जी पूर्वीची भाषा ती शौरसेनी. उंच जातीच्या व कुलीन बायका जी भाषा प्राचीन काळी नाटकात बोलत ती हीच, शौरसेनी नाटक म्हटले म्हणजे लोकस्थितीचे हुबेहुब चित्र होय. तेव्हा संस्कृतात नाटके ज्यावेळी होऊ लागली त्यावेळी कुलीन व वरिष्ठ जातींच्या बायकांची भाषा शौरसेनी होती, याविषयी काही संशय नको. या शौरसेनी भाषेची एक प्रकृती जशी संस्कृत तशीच दुसरी प्रकृती माहाराष्ट्री उर्फ अतिप्राचीन मज्हाठी, असे कात्यायन म्हणतो. शौरसेनीपासून मागधी व पैशाची नावाच्या बालभाषा निघाल्या. मगध म्हणजे गयेच्या व पाटणाच्या आसपासचा मुलुख या देशाची जी पूर्वीची भाषा ती मागधी. पंजाब वगैरे प्रांतातील रहाणाज्या लोकांचे पिशाच हे प्राचीन नाव दिसते. बाल्हीक म्हणजे बल्क, बुखारा, व समरकंद वगैरे ठिकाणचे लोक सर्व पिशाचांची संतति, असे कर्णपर्वात लिहीले आहे. या लोकांची पूर्वीची भाषा पैशाची. शौरसेनीपासून मागधी व पैशाची निघाल्या व शौरसेनेची प्रकृति जशी संस्कृत तशीच मज्हाठी असे कात्यायन म्हणतो. तर मग सर्व बालभाषांचे मूळ प्राचीन मराठी असा सिद्धांत केल्यास काहीच प्रत्यवाय नाही. गाथांची भाषा महाराष्ट्री असे अलंकारिक म्हणतात. गाथा शब्द आलेला गै धातूपासून गाथा शब्दाने प्रायः आर्या किंवा गीति संस्कृतात समजली जाते. या अलंकारिकांच्या नियमावरुन गाण्याची भाषा प्राचीन काळी माहाराष्ट्रीयच होती असे म्हणावे लागते. तेव्हा सर्व बालभाषांची प्रकृति व गाणी प्राचीन काळची ज्या भाषेत, अशी एक प्राचीन मज्हाठी भाषा होय... शौरसेनीची प्रकृति संस्कृत हे तर कात्यायनाने प्रकरणाच्या आरंभीच सांगितले आहे. असे असता अखेरीस शेषं माहाराष्ट्रीवत् असे कात्यायन पुनः म्हणतो, त्यापक्षी महाराष्ट्री व संस्कृत या दोहोंची परस्परनिरपेक्षता त्यास इष्ट होती असे दिसते. मूळचा शब्द पाहू गेले असता पाअड होय. पाअड शब्दाच्या जवळजवळ संस्कृतात प्रकट हा शब्द येतो. पाअड भाषा=प्रकट भाषा. म्हणजे अर्थात सर्व लोकांचा व्यवहार व दळणवळण जीत चालते ती. संस्कृत भाषा पडली धर्माची, अर्थांत धर्मप्रसार करणे ज्यांच्या हातात असल्या ब्राह्मणांची. ती काही सर्वसाधारण भाषा नव्हती. पण पाअड भाषा पडली वाहत्या पाण्याप्रमाणे. ते सर्वांचे जीवन तेव्हा सर्वांचाच संबंध तिच्याबरोबर. सहजच तीस पाअड म्हणजे सर्वास समजण्यासारखी असे अन्वर्थक नाव मिळाले, व धर्मभाषेचे संस्कृत म्हणजे थोड्याशा विद्वान ब्राह्मणांनी मिळून आपल्या बुद्धीप्रभावाने तकतकी आणलेली असे ब्राह्मणांनीच नाव पाडले. काही काळाने संस्कृत या शब्दाबरोबर मेळ दिसावा म्हणून पाअड शब्दाचे प्रकट रुप न करता प्राकृत असे रुपांतर केलेले दिसते.
त्यामुळे प्राकृत हा शब्द संस्कृतात दररोज पहाण्यात येणारे, अर्थात क्षुल्लक या अर्थाचा वाचक झाला. शिक्षा म्हणून वेदाचे एक अंग आहे. त्यात प्राकृते संस्कृते चापि (प्राकृत भाषेत व संस्कृत भाषेत) असा लेख आला आहे. त्यापक्षी प्राचीन काळीही प्राकृत ही स्वतंत्र भाषा समजण्याचा संप्रदाय पुष्कळ दिवसापासून होता हे उघड होय. तेव्हा माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या सर्व जितक्या पाअड भाषा होत्या तितक्या प्राकृत झाल्या व या प्राकृत भाषांचे प्राकृतप्रकाश नावाचे सूत्रमय व्याकरण कात्यायनाने पहिल्याने लिहीले. वर लिहीलेल्या पाचही भाषा पाअड भाषा इतकेच की सर्वात प्राचीन व सर्वाची प्रकृती माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मज्हाठी. महाराष्ट्रीपासून निघाली शौरसेनी व शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. तेव्हा मागधी व पैशाची ही दोन्ही प्राचीन मराठीची नातवंडे होत. शौरसेनीची खरी आई म्हटले म्हणजे एकटी प्राचीन मज्हाठी भाषा. (पृ. १२, १३)
प्राचीन मराठीतील १) गाथा सप्तशती २) प्रवरसेनाचे सेतुकाव्य ३) गौडवध ४) राजशेखराची कर्पुरमंजिरी हे ग्रंथ आणि गुणाढ्याचे पैशाची भाषेतील बृहत्कथा हे फारच महत्त्वाचा पुरावा होत. नंदाच्या वेळच्या शालिवाहनाचा गुणाढय हा प्रधान होता. त्या ग्रंथाची हल्ली संस्कृतात दोन श्लोकमय भाषांतरे विद्यमान आहेत. श्रीलंकेतील महावंश या पाली भाषेतील सिंहली लिपीतील ग्रंथात अशोकाने बौद्ध भिक्षू महाराष्ट्रात पाठविल्याचा उल्लेख आहे. भवभूतीच्यानंतर दोनशे वर्षांनी राजशेखर झाला. तो महेंद्गपाल राजाकडे आश्रयाला होता. तो स्वतःला महाराष्ट्र चुडामणी म्हणवून घेत असे.
इरावती कर्वे आपल्या मराठी लोकांची संस्कृती या ग्रंथात म्हणतात पश्चिमेकडील शक व महाराष्ट्रातील शातवाहन येण्याचे आधीच महाराष्ट्राच्या भूमीत संस्कृत वा संस्कृतोद्भव भाषा दृढमूल झाली होती व म्हणून बाहेरुन आलेल्या राजांनी द्गाविड भाषा न उचलता महाराष्ट्री (संस्कृत प्राकृत अवतार) आत्मसात केली. (पृ.२०३) त्या पुढे म्हणतात, सर्व भारताची संस्कृती ज्या काव्यामध्ये साकारली ते वैदर्भी रीतीत होते, म्हणजे विदर्भाचे संस्कृत परंपरेमधील स्थान लक्षात येते. जसा अपरान्त त्याचप्रमाणे विदर्भ ही अति प्राचीन आर्य (संस्कृत बोलणाराची) वसाहत होती. दोन्हीही वसाहती वन्यांच्या प्रदेशात झाल्या. संस्कृत द्गाविडांशी लढा करुन नव्हे. पहिल्या प्रख्यात वैदर्भीचे नांव लोपमुद्गा आहे. हे नांव आर्य नव्हे ते लोपामुंडा ह्याचे तर रुप नव्हे ना? मुंड लोकांची राजकन्या लोपा असा त्याचा अर्थ होईल. मुंडांचा नागांशी संबंध होता, त्याबद्दल बौद्ध वाङ्मयात पुरावा सापडतो.
कोसलाचा राजा पसेनदी हयाचे मनात गौतम बुद्धाच्या घराण्यात लग्न करुन बुद्धाचे नातेवाईक व्हावे असे होते. वासभखत्तिया यांच्या विवाहातून जन्मलेल्या विदुडभ याने सर्व शाक्य कुळाचा नाश केला. ही कथा पाली वाङ्मयात सांगितली आहे. इ.स. पूर्व ५०० ते ६०० वर्षांची ती कथा आहे. म्हणजे त्यावेळी नाग व मुंड एक असावेत असे दिसते. (पृ. २१३ व १४)
इरावती कर्वे यांनी पुढे या संदर्भात अधिक माहिती देताना म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राजे सातवाहन यांनी प्रतिष्ठान उर्फ पैठण येथे राज्य केले. प्राकृत भाषेला उत्तेजन दिले. व पर्यायाने मराठीच्या जन्माला मदत केली. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व संतकवीचा जन्म मध्य महाराष्ट्रात झाला व हल्लीच्या मराठीचे स्वरुप त्यांनी निश्चित केले. ह्या प्रदेशाला जुने नाव अश्मक असे आहे. ...अश्मकाचे सर्वात प्रसिद्ध राजे म्हणजे प्रतिष्ठानचे शातवाहन. त्यांचे आधी प्रतिष्ठानला नरसिंह नावाचा राजा होता. असा उल्लेख सोमस्वामीच्या कथा सरित्सागरात सापडतो. त्या कथेबद्दल कै. श्री. व्यं. केतकरांनी प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात लिहीले आहे.. शातवाहनांना संस्कृत माहीत नव्हते, त्यांनी प्राकृताला आश्रय दिला, महारठी नावाच्या मांडलिक राजांशी लग्नसंबंध जोडला असे दंतकथा व शिलालेखांवरुन दिसते. ...शातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव ह्या घराण्यांनी महाराष्ट्रावर एकामागून एक राज्य केले. महाराष्ट्रातील बुद्ध लेणी शातवाहनांच्या व वाकाटक आणि चालुक्यांच्या कारकिर्दीतील आहेत. त्यातील सर्व लेख प्राकृतातील आहेत. लिलावती ह्या अपभ्रंश भाषेत लिहीलेल्या काव्यात सुप्रसिद्ध बौद्ध पंडीत नागार्जुन हा हालाचा मित्र व हितोपदेशक होता असे म्हटले आहे. ...त्यांच्या संबंधी रठ्ठ आणि महारठ ह्यांची नावे शिलालेखात येतात. ह्यांचे प्रमुख शिलालेख पश्चिम महाराष्ट्रातच आहेत. ...आंध्र व कर्नाटक अशा दोन संस्कृतीसंपन्न राष्ट्रांशी बरोबरी करून मराठीने आपल्या दक्षिण सीमा पक्क्या केल्या, एवढेच नाही तर मराठी भाषा कर्नाटकाच्या गाभ्यापर्यंत पोचली, ह्याला अनेक सांस्कृतिक कारणे आहेत. प्रख्यात सूत्रकार बौद्धायन व आपस्तंभ दाक्षिणात्य होते. बृहत्कथेत अपाणिनीय अशा ऐन्द्गादी व्याकरणांचा उल्लेख येतो ती दक्षिणात्यांनी रचिलेली होती असे दिसते. ...चालुक्य व राष्ट्रकूट दोघेही जैनानुयायी होते, व त्यांच्या आश्रयाखाली पुष्कळ महत्त्वाचे जैन ग्रंथ महाराष्ट्रात लिहीले गेले. पुष्पदंताचे हरिवंशपुराण राष्ट्रकूट राजांच्या अमदानीत मान्यखेड (मालखेड) येथे रचले गेले. कर्नाटकाच्या गाभ्यात महाराष्ट्री भाषेत ग्रंथनिष्पती राजाश्रयाने होत होती असे स्पष्ट दिसते. ...श्रवणबेळगोळचा हा शिलालेख मराठ्यांच्या आक्रमक राजसत्तेचे प्रतीक नसून जैनांच्या धर्मप्रसाराचे आहे. ...मध्ययुगातही भाषेच्या बाबतीत मराठीची आई जी महाराष्ट्री, तिचे वर्चस्व दक्षिणेत होते व तीत उत्तम ग्रंथांची उत्पत्ती होत होती.
कोऊहल कवीने रचलेल्या लिलावती काव्यात तो स्वतःचे काव्य मरहठ्ठ देशी लिहील्याचे सांगतो. काव्याचा काळ सुमारे ख्रिस्ताब्द ८०० असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. ...शातवाहन हे राजाचे नाव ख्रिस्तपूर्व दुसज्या शतकापासून तो थेट सत्पशती हालापर्यंत आढळते. ह्यातील एका शातवाहनाची (ख्रिस्तपूर्वीच्या शातवाहनाची) राणी पंडीता होती. ती राजाजवळ विनोदाने जे संस्कृत बोलली ते राजाला कळले नाही. म्हणून ती हसली व राजा अपमानित होऊन निघून गेला. राजाने सहा महिन्यात भाषा शिकण्याचा निश्चय केला व तो जी भाषा शिकला ती प्राकृत, हा कथाभाग बृहत्कथेच्या आरंभी येतो. व त्यात वररुचीचे नाव प्रामुख्याने येते. ...मराठी वाङ्मयाच्या प्रौढत्त्वाची, स्वयंसिद्धतेची बीजे ही ह्या प्राकृत वाङ्मयात आहेत. बृहत्कथेला जगातील कथावाङ्मयात तोड नाही. ... हालाच्या सप्तशतीतील काव्यही लोकवाङ्मय आहे. कुठल्यातरी राज्याच्या राजकवीने केलेले ते काव्य नसून महाराष्ट्रात प्रचलीत असलेल्या लोकप्रिय काव्याचे ते संकलन आहे. त्यात राज्यांच्या दरबाराचे चित्रण नसून गावगाड्याचे, पाटलाचे, पाटलाच्या सुनेचे म्हणजेच महाराष्ट्राच्या साध्या ग्रामीण जीवनाचे चित्र पाहवयास सापडते. लिलावती ही अदभुतरम्य कथा हाल राजाबद्दल आहे. त्यातही महाराष्ट्राचा प्राण जे प्रतिष्ठान नगर व तेथील गोला उर्फ गोदावरी नदी व तीत नहाणाज्या, अंगाला हळद फासणाज्या महाराष्ट्र सुंदरीचे वर्णन आढळते. हा कवी आपल्या भाषेला मरहठ्ठ देसी भाषा असे नाव देतो (पृ. २२३-२६)
दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे की, जुनी महाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. (पृ.२)
थोर संशोधक श्री.व्यं.केतकर, राजारामशास्त्री भागवत, वि.का.राजवाडे, इरावती कर्वे, कृ.पां.कुलकर्णी, दत्तो वामन पोतदार, वि.ल.भावे, रा.भि.जोशी आदींच्या उपरोक्त संशोधनाच्या आधारे माहाराष्ट्री (मराठी) भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. माहाराष्ट्री, मज्हाठी, मराठी भाषेचा हा अडीच हजार वर्षाचा प्रवास साधार उलगडला म्हणजे मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्याचे निर्विवादपणे सिद्ध होते.
साभारः हरी नरके.
श्री बकासुरे करवियले, मायबोलि
श्री बकासुरे करवियले, मायबोलि सुत्ताले करवियले.
>>साभारः हरी नरके. गुलमोहरात
>>साभारः हरी नरके.
गुलमोहरात स्वतःचे साहित्य लिहीणे अपेक्षित आहे असा नियम आहे ना?
गाथा सप्तशतिच्या या धाग्यावर
गाथा सप्तशतिच्या या धाग्यावर प्रतिक्रिया देता आली नाही म्हणून सर्च मधून मिळालेल्या या धाग्यावर माहिती देतोयः
आताच एका मित्राकडून मिळालेल्या माहितीमुळे माबोकरांना कळावे यासाठी ही माहिती देत आहे.
स. आ. जोगळेकरांचा दुर्मिळ असलेला 'गाथा सप्तशति' हा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला जोगळेकरांची ५०० पानी प्रस्तावना आहे यावरुनच या ग्रंथाचे महत्त्व लक्षात यावे किंमत १,००० रुपये. सवलत मूल्य ७५० ते ८०० रुपये. पुण्याच्या 'अक्षरधारा' मधे ती उपलब्ध आहे. बाकी मागणी नोंदवल्यास तुमचे विक्रेते २००० वर्षांपूर्वीचा हा महान ग्रंथ उपलब्ध करुन देऊ शकतील
जागोमोहनप्यारे | 25 October,
जागोमोहनप्यारे | 25 October, 2011 - 03:27
श्री बकासुरे करवियले, मायबोलि सुत्ताले करवियले.>>>>
लेख खूप आवडला
लेख खूप आवडला
http://www.indianexpress.com/
http://www.indianexpress.com/news/marathi-may-become-the-sixth-classical...
चांगला लेख दिलेला आहे. गूगल
चांगला लेख दिलेला आहे. गूगल सर्च मधे पुन्हा मायबोलीवरचे लेख सापडले. मायबोलीवरच असे विवेचन झाले आहे याची कल्पना नव्हती.
आक्षेप घेणा-यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटली.
या लेखात कुठेतरी मराठी ही प्राचीन आहे आणि तिच्यातून इतर भाषांची उत्पत्ती झाली आहे असं गृहीतक आहे का ? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा हेतू मनात धरून सध्या काही संशोधन चालू आहे. एखादा हेतू मनात धरून केलेल्या संशोधनाकडे अधिक चिकित्सक नजरेने पाहता येण्यासाठी त्या क्षेत्रातला अधिकार असणा-या व्यक्तींची आवश्यकता असते. माझ्यासारख्या या विषयात केवळ रस असणा-याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. विद्वानांचे विश्लेषण अपेक्षित आहे.
सदर विद्वान साहेबांचे (हरी नरके) इतर ठिकाणी प्रकाशित झालेले लेख वाचनात आले. त्यातला एक इथे देत आहे. या दोन्ही लेखांत एकच सूर आहे का याबद्दल किंचित गोंधळ आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/dainikbhaskar2010/scripts/print/print_ph...