'आसरा'- अर्थहीन....... तुझ्याविना!! (अंतिम भाग)

Submitted by बागेश्री on 31 August, 2011 - 14:49

- कथेचा पहिला भाग इथे आहे.

- कथेचा दुसरा भाग इथे आहे.
------------------------------------------------------------------

...भरपुर मालमत्ता घेऊन राजीव घरातून परागंदा झाले... ह्या धक्क्यानेच दादांनी हाय खाल्ली!

त्यांना शोधण्याचे दादांनी सारे प्रयत्न केले, गाव अन् गाव धुंडाळलं..
प्रत्येक वेळेस निराशाजनक खबर ऐकताच ते खचत गेले..... खचतच गेले... दुरावले पार!

"माझ्या हट्टापायी माझ्या मुलाचा संसार मोडला" असा शोक करत-करतच दादांनी जग सोडलं!

होत्याचं 'नव्हतं' झालं!!

घर सोडून जातांना राजीवने माझ्या उशाशी ठेवलेल्या एका पत्राचे, गेल्या १६ वर्षांत मी लाख वेळा पारायणं केली असतील.....

>>>>>>

किशोरी,
तुला 'प्रिय' म्हणण्याइतपतही सख्य जाणवत नाही आज....
मी घर सोडुन जातोय! कदाचित कायमचा! मला माझ्या पद्धतीने जगायचंय,तुझ्या किंवा दादांच्या नाही!
आईमागे 'मला' समजून घेणारं कुणी नाही, समजलंय मला...!

तुझ्या सर्व वेळ मला अन् दादांना एकत्र आणण्याच्या 'भानगडीत' गेला... ते असं अंतर होतं जे आम्ही दोघांनाही 'जपलं' होतं...

भावनिक आधार 'दादा' कधी देऊ शकले नाहीत,
आणि आर्थिक दिला नाही- देऊ शकत असुनही!!

जिथेही जातोय तिथे 'किशोरीबाईंचे पती' किंवा 'सरपंचांचा मुलगा' हीच ओळख आहे! तेच पुसायचंय!

मला शोधु नका, त्याची 'गरज' नाही!

तू माझी 'होऊ' शकली असतीस, तर आज 'सोबत' घर सोडलं असतं..

असो!
प्रसिद्धी मिळवत रहा..
बंगला सोडू नकोस..
झोपडीतून महालात आणलंय.... राणीसारखीच रहा..!
-राजीव

>>>>>>>>

ह्या पत्राने १६ वर्षांत लाख वेळा मला संपवलं!
राजीवच्या घरातून जाण्यानंतर, दादा गेले.... माझं गाणं पुन्हा एकदा उपजिवीकेचं माध्यम झालं!

बंगल्याला "आसरा" नाव दिलं आणि येणार्‍या- जाणार्‍या वाटसरुंना 'विश्रामघर' देऊ केलं..
गावात कुणाचं दुखलं खुपलं सांगत लोक येत, मन हलकं करत नी जात... जमेल ती आर्थिक मदत मी करी..

सार्‍यांना हक्काचं घर मोकळं करून दिलं... माझं साध्वीपण जपत!

आणि आज,
हाच "राजीव" परत आलाय... आसर्‍यात आलाय...
नदीकाठच्या देवळाच्या पायरीवरून खाटकन उठले.. राजीवने आज सकाळी पुन्हा एक पत्र ठेवलं होतं!

>>>>>>

प्रिय किशोरी,
कुठल्या नात्याने आज 'प्रिय' म्हणतोय, विचारु नकोस!
तब्बल १६ वर्षांनी मी परतलोय अन् तू 'तोच' बंगला किती प्रेमाने सांभाळलास हे जाणवलं! पंचक्रोशीत आजही नाव आहे तुझं ते तुझ्या 'सेवाभावी' वृत्तीनं आणि गायकीनं...!

मला स्विकारशीलच ह्या विश्वासाने आलोय आणि हो खूप पैसा कमावला आहे मी.... नावही!!
सारं तुझ्याचसाठी आहे! आता गाणं करत गावोगाव जाण्याची 'गरज' नाही तुला..

खरं तर माझ्यामागे, दादा गेल्याचं कळालं होतं मला पण आलो नाही मी, माझ्यासाठी जीव जाण्याइतपत प्रेम होतं त्यांच्या मनात, हे पटलंच नाही मला!

असो!
आपल्यासमोर उर्वरित आयुष्य आहे, भुतकाळ विसरुन, तुझा हात हातात घेऊन जगावं म्हणतो.. गरज आहे मला साथीदाराची..

तू फक्त माझी आहेस म्हणून आजवर वाट पहात हे 'एकटीचं जीणं' जगलंस ना?
खरंच "पाण्यासारखी" आहेस तू , पवित्र, निर्मळ.. हव्या त्या रंगात ओतलं की तोच रंग घेणारी...

मी आलोय परत.. तुझा निर्णय वेगळा नसावाच... बोलूच सविस्तर!

-तुझाच, राजीव.

>>>>>>>>>>

तिरस्कार!! तिरस्कार दाटून आला माझ्या मनात.. द्वेष!
'स्वतःचाच'!

कोण मी?
का जगले? का जगतेय? प्रत्येकाने हवं तसं वागवुन घेतलंय!
नियतीनेही!

आज हा परत आलाय, ह्याला मी हवीये कारण; कारण ती त्याची 'गरज' आहे- आयुष्याच्या उतरत्या काळात साथीदाराची गरज आहे!!
माझ हात झिडकारून हा निघून गेला, कारण, तेव्हा 'पैसा- नवा व्यवसाय' ही त्याची गरज होती..
दादा गेल्याचं कळूनही आला नाही कारण, दादांचा फक्त पैसा हवा होता आणि ती गरज भागली होती!

जगणं हीच त्याची 'गरज' होती..
आणि आता "माझीही"!!!

त्या पत्रांचे तुकडे करून उधळले, हातातला कुंकवाचा खडा त्या शांत नदीत भिरकावला मी...!
तरंग उठले! काठापर्यंत येत गेले!
पाणी पुन्हा पूर्ववत झालं!
खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!

देवळातून घरी परतले, तो राजीव मालकाचा 'आव' आणून 'आसर्‍यात' पेपर वाचत बसला होता!

मी जाताच, हसत- उठून म्हणाला, "होतीस कुठे? किती वेळ झालाय तुला जाऊन? आणि काय, आज शिरा होता.. अजुनही माझी आवड लक्षात आहे? पण अगं आता मी गोड खात नाही, साखर झाली आहे मला.. ते सोड, पत्र वाचलंस ना..? मग सहजीवनाची करायची सुरुवात?"

"राजीव, बोलायची इच्छा नाही माझी"

निघुन गेले मी तिथून...माळावरच्या खोलीतच बंद होते दिवसभर!

राधा बिचारी, सैरभैर.. कशाचा ताळमेळ लागेना तिला.. कोण हा? बाईसाहेबांशी एकेरी कसा बोलतो? अनेक संभ्रमात असावी! मला रात्रीचं जेवणही वर आणुन दिलं तिनं!

रात्री सगळीकडे नीज झाल्यावर एक लहानगी पेटी घेऊन उतरले... चार साड्याच्या पलीकडे, माझं असं होतंच काय? आणि माझा तानपूरा!!

अलगद 'आसर्‍या' बाहेर पडले!

इथली माझी 'गरज' संपली होती!

ह्या घराचा 'मालक' परत आला होता....!
आणि केवळ त्याच्या गरजेपूरतं आता मला जगायचं नव्हतं!

क्षणभरच रेंगाळले... दादांनी लावलेल्या गुलाबाच्या, जाई-जुईच्या फुलांचा गंध उरात साठवला...
पाय अडखळले ते 'माळी-काकां' साठी...
बंगल्यामागच्या त्यांच्या झोपडीत जाऊन आशीर्वाद घ्यावा का?
म्हणतील, "किशुरी, माजी बाय, जा गं तू ह्या बंगलेतून... जळू नगंस हिथ... सूखी र्‍हा माय..."

पण, कुठल्याही मोहात न पडता झपाझप निघाले....

उगवणारा सुर्यच ठरवणार होता.... माझा मार्ग, जगण्याचा!!!

"तुम्हे ना अपनायाँ तो क्या?
कोई मंजील पां ही लुंगी
"आसरा" न रहा तो क्या
बस अब, मैं भी "जीं" लुंगी!!"

गुलमोहर: 

बागे, मी सांगितलं ना कि आज फिल्डिंग लावुन बसेन. आताच सोसायटीच्या गणपतीचं डेकोरेशन करुन आले आणि चान्स घेतला तर मीच पहिली. बघ माझी will power. Happy

मस्त लिहिलंयस गं. खुप सुंदर. इतकी हळवी आणि उत्कट बागी, किती कणखरही आहे हे दिसलं. लेखकाचं मनच दिसतं ना त्यांच्या लिखाणातुन. मी तुला सांगितलं कि सुखान्त लव स्टोरी लिही. ही सुखान्तच आहे. ती त्याच्याकडे परत गेलेली मला नसतं आवडलं. थँक्स गं ! मला आवडली ही दीर्घ कथा. आता पुढे??? Happy

हे मनी....
खरंच फिल्डींग पाहिली तुझी मी... Happy
हो, हिला सुखान्तच म्हणावं लागेल! खराय मनी तुझं, लेखकाचं मन उमटतं, इथे कणखरपणा आलाच आहे जरा...

तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप्पच आभार... आता पुढे?- बघू काय आणि कसे सुचते ते, काही ठरवलं नाही गं Happy

छान लिहीली आहेस गं ही कथा बागेश्री...आवडली Happy

मस्त लिहिलंयस गं. खुप सुंदर. इतकी हळवी आणि उत्कट बागी, किती कणखरही आहे हे दिसलं. लेखकाचं मनच दिसतं ना त्यांच्या लिखाणातुन. ती त्याच्याकडे परत गेलेली मला नसतं आवडलं.>>>> मनिमाऊ ला अनुमोदन

लेखनः
पाल्हाळ न लावता मोजक्या शब्दात प्रभावी लेखन. घर आणि ठिकाणांची वर्णनं तर अप्रतीम - मनिमाऊ म्हणते तसं ती ठिकाणं टिव्हीवर बघतोय असं वाटतं.

कथा:
मनिमाऊला संपूर्ण अनुमोदन. बागेश्री, शेवट अनपेक्षित होता असं म्हणणार नाही, कारण तुझ्या एकंदर लिखाणाचा रोख लक्षात घेता तू असा शेवट करशील असा अंदाज होता, आणि तसा तो तू केलास याबद्दल अभिनंदन. किशोरीच्या दृष्टीने सुखांतच आहे हा. पर्याय निवडायचं स्वातंत्र्य तिने मिळवलं.

>>खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!

जबरदस्त पण तितकंच कटू सत्य.

गृहित धरणं - being taken for granted - हा सगळ्यात मोठा अपमान आणि 'स्व'त्वा वरचा जीवघेणा हल्ला असतो. आणि तो एकदाच होत नाही. हळू हळू आयुष्य पोखरतो. कॅन्सरसारखा. फक्त तसं होतंय हे जाणवण्यासाठी एक क्षण यावा लागतो.

एक सल्ला:
तुझ्या लिखाणाकडून अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत.
अवास्तव असली, तरी तेंडुलकरने प्रत्येक वेळी शतक ठोकावं अशी अपेक्षा असते क्रिकेटरसिकांची.
त्यामुळे पुढची कथा लिहीण्याआधी जरा वेळ घे.

शुभेच्छा आहेतच Happy

मनिमाऊला संपूर्ण अनुमोदन. बागेश्री, शेवट अनपेक्षित होता असं म्हणणार नाही, कारण तुझ्या एकंदर लिखाणाचा रोख लक्षात घेता तू असा शेवट करशील असा अंदाज होता, आणि तसा तो तू केलास याबद्दल अभिनंदन. >>>>>> आभार मंदार!! तू विचार केलास तर तशी ही कथा निव्वळ "एका" दिवसा भोवतीची आहे, तिने सकाळी (दुसरे) पत्र वाचल्यापासून ची तिची घालमेल आणि अंती-रात्री तिने घेतलेला निर्णय... मधला फ्लॅशबॅक!! ती घालमेल उतरवताना जर, तिचा निर्णय आधीच वाचकांना स्पष्ट होत असेल तर आनंदच आहे!

पुढच्या कथेचा सध्यातरी काही विचार नाही! शिवाय, सल्ल्यारूपी कॉम्प्लिमेंटबद्दल विशेष आभार Wink

ये हुई ना बात! ती त्याच्याकडे परत जात नाही हे वाचून माझा जीव भांड्यात पडला Happy तरी दादांनी बंगला सुनेच्या नावावर केला असता तर त्या राजीवला त्याच्या ट्रंकेसकट बाहेर काढणारी किशोरी जास्त आवडली असती. अर्थात हे थोडं फिल्मी झालं असतं म्हणा. Proud पण त्या राजीवचा मला भारी राग आलाय. #@$$$

>>खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
>>काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली >>खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!

हे भारी आवडलं. हॅट्स ऑफ टू यू.

खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!>> अप्रतिम बागेश्री! खूप खूप सुंदर जितकी हळवी तितकीच कणखर कथा. शेवटचा शेर तर उच्च! कथेचं सार सांगणारा...

पुढच्या कथेची चातकासारखी वाट बघतेय...

या कथेवर एखादी सिरिअल किंवा लघुचित्रपट काढायला हरकत नाही.
मिडीयातले मायबोलीकर, कुणाचं लक्ष आहे का इकडे?

चांगली लिहीली आहे कथा Happy अश्या कथाबीजावर यापूर्वी ही कथा वाचल्या आहेत, तरी तुमची शैली ओघवती आहे म्हणून वाचताना उत्सुकता टिकुन रहाते. Happy

खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!

हे ब्येस्ट!

पण something was missing here... कदाचित पहिल्या दोन भागांमुळे अपेक्षा वाढल्या असतील! Happy

सुंदर कथा बागेश्री... स्मित:
कथेचा शेवट अगदी योग्य... माघार घेतली नाही हे जास्त आवडल. Happy

पण मला तरी असा शेवट झालेला आवडला असता...
तो जसा तिच्या उशाशी पत्र लिहून जातो, तसच हिनेही कराव अस वाटून गेल. शेवटच्या ओळी तिने पत्रात लिहल्या असत्या तर... अर्थात ति तिथून निघून गेली यातच सगळ आल.. पण मला आपल सहजच असा शेवट असावा अस वाटल. Happy

आभार सगळ्या मित्र-मैत्रिणींचे!!

ह्म्म.. विषय नेहमीचाच होता, पण मला, 'माझ्या शब्दांत आणि वर्णानांत' कशी लिहीता येते, हा प्रयोग पाहायचा होता करून Happy

खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!

व्वा. Happy

कथा छान आहे. आवडली. विषय नेहमीचाच तरी चांगला हाताळलाय.
१-२ त्रुटी राहिल्या आहेत अस वाटतय.
१> राधा जर १५ वर्षापुर्वी आली असेल तर तिला "हा" प्रकार माहीत असायला हवा होता. कीशोरी च्या लग्नाला १६ वर्षे झाली असली तरीही १-२ वर्षे भांडनात नक्कीच गेली असतील

२> कीशोरी चे भुतकाळातले स्वगत देवळात चालु होते ते तेथेच संपायला हवे होते.

तिच्या त्या "पत्रांचे तुकडे करून उधळले, हातातला कुंकवाचा खडा त्या शांत नदीत भिरकावला मी...!" ह्या वाक्यातल स्वगत खटकतय.

३>मग सहजीवनाची करायची सुरुवात?--खूप नाटकी वाटतय

आगाउ सल्ल्या बद्धल क्षमस्व
पुढील लिखाना साठी शुभेछा!

तीनही भाग आज वाचले. कथा आवडली. थोडक्यात बरंच सांगण्याची हातोटी चांगली आहे.

“खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!"

हे मस्तच लिहिलंय…… मुक्तछंद वाचतोय असं वाटलं.

छान केला शेवट.....ती त्याच्याकडे परत गेलेली मलाही नसतं आवडलं.

खडे फेकून मारणाराच असा असतो... शांत "पाण्याला" ढवळणारा, हवं तेव्हा!
काठाशी उभा राहून तो खडा भिरकावतो... तरंग उसळतात.. हळू-हळू शांतही होतात... खडा मारल्याने झालेली खळबळ आणि शांत होण्यासाठी पडलेले प्रयास, हे त्या "पाण्यालाच" ठाऊक.... खडा मारणारा मात्र निर्विकार!

व्वा. नि:शब्द केलंस अगदी बागे. कथा खरंच खूप प्रभावी वाटली. नायिका त्याच्याकडे परत गेली असती तर खरंच नसतं आवडलं. स्वप्ना ने म्हटलंय तसं तिने दूर न जाता राजीव ला हकलून स्वतःचं तिथलं अस्तित्व सिद्ध केलं असतं तर जास्त आवडलं अस्तं. अर्थात हा शेवट पण भावलाय. तिला ''तिचं'' आयुष्य ''जगायला'' घराबाहेर पडावं लागलं याचं वाईट वाटलं. दुसर्‍याना ''आसरा'' देणारी ''ती'' आज आसराहीन झाली होती.

>>स्वप्ना ने म्हटलंय तसं तिने दूर न जाता राजीव ला हकलून स्वतःचं तिथलं अस्तित्व सिद्ध केलं असतं तर जास्त आवडलं अस्तं. अर्थात हा शेवट पण भावलाय. तिला ''तिचं'' आयुष्य ''जगायला'' घराबाहेर पडावं लागलं याचं वाईट वाटलं. दुसर्‍याना ''आसरा'' देणारी ''ती'' आज आसराहीन झाली होती.

अनुमोदन टोके.

Pages