"तुमच्याकडे गौरी असतात? उभ्याच्या?"
शाळेत अगदी नकळत्या वयातही नव्या मैत्रिणीला माझा हा हमखास प्रश्न. जणू हिच्याशी आपलं किती जुळेल हे तिचं आणि गौरींचं आपल्याइतकं मेतकूट आहे का नाही यावर अवलंबून असणार होतं. 'गौरी असतात' हे म्हटल्यावर बडबडीसाठी एक मोठा मुलुख इनामात मिळल्यासारखं होऊन जायचं. मग खड्याच्या, सुगडाच्या,शाडूच्या की आमच्यासारख्या पितळेचे सोनेरी झगझगते मुखवटे असलेल्या उभ्याच्या यावर पुढचे प्रांत पडत जायचे. 'गौरी नाहीत' असे ऐकले की मला फार दमल्यासारखे होऊन जायचे आधीच. कारण मग इतिपासून अथपर्यंत तिला 'महालक्ष्म्या' विषयात माहितगार करुन सोडणे हे माझे कर्तव्यच असायचे. पण मग सारखे एकटीने बडबडून तोंड दुखायला लागत असे. दोघींकडे गौरी असल्या की गप्पांना ऊत येई.
गौरींचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासून. दिवाळीपेक्षाही गौरी गणपती मला फार आवडतात. सगळीकडे उत्साहाचं मांगल्याचं वातावरण.
वर्षभराच्या कष्टाचं, साठवणीचं चीज म्हणजे दिवाळी. तृप्तीनं, सुखानं समाधानानं उजळलेले चेहरे म्हणजे दिवाळी. नात्यांच्या कर्तव्यपूर्तीचे माप पदरात पडण्याचे दिवस म्हणजे दिवाळी. गौरी गणपती हा तर पाहुण्यांसाठीचा खास सण. घरी आलेल्या अतिथीचा मनापासून आदरसत्कार करायची शाळाच जणू. वेगवेगळ्या मूर्तींनी, सजावटीच्या सामानाने नटलेली बाजारपेठ महिनाभर आधीच त्यांच्या येण्याची चाहूल देते. घराघरात वर्षानुवर्ष चालत आलेल्या रिवाजाप्रमाणं तयारीला सुरुवात होते.
दिवाळी आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी साजरी करु पण गौरी गणपतीला ते स्थान, ती माणसं यांचं त्या त्या ठिकाणी असण्याला एक विशिष्ट महत्त्व असतं. जगाच्या पाठीवर कुठलाही गणेशोत्सव 'पुण्यासारखा' कधीच वाटणार नाही मला. गणपतीत आनंदाला धार्मिकतेचं कोंदण मिळाल्यानं की काय वसा, वारसा, संस्कृतीच्या अनाकलनीय जबाबदार्या पार पाडल्याचं अस्फुट समाधान नकळत मन शांत करुन जातं.
माझी आजी प्रचंड हौशी, कष्टाळू आणि मायाळूही. वर्षातला एकही महिना आमच्या घरात सण, कुळधर्म, कुळाचार यांशिवाय गेल्याचं मला आठवत नाही. रथसप्तमीला त्या सुगडातून दूध कधी ऊतू जातंय याची वाट बघत बघत उन्हानं कानशिलं तापली की आजी आत घेऊन जायची. मग दुपारनंतर कधीतरी त्या सुगडावर दुधाचे ओघळ गेलेले दिसले की तणतणत घरात येऊन "मला बघायचं होतं की!" असं भोकाड. मग आजी सहजच म्हणे, "पुढच्या वर्षी बघू हां." ते वर्ष कधी आलंच नाही, आणि दूध ऊतू घालवायला रथसप्तमीचीच काय गरज? हा प्रश्न मलाही कधी पडलेला आता आठवत नाही. खंडोबाचं, देवीचं आणि नरसिंहाचं अशी तीन तीन नवरात्र आमच्या घरी!
गोकुळाष्टमीला हिंडून फिरून माती आणायची. त्याचा चिखल करायचा. पाटावर मातीचं गोकुळ थाटायचं. त्यात गायी, उखळ, रवी, गोवर्धन, बासरी इ. सार्या प्रतीकांसोबत कालिया, पुतना आणि कंस मामाही असायचे. त्याला ज्वारीच्या दाण्यांनी सजवायचं. ते सगळं करुन झाल्यावर रात्री बरोबर बारा वाजता कृष्णाची पूजा करुन दहीपोह्याचा प्रसाद खायचा. दुसर्या दिवशी त्या गोकुळाचं काय व्हायचं ते तो कृष्णच जाणे. तीच गोष्ट रामजन्माची. नरसिंहजयंतीला, हनुमानजयंतीला सुंठवडा असणारच. एक चिमूट सुंठवड्याने वर्षभर मारुतीसारखी शक्ती कुठे येणार होती? हरितालिकेचा उपास रात्री रुईचे पान चाटून सोडताना आम्हाला जाम मजा वाटायची. अनंत चतुर्दशीला अनंताचीही पूजा आमच्या देवात व्हायची. आजी आणि तिच्या भाबड्या श्रध्दा. तिनं कधी सुनांना त्याचा कहर केला नाही. मला जमतंय तोवर मी करेन, तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा इतका साधा सरळ विचार होता. तिला दुखवायचं नाही हे तत्त्व आण्णानाच इतकं जपताना पाहून नकळत हे सारं आमच्याही अंगवळणी पडत गेलं म्हणण्यापेक्षा भिनत गेलं.
आमच्या माळ्यावर महालक्ष्म्यांच्या सामानाची एक मोठी लाकडी पेटी होती. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून पळून जाताना वापरलेल्या पेटार्यापैकीच हा असणार अशी मला खात्रीच. गौरी बसायच्या आधी आठवडाभर काकाच्या मागे लागून आजी तो जगड्व्याळ पेटारा उतरवून घेणार, त्यातल्या एकेक वस्तू काढून पुसून ठेवणार. दरवर्षी शोधाशोध नको म्हणून गौरीसाठी लागणार्या एकूण एक वस्तू त्यात असत. वस्तूंचे तरी किती प्रकार! डझनभर हरितालिका, गौरींचे मुखवटे, हात, साड्या, खण, दागिने, वेण्या, हार, लाईटच्या माळा, वायरी, होल्डर्स, एक्सटेन्शन, मागे पडदा म्हणून सोडायच्या भरजरी साड्या, नक्षीची चादर, खोटी फळे, परडी, कलाबतू, झिरमिळ्या, लाकडी सैनिक, राजा राणी, बाळ, मातीचे हत्ती, हरीण, वाघ, सिंह, कापसाचे ससे, खारुताई, पोपट, मोर, राजहंस, कुत्रा, मातीच्या बाहुल्या, एअर इंडियाचा महाराजा.. सारे वर्षभर पेटीत निपचित एकमेकांशेजारी पडून असायचे. नाटकात युध्द झालं की सारे तात्पुरते स्टेजवरच आडवे पडलेले असताना अंधार करतात तसे. मग या गौरी गणपतीच्या पाच दिवसात त्यांच्यात जणू प्राण फुंकले जायचे आणि त्या चार बाय सहाच्या जागेत उभा राहायचा एक रंगमंच!
महालक्ष्म्या बसायच्या दिवशी मुखवटे चिंचेनं, लिंबानं आई लख्ख घासून ठेवायची. मी घासले की तिला त्यावर पाण्याचेही डाग दिसणार! मग ताई त्यांचे डोळे, भुवया, कुंकू लाल,काळ्या गंधानं ठळक करत असे. ते तेजाळ मुखवटे नथ, मंगळसूत्र घालून डोक्यावर खण घेऊन स्वयंपाकघरात पाटावर बसले की वाड्यातल्या कुणी श्रीमंत सवाष्णीच सकाळच्या घाईत कसलंसं आमंत्रण घेऊन आल्याचा भास व्हायचा. दुपारी एकपर्यंत जेवणं करुन इतक्या वेळ ज्यासाठी वाट बघितली ती वेळ यायची. आरास! आजी आणि ताई या 'व्यवस्थित' आणि कलागुणी मेंबरांकडे साड्यांची मुख्य कामगिरी असायची. मी आणि मधली बहिण आईच्या देखरेखीखाली त्या पेटीतले जंगली प्राणी, बाहुल्या, फळे यांची निरर्थक संगती लावत मांडून ठेवायचो. कधी सिंहाच्या तोंडाजवळ राणी तर कुत्र्याचे लवून स्वागत करणारा एअर इंडियाचा महाराजा असे सीन झालेले नंतर लक्षात आले कि हसता हसता पुरेवाट व्हायची.
हरतालिकांपेक्षा उंच खारुताई फळांकडे टुकुर टुकुर बघत बसायची. त्यातच घरी केलेले चकल्या, करंज्या, लाडू, शेव, चिवडा, शंकरपाळ्या असे फराळाचे पदार्थ ग्लासात गहू तांदूळ भरुन कमी अधिक उंचीवर ठेवायचे. करंज्या, लाडूंचा एकेक डबा गौरींच्या पोटात म्हणजे स्टँडमध्ये ठेवायला विसरायचं नाही. मग वाजत गाजत 'सोन्याची पावलं' उमटवत महालक्ष्म्या यायच्या. त्यांना आणताना सारं घर फिरवायचं. तिजोरी, कपडेलत्ते, वह्यापुस्तकं, दूधदुभतं, लोणीतूप, धनधान्य सार्याची भरभराट होऊ दे असं मागणं मागून त्यांची घरातल्या देवांशी भेट घडवायची आणि मग गणपतीशी भेटवून त्यांना स्थानापन्न करायचं. यंदा घरात नवीन वॉशिंग मशीन आणलं असेल तर आम्ही तेही दाखवायला लावायचो. त्या आमच्यासाठी खरंच हव्याहव्याश्या पाहुण्या असत. मुखवटे चढवले की समोरुन वेगवेगळ्या कोनांतून बघत कुठली तिरकी, पुढे मागे तर नाही झाली याची आजीची नजर चुकवून पडताळणी करत असू, आणि हळूच ठीकठाक करत असू.कारण एकदा बसलेल्या मुखवट्यांना स्पर्श झाला की काही खैर नसायची. गौरी बसल्यादिवशी रात्री मेथीच्या भाजी भाकरीचा नैवेद्य जेवून पाठ टेकायची.
दुसर्या दिवशीची आण्णांनी जय्यत तयारी केलेली असे. भरपूर ताजी भाजी, भरगच्च हार, फुले, रसरशीत फळे, मिठाई, बाकरवडी एक ना दोन. दुसर्या दिवशीचा स्वयंपाक जीव ओतून करताना आजीला बघून मला स्वयंपाकघरातच महालक्ष्मी आली असल्याचा भास कित्येकदा झालेला आठवतो. सुनांना हाताशी घेऊन सारा स्वयंपाक सोवळ्यात, उभ्यानं करायची ती दादा असेपर्यंत. कृतकृत्यता म्हणजे काय असं मला आजही कुणी विचारलं तरी मला गौरीजेवणाच्या दिवशीचा आजीचा चेहरा आठवतो..!
जेवणं झाली की गोविंदविडे. मग संध्याकाळच्या हळदीकुंकवाची लगेच तयारी सुरु. अत्तरदाणी, गुलाबदाणी भरून ठेवणं, हळदीकुंकवाचं आजूबाजूला आमंत्रण देणं.. एकच लगबग. रांगोळ्या काढणं, कलिंगड आणि खरबूजांची कमळे कापायचं नाजूक काम अर्थातच ताईकडे. हळदीकुंकू म्हणजे नटूनथटून घरोघरी जाऊन आरास पाहणं आणि कौतुक करवून घेणं. आजच्या दिवशी गणपती अगदीच सायडिंगला गेला असं मला पार रात्री आरतीच्या वेळेस वाटायचं. 'आजचाच दिवस हां, सॉरी!' असं मनातल्या मनात म्हणून पण घ्यायचे. आरती करताना गौरींच्या मुखावर समाधान विलसत असायचं. आता, ते फक्त गौरींचं नसून आणखी एक वर्ष नेटानं सारं निर्विघ्नपणे नीट झाल्याचं आई आणि आजीच्या चेहर्यावरच्या समाधानाचं प्रतिबिंब असल्याचं नक्की वाटतं. रात्री झोपताना हळदीकुंकवाची कोयरी सपाट काठोकाठ भरुन गौरींच्या मध्ये ठेवायची. त्या रात्री एकमेकींना हळदीकुंकू लावतात आणि जातात म्हणे. सकाळी त्यात बोटांचे नाजुक ठसेही दिसायचे. आता ते आपलेच रात्री हळद कुंकू सपाट करतानाचे नसतील कशावरुन? अशी अक्कल चालवली की पाठीत चापट बसायचीच आजीची. आई 'जाऊ दे नं, कशाला कीस पाडताय?' असं डोळ्यांनीच दटावायची.
आज गौरी जाणार म्हटल्यावर आम्हाला उगाच सारं उदासवाणे वाटायचं. दही कानवल्यांचा नैवेद्य असायचा. संध्याकाळी सहाला आरती करुन गौरी गणपतींवर अक्षत टाकायची. 'पुनरागमनायच॥' असं तीनदा म्हणून मुखवटे उतरवून घ्यायचे. आणि गणपती विसर्जनाला न्यायचा. विसर्जन करुन आल्यावर तेच घर, समोर तेच मुखवटे त्याच आराशीत असूनही अचानक रिकामं, ओकंबोकं होऊन जायचं. तीन दिवस 'दमले' असं न म्हणता एकामागून एक केलेल्या कामांचा सार्यांना एकदमच शीण यायचा. पाणीही घ्यायला उठावंसं वाटायचं नाही. थोडा वेळ थांबून सारा पसारा आवरायला घ्यावाच लागायचा. पुढच्या वर्षी प्रत्येक गोष्ट जागच्या जागी सापडायला हवी. उसनं अवसान आणून पटापट आवरतं घ्यायचो आम्ही मुली. तोवर आई कढी खिचडी वाढत असे. गरम गरम जेवून गुडूप. दुसर्या दिवशी रुटीनला सुरुवात.
हे चक्र कितीतरी वर्ष अखंड चालू होतं. माझ्या जन्माआधीपासून आतापर्यंत. आजी थकली. दोन्ही बहिणींची लग्नं झाली. त्यांच्याही घरी गौरी असल्यामुळे त्यांना माहेरी फार वेळ येणं व्हायचं नाही, जे आम्हालाही पटलंच होतं. सारं इतकं निगुतीनं आणि मनापासून नेटानं करणार्या 'वेल ट्रेंड' सुना आल्या म्हणून त्यांच्या सासरी त्यांना मखरातच ठेवायचं राहिलं होतं.
दोन वर्षातच ही सारी जबाबदारी माझ्या आणि आईवर येऊन पडली. माझं कॉलेज, क्लास, आईचं ऑफिस, आजी आण्णांचं आजारपण सांभाळून हे सारं करणं म्हणजे सोपं नव्हतंच. आण्णांचं आजारपण आणि बहिणींची लग्न यांनी एकदम बाहेरच्या आणि घरच्या दोन्ही कामांचे वाली गेले. शेंडेफळ म्हणून लुडबूड करणं आणि जबाबदारी घेऊन निभावणं यात फरक होता. आजी थकली असली तरी तिला सारं समजत, कळत होतं. आईला इतक्या वर्षांचा वसा अर्ध्यात सोडवत नव्हता. आजी असेपर्यंत तरी. मला हे सारं कधी जाणवलं हे समजायच्या आत मी आईला म्हटलं, मी आहे ना, तू कशाला काळजी करतेस? आपण करु सारं. गौरी गणपतींनी मला खर्या अर्थानं आई-आण्णांचा एकाच वेळी मुलगा आणि मुलगी कसं व्हायचं ते शिकवलं. आपल्या घरी असतो तशाच ठराविक पध्दतीचा गणपती बुक करुन तो वाजतगाजत घरी आणायचा, त्याची पूजा करायची, आरती करायची, लायटिंगची व्यवस्था बघून आरास करायची, गौरी जेवायच्या दिवशीच्या ठराविक भाज्या, सुरेख हार, ताजी सुंदर फळे कितीही महाग वाटली तरी आणणं हळूहळू जमायला लागलं.
पहिल्या वर्षी नावीन्यासोबत वाटलेला 'ग्रेटनेस'ही दबत गेला आणि त्या सार्याचं भान येऊ लागलं. आजी आणि आण्ण्णा रिटायर्ड प्लेयर्स सारखे पॅव्हेलियनमधून आम्हाला सूचना देत. आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्हीही ऐकत असू. आण्णांचं घरातल्या या गोष्टीतही किती काटेकोर लक्ष होतं हे मला आता समजून येत होतं. तेव्हाही ते प्रत्यक्ष काही करत नसले तरी प्रत्येक गोष्ट कशी करायची याची त्यांना माहिती होती. माझ्या बाबतीत मात्र वेळेअभावी बाहेरच्या कामांची व्यवधानं, अभ्यास सांभाळताना अर्थातच नैसर्गिक सौंदर्यदृष्टी, कलावादावर अस्पष्ट फुली उमटली. ताई इतकं सुंदर करणं मला जमणार नाहीये हे मी आधीच मान्य केलं होतं. त्यातूनच मग गौरींच्या रेडिमेड साड्या, आदल्या रात्रीच आरास करुन ठेवणं, थोडाफार विकतचा फराळ, रांगोळ्यांचे छाप असं जमेल तिथं कस्टमायझेशन आलं. त्याचं हसून स्वागतही झालं. माझं आणि गौरींचं नातं घट्ट होत जात होतं. तिसर्याच वर्षी मी ताईसारख्या साड्या नेसवायलाही शिकले. आजीला प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटायचा. थकलेली असली तरी आपला काहीतरी सहभाग त्यात असावा असं तिला फार वाटायचं.तर आण्णांना माझ्यामुळे या दोघींनाच सारं करावं लागतंय याचं किंचित वैगुण्य. मग त्या दोघांना सहज करता येईल असं एखादं काम सोपवून त्यांना काहीतरी केल्याचं समाधान मिळवून द्यायचं, त्यांच्याही नकळत.
लग्न झाल्यानंतरची बहिणींची धावपळ बघितल्यानंतर, माझ्याही सासरी गौरी असतील तर काय, हा प्रश्न आपोआपच सुटला. या घरी गौरी नाहीत, म्हटल्यावर मला आमच्याच गौरींचं आयुष्यभर करता येईल, आणि आईला तिघींपैकी एक तरी हक्काची माहेरवाशीण मिळेल याचीच सुखद जाणीव झाली. सासरी धूमधडाक्यात गणपती बसवला की गौरी बसवायला मी हक्कानं माहेरी जाणार आणि पूर्वीइतक्याच सहजपणे सारं करणार. त्या कशातच कुठे फरक पडणार नव्हता. सासूबाईही हौशी असल्यानं सुनेचं कौतुक करायला आवर्जून हळदीकुंकवाला येणार, मन लावून आरास बघणार. आईला त्यातच समाधान मिळणार. आण्णा सुखावणार. असं एकेक.
आजी गेल्यानंतरच्या वर्षी मात्र गौरी बसवताना मधूनच प्रचंड पोकळी जाणवायची तर मधूनच आजी इथेच आहे, सारं बघतेय असं वाटून भराभरा पुढची कामं हातावेगळी करावी लागायची. काहीशा अस्थिर मनःस्थितीतच त्या वर्षी रिवाज म्हणून गौरी गणपती झाले. विसर्जनाच्या दिवशी 'पुनरागमनायच॥' म्हणताना आजीच्या आठवणीने आईला हुंदका अनावर झाला...
आमच्या घरच्या गौरींचं हे सुख माझ्या नशीबात बहुतेक इथवरच होतं. आता यावर्षीपासून गौरी गणपती नाहीत. आण्णा गेले.
आण्णा गेले, ते सारे वसे-वारसे-सणवार सोबत घेऊन. पार्थिव मूर्तीत चार मंत्रांनी प्राणप्रतिष्ठापना केल्यावरही जिथं विसर्जन करताना एवढा जीव तुटतो तिथं सोबत असलेलं एक सबंध जितं जागतं आयुष्य अचानक नाहीसं झाल्यावर काय करावं? चटका लागतो... तेच घर, समोर तेच मुखवटे त्याच आराशीत असूनही अचानक रिकामं, ओकंबोकं होऊन गेलं. आयुष्यभर 'दमले' असं न म्हणता एकामागून एक केलेल्या सार्याचा एकदमच शीण आला. यातून उठावंसं वाटत नाही... माहितीये, थोडा वेळ थांबून का होईना सारा पसारा आवरायला घ्यावाच लागणार आहे... पुढच्या वर्षी प्रत्येक गोष्ट जागच्या जागी सापडायची गरज नसली तरी...
महालक्ष्म्यांची साडी चोळीनं ओटी भरुन पाठवणी करताना तीनदा 'पुनरागमनायच॥' म्हणतानाही त्यातला फोलपणा कळून चुकला होता. त्या आता पुन्हा कधीच येणार नाहीत आमच्या घरी. त्या गेल्या असतील बहुतेक त्यांचं जीवापाड कोडकौतुक करणार्या आजीकडे. कित्येकदा काही गोष्टींचा अर्थ कळता नकळताही त्या करत राहण्यातच काहीतरी अर्थ असतो, आजीसारखंच. म्हणूनच कदाचित हात जोडून पुन्हा एकदा मनापासून म्हटलं.. "पुनरागमनायच॥"
आशूडी.. काय लिहू? पोचलं तुला
आशूडी..
काय लिहू? पोचलं तुला काय म्हणायचंय ते..
अफाट लिहिलयस आशूडी!!! अगदीच
अफाट लिहिलयस आशूडी!!! अगदीच पोचलं.
खुप छान लिहिलयं डोळ्यातुन
खुप छान लिहिलयं
डोळ्यातुन पाणी काढणारं
छान च.. सगळि धावपळ डोळ्यासमोर
छान च..
सगळि धावपळ डोळ्यासमोर उभि झाली
सणावारांचं वर्णन
सणावारांचं वर्णन
आशू, तुला परत आलेली बघून बरं
आशू,
तुला परत आलेली बघून बरं वाटलं.
मी लहानपणी आईकडे हट्ट करायचे आपल्याकडे गौरी का नाहीत म्हणून. आमच्याकडे आपल्या कोकणस्थी खड्याच्या गौरी. वर्गातल्या देशस्थ मैत्रिणी इतकी वर्णनं करत असायच्या. आणि ती गौरींची आरास इत्यादी बघायला मस्त वाटायचं.
आता एकत्र गणपतीमधला एकत्रपणा पण संपल्यात जमा आहे. गणपतीत दरवर्षी या गोष्टीची ठेच लागतेच. त्यामुळे तुला काय म्हणायचंय ते पोचलंच.
(No subject)
पोचलं आशू.
पोचलं आशू.
भावपूर्ण बाकी, सर्व
भावपूर्ण
बाकी, सर्व सणावारांचं वर्णन वाचूनच दमले.
वविला तू घेतलेल्या लांबलचक पण सुंदर उखाण्याचं मूळ तुमच्या घरच्या सणावारांच्या या साग्रसंगीततेतच दडलेलं असणार.
(No subject)
तू आलीस, तुला पाहून छान
तू आलीस, तुला पाहून छान वाटलं.
पुढे चालावंच लागतं गं.
आशू, मी पाहिली आहे तुझ्याकडची
आशू, मी पाहिली आहे तुझ्याकडची आरास, तुझी लगबग आणि उत्साह. वाचता वाचता एकेक दिसत गेलं डोळ्यापुढे!
बाकी, प्रतिक्रिया द्यायला योग्य असे शब्द नाहीत माझ्याकडे, just a big hug to you!
(No subject)
आशू.. किती गोड
आशू.. किती गोड लिहिलंयस..वाचता वाचता नकळत डोळे ओलावले..खूप खूप आवडलं .
सुरेख लिहीले आहेस. एकदम आतल.
सुरेख लिहीले आहेस. एकदम आतल. पण 'पुनरागमनायच॥' म्हण व कुणाचीतरी आज्जी हो.
मी रडलो आशूडे. खूप दिवसांनी.
मी रडलो आशूडे. खूप दिवसांनी. वडलांची आठवण आली.
कुठे जातात तरी हे बाप लोक आपल्याला सोडून? सणवार खुपतात, अक्षरशः अंगावर येतात. बाप पुरायला हवा हो. प्रत्येकाला. जन्मभर.
कुठे जातात तरी हे बाप लोक
कुठे जातात तरी हे बाप लोक आपल्याला सोडून? सणवार खुपतात, अक्षरशः अंगावर येतात. बाप पुरायला हवा हो. प्रत्येकाला. जन्मभर.<<<<
हेच आईसाठी सुद्धा...
साजिरा, नी अवघड आहे रे.
साजिरा, नी
अवघड आहे रे.
आमच्या माहेरी पण मोठ्या उभ्या गौरी आणि अनंताची पूजा. ते समुद्र गुरुजी येत पहाटे ते मला अगदी वैदिक वाट्त. आशू, पुढे हीच रिच्युअल्स तुला, आईला एक आत्मिक आनंद देतील. आपलं स्टेट्स बदललं तरी देव नाही बदलत. ते सर्व असतातच आपल्या पाठीशी.
अगदी अगदी, बाबा गेल्यावर एकदम
अगदी अगदी, बाबा गेल्यावर एकदम ठप्प झालेली ती धावपळ आठवली.
(No subject)
छान लिहिलय..
छान लिहिलय..
खूप टचिंग. हे वाचलं नस्तं तर
खूप टचिंग. हे वाचलं नस्तं तर कदाचित यंदा घरी येणार्या गौराईच्या स्वागतात कसर राहून गेली असती.
आशू. फार सुंदर लिहिलं आहेस.
आशू. फार सुंदर लिहिलं आहेस.
आमच्याही घरी अशाच उभ्याच्या, पितळेचे तेजस्वी मुखवटे असलेल्या गौरी. शाळेत असतानापासून त्यांचे डोळे, ओठ रंगवायचं काम माझं. आजी,आईच्या काटेकोर कौतुकाची नजर त्यावर पडली की जगातला सारा अभिमान मनात उमटायचा. गौरींची तयारी, साड्या नेसणं, त्यांची पोटं भरणं, मधे त्यांचं बाळ, गौरींचं जेवण, हळदूकुंकू, फुलांच्या रांगोळ्या, सजावट.. केवढी सांस्कृतिक समृद्धता अनुभवता येत होती नकळत.. लग्न झाल्यावर माझ्याही सासरी गणपती नसल्याने आईला मदत करायला आधीपासून जाता यायचं. माझ्या धाकट्या मुलीचा जन्मही गौरीविसर्जनाच्या दिवशीचा. गौरींशी एक अतूट भावबंधनच जुळालेलं मनात. मात्र मग मुली मोठ्या होत गेल्या माझ्या, कधी कधी ऐन गौरीगणपतीतही आम्ही परदेशी असायला लागलो, भावाचं लग्न होऊन तोही अमेरिकेलाच गेला त्यामुळे नवी सूनही एखादं वर्षच गौरींना घरी. मधल्या काळात बाबांचंही बायपासं ऑपरेशन झालं. आईला गौरीगणपतींचा व्याप झेपेनासा होतो आहे हे स्पष्ट दिसायला लागलं. एकदा ऐन गौरीजेवणाच्या दिवशी बाबांना हॉस्पिटलात अॅडमिट करायला लागालं तेव्हा धावपळ, दगदगीचा कहर झाला. मग काकू म्हणाली (तसं ती अनेक वर्षं म्हणत होतीच) की गौरी आम्ही आमच्या घरी बसवायला सुरुवात करतो. अत्यंत नाईलाजाने आईबाबांचं मन वळवून आम्हाला त्या गोष्टीला मान्यता द्यायला लागली. गौरींचे मुखवटे, सारं सामान रवाना झालं. मात्र त्यानंतरची ही दोन्ही वर्षं इतकी जीवघेणी उदास जाताहेत गौरीगणपतीच्या दिवसांत. कधी कोणी घरी उभ्याच्या गौरी आहेत असं म्हटलं की जीव गलबलून जातो सगळ्या आठवणींनी. आईबाबांचं काय होत असेल मग? वर वर काही बोलत नाहीत पण त्यांना विचारायचंही धाडस होत नाही माझं की येतेय का गौरींची आठवण. आपण प्रॅक्टिकल निर्णय घेतलाय याचं सगळं समाधान विखरुनच जातं पूर्वीचे गौरींचे दिवस आठवले की.
आशू.. लेख वाचून डोळ्यात पाणी येण्याइतका भाबडेपणा माझ्यात शिल्लक असेल असं वाटलं नव्हतं. पण तुझा लेख वाचता वाचता डोळे भरुन आलेत. तुला काय वाटत असेल याची पुरेपूर कल्पना आहे.
आशुडी, रडवलस! खुपच भावपुर्ण
आशुडी, रडवलस!
खुपच भावपुर्ण लिहीलयस!
मी तुझ्या घरच्या गौरी बघितल्या नसल्या, तुला भेटले नसले तरी सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहीलं!
शब्दसामर्थ्य अफाट आहे तुमचे.
शब्दसामर्थ्य अफाट आहे तुमचे. केव्हा डोळे पाणावतात कळतही नाही, प्रतिसाद देण्याकरता दुसर्या - तिसर्यांदा ओपन करत खंबीरपणा राखतच लिहावे लागत आहे.
आमच्याकडेही उभ्याच्या गौरी असल्याने तद्रूपताच आली वाचताना, आता मात्र नाईलाजाने मुखवट्यावर भागवतो - पण हे दिवस मात्र खरेच खूप भक्तिभावाने भरलेले असतात.
आशू!
आशू!
सुंदर लिहिलं आहेस.
सुंदर लिहिलं आहेस.
अतिशय सुंदर लेख.
अतिशय सुंदर लेख. भावस्पर्शी.
लहानपणी आजी अश्या गौरी बसवत असे ते आठवले. आणि गेल्या की त्याच्या आधीच्या वर्षी आई नेमकी गौरीच्या दिवसात मामा-मामीकडे गेली होती. तेव्हा मामीने बसवलेल्या साग्रंसंगीत गौरी पाहून आनंदली होती आणि आजीच्या आठवणीने हेलावली होती. तिची तेव्हाची एक्साईटमेंट मला गमतीशीर वाटली होती पण आता थोडा अर्थ समजल्यासारखे झाले.
सुंदर लिहिलय! माझ्याही घरी
सुंदर लिहिलय! माझ्याही घरी अशाच ऊभ्या गौरी असतात त्यामुळे अगदी खोलवर भिडले.
ईतक्या वर्षांत हे सण आपण इतके प्रॅक्टिकल केलेत की हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीला द्यायला उरेल की नाही अशी शंका वाटते.
आशू , खुप दिवस खाले मनाला
आशू :(, खुप दिवस खाले मनाला इतकी टोचणी लागून राहीली होती, बाबांची कमतरता ह्यावेळेला तर खुपच जाणवतेय. आईकडे नवी सून आलीये. सो ह्या वेळची पोकळीही पहील्या वर्षी इतकीच भक्क जाणवतेय. आणि हे कोणाकडे बोलताही येत नव्हतं. आज ह्या निमित्तान्नं खरच खुप रडून घेता येतय.
Pages