माबो गटगनंतर वाडेश्वरवाल्यांची मुलाखत

Submitted by बेफ़िकीर on 22 August, 2011 - 04:22

वाडेश्वरचे संस्थापक अजीत घाटगे यांची काल मुलाखत घेतली. सायंकाळी साडे सात वाजता मी वाडेश्वरला गेलो तेव्हा ते विषण्ण मनस्थितीत अंधारलेल्या आकाशाकडे पाहून आता आयुष्यात काहीही राहिले नाही हे भाव लोचनांत धारण करून अध्यात्मिक होण्याच्या मार्गावर बरेच पुढे गेले असल्याची जाणीव करून देत होते.

"सर, आपली मुलाखत घ्यायला आलो आहे"

"घ्या, फक्त घ्या, माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण काहीतरी तरी घ्या"

"म्हणजे काय सर??"

एक खिन्न सुस्कारा सोडून माझ्याकडे 'माझ्या थ्रू' पाहात असल्याप्रमाणे पाहात ते म्हणाले.

"तुम्हाला काय वाटते?? हे.. हे जे आजूबाजूला आहे हे सगळे काय आहे आहे???"

"हा.. हा गुडलक चौक आहे सर... इकडे एफ सी रोड सुरू होतो..."

"हे हे... हे म्हणतोय मी... हे काय आहे???"

"हे एक टेबल आहे..."

"तुम्हीही असामान्य व्यक्तीमत्व दिसता तेथील"

"सर... पहिला प्रश्न विचारू क??"

"आधी माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्या.. हे तुम्हाला एक उपहारगृह वाटत नाही काय???"

"अर्थातच सर, अत्यंत स्वादिष्ट अशा खाद्यपदार्थांसाठी अल्पावधीतच लोकप्रिय झालेले आणि मोक्याच्या ठिकाणी असलेले असे हे वाडेश्वर उपहारगृह एक उपहारगृहच वाटते मला"

"मग उपहारगृहाबाबत तुमची संकल्पना काय आहे??"

"तेथे खाद्यपदार्थ मिळावेत आणि पोटभर खाऊन तृप्त होऊन माणुस निघून जावा"

"जाताना खाल्लेल्या पदार्थांचे पैसेही द्यावेत"

"बिलकुल बिलकुल"

"धन्यवाद! आता विचारा तुमचा पहिला प्रश्न! तुमच्या या आत्ताच्या उत्तराने काही आमच्यासारख्या सामान्य विचारांची माणसेही तेथे आहेत असा अंदाज होता तो खरा ठरू शकेल असे वाटते"

"कुठे सर??"

"तिथेच, जिथून ते आलेले होते"

"सर, पहिला प्रश्न, हे उपहारगृह सुरू करण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली?"

"अक्कल नव्ह्ती तेव्हा मला"

"सर दुसरा प्रश्न, ही कल्पना सत्यात आणण्यासाठी आपण काय काय केलेत?"

"जागा घेतली, आचारी बोलावले, टेबल खुर्च्या आणल्या, खाद्यपदार्थांचे रॉ मटेरिअल आणले आणि अ‍ॅडमीनना प्रपोझल धाडले"

"ते काय म्हणाले?"

"ते म्हणाले आमच्या प्रचंड व्याप्तीमुळे आमचे लेखक, कवी, सभासद व कशातही न पडणारे असे असंख्य वाचक देशोदेशी विखुरलेले असून ते सातत्याने प्रवास करत राहतात. ते पुण्यात आले की 'पुण्यात येण्याच्या साहसाचे कौतुक', 'इतका प्रवास केल्यानंतर माणूस कसा दिसतो हे बघणे' व 'जे ऑनलाईन करतो ते ऑफलाईन करून दोन्ही माध्यमात मी एकाच प्रकारची व्यक्ती आहे हे सिद्ध करणे' अशा हेतूने आमची काही गटगे होत असतात. "

"मग??"

"तर ते म्हणाले की ही गटगे तुमच्यायेथे करण्यास आम्ही आमच्या सभासदांना भाग पाडू शकू"

"मग??"

"मग काय! झाली सुरू गटगे!"

"अभिनंदन सर"

"त्यात कसलं अभिनंदन?? हवं तर जोड्याने मारा पण गटग करू नका"

"का हो सर??"

"अरे काय ते स्मायली का काय असतात?? तसले चेहरे इथे करून दाखवतात. एक जण तर गडाबडा लोळून दाखवत होता. त्याला आमच्यातल्या एकाने विचारले की असा का लोळतोयस, काय विनोद झाला, तर तो म्हणाला की दर दहा मिनिटांनी असे लोळायची त्याला सवय झाली आहे"

"मग तुम्ही 'अरेरे'चा स्मायली करून दाखवलात का?"

"तो माझा केव्हाचाच झालेला आहे"

"मग यावर उपाय काय सर??"

"कार्यक्रमात नांवनोंदणी मीच स्वतः करणार आणि सदस्य म्हणून त्यांच्यात बसणार"

"पण ते तर तुम्हाला ओळखतील"

"हो पण त्यांच्यातल्याच एकाचा ड्यु आय म्हणून मी उपस्थित राहिलो आहे असे सांगणार"

"सर पुढचा प्रश्न, गटगचा आपला काही विशेष अनुभव??"

"माझ्या आयुष्यात विशेष अनुभव मी एकदाच घेतो"

"केव्हा सर??"

"इथे गटग होते तेव्हा"

"काय अनुभव असतो सर तो??"

"अनेक अनुभव असतात"

"एकेक सांगा"

"पहिले म्हणजे गटग जेव्हा सुरू होणार असते तेव्हा आमच्या उपहारगृहात दहशत पसरते, सर्व स्टाफ अबोला धारण करतो, काही सदस्य जमा झालेले असतात व ते एकमेकांना ओळखतच नसतात, मात्र त्यांच्या चेहर्‍यावरचे 'मी सर्वज्ञ' हे भाव त्यांना परिचय करून घेण्यास उपयुक्त ठरतात"

"नंतर??"

"त्यांची परस्तुतीतून आत्मस्तुती ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा आमचा स्टाफ हतबुद्ध होऊन चहाचे कप आदळतो"

"परस्तुतीतून आत्मस्तुती ही संकल्पना जरा उलगडून सांगाल का? मी टिपून घेतो"

"थांबा, मी आधी माझे डोळे टिपून घेतो"

"टिश्यू पेपर देऊ काय??"

"संपले सगळे आजच्या गटगमध्ये"

"कसे काय??? "

"एकमेकांच्या बोलण्यावरचे प्रतिसाद सगळे जण टिश्यू पेपरवर लिहून दुसर्‍याला देत होते"

"ते कसे??"

"पेने आमच्याकडून उधार घेतलेली होती. कारण पेन विसरणे हा तेथे प्रस्थापित असल्याचा गुणविशेष ठरतो असे ऐकले आहे"

"तो कसा काय??"

"चोवीस तास बोटांनी प्रतिसाद लिहिल्यामुळे झरणी हे लेखनातील एक साधन आहे या सर्वमान्य समजाचा त्यांना विसर पडलेला आहे"

"पण हे असे होत असतानाही तो एक जण मधेच गडाबडा लोळत होता?"

"होय, विशिष्ट कालावधीनंतर काहीही झालेले नसतानाही तो उठायचा आणि फरशीवर गडाबडा लोळायचा आणि पुन्हा गंभीरपणे खुर्चीवर बसायचा"

"पण परस्तुतीतून आत्मस्तुती म्हणजे काय??"

" तुझा तो थ्रेड अत्यंत सुंदर होता असे सांगून परस्तुती करायची आणि आपसूकच त्याला आपल्या एखाद्या थ्रेडची स्तुती करण्यास नैतिकदृष्ट्या भाग पाडायचे"

"पुढचा प्रश्न सर... गटगमधील विविध व्यक्तीरेखांचे काही वर्णन करू शकाल काय?"

"नक्कीच! एक होते, ते त्यांच्यासाठी गटग असल्याने आनंदात होते. दुसरे दिव्याची असंख्य चित्रे हातात घेऊन आलेले होते. ते आधी एक चित्र एखाद्याला द्यायचे आणि मग वाक्य बोलायचे. ते चित्र घेणारा 'हलके घेतले' असे वरवर म्हणून दिव्याचे चित्र देणार्‍याचे दुर्लक्ष झाले की नाक मुरडायचा. एक बाई नुसत्याच हेमाशेपो हेमाशेपो असे म्हणून हे एवढाल्ले डोळे करून संतापत होत्या. खरे तर त्यांना राग यावा असे कुणीच काही करत नव्हते. आमच्यातील काही जणांना हेमाशेपोचा अर्थ शेपूचि एखादी थाई करी असावी असा वाटल्यामुळे आम्ही ते येथे मिळत नाही असे म्हणून बघितले. पण त्यावर आपल्याच दोन्ही हातांची पहिली बोटे आपल्याच डोळ्यांच्या शेजारी धरून सर्वांनी बुबुळे पूर्व पश्चिम अशा दिशेला मोजून पाच पाच वेळा हालवली. हा प्रकार काहीतरी निराळा असावा असे वाटून आमचा स्टाफ चरकून मागे झाला. एक बाई होत्या त्या हसू आले की फक्त 'फिदी, फिदी' असे तोंडाने म्हणत होत्या. तीन सदस्य असे होते की त्यांच्या अंगावर जर टीशर्ट नसता तर ते रोमातही चालले असते. "

"सर पुढचा प्रश्न..... बिल किती झाले??"

"एकविस"

" एकवीसशे?? म्हणजे सणसणीत बिल झाले म्हणायचे"

"एकवीस रुपये, एकवीस... .... एकवीसशे कसले आलेत??"

"फक्त एकवीस रुपये??"

"होय, तीन फुल चहा तीन बाय बारा घेतले"

"या बारावरून आठवले मला... ते बारा.... "

"बाराचा उल्लेख करू नका अजिबात... हवे तर तीन बाय तेरा घेतले म्हणा"

"पण म्हणजे लगेच गेले सगळे??"

"आत्ताच गेले... "

"पण सकाळी होतं ना गटग??"

"सुरू होण्याची वेळ ठरते असे आम्हाला अ‍ॅडमीननी आधीच सांगितलेले होते .. संपते केव्हाही"

"पण मग... तुम्ही काही मिनिमम चार्जेस का घेत नाही??"

"आमची ती मागणी प्रशासकांना भा प्र वाटली"

"पण खाल्ले काहीच नाही कुणी??"

"नाही... कारण एक बाई होत्या त्यांनी दहा पाकक्रिया करून आणल्या होत्या... खरे तर अकरा आणणार होत्या... पण म्हणे निवडक दहाच असू शकतात म्हणून तेवढ्याच आणल्या"

"मग त्याच खाल्ल्या??"

"छे छे... तश्श्या पडून होत्या सगळ्या टेबलवर आत्तापर्यंत"

"का?????"

"पदार्थांचे फोटो नाहीत म्हणून कुणी खाल्लेच नाहीत ते पदार्थ"

"पण मग कॉम्प्लिमेन्ट्स कशा दिल्या त्यांना??"

"टिश्यू पेपरवर लिहिले, अप्रतीम, तोडलंस, हॅट्स ऑफ, महान आहेस, सलाम, डोळे भरून आले, तोपासू, भ्यां, नालायक मी नसताना केलेस ना सगळे, वगैरे"

"एवढेच??"

"एका महिलेने मी आता तुला झब्बूच देणार आहे अशी धमकीही दिल्याचे समजते"

"पण म्हणजे इतका वेळ गप्पा काय झाल्या मग??"

"एक कोणीतरी सदस्य बाहेरून सगळ्यांना पाहून जाणार आहे तो चुकून आत आला तर काय भूमिका घ्यायची याबाबत"

"भूमिका ठरली का??"

"नाही, कारण एकमताने आमच्या गटगमध्ये काहीही होऊ शकत नाही हे प्रशासकांनी आम्हाला आधीच समजावलेले होते"

"पण मग... बाकी... बाकीची गिर्‍हाईके काय करत होती??"

"ती सदस्यत्वाला एक दिवस आठ तास झाल्यासारखी बावरलेली होती"

"मग तुम्ही काय केलेत??"

"आम्ही पहिल्या गटगपासूनच 'वाडेश्वरचा अकाऊंट काढून टाका' अशी विनंती केलेली आहे"

"एकविस रुपयाचे बिल कोणी दिले??"

"कुणीही नाही, अनुल्लेखाचे शस्त्र वापरण्यात आले"

"आता शेवटचा प्रश्न.... मायबोली गटगचा होटेल व्यावसायिकांना फायदा काय??"

"एकच ...."

"तो कोणता सर???"

"आपले नुकसान आपल्याच डोळ्यांनी पाहताना कसलाही व्यत्यय येत नाही... अगदी तरही गझलचाही"

================================

सर्वांनी कृपया हलके घ्यावे. वाडेश्वरचा उल्लेख केवळ नुकतेच झालेले गटग म्हणून केला आहे. कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही. अर्ध्या तासात जे काय सुचले ते खरडले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

<की दर दहा मिनिटांनी असे लोळायची त्याला सवय झाली आहे"

<"एकमेकांच्या बोलण्यावरचे प्रतिसाद सगळे जण टिश्यू पेपरवर लिहून दुसर्‍याला देत होते"

<"पदार्थांचे फोटो नाहीत म्हणून कुणी खाल्लेच नाहीत ते पदार्थ">

<"एका महिलेने मी आता तुला झब्बूच देणार आहे अशी धमकीही दिल्याचे समजते"

Rofl Rofl

drunk-irish-048.gif

<"कुणीही नाही, अनुल्लेखाचे शस्त्र वापरण्यात आले" lol-047 laughing.gif

भन्नाट सुचलंय.... Happy

बेफिकीरजी __________/\__________ Rofl
चातका, तूच लोळत होतास का? (दर दहा मिनिटानी?) Wink Lol

जबरदस्त...अशक्य....काहीही सुचतं तुम्हाला बेफी....

एक बाई नुसत्याच हेमाशेपो हेमाशेपो असे म्हणून हे एवढाल्ले डोळे करून संतापत होत्या. खरे तर त्यांना राग यावा असे कुणीच काही करत नव्हते.

तीन सदस्य असे होते की त्यांच्या अंगावर जर टीशर्ट नसता तर ते रोमातही चालले असते. "

"पण मग... बाकी... बाकीची गिर्‍हाईके काय करत होती??"
"ती सदस्यत्वाला एक दिवस आठ तास झाल्यासारखी बावरलेली होती"

बापरे....वाट लागली हसून हसून....

"पण मग... बाकी... बाकीची गिर्‍हाईके काय करत होती??"

"ती सदस्यत्वाला एक दिवस आठ तास झाल्यासारखी बावरलेली होती"

>>>>
Proud
भारी लिहिलय

HE KHARACH ASECH HOTE....GET TO GETHRER LA...?.... >> नाही. याच्यापेक्षा भयानक होते. त्या बेफिकिरांना नीट अनुभव नाही गटगंचा, त्यामुळे असे अर्धवट लिहित सुटलेत. त्यांना रीतसर गटगकर व्हायला टाईम आहे अजून. Proud

Pages