बरस माझ्या मेघराजा.....

Submitted by कौतुक शिरोडकर on 25 July, 2008 - 04:56

डोळयात प्राण, अंगी ना त्राण
ओढुन उसनं अवसान
भुई लवुन, मागतो दान
गातो गार्‍हाणं तुझ्या नावानं
बरस माझ्या मेघराजा.....
नदी नालं, पार आटलं
घुमुन, दमुन, डोळ ओलं
सुकली पेरणी, थकली लावणी
मुकी झाली घुंगुरवाणी
गुराढोरा, मिळ्ना चारा
फाटली धरा, बोले अंबरा...बरस माझ्या मेघराजा.....
बी बियाणं सोन्याचं नाणं
वाकल्या घराला कर्जाचा ताण
सावकारापाशी जगणं गहाण
सरकारापाशी झिजली वहाण
माफीची भाषा, फुकाची आशा
गळ्क्या झारीत वाटती भिक्षा...बरस माझ्या मेघराजा.....
इज ना वरी इज ना घरी
रित्या घागरी डोईच्या वरी
जीवास घोर, उपाशी पोरं
पडवीच्या म्होरं खोकं म्हातारं
गळ्याला फाशी, नजर आकाशी
इतकचं बळीराजाच्या राशी....बरस माझ्या मेघराजा.....

गुलमोहर: 

आपली दाद अन आमचा धन्यवाद.

मस्त रे...आवडली Happy

वाह सुंदर रे...छान लिहील आहेस. कौतुकास्पद आहे Happy