कलंकी

अंधाराचे घर माझे न कुठेही प्रकाश
सावल्याही नसती आता न अवसे आकाश

माय ज्योती होती बाप दिव्यातली वात
वणव्याच्या तेजा भुलले विदग्धी ही साथ

कधी पांघरुन उषा कधी चांदणे लेवुन
जे जे भासले ते तेज गेले चटके देउन

तिच्या पदराखाली ऊन कधी ना लागले
तिच्या उरीचे दुध आज कसे गा नासले

कुणी ओरबाडुनी देतो कुणी दांभिक उदार
अंधाराच्या हाता हवा निज उघडा पदर

माझ्या बाहुललीला तिन तिटं लावु दिला नाही
त्या निष्कलंकी बाहुलीत माझी माय मला पाही

-सत्यजित


सत्या, शेवटची ३ कडवी सुन्न करुन गेली.



मलाही.



सत्यजीत, अगदी खरं सांगायचं तर मला कळली नाहीये. नीटशी. (माफ कर रे) उगीच काठावरून फिरल्यासारखं वाटतय. तूच सांगतोस?



ही कविता मी, त्या मध्यम वर्गीय मुलीच मनोगत मांडायचा प्रयत्न केला आहे जी glamour जगताच्या झगमगाटाला मोहुन दृष्टचक्रात अडकली आहे आणि त्या बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तीच्याकडे नाही.

तिची परिस्थीती आणि तिच्या घरच्यांच तिच्या बद्दलच्या अपेक्षा मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण तो तेवढासा पोहचला नाहीस वाटते.



चटका लावणारी कविता!
विदग्धी म्हणजे?



ओह!
वेगळाच विषय आहे, सत्यजीत. फक्तं मला कळली नाहे म्हणजे 'पोचली; नाही असं नको म्हणूस. कधी कधी नाकासमोरचंही दिसत नाहीच ना आपल्याला?
सगळी कडवी आता एकदम भिडली. पाचवं सोडून. तिथे पहिल्या ओळीत तुला नक्की काय म्हणायच असेल ते मला कळत नाहीये.
कुणी ओरबाडुनी देतो कुणी दांभिक उदार
अंधाराच्या हाता हवा निज उघडा पदर

कविता सुंदर आहे, काहीतरी खोल अर्थ आहेत हे जाणवतय पण नक्की कळलं नाही की, एक छान मैफिल ऐकली पण राग कोणता होता ते नीटसं कळलं नाही असं वाटतं.



चिनू विदग्ध म्हणजे... जळालेला, राख करणार कींवा राख होउन उरलेला. असा अर्थ मला प्रेरित आहे. चुकीचा असल्यास सांगा.

दाद, येथे जरा वेगळ म्हणायच.. स्पष्टच सांगायच तर. एकदाका स्त्रीह्या दृष्टचक्रात अडकली की तिचा उपभोग घेणारे अनेक. कुणी ओरबाडुन घेणरे तर उगाच प्रेमाचा आव आणणारे कींवा सांत्वनाचा आव आणुन उपभोगणारे. अंधाराचे हात या करता की त्याना चेहरा नसतो ते असतात ते फक्त कीळसवाणे स्पर्ष..
वणवा कधीच विझुन जातो पण त्या नंतरची होरपळ मात्र अयुष्यभराची ह्या अर्थी अजुन एक कडवं सुचल होत पण ते इथे नाही लिहील..

वणवा नुसता वणावा असतो सदा कधी उरत नाही
एकदा वणव्यात जळालेले पुन्हा हीरवे होत नाही

ह्या रियलीटि शोजच पेव फुटल असताना असे वणावे जागो जागी पेटले असतील. ह्या वणव्यां पासुन सावधान रहा, जे झगमगत ते सगळच तेज नसत येवधच ह्या कविते मागच प्रयोजन...



अर्थाबद्दल धन्यवाद. काहूर उठवून गेली कविता.