हे राम

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 July, 2008 - 03:21

राजघाटावर | खादीचा वावर |
गांधीबा पार | आश्चर्यचकीत ||
तिथी की जयंती | महात्मा पुसती |
नेते जयजयकारती | सत्तामेवाजयते ||
डाव्यांनी अवचित | केले 'अणु'चित |
पाठींबा खेचीत | ठाकले विरोधी ||
लागली ठास | संकटी देश |
रयतेच्या भल्यास | मांडला ठराव ||
फायलींचे ढिगारे | उपसून सारे |
लाड केले पुरे | असंतुष्टाचे ||
खुनी दरोडेखोर | जरी शिरजोर |
तरी खासदार | हे मह्त्त्वाचे||
परा'कोटी'चे प्रयत्न | ना..ना 'हो' यत्न |
झिडकारलेले रत्न | धारिले माथी ||
किती 'वाटा'घाटी | मुलायम भेटी |
सत्तेच्या सारीपाटी | अमर हा डाव ||
'माया'स चाट |'लाल'च सपाट |
सोनियाची पहाट | राखली पगडी ||
कशीही काहीही | जगावी लोकशाही |
हा आशिर्वाद घेण्या | पायी तुमच्या ||
लीन गुडघ्यावरी | बैसुन चौथरी |
गांधीबा उच्चारी | "हे राम" ||

गुलमोहर: 

अप्रतीम !! अतिशय सुंदर !!! मान गये बॉस !!!!
........................अज्ञात

कौतुक, खूप छान रचलंय. कालचा गोंधळ पाहून गांधीजींनीच काय, स्वातंत्र्यासाठी हाल सोसलेल्या प्रत्येकाने "हे राम" म्हटले असेल. अख्ख्या जगासमोर आपली लक्तरे वेशीवर मांडली गेली.

२ दिवसाच्या या गदारोळानंतर असेच काहीतरी झणझणीत लिहावेसे वाटत होते, तुम्ही ते लिहीले !
आपण ज्या सन्माननिय लोकशाहीचे नागरीक आहोत त्यातील हे सगळे खेळ बघता कोणते लोक आपले राज्यकर्ते आहेत . आपण नक्की कोणाला निवडून दिले आहे हे बघून खिन्न व्हायला होते...!

गोदेय

जबरी लिहीले आहे! एकदम आवडले.

अचूक शब्दमेळ.. आवडलं...

लीन गुडघ्यावरी | बैसुन चौथरी |
गांधीबा उच्चारी | "हे राम" ||
मस्त रे...

वाह रे !!!

परागकण

कौतूक, खरंच कौतूकास्पद.. प्रतिसादाला शब्दच नाहीत. अगदी सर्वांच्या मनातलं लिहिलंस.

अगदी छान सुरात आरती उतारली आहे!