"मल्ल्या अरे बस कॅन्सल केलीत काय?"
"माणसच्नायत मग म्हणून गाड्या केल्यांमग"
"अरेरे! बस असती तर मी आलो असतो."
"उचकवू नको मला... तू चल मी गाडीत जागा करतो"
"नाय रे अडचण होईल"
"तू चल बे मी बगतो..."
फोन करून फसल्यासारखे झाले... बायको परवानगी देणार नाही... आत्ताशी ताप उतरलाय... गेलो तर पुन्हा...
"हबा, अरे रामला फोन कर त्यो घारापासनं उचलल तुला..."
रामचा फोन दहादा ट्राय केला तरी लागला नाही. म्हटलं चला वाचलो. निवांत होऊन गाढ झोपलो. सकाळी सहाला उशाला भुंगा भुनभुनला... मोबाईल व्हायब्रेट होत होता. न बघताच रिसीव्ह केला. कानाला लावला.
"आटपलस का रे?"
"कोण?"
"आर्या"
"नाय गं गाडी नाय अॅड्जेस्ट झाली... म्होरला जायन म्या दमानं"
"फोन ठेव मी मल्ल्याला फोन करते"
पाचेक मिनीटात पुन्हा फोन वाजला.
"हबा, राम बोलतोय, दहा मिनीटात पोहोचतोय." इ. इ. चर्चा झाली. आता येत नाहीम्हणने म्हणजे मित्रांशी खेळ करण्यासारखेच. बायको झोपेचं सोंग घेऊन सगळं ऐकत होतीच.
"अगं... ते मी... फोन आलेला... "
"चहा करून पाहिजे का?"
"नको.. म्हंजे मी कशाला जातोय..."
"जा पण भिजू नको. पुन्हा ताप, सर्दी असलं काही झालं तर बघ."
तेवढ्यात चिरंजीव जागे झाले. भर रविवारी बाबा आपल्याला घरी ठेऊन फिरायला जाणार हे त्याच्याही लक्षात आले असावे. त्याने गादी ओली करून निषेध नोंदवला.
"तू चहा ठेव जा मी बदलतो... "
"अंघोळ करून जाशील ना?"
"कशाला? वविला जाताना अंघोळ म्हणजे मरीआईच्या जत्रेचं बोकडं खायला जाताना अंडाबुर्जीचा नाष्टा करून जाण्यासारखं होईल."
विनोद बरा होता पण ही हसण्याची वेळ नाही हे तिला पक्क माहिती होतं.
"अंघोळ करून जा"
"अगं कुणीच येत नाही अंघोळ करून.. सगळे पारोसे असतात तिथे जाईपर्यंत" दहा मिनीटात चहा आणि अंघोळ आणि कपडे घालणे हे अशक्य होते हे तिला सांगण्यात अर्थ नव्ह्ता.
"बरं... जा तसाच"
चहा घोटला. आटपून बाहेर पडलो. बालाजीनगरला गाडी येऊन थांबलेली. मी हालेडुले करत पोचलो. राम आणि हिमस्कूल बाहेरच उभे होते. बाकी लोक गाडीत बसलेले. सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. फक्त शुभांगी कुलकर्णीला आधी भेटालेलो. पण यावेळी तीनेही काहितरी विचीत्र प्रकार करून चेहर्यात अमुलाग्र बदल (हे चांगल्या अर्थाने घेतले तरी माझी काही हरकत नाही) केल्याने. तिलाही ओळखले नाही. मागच्या कोपर्यात लक्ष गेले आणि एक सुखद सरप्राईज दिसले.
बर्याच दिवसापासून श्री कौतूक शिरोडकर यांना भेटायचे होते. "हाताला हात भिडले तसे त्यानी "गळाभेट उतरल्यावर करू" असा हलकासा पण खसखस पिकवणारा विनोद केला. मला पटकन फु बाई फु आठवले. त्यांच्या शेजारी एक महिला होत्या. मला वाटले शुटींगला सोबत आलेलं कुणीतरी असेल. एकुण त्यांची पर्सन्यालिटीच तशी होती. पण त्या चक्क दक्षीणा निघाल्या.
गाडी निघाली. मल्ल्याची वाट पाहण्यासाठी सोलकरी ला थांबली.
खाली उतरताच
"ए हे क्काय घातलयसं हबा?"
दक्षीणाच्या या प्रश्नाने मी हबकलोच. झोपेत पँट घालायची विसरलो की काय म्हणून बघितले तर पँट जाग्यावर होती. टी शर्ट होता. स्वेटर होते. जॅकेट होते. कानटोपी होती. आणि तरीही ही असा प्रश्न विचारते?
"का गं? कपडेच घातलेत मी?"
पण एकुण तिच्या एक्स्प्रेशनवरून. कोण आलाय? का आलाय? यापेक्षा कोणीका येईना पण काय घालून आलाय? हे जास्त महत्वाचे असल्याची जाणीव मला झाली. आणि या कसोटीवर आपण तहहयात निकृष्टच राहणार इतका आपला कपड्यांचा चॉईस सॉलिड असल्याची पुन्हा एकदा खात्री झाली. असो, बर्याच जणांनी नंतर तू एखादी आर्धी चड्डी (काही लोक त्याला बर्म्युडा पण म्हणत होते) घालून यायला हवे होतेस असे सांगीतले पण दहावीनंतर आपण कायम फुल पँटच वापरत असल्याने तसा विचार माझ्या डोक्यातच नाही आला. असो त्यानंतर श्री कौतुक शिरोडकरांचा बड्डे, पल्लीच्या मुलीचा बड्डे, (श्रावणी)
साजिर्याचा शिळा बड्डे असे सगळे बोलून झाले. त्यादरम्यान. बोलता बोलता 'च्यायला' हा शब्द आमच्या तोंडून गेला. आणि नेम धरून बसल्यासारखी दक्षिणा बोल्लीच...
"ए तू शिव्या काय देतोयस?"
मला परिस्थिती चा अंदाज आला. आता आपल्या वाक्या वाक्याला काहीतरी खटकणार हेही लक्षात आले. हळूच उठलो तिच्या नकळत तिला एक प्रदक्षिणा घातली आणि पाच पावलांवरून रामराम करून कमीत कमी बोलण्याची ताकद दे असं नवस बोललो.
मल्ल्या आला. त्याच्या गाडीत तो माझ्यासाठी जागा देणार होता. पण परिस्थिती बिकट होती. गणेशही त्याच गाडीत येणार होता. ड्रायव्हरशेजारच्या सीट वर दोघांना बसावे लागणार होते. सीट छोटी होती आणि सीट संपताच सीटबेल्टचे ते लोखंडी दांडाके होते. आत्ता इथे बसलो तर पुन्हा आठवडाभर कुठेच बसता येणार नाही हे ओळखून मी माझ्या वाट्याचा तो आनंद गणेशला देऊ केला. निम्मा प्रवास झाल्यावर त्याला हबाने आपल्याला फ्रंट सीट का दिली याची उकल झाली.
दर दहा मिनीटानी "हबा, तू चाप्टर हाय हा हबा" असं म्हणून तो कळ मारण्याचा प्रयत्न करत होता.
मल्ल्याच्या पोराशी खेळत,
आर्याच्या मुलाशी गप्पा मारत प्रवास संपला आत जाताच गिर्या, विन्या, यो, इंद्रा, रोहीत, प्रणव दिसले. कुलंगचा ग्रूप. पण कुणाशी बोललो नाही. मस्त भिजत दंगा करत होते. म्हटलं जरा निवल्यावर बोलू. नाहीतर आपल्याला भिजवायचे. मग सगळे अनोळखी चेहरे बघत कुणी आपल्याकडे बघून एखादी स्मायल देतय का ते पाहिले. डुआय भेटला, तो सांस ची धुरा वाहत होता. रोहितने मला आजारी आहेस भिजू नकोस असे सांगून स्वतःची छत्री दिली. मग मी आणि साजिरा आम्ही भर स्विमींग पुल मधे लोकांना ओळीत उभा करून फोटोची पोज द्यायला लावली आणि कॅमेरा उलटा धरून स्वतःचेच फोटो काढले. जे हुशार होते त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. पण जे खरोखरच ब्रिलीयंट होते त्याना काहीच कळाले नाही.
पण ते वातावरण बघून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. नाकातोंडात पाणी जाईपर्यंत चर्चेच्या डबक्यात बुडणारे हातात हात घालून स्विमींग पुल मधे तरंगत होते. दोन संघ करून एका मोठ्या गोल आकाराच्या चेंडूने पाण्यात हॉलीबॉल खेळ्त होते.
महिला वर्ग भिंती धरून तो सामना पाहत होत्या आणि एक दोघिंच्या तोंडावर बॉल बसूनही पाण्याबहेर पडायचं नाव घेत नव्हत्या. सगळ्यांच्या चेहर्यावर रिमझिमणारा आनंद, उत्साह पावसापेक्षाही देखणा दिसत होता. आंम्ही आपले छत्री घेऊन साजिर्याचा फोटोग्राफी असिस्टंट म्हणून फिरत होतो. मधेच अनोळखी लोक येऊन 'मैत्र जिवांचेचा सभासद होणारे मी... मागच्या वेळी जरा कामात होतो...' वगैरे बोलून जात होते. मी आपला बालमित्र असल्यासारखा. मी करतो फोन तुम्हाला निवांत म्हणत होतो. फोन नं. मात्र त्यापैकी कुणाचाच नाही. (ईमेल करा रे).
मग आंही धबधब्याकडे गेलो. मी तिथे पोहोचायच्या आधीच गिरीविहार धबधब्यात कोसळून वाहत वाह्त खाली येऊन एका दगडावर आपल्यासोबत वाहत येण्याची जबरदस्ती करत थांबलेला. लोक त्याला कसा खेचायचा यावर चर्चा करत होते. आता हा बाफ पेटला तर अॅडमिन टाळा लावायच्या आधी गिर्याची टाळी वाजणार अशी भिती मला वाटली पण तेवढ्यात विन्या, कौतूक, यो, रोह्या, आणि सहकारी यांनी दोरी टाकून त्याला बाहेर खेचला. चिंगळी माश्यांच्या गळाला हिप्पो लागल्यासारखा नजारा तयार झालेला. पण तो सुखरूप बाहेर आल्यानंतर सगळ्यांचाच जीव काठावर पडला. परत सगळे स्विपु कडे आले पुन्हा पाण्यात खेळ. आता मला असंलांबून बघायला नको झालेलं म्हणून मी जरा जवळ जाऊन उभा राहिलो. तर मल्ल्या आणि गणेशने घात केला हातातल्या छत्रीसहीत अंगावरच्या कपड्यांसहीत आणि खिशातले पैसे, मोबाईल, घड्याळ, जसा होतो तसा पाण्यात फेकला गेलो. आणि कृष्णाकाठच्या देहाला एकदा पोहायची संधी मिळाली की सोनं केल्याशिवाय राहवलं नाहीच. बदलायला कपडे नेलेले नव्हतेच. त्यानंतर आमचा अखंड ववी झाला. रामने बजाऊन सांगितलेलं ताप उलटेल. पण मल्ल्या उलटेल असं एकदा जरी म्हणाला असता तरी मी मल्ल्यापासून दूर राहिलो असतो. नंतर सगळ्यांचा डॉन्स झाला. घारूआण्णांचा डान्स बघून मला बिरोबाच्या जत्रेत मळवट भरून नाचणारे ढोलवाले आठवले. आनंद सुजू आपल्या कवायतींनी सोबतच्यांच्या तोंडावर सूज चढावी असे प्रकार करत होते. एकून नाचाची प्रत आणि दर्जा बघून महिला मंडळाने आपला वेगळा गोल करून ढिंकचिका या गाण्यावर मंगळा गौर सुरू केली. ते बघून मी घारूआण्णांना शंभर मार्क देऊन टाकले. यो रॉक्सच्या अदांनी अनेकांना घायाळ केले. श्री कौतूक शिरोडकर यानॉही बराच वेळ डॅन्ससारखेच दिसणारे काहितरी केले.
होता होता जेवणे झाली. आणि.....
सांस्कृतीक क्रिडा मंडळाने अवघ्या वातावरणाचा ताबा घेतला. डुआयने माईक हातात घेताच सगळेजण गांभिर्याने त्याच्याकडे पहायला लागले. त्याच्या कपाळावर खेळ सुरू व्हायच्या आधीच घाम आलेला. मी आर्या आणि त्याने खूप धावपळ केली. सांस्कृतिक कार्यक्रमांचे यश हे त्यांच्याच कष्टाचे फळ म्हणायचे. लंगडी हा खेळ घ्यावा की न घ्यावा असा बराच खल झालेला पण ऐन वेळी बाकी खेळ रद्द करून पहिल्यांदा तोच खेळ घ्यायचे ठरले. परिस्थीती बिकट होणारे याचा अंदाज होताच. पहिल्याच फेरीत ढासळा ढासळी झाली.
पण मला काही विशेष मजा नाही आली. मग म्हटल खेळ जरा अवघड करू. एक हात वर ठेऊनच लंगडी घालायची आणि तो हात खाली आला की लंगडी घालणारा ऑट होणार. पण हा प्रयोग अशक्य आहे असे दोनतीन खेळाडुंच्या खेळून झाल्यावर लक्षात आले.. मग कौतूक शिरोडकर यांनी "हबा तू करून दाखव" अशी आज्ञा दिली मग मी काय लगेच तयारच होते. एका सरळ रेषेत लंगडी घालत पळत गेलो आणि तसाच परत आलो.
सगळ्यांना वाटालं सोप्पाय. पण सरळ रेषेत सोप्प असलेलं हे काम. समोरच्याला आउट करताना किती अवघड होणारे याचा अंदाज कुणालाच नव्हता. खेळ उत्साहात सुरू झाला आणि त्याच उत्साहात खरा नजारा दाखवला तो आण्णांनी आणि त्या अज्ञात मॅडमनी. गरूडाला लाजवेल अशी झेप घेत आण्णा एका माणसाकडे झेपावले. सगळे खेळाडू रिंगणात असताना आण्णा त्या बिचार्याला का आउट करायला गेले ते कळले नाही पण ते जे गेले ते असे गेले की लोकांना वाटाले आण्णा गेले की काय? पण वीर आण्णा दोन सेकंदात उभा राहिले आणि मर्द को कभी दर्द नही होता असे भाव चेहर्यावर घेऊन सगळ्यांकडे आत्मविश्वासाने बघत राहिले. तो आत्मविश्वास होता की चक्कर आलेली ते मात्र आण्णांनाच माहिती.
नंतर अगदी बारीक, चपळ दिसणार्या एक मॅडम आल्या
भन्नाट वेगात विरोधी पक्षावर झेपावल्या विरोधक पटकन बाजूला झाले आणि मॅडम धापकन तोंडावर आपटल्या. दोन्ही गुडघे सनकले. पायाच्या अंगठ्यातून रक्त आले. खेळातला हा बदल योग्य असल्याची माझी खात्री झाली.
पोटात दुखेपर्यंत हसलो. अर्थात सगळेच हसले. लंगडी घालताना लहानपणी बराच वेळ हवेत बागडलेल्या पावलाला जुने दिवस आठवले असतील, जर कुणाला शाळेच्या पटांगणाची, घराच्या अंगणाची, झपकुळीच्या घरांची आठवण आली असेल तर हा खेळ यशस्वी झाला असं नक्कीच म्हणता येईल.
केळं खाऊ स्पर्धा म्हणजे तर तुफान धमाल होती. पण संयोजकांच्या अपेक्षे प्रमाणे कुणाच्याच नाकात केळ न गेल्याने म्हणावी तशी मजा आली नाही. सगळ्या स्पर्धकांनी एकमेकाच्या तोंडाचे अंदाज बरोबर घेतलेले.
चित्र काढण्याची स्पर्धाही छान झाली.
सगळ्यानी मनापासून सगळ्या स्पर्धांमधे सहभाग घेतला. कसली तक्रार नाही. कस्ला रुसवा नाही. पडलो म्हणून संयोजकांना आभार नाही.
आयुष्याच्या शंभर पानी वहीचं एक पानं जिव्हाळ्याच्या रंगानी रंगून गेलं... आपल्याचं आयुष्याला आघाशीपणे वाचावं असं वाटणारी खूप कमी लोकं असतात. त्यातली बहुतांश मायबोलीवर असतीलच.... असं आपलं मला सहजच वाटलं...
फोटो योगेश जगताप यांचेकडून साभार!!!
मस्त वर्णन केले ववि चे...
मस्त वर्णन केले ववि चे...
मी मिसले
लई भारी!!!! काही काही पंचेस
लई भारी!!!!
काही काही पंचेस ज्ज्ज्ज्ज्ज्जाम सही आहेत हबा!!
good one!! keep it up!!
मस्त लिहिला आहे वृ.
मस्त लिहिला आहे वृ.
हबा... अजून जरा डीटेलवार
हबा... अजून जरा डीटेलवार वर्णन हव होतं.. पण ह्यातलेही काही पंचेस जबरीच...
मस्त रे ह.बा. तुझ्या शेवटच्या
मस्त रे ह.बा.
तुझ्या शेवटच्या वाक्यात सार आल .... अगदी
खुप छान वर्णन !!! खेळ
खुप छान वर्णन !!!
खेळ उत्साहात सुरू झाला आणि त्याच उत्साहात खरा नजारा दाखवला तो आण्णांनी आणि त्या अज्ञात मॅडमनी. गरूडाला लाजवेल अशी झेप घेत आण्णा एका माणसाकडे झेपावले. सगळे खेळाडू रिंगणात असताना आण्णा त्या बिचार्याला का आउट करायला गेले ते कळले नाही पण ते जे गेले ते असे गेले की लोकांना वाटाले आण्णा गेले की काय? पण वीर आण्णा दोन सेकंदात उभा राहिले आणि मर्द को कभी दर्द नही होता असे भाव चेहर्यावर घेऊन सगळ्यांकडे आत्मविश्वासाने बघत राहिले. तो आत्मविश्वास होता की चक्कर आलेली ते मात्र आण्णांनाच माहिती. >> हसुन हसुन डोळ्यात पाणी आल !!!
हबा, चान्गल लिहीलहेस
हबा, चान्गल लिहीलहेस
सगळं कसं डोळ्यासमोर उभं
सगळं कसं डोळ्यासमोर उभं राहिलं. मस्त लिहिलय !
धमाल वृत्तांत. तर हे सगळं
धमाल वृत्तांत.
तर हे सगळं मिसलं म्हणायचं.
<सगळ्यांच्या चेहर्यावर
<सगळ्यांच्या चेहर्यावर रिमझिमणारा आनंद, उत्साह पावसापेक्षाही देखणा दिसत होता. >
खरच हबा.. हे खराय.. मस्त संस्मरणीय ववि, पावसाची हजेरी, उल्लेखणीयच.. छान लिहीलस तू
हबा, मी कुठलीही प्लास्टिक
हबा, मी कुठलीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही त्यामुळे आमुलाग्र वगैरे बदल की काय म्हणत्यात तो नव्हता अज्याबात. मागच्या वेळी भेटलास तेव्हा मी जशी होते तशीच कालही होते फक्त तेव्हा तू आजारी नव्हतास

असो, वृत्तांत खास तुझ्या शैलीत लैच भारी. पण लोकांना लंगडी घालालायला लावुन लंगड केल्याबद्दल तुला आणि या वविला कुणी विसरणार नाहीत नक्कीच.
हबा स्टाईल सुप्पर वृत्तांत.
हबा स्टाईल सुप्पर वृत्तांत. सही लिहीयलस रे.
लई भारी!
लई भारी!
हबा, लगे रहो.. तुझ्यामुळे
हबा, लगे रहो.. तुझ्यामुळे बरीच मजा आली... वाकडचं वेटींग तुझ्यामुळे सुखकर झालं..
मस्त वृत्तांत. शीर्षकातली
मस्त वृत्तांत.
शीर्षकातली कोटी मस्तच!
दर दहा मिनीटानी "हबा, तू
दर दहा मिनीटानी "हबा, तू चाप्टर हाय हा हबा" असं म्हणून तो कळ मारण्याचा प्रयत्न करत होता.>>>
जे खरोखरच ब्रिलीयंट होते त्याना काहीच कळाले नाही.>>>
श्री कौतूक शिरोडकर यानॉही बराच वेळ डॅन्ससारखेच दिसणारे काहितरी केले. >>>
हबा सुंदर रे ..... त्या
हबा सुंदर रे ..... त्या गरुडझेपेचे आठ्वण सकाळ्पासुन ठणकतेय रे...... आणी उठुन उभा राहेलो ना काल तेंव्हा जुन्या आठ्वणी ताज्या झाल्या... गुडघा नेहेमी फुटायचा खेळुन... आणी आईकडुन आधी औषध मग मार मिळायचा न सांगता खेळायला जायचो म्हणुन ......काल १५ /१६ वर्षानी परत गुड्घा फुट्लाय... पण आता आई नाही रे औषधालाही आणि मार द्यायलाही.... स्वतःच निस्तरायच सगळ....
तो आत्मविश्वास होता की चक्कर
तो आत्मविश्वास होता की चक्कर आलेली ते मात्र आण्णांनाच माहिती.

पन थोडक्यात आवरतं घेतलंस असं वाटलं.
छान लिहिलंय... शेवटचा
छान लिहिलंय...
शेवटचा परिच्छेद एक नंबर
मस्तच वृतांत रामने बजाऊन
मस्तच वृतांत
रामने बजाऊन सांगितलेलं ताप उलटेल. पण मल्ल्या उलटेल असं एकदा जरी म्हणाला असता तरी मी मल्ल्यापासून दूर राहिलो असतो
महिला मंडळाने आपला वेगळा गोल करून ढिंकचिका या गाण्यावर मंगळा गौर सुरू केली.
>>>>>>:हहगलो:
खुसखुशीत वृत्तांत. सॉल्लिड
खुसखुशीत वृत्तांत.
सॉल्लिड मज्जा केलेली दिसत्ये पब्लिकनी.
मी मिसले सगळं
शेवटची वाक्य......
हबा... सह्ही लिहीलय्स सगळं
हबा...
सगळं डोळ्यापुढे आलं 
सह्ही लिहीलय्स
तुझ्या शेवटच्या वाक्यात सारं आलं .... अगदी<<< +१
फारच छान ! वविला काय वृत्ती
फारच छान ! वविला काय वृत्ती घेऊन जावं हे ब्येस दाखवलं तुमी !
मस्त वृत्तांत!
मस्त वृत्तांत!
लै भारी व्रुतांत.. हसुन
लै भारी व्रुतांत..
बॉल लागणार्यात मी पण होते.. 
हसुन डोळ्यात पाणी आलय..
तर पँट जाग्यावर होती. टी शर्ट
तर पँट जाग्यावर होती. टी शर्ट होता. स्वेटर होते. जॅकेट होते. कानटोपी होती. >>
आता आपल्या वाक्या वाक्याला काहीतरी खटकणार हेही लक्षात आले. >>>
महिला मंडळाने आपला वेगळा गोल करून ढिंकचिका या गाण्यावर मंगळा गौर सुरू केली. ते बघून मी घारूआण्णांना शंभर मार्क देऊन टाकले. >>>
बदलायला कपडे नेलेले नव्हतेच. त्यानंतर आमचा अखंड ववी झाला.>> व्वा!
खेळातला हा बदल योग्य असल्याची माझी खात्री झाली.>>
एकुण वर्णन सॉल्लीड लिहलंय हबा...मजा आली वाचताना.
बॉल लागणार्यात मी पण होते..
बॉल लागणार्यात मी पण होते..
सुरुवातच तुझ्यापासुन झालेली.
सर्वांचा आभारी आहे!!! मल्ल्या
सर्वांचा आभारी आहे!!! मल्ल्या सोडून.
हबा... मस्त वॄत्तांत रे..
हबा... मस्त वॄत्तांत रे..

होप की पाण्यात भिजल्याचा, लंगडी घालण्याचा तुला काही त्रास झाला नसेल... काळजी घे मित्रा..
खुसखुशीत. <<श्री कौतूक
खुसखुशीत.
<<श्री कौतूक शिरोडकर यानॉही बराच वेळ डॅन्ससारखेच दिसणारे काहितरी केले. >>>:D
Pages