५० वर्षांचा प्रलय - पानशेत

Submitted by विना हसुरकर on 13 July, 2011 - 23:00

१२ जुलै २०११ ला पानशेतच्या पुराला ५० वर्षे पूर्ण झली खरी पण अजूनही तो १२ जुलैचा दिवस डोळ्यांसमोर दिसतो. पूर आला म्हणले की मला तो दिवस आठवतो आणि मी परत त्या पूरात वाहून जाते. आता माझी मुलेच म्हणतात, थांब आई मी पुढचे सांगतो... असो.
तर तेव्हा मी सहावीत शिकत होते. शाळाही जवळ होती. आमचे घर तसे नदीपासून फार जवळ नाही पण फार लांबही नाही. पावसाळ्यात पाण्याचा पूर बघायला जायला पुणेकर मंडळी धावत असत.
त्या दिवशी मात्र सकाळपासून रस्त्यावर खूप गडबड होती. वायरलेसच्या गाड्या, पोलीस सतत सूचना देत होते. काहीतरी वेगळी गडबड आहे हे आमच्या घरच्यांना जाणवत होते. म्हणून मी व माझा भाऊ शाळेला बुटी मारुन घरीच होतो. माझ्या आईची गडबड चालू होती. एकीकडे ती एका पिशवीत सामान भरत होती. त्यात तिने घरातले पैसे व दागिने ठेवले वर आमचे कपडे. अर्थात हे सर्व नंतर आम्हाला कळले तेव्हा तिच्या सूज्ञपणाचा अभिमान वाटला.
मस्त आमरसपुरीचा बेत त्या दिवशी होता. आमची मुलांची जेवणे झाली होती व मोठे सर्व हणजे आई वडील, काका काकू व माझे आजोबा नुकतेच जेवायला बसले होते. आम्ही बहीण भाउ गॅलरीत गंमत बघत उभे होतो. आणि समोर नारायण पेठ पोलीस चौकीवर पाण्याचा लोंढा दिसताच आम्ही ओरडलो, पाणी आले..पाणी आले.. जेवण तसेच सोडून सर्व धावले. आईने हाताशी आम्हाला धरले, दुसरीकडे आजोबा तर कडेवर माझी लहान बहीण खांद्याला पिशवी अडकवलेली... बास.. सर्वत्र पळा..पळा.. घराबाहेर पडा.. हेच ऐकू येत होते.
पण्याच्या उलट बाजूला म्हणजे मोदी गणपती मंदीराकडे पळत होतो. देऊळ अवघ्या३०-४० मीटरवर आहे पण तेथ पोहोचेपर्यत पाणी गळ्याला भिडले. पाय पाण्यातुन उचलता येत नव्हता, आई सर्वांना ओढ्त होती, हात सोडायचा नाही बजावत होती. आमची काकू अजूनही घरातच होती. बरोबर लहान बहीण होती. तेवढ्यात माझे मामा जे सहज पूर बघायला आले होते त्यांनी स्वतःची सायकल पाण्यात सोडून दिली व काकूला धरुन तर बहीणीला डोक्यावर धरुन बाहेर आणले.
गणपतीच्या देवळापासून मग पाण्याचा वेग कमीकमी होत गेला. लक्ष्मीरोड ओलांडून मग आमची वरात हळूहळू सदाशिव पेठेत मामांचे घरी पोहोचली. आमच्यासारखे अनेक जण हक्काने मामांचे घरी आश्रयाला आले होते. सर्वानांच माझे वडील आणि काकांची काळाजी वाटत होती. पण बातम्या येत होत्या की ते दोघे आणि आमचे गल्लीतील कित्येकजण तेथे पोहत लोकांन वाचवतायत. घरातील तरंगत येणार्‍या वस्तू पकडून जमेल तसे बाहेर काढत आहेत.
हळूहळू पूर ओसरत होता. आमच्या घराचा पहिला मजला पूर्ण पाण्यात होता. त्याचवेळेस आमच्या घराची एक भिंत कोसळली आणि वडीलांच्या डोळ्यासमोर पाहता पाहता सर्व वाहून गेले. घर पडले म्हणताच माझा लहान भाऊ इतका रडला की त्याला सावरणे कठीण झाले होते. मग उद्या तुला घेऊन जातो म्हटल्यावर तो शांत झाला. वडील आणि काका रात्री उशीरा घरी आले. तेव्हा सांगत होते की किती जण डोळ्यांदेखत वाहून गेले. कोणी विजेच्या तारेला चिकटले,, कोणाला बाहेर काढले वगैरे. आमच्या घराची जी भिंत पडली त्यात आमची पूर्वीच्या काळची मजबूत लोखंडी तिजोरी होती. त्यात चांदीची भांडी, ताटे, वाट्या इ. असत. ती काढून आणणे आवश्यक होते तितकेच अवघड होते. पण उद्या जाऊ असे ठरले. घर पडले म्हटल्यावर आता पुढे काय हा प्रश्न आ वासून उभा होता. पण मामांनी नंतर आनंदाने तेथे राहायला लावले. मामींनी अंधारातही पिठले भाकरी सर्वाना खाऊ घातले. झोप लागणे शक्य नव्हते. पानशेत धरण फुटले होते..
दुसरे दिवशी सकाळी वडील, काका आणि मामा सर्वजण तिजोरीतून सामान आणावयास गेले. प्रचंड चिखल झालेला पण तिजोरी उलटी पडलेली. मग २०-२५ जणांनी मिळून ती सरळ केली आणि दार उघडणार इतक्यात अफवा आली की पळा पळा खडकवासला धरण फुटले. मग पुन्हा धावपळ, चोर्‍यामार्‍या.. आमचेकडे तर इतकी धावपळ झाली की आम्ही पूर या शब्दाचा धसका घेतलेला. आमची आई आम्ही सर्व मुले म्हणजे मामांचीही मुले सर्वांना घेऊन पर्वतीकडे पळाली. वाटेत भेटलेल्या ट्रकला विनंती करत होती की आम्हाला पर्वतीला सोडा-- अशी आमची दैन्यावस्था झालेली.
दुपारी पर्वती उतरुन घरी आलो आणि आमचे घर बघायला गेलो. हाय रे!! चिखल, राडा, डास, वास ह्यातून घराजवळ जातो तर समोरच्या परशुराम डेअरीतील म्हशींना अक्षरशः कापून बाहेर काढत होते. मुके जीव बिचारे...!
घराच्या तीन रिकाम्या भिंती उभ्या होत्या. आत सर्व मोकळे! शेजारी, समोर थोड्याफार फरकाने तीच अवस्था होती. आमच्यासारख्या पूरग्रस्तांना सावरायला बराच वेळ लागला. खूप मेहनत घ्यावी लागली. प्रचंड हाल झाले.
आमचे वतय जरी लहान होते तरे हे चित्र आजही डोळ्यासमोरुन हलत नाही. असा तो पानशेतचा प्रलय आम्ही प्रत्यक्षात अनुभवलाय हो!
- वीणा हसूरकर

गुलमोहर: 

Thanks ashwini
तु मला सर्व लिहायला मदत केलिस . me senior citiz ahe so not use to type in marathi on net
पन try करते.anyway मदत केल्याबद्दल धन्यवाद.
वीना

वीणा, खरच सगळ अगदी भयावह होतं आणि तेव्हा आजच्यासारख्या मोबाईल सारख्या सुविधा पण नव्हत्या पुढच्यांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी.
तुमची आई धीराची तिने परिस्थितीचे भान ठेवुन तुम्हा सगळ्यांना योग्य जागी हलवले.

पानशेतचे धरण फुटल्यावर आलेल्या संकटांची अनेक वर्णने ऐकली आहेत. ( धरण फुटले तेव्हा जन्म ही झाला नव्हता माझा) मात्र अनेक पेपर मधे आलेल्या अग्रलेखातून असे वाटते की हे संकट पुणेकरांसाठी , पुण्याचा सर्वांगीण विकासासाठी ही इष्टापत्ती म्हणायचे का ? आपणास काय वाटते.

अमोल केळकर
----------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा