...जीवनाच्या कणाकणाचा मीच साक्षी !

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:35

कितीक आली आणि गेली
पाखरे गोंदून नक्षी ,
जीवनाच्या आकाशाचा
एक माझा मीच साक्षी !

कितीक वाहिले वादळवारे,
कितीक तुटूनी पडले तारे,
आकाशही कोसळले सारे...
वेदनेच्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

सुखामध्ये आतुर झालो,
दुखा:मध्ये कठोर झालो,
भावनेला फितूर झालो…?
भरकटलेल्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

हारलो ना,जिंकलोही,
बे-ईमान विकलो नाही,
कर्तव्याला मुकलो जरि,
निर्णयाच्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

ग्रीष्मामध्ये वठलो नाही,
शिशिरात गोठलो नाही
वसंतात फुललो न जरि,
फुललेल्या त्या क्षणांचा मीच साक्षी!

मला येथली प्रीत न कळली,
जगण्यामधली रित न वळली,
विरले जीवनगीत जरि,
छेडलेल्या त्या सुरांचा मीच साक्षी!

मला न कळले जगण्यामधले
जळकट अर्थ,
मला न वळले समिधांमधले
कळकट स्वार्थ,
जळणे मला जमले न जरि,
जळणाऱ्या त्या मनांचा मीच साक्षी!

जन्म अनंत जरि न पाहिले,
मृत्यू अनंत जरि न साहिले,
क्षणात विरून गेलो तरीहि
जीवनाच्या कणाकणाचा मीच साक्षी!
-डॉ.सुनील अहिरराव
(c)original copy)
(सर्व हक्क सुरक्षित)

गुलमोहर: