आतून जागते कोणी

Submitted by जया एम on 16 March, 2011 - 07:50

मी डोळे मिटते तेव्हा आतून जागते कोणी, प्राणाच्या तरल पटावर पुसटशी कुणाची छाया
देहात श्वास कळवळतो- इतुकीच आर्जवे ऐक, तडकते जिवाची काच, विरघळे मृगजळी माया

हा जन्म भाबडे ऊन, कुणि झाड जिवाचे हलवी, पाखरू होऊनी अवघे आभाळ तरंगत जाते
प्रतिबिंब कुणाचे विरते काचेत जिवाच्या रुतुनी - मी अर्धस्फुट स्वप्नांना झोपेत कवळुनी घेते

स्पर्शात साकळे अर्थ, गाभ्यातून आशय भिजती, बंधांचे गर्भ उसवुनी आयुष्य प्रसवते नाती
घनघोर वाळवंटात शिम्पते मार्दवे कोणी , सांत्वने साजिरी माझ्या डोळ्यातून झिरपत जाती

निद्रेतुन कुंडलिनीचे सातवे चक्र तगमगते, हलक्या शपथा - जडभारी इथल्या जन्मीच्या गाठी
विप्रलंभ घंटानाद हृदयात भरुन मी उठते, नि:शंक हात जुळतात भव तरून जाण्यासाठी

गुलमोहर: 

आपली ही कविता 'जाणवून घ्यावी' अशीच!

अप्रतिम!

हा जन्म भाबडे ऊन, कुणि झाड जिवाचे हलवी, पाखरू होऊनी अवघे आभाळ तरंगत जाते
प्रतिबिंब कुणाचे विरते काचेत जिवाच्या रुतुनी - मी अर्धस्फुट स्वप्नांना झोपेत कवळुनी घेते>>> सुरेख!

'कविता' या सदराला नवचैतन्य यावे या कवितेने!

पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता!

खरीखुरी कविता अशीच असावी असे वाटले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

!

>>निद्रेतुन कुंडलिनीचे सातवे चक्र तगमगते, हलक्या शपथा - जडभारी इथल्या जन्मीच्या गाठी
विप्रलंभ घंटानाद हृदयात भरुन मी उठते, नि:शंक हात जुळतात भव तरून जाण्यासाठी >>

बाई कुठे आहात ?!