संथ चालती ह्या मालिका

Submitted by फारएण्ड on 2 June, 2008 - 00:00

कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्‍याच बेटियॉ दिसत होत्या. एकूण प्रसंग सात फेरे वाला होता. सगळे क्रमाक्रमाने आनंदी, वात्सल्ययुक्त (काही 'युक्त' म्हंटले की श्रीखंडच आठवते. भूक लागली ) वगैरे नजरेने पाहात असतात. तेवढ्यात त्यातली एक खुनशी वगैरे हास्य करते यातील त्या कृतिका देसाईसारख्या दिसणार्‍या बेटीकडे बघून (सोयीसाठी आपण तिला क्रुतिका देसाईच म्हणू), चार पाच वेळा कॅमेरा फटाफट झूम इन झूम आउट होतो, पण इकडे फेरे चालूच असतात. वधूच्या डोक्यावरचा घूंघट पूर्ण चेहरा झाकत असतो, पण पुढून खालच्या कोनातून बघितले की आत एक हॉरर पिक्चर मधे दाखवतात तसे डोळे असलेला चेहरा दिसतो. त्याचबरोबर एक दुसरी बेटी कोठेतरी बहुधा कोंडलेली तेथून बाहेर पडते व रिक्षाने कोठेतरी जायला निघते.

मग क्रु.दे. ला शंका येऊ लागते, तेवढ्यात तो घूंगट जरा हालतो आणि तिच्या लक्षात येते की ही भलतीच बेटी फेरे मारते आहे. आणि एकदम क्रु.दे. 'रोक दो ये शादी' ओरडते. पुढचे ५-१० मिनीटे प्रत्येकाचे reaction शॉट दाखवलेत नुसते वेगवेगळ्या कोनातून. प्रत्येक जण इमाने इतबारे दुसर्‍याची प्रतिक्रिया झाल्याशिवाय आपली देत नाही. इतके की शेवटी दिग्दर्शकच विसरतो की मूळ आरोळी क्रु.दे नेच मारली होती, कारण तिच्याच ओरडण्यावर तिचीच पुन्हा प्रतिक्रिया दाखवली आहे. या प्रतिक्रियांमधेच चार पाच फेरे होऊन गेले असतील मग तो गोंडस वगैरे दिसणारा वर त्या बेटीचा घूंघट (खस कन वगैरे नाही, अगदी 'घूंघट उठा रहा हू मै...' कभी कभी स्टाईल) उचलतो आणि अजूनपर्यंत तुमच्या लक्षात आले नसेल तर (मात्र तुम्ही या सिरीज पुन्हा पुन्हा पाहा) सांगतो की त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतीच मुलगी निघते.

मग तो बहुधा सासरा किंवा मोठा दीर असावा असा माणूस (तो पहिल्या मुन्नाभाई मधला... ज्याला शेवटी मुन्नाभाइ बोलका करतो तो, नाव आठवत नाही) बरेच डॉयलॉग बोलतो. मग पुढची वाक्ये ऐकू आली नाहीत (कोणीतरी चुकून रिमोटवर mute दाबले आणि रिमोट शोधून म्यूट बटन शोधून लावण्यासाठी तेथे काही रिची बेनॉ बोलत नव्हता) पण झीकृपेने सबटायटल्स होती: you are a prostitiute , किंवा ...behaving like a lajawanti girl किंवा असेच काहीतरी. वर तिला ही धमकी देतो की जर तू पुन्हा असे केलेस तर काहीतरी करीन. म्हणजे एकदा हा प्रसंग घडल्यावर सुद्धा पुढच्या लग्नात जिचे लग्न आहे तीच मुलगी फेरे मारायला उभी राहील याचा भरवसा यांना नाही.

१० मिनीटेच एवढी जबरदस्त असतील तर सिरीयल काय असेल? लावायला पाहिजे हे चॅनेल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिअली? बरं मित्राचा फोन ब्लॉक केलाय पण मित्र, नातेवाईक कोणी त्याला एक कॉल करायला फोन उधार देत नाही ? का जीओने त्यांचा धंदा गुंडाळला भारतातला? मेल पण ब्लॉक केलीत का? गेला बाजार पोस्टाने ऑफिसच्या पत्त्यावर रजिस्टर्ड पत्र तरी पाठवायचं ना? का तो ऑफीसातही जात नाही?

आणि फी म्हणून काँट्रॅक्ट मॅरेज करण्यात काय हशील आहे? नुसतंच लिव्ह इन मध्ये राहणे कमी कटकटीचं नाही का? लेखक बहुतेक प्रतिलिपीवरून आयडिया चोरत असावा. तिकडे काँट्रॅक्ट मॅरेजची कायमस्वरूपी साथ आलेली असते.

पिस्तुलाच्या गोळीने झालेली जखम हळदीने बरी झाली?
आत्तापर्यंत हिंदी पिक्चरवाले उगीच चाकू तापवून वगैरे गोळी बाहेर काढायचे. उसके बाद भी जहर बहोत फैल जाता था और सिर्फ भगवानही उनको बचा सकते थे|
मराठी आया फारच ऍडवान्सड निघाल्या. बहुतेक आपल्या पदराने/ओढणीने कपाळावरचा घाम पुसणारी हॉट नायिका सीरिअलवाल्यांच्या बजेटमध्ये नसेल. म्हणून थोडक्यात आटोपून घेतलं का?

हा एपिसोड बघून तुम्हांला तुमचे केस उपटावेसे वाटले नाही का भरत?

भरत Lol कहर धमाल लिहीले आहे. सगळीच पोस्ट. हीच बघायला पाहिजे. नाहीतरी तिकडे भूमी व आत्या बोअर करत आहेत. वरती ती शिल्पा नवलकर वाली सिरीज ती तीच.

कॉट्रॅक्ट मॅरेज हा काय प्रकार आहे? काही अधिकृत आहे का असे नवीन? सरकारात रजिस्टर केलेली सगळी लग्ने कायद्याच्या दृष्टीने सारखीच ना? एरव्ही रजिस्टर अजून केले नसेल पण सात फेरे झाले असतील तर लग्न झाले समजतात असे वाचले आहे. त्याचे लीगल स्टॅण्डिंग माहीत नाही. पण हा कॉट्रॅक्ट मॅरेज प्रकार नवीन दिसतो.

फारेण्ड, पहाच. धमाल आहे. निवेदिता जोशीला अगदी मोकळं सोडलं आहे.
माझेमन , माझी इम्युनिटी वाढली आहे. या सुखांनो या पाहताना केस उपटावेसे वाटायचे (विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर , इ.) त्यानंर इतक्या मालिका पाहिल्या की काही त्रास होत नाही. so bad its good असं झालं आहे.
--
जुळून येती मध्ये ती आणखी एक रडकी मुलगी होती आणि तिचा चिडका नवरा होता. त्याचा फोन तर कधीच लागत नसे.

पण हा कॉट्रॅक्ट मॅरेज प्रकार नवीन दिसतो.
>>> हा प्रकार फक्त सीरिअल्स आणि काही कथांमध्ये असतो. बाकी लोक्स लग्न करून किंवा न करता सुखाने (?) राहतात.

माझी इम्युनिटी वाढली आहे >>> Lol

भरत , धमाल Lol
अमितवची आतेबहिण लेखिका आहे या मालिकेची , तो फीडबॅक पोचवतो म्हणाला होता मला . Happy

भरत Lol तुम्हाला _/\_ . पेशन्स आहे! गोळी काढल्यावर हळद काय!!

जुळून येती मध्ये ती आणखी एक रडकी मुलगी होती आणि तिचा चिडका नवरा होता >>> हो हो Lol ती चित्रा - मनोज ची जोडी. तो म्हणे ऑफिसात गेल्यावर फोन बंद करत असतो. डेडिकेशन पहा! Proud

गोळी नुसती चाटून गेली. तीपण सँडलच्या आतल्या पावलाला. पावलाला चाटून पुढे कुठे कशी गेली, हे त्या गोळीलाच माहीत.

भरत, Lol

या सिरियलचा वेगळा धागा काढा. वाचायला मजा येईल.

Lol
अरुंधती खरंच दाखवली आहे? त्याच गेट अप मधे की काय?
म्हणजे व्हर्च्युअल व्हर्च्युअल म्हटले तरी त्यांचे पण काही उसूल असतात म्हणायचे!

फा.. Biggrin
काँट्रॅक्ट मॅरेज नवीन टर्म दिसते. म्हणजे वधूवरांच्या संमतीने काही महिन्यांसाठी जगाला दाखवलेलं लग्न! असा ढोबळ मानाने अर्थ असावा. पण मग अर्थात त्या दोन पार्टीज प्रेमात पडणारच आणि सगळे राडे होणारच पुढचे!

कॉट्रॅक्ट मॅरेज हा काय प्रकार आहे? काही अधिकृत आहे का असे नवीन? >> या सिरियल मध्ये एका वर्षासाठी / मधुभाऊ (नायिकेचे मानस बाबा) जेलमधून बाहेर येईपर्यंत लग्नाचे कॉट्रॅक्ट केलेले आहे. त्याचवेळी घटस्फोटाच्या पेपर्स वर पण सह्या केल्या आहेत. नंतर मी नाही जा म्हणायला चान्स नको.

दोन पार्टीज प्रेमात पडणारच आणि सगळे राडे होणारच पुढचे!>> आता तर काहीही चालू आहे. घटस्फोटाचे पेपर्स कोर्टात सबमिट केले की दुसरं लग्न करायला मोकळे. सायली तर म्हणे आता घटस्फोट घेणार आणि परत त्यांच्याशीच लग्न करणार. अरे पण घटस्फोट देतच नाही म्हणून सांग ना.. सह्या केल्या म्हणजे घटस्फोट होत नाही त्याची पण प्रोसेस असते.

तर आईबाबा रिटायर होतातचा मागचा मी इथे लिहिलेला भाग इतका हॅपनिंग होता की त्यातला शेवटचा भाग लिहायचाच विसरलो. सासूबाई सुनेच्या भावाला मलमपट्टी करत असताना आणि बेसन लाडू खिलवत असताना थोरली सून ( खर्‍या) पोलिसांना घेऊन आली. बघा , आमच्या घरात कशी तोडफोड केली आहे आणि माझ्या नवर्‍याला सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारली, हे कारण. बंदूक नावाचं पिस्तुल काढलं, सासूच्या कपाळावर धरलं, याचं काहीच नाही. पण तिच्या नवर्‍यासकट घरातल्या सगळ्यांनी - ये हमारा आपस का मामला है, हिचा काही तरी गैरसमज झाला, असं म्हणून पोलिसांना जा जा केलं.

पुढच्या भागात - थोरल्या सुनेने नव्या धाकर्‍या सुनेचं लग्न झालंय हे मान्य करायला नकार दिला. हे असं मंगळसूत्र कुठेही मिळतं. मॅरेज सर्टिफिकेट कुठेही छापता येतं. पण पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. हिच्या भावाने माझ्या नवर्‍याचा सग ळ्यांसमोर अपमान केला म्हणून हिने माझ्या नवर्‍याची सगळ्यांसमोर - म्हणजे घरासमोरच्या मोकळ्या जागेत - माफी मागायची.
सासूबाईंना हे मान्य नाही. एकतर तिची काही चूक नाही, आणि माफी मागायला बाहेर जायची गरज नाही.

आता धाकट्या सुनेला आपले गुण दाखवायची संधी. सासरेबुवांचे दोन मित्र चौकशीला येतात. त्यांना घरात न नेता, अंगणातच बाक ड्यावर बसवतात. खरं तर तुमच्या घरी पोलिस आले, मारहाण झाली या बद्दल चौकशी करायला हवी. तिथे नवी सून दाखवण्याचा कार्यक्रम. तीही येताना चहा करून घेऊनच येते. लहानशा पुतणीकरवी मोठ्या सुनेला बाहेर बोलवते. आणि थोरल्या दिराच्या पायावर चहा सांडते. मेंदी लावावी इतका सावकाश तो पुसते आणि माफीही मागून टाकते. चहा सांडल्याबद्दल आणि आधी जे काय झालं त्याबद्दल. प्रफुलच्या भाषेत - माफी की माफी और सबके सामने का सबके सामने.

यावरून सासूला आपली नवी सून किती गुणाची आहे, ते कळतं.

कथा- पटकथा - चिन्मय मांडलेकर.

आपण लग्न केलंय आणि दिल्लीहून हिच्या भावांमुळे नोकरी सोडून पळून आलोय, हे मुलाने सांगितलं नव्हतं. तो अमेरिकेत नोकरी शोधतोय आणि दोन तीन दिवसांत मिळणारच आहे, मग सांगणार होता.

आता ट्रंप तात्या आल्यावर कसला जातोय तो अमेरिकेला? इथे पुढचा महिनाभर त्यांचं लग्न लागणार आहे.

चिन्मय मांडलेकर >>>>
सिरिअसली? एवढे वाईट दिवस आलेत चिन्मय मांडलेकरवर? त्यापेक्षा शिवाजीच्या अजून ४ भूमिका केल्या असत्या तरी परवडलं असतं.

दिराच्या पायावर चहा सांडते. मेंदी लावावी इतका सावकाश तो पुसते >>>>>
मला एकदम मिलिंद गुणाजीने ऐश्वर्याला नमस्कार केल्याचा प्रसंग का आठवला? नॉटी मी...

तो अमेरिकेत नोकरी शोधतोय आणि दोन तीन दिवसांत मिळणारच आहे
>>>> हायला एवढया पटकन नोकऱ्या मिळतात अमेरिकेत? नो वंडर, लोक डंकीच्या मार्गाने जातात.

भरत Lol

कथा- पटकथा - चिन्मय मांडलेकर >>> जपून पहा मग. त्याची कथा पटकथा असलेली 'तू तिथे मी' नावाची सिरिअल लै डेंजर होती. ही घ्या त्या मालिकेची लिंक -
https://www.maayboli.com/node/43883