वाचणे माझे मला

Submitted by दाद on 10 June, 2008 - 22:52

चालले आहे अजून, वाचणे माझे मला
वाचते पुन्हा पुन्हा, अन अर्ध्यावर सोडते

रोज वेगळी कथा, नाव फक्तं ते जुने
माझी मला न सापडे, खूण कालची कुठे

काल मीच वाचले, आज बदलले कसे?
लिहिते काही कुणी अन का अनामिक राहते?

हे लिहिले मीच पान! काय हे! का? कधी?
शब्द छान काल, आज अर्थहीन वाटते

लिहिणारे लिहित जाती, वाचणारे वाचताती
माझ्यातिल माझेपण काय असे राहते?

तुज समक्ष ठेवताच अक्षरे उडून जाय
इवलासा अर्थगंध पोथीसम उरुन र्‍हाय
ऐसे काही करावे मज तुम्ही देवराय
कोणी काही लिहो, मी नाम तुझे वाचते

-- शलाका

गुलमोहर: 

दाद, कविता लिहितेस हे पहिल्यांदा कळलं, सहज इकडे चक्कर टाकली तेव्हा; अन चकितच झालो.
'फुल गेंदवा..' वगैरे डोक्यात असताना असं काही वाचलं की होणारच असं.
आणखी वाचायचंय, लिहित राहा.

खुप सुंदर....
एका कलावंताच्या मनाचं हे प्रतिबींबच जणू !

प्रत्येक पारायणात नवीन आशय गवसणे अथवा शोधत रहाणे किंबहुना कालचा अर्थ आज आणि आजचा उद्या बदलणे म्हणजेच "सृजन". हीच तर कलावंताची प्रगती !!
.......................अज्ञात

मस्त! शेवटच्या चार ओळी तर अप्रतिम!

शरद

नको 'शरद' शब्दांचे वैभव, हवी भावना सच्ची,
ह्रदयावरच्या अनंत लहरी स्वीकारतेच कविता!!