दुसरा मात्र मुलगाच हवा?

Submitted by ठमादेवी on 18 January, 2011 - 02:58

आजही मुलांसाठी स्त्रियांच्या जिवाशी खेळ करायला नवरा वा नातेवाईक तयार असतात; कारण पितृसत्ताक पद्धतीचे ते पाईक! एकीकडे नवी मुंबईत ‘शक्यतो दुसरा मुलगाच हवा.. मुलगा-मुलगी दोघेही असले की कुटुंब पूर्ण होत, असं म्हणत दुसरा गर्भ पाडण्याचं प्रमाण वाढतं आहे. तर दुसरीकडे, मुलगाच होण्याची तजवीज करण्यासाठी बँकॉकला जाणा-या भारतीयांची संख्याही वाढते आहे. हे स्त्रियांच्या आग्रहामुळे चाललं आहे का?

पहिली मुलगी झाल्यावर आता दुसरा मुलगाच हवा म्हणून गर्भजलचिकित्सा आणि गर्भनिदान करून मुलीचा गर्भ पाडण्याकडे लोकांचा कल वाढू लागल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारचा प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स (पीएनडीटी) हा अत्यंत कठोर कायदा अंमलात आल्यावरही गेल्या वर्षभरात दुस-या मुलीचा पहिल्या तीन महिन्यांचा गर्भ पाडण्याचं प्रमाण सहा टक्क्यांनी वाढलंय. शिवाय दुसरा किंवा तिसरा मुलगाच असावा, यासाठी थायलंडला जाऊन गर्भारोपण करण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

केंद्र सरकारने कायद्याच्या माध्यमातून गर्भनिदानाला बंदी घातली असली तरी हे छुप्या पद्धतीने सुरूच आहे. नवी मुंबईत अलीकडेच तिथल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी केली. या पाहणीत गेल्या वर्षभरात दुसरा गर्भ पाडण्याचं प्रमाण सहा टक्क्यांनी वाढल्याचं लक्षात आलं. यातल्या जवळपास 95 टक्के जोडप्यांना पहिल्या मुली आहेत आणि त्यांना दुसरा ‘शक्यतो’ मुलगा हवा आहे. एक मुलगा आणि एक मुलगी असली की कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं, असं या जोडप्यांचं मत आहे. पण वारंवार गर्भपात केल्यानेही शारीरिक नुकसान होतं. ते टाळण्यासाठी आता थायलंडमध्ये जाऊन गर्भारोपण करण्याचा पर्यायही स्त्रिया निवडू लागल्या आहेत. ही प्रक्रिया करण्यासाठी एक स्वस्त आणि हमखास उपाय म्हणून अमेरिका, इंग्लंड अशा देशांमधूनही लोक थायलंडला जाऊ लागले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एकूण प्रक्रियेसाठी आपल्या पत्नीच्या वतीने चौकशी करणारे आणि नाव नोंदणी करणारे 80 टक्के पुरुष आहेत. अनेकदा त्यांच्या पत्नींना काय करण्यात येणार आहे, हेच माहीत नसतं. तिथे गेल्यावर त्यांना कळतं किंवा अगदी शेवटच्या क्षणी कळतं. त्यामुळे त्या अत्यंत धास्तावलेल्या असतात. स्त्रियांपेक्षाही पुरुषांना त्यांचं नाव चालवणारा वारस हवा असल्याचं थायलंडमध्ये उपचारांसाठी जाणाऱ्या लोकांकडून स्पष्ट झालंय. याची कारणं सामाजिक स्तर पहिल्यावर आणखी समजतील. हे बहुतेक पुरुष पिढीजात व्यवसाय सांभाळणारे आहेत आणि त्यांच्या पिढय़ान्पिढय़ांनी, मुलींना गडगंज हुंडा दिला तरी कौटुंबिक संपत्तीत वाटा नाकारलेलाच आहे!
नवी मुंबईतल्या पाहणीतही नेमकं हेच दिसून आलं आहे. स्त्रियांपेक्षा त्यांचे नवरेच सेंटर्सवर जाऊन लाच देऊन गर्भजलचिकित्सा आणि गर्भपात करण्याची गळ घालतात, असं दिसतं.

भारतासह इतर अनेक देशांमध्ये गर्भजल परीक्षणाला आणि गर्भनिदानाला कायद्याने बंदी घातली आहे. पण थायलंडमध्ये असे काहीही नियम नाहीत. शिवाय तिथली वैद्यकीय सेवा इतर देशांच्या मानाने अत्यंत स्वस्त आहे. त्यामुळे गर्भारोपणाच्या प्रक्रियेसाठी जगभरातून लोक तिकडे जात असतात. वर्षभरात तिकडे अशा शेकडो प्रक्रिया पार पडतात. ही प्रक्रिया म्हणजे कृत्रिमरीत्या गर्भारोपण म्हणजेच प्रीइम्प्लिमेंटेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी)म्हणून ओळखली जाते. शरीराबाहेर पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्री बीजांड यांना एकत्र करून बीजनिर्मिती करून, त्यानंतर हे बीज तीन दिवस प्रयोगशाळेत ठेवून पाहणी केली जाते. तीन दिवसांनी त्यात आठ बीजे तयार होतात. त्यातल्या दोन पेशींची लिंगचाचणी करून मग हव्या असलेल्या (स्त्री अथवा पुरुष) गर्भबीजाचं रोपण गर्भात केलं जातं.

अर्थातच इथे, मुलाचाच गर्भ हवा म्हणून भारतीय कुटुंबांकडून आग्रह धरला जातो. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये मुलींसाठी पालक आग्रह धरत असताना आपल्याकडे आजही मुलांसाठी स्त्रियांच्या जिवाशी खेळ करायला नातेवाईक तयार असतात, असं दिसतं. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, असा विचार आजही केला जातो. गेल्या काही वर्षात मुलींचं प्रमाण वाढलेलं प्रथमदर्शनी दिसत असलं तरी आपल्या समाजाचा ‘मुलगा हवा’ हा आग्रह काही कमी झालेला नाही. पण दृष्टिकोन मात्र थोडा बदलला आहे.

लग्न झालं की मुलगी सासरी जाणार हे स्पष्टच आहे. पण तिला एखादा भाऊ असेल तर आपल्या नंतर तिला एक हक्काचं ठिकाण राहील, असा विचार करणारी कुटुंबं आहेत. त्याच वेळी पहिला मुलगा असताना दुसरी मुलगी असायला हवी, असाही विचार करणारी मोजकीच कुटुंब आहेत. पण नवी मुंबईतली पाहणी नेमकं काय सांगते? मुलाचा गर्भ नसेल तर तो पाडून टाकायचा ही वृत्ती तशीच आहे. सरकारने कितीही कायदे केले तरीही त्यातूनही पळवाटा काढणारे लोक आहेत आणि ते याच यंत्रणेतले आहेत, हे स्पष्टच आहे.

गुलमोहर: 

ठमे १०००:८३४ हा रेशो हेच तर दर्शवतो. Sad
अशाच सगळ्या मुली संपवल्या तर मुलगे जन्माला घालायला कोण मिळणार यांना काय माहित???

आज सकाळीच एका पेपरात एक वाचकपत्रही वाचले याच विषयावर.

मुलगा हवाच ही मानसिकता सगळ्यांची आहे, शिकलेले-अशिक्षीत, स्त्री-पुरूष, शहरी-ग्रामिण.. कुठेही जा. मुलगाच हवा. एखाद्या घरात दोन्ही मुलगेच असले किंवा कुटूंबात मुलांचे प्रमाण जास्त असले तर ती बाब अभिमानाने सांगितली जाते. दोन्ही मुलीच असतील तरी पालकांना काही फरक पडत नसला तरी इतरांना वाईट वाटते, एक तरी मुलगा पाहिजे होता किंवा आज्काल मुली आणि मुले दोन्ही सारखेच यापैकी एकतरी उद्गार आवर्जुन काढला जातो, पालकांना मुलगामुलगी फरक पडत नसेल तर दुसरा उद्गार आणि फरक पडत असेल तर पहिला उद्गार. दोन्ही मुले असलेल्या ठिकाणी मात्र कोणीही एकतरी मुलगी हवी होती असे म्हणत नाही.

यावर उपाय काय मला तरी माहित नाही. आपण मुले ही आपली म्हातारपणाची गुंतवणुक, मुलांनी आईवडलांना म्हातारपणी सांभाळले पाहिजे, त्यांचे ते कर्तव्य आहे इ.इ. मानसिकता सोडली. आपली म्हातारपणाची व्यवस्था आपली आपणच केली तर याला थोडाफार आळा बसु शकेल. बाकी फॅमिली नाव पुढे चालवणे इ.इ. कल्पना मागासलेल्या आहेत हे लोकांना पटणे कठिण.

कायदे करुन थोडाफार आळा बसु शकेल. कोल्हापुरच्या जिल्हाधिका-यांनी एका ठिकाणी लिहिल्याप्रमाणे जानेवारी २०१० नंतर त्या जिल्ह्यात जन्मलेले कुठल्याही मुलाची जन्मपुर्व लिंगभेदचाचणी झालेली नसणार. पण ज्यांना शक्य आहे आणि पैश्याचे पाठबळ आहे ते जगाच्या पाठिवर कुठेही जातील आणि आपली सोय लावतील... Sad

अतिशय भयंकर आहे हे. सर्वात जास्त राग येतो तो असली कामं करनार्‍या डॉक्टरांचा.त्यांनी मनावर घेतलं तर गोष्ट पुढे सरकणारच नाहि Sad
आणि पहिली मुलगी असल्यावर कुटुंब पुर्ण होण्यासाठी मुलगा हवा हा युक्तीवाद तर अतिशय हास्यास्पद.तेच जर पहिला मुलगा असेल तर दुसर्‍या वेळी काहिहि चालतं.
हे सर्व थांबवण्यासाठी आपण काहि करु शकतो का?

स्त्रीला कमी लेखण्याची मानसिकता कुठवर जाते माहितेय? जेव्हा मी आणि (अजून झाला नव्हत अशा) नवर्‍यानं कोर्टमॅरेज करायचं ठरवलं तेव्हा फॉर्म भरताना नवर्‍याने माझं नाव पहिले घातलं होतं. तर त्या क्लार्कनी (जी बाई होती) यावर ऑब्जेक्शन घेतलं. कारण काय तर नवरा माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे काय? आम्ही खुप वाद घातला आणि ते तसंच ठेवायला लावलं.

हे सगळ थांबवण्यासाठी काही उपाययोजना सरकारकडून झाल्या पाहिजेत.
दोन वर्षा पुर्वी आम्ही रोटरी क्लब तर्फे एक कार्यक्रम केला होता. फक्त एक किंवा दोन मुली असलेल्या दांपत्यांचा सत्कार केला होता. पण केवळ सत्कारासाठी कोणी ही परिस्थिती बदलणार नाहीत. हा हुंडा प्रकार मुलांकडूनच घेण्याची प्रथा पाडायला हवी आता Lol

हे सर्व थांबवण्यासाठी आपण काहि करु शकतो का?
>>> नक्की करू शकतो... असे प्रकार कुणीही करताना आढळलं किंवा असं केंद्र कुठे दिसलं तर त्याची तक्रार थेट केंद्र सरकारकडे दाखल करायची... त्यासाठीचा ई-मेल मी माझ्या दुसर्‍या लेखात दिला आहे... किंवा डॉ. गायकवाड यांच्यासारख्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडे ती दाखल करता येईल...

मामी, मी लोकमतची नोकरी सोडल्यावर प्रॉव्हिडंट फंड परत पाहिजे म्हणून अर्ज केला होता.. मला पैसे मिळाले पण ते कसे? अर्ज भरताना आडनाव, आपलं नाव, वडिलांचं नाव,आईचं नाव असा भराव लागतो... मी तसाच भरला... पण केंद्र सरकारच्या डोकेबाज अधिकार्‍यांना आईचं नाव माझं आडनाव वाटलं आणि चेक त्या नावाने काढला... पुन्हा चेक नव्याने काढायला मला १०० खेटे घालावे लागले आणि सिद्ध करावं लागलं की आईचं नाव लावण्याचा अधिकार मुलींना आहे... मी माझ्या मुलीच्या नावामागे माझं नाव लावलंय आणि आता त्यावरून राडे सुरू आहेत... Sad

माझ्या साबांचे कौतुक वाटते... त्यांनी मुलगी झाल्यावर सगळ्या नातेवाईकात केशर वाटलं होतं आणि मुलगी झाल्याचे कळल्यावर त्यांचा आनंद अजून विसरता येत नाही.

ठमादेवी!

सगळचं भयानक आहे. देवानं दिलेलं मूल आपण का पाडावं? मग होऊच देऊ नये. पण मुलगाच असला पाहिजे हा आग्रह भयानक आहे. मला तर वाटते की मुलीच आईवडिलांना जास्त चांगले सांभाळतात.

शिकल्यासवरल्या लोकांना अजून एज्युकेट व्ह्यायची गरज आहे..
आमच्या इकडचीच केस.. दोन ओळखीच्या भारतीय महिलांनी( आणी नवरा,सासू,सासरे इ.इ. नी) आधीच्या दोन दोन गोंडस पोरी( वय वर्षं १२ आणी १०) असतांना काहीकाही उपाय करून एकेक मुलगा मिळवलाय.. त्यापैकी एकीचा मुलगा मेंटली थोडा वीक पण आहे .. Sad
चायना आणी इन्डोनेशियाला पण हे मुलाचं वेड पाहण्यात आलं.. या बायकासुद्धा काहीही उपाय करून घ्यायला तयार असतात..

अरे देवा! हे थायलंडचं माहित नव्हतं.... कसली ही लालसा! बाईच्या जीवाशी खेळ आणि न जन्मलेल्या भ्रूणाची हत्या! शक्य झालं तर पहिलंच अपत्य असं निवडून, मोजून, मापून, निरखून आयात करा म्हणावं..... म्हणजे घरोघरी मुलगेच मुलगे जन्म घेतील. घराण्यांना वारसही होतील, वंशाला दिवेही होतील. फक्त त्यांना वंशवृध्दी करायला बायका तेवढ्या शिल्लक असणार नाहीत. पण तंत्रज्ञान महान आहे.... त्यावरही उपाय निघेल! स्त्रीविना वंशवृध्दी करता आली तर तीही करतील. ह्या मानसिकतेचा अंत नाही! Angry

गजानन मी त्याची माहिती माझ्या दुसर्‍या लेखात दिलीय.. आता मी त्या लेखाची रिक्षा फिरवतेय असं समजू नका प्लीज... पुन्हा लिहायचा आळस इतकंच कारण आहे... Proud

मलाही दोन मुलीच आहेत. सासुबाईंचा दबाव असतानही माझ्या नवर्‍याने तिसर्‍या चान्सला नकार दिला व मुलींना पण पूर्ण स्वातंत्र दिले. आमच्या ओळखिच्या एका कुटुंबात मात्र मुलाच्या लग्नाच्या वेळी मुलीच असणार्‍या स्थळाचा विचार केला जात नव्ह्ता कारण मुलाच्या वडिलांचे असे मत होते की म्हातारे झाल्यावर मुलीला आपल्या आईवडिलांना सांभाळावे लागेल्.मला त्यांची ही मानसिकता बघून खूप चीड आली. पण इतर समाजातल्या लोकांपेक्षा आपण मराठी लोक आता ह्याचा बाउ करत नाही असे मला वाटते

ठमादेवी, तो लेख वाचतो. धन्यवाद.

पण इतर समाजातल्या लोकांपेक्षा आपण मराठी लोक आता ह्याचा बाउ करत नाही असे मला वाटते. <<< काही प्रमाणात हे खरं आहे. इतर बाबतीतही जेव्हा इतरांनी बोलतो तेव्हा मला हे जाणवतं.

हे भयंकर आहे. माझ्या नात्यातले १ डॉक्टर (मामेबहिणीचे पती) आणि माझी मामबहिण दोघे गायनॅक आहेत. डॉक्टर सर्रास लिंग भेद चाचणि करतात पैसे घेऊन. ह्या दांपत्याला पहिली मुलगी आहे, आणि जेंव्हा बहिणिला २र्यांदा दिवस गेले तेंव्हाहि त्यांनी बायकोची हिच चाचणी केली. मुलगी चे निदान झाले...बहिण अत्यानंदाने म्हणाली, बरं झालं, मला मुलगीच हवी..आणि अशा हावरट माणसाच्या पदरी कायम मुलिच पडाव्यात म्हणजे आपोआप मुलिची कदर करायला शिकेल. Sad

शिकुन माणुस शहाणा होत असता तर अजुन काय हवं होतं?

अरे देवा!!! हा थायलॅण्ड प्रकार नवीनच आहे माझ्यासाठी... किती विचित्र गोष्टींचे पायंडे पडायला लागलेत... दुर्दैव म्हणजे ज्या कारणांसाठी लोकांना मुलगाच हवा असतो, ते कारण म्हणजे-वृद्धापकाळातला आधार- खरंच तो तरी लोकांना मिळतो का? हा भाग वेगळाच!!!! Sad
वाईटच प्रकार आहे सगळा.

ठमादेवी, अभिनंदन आणि धन्यवाद इतका चांगला लेख लिहिल्याबद्दल.
ही सगळी परिस्थिती चीड आणणारी आणि विषण्ण करणारी आहे. Sad
भान म्हणते ते बरोबर आहे.
<<सर्वात जास्त राग येतो तो असली कामं करनार्‍या डॉक्टरांचा.त्यांनी मनावर घेतलं तर गोष्ट पुढे सरकणारच नाहि >>
मला वाटतं, प्रत्येक डॉक्टरने जर सद्सद्विवेकबुद्धी ठेऊन मनाशी निश्चय केला की हे असलं घाणेरडं कृत्य माझ्या हातून होऊ देणार नाही, तर परिस्थिती काही प्रमाणात तरी बदलू शकेल.
( अर्थात आता मेडिकल टूरिझ्म वाढल्यामुळे लोक हे काम दुसरीकडे जाऊन करून घेतील. Sad )

aashu29 काय पण माणूस आहे तो Angry

>>शिकुन माणुस शहाणा होत असता तर अजुन काय हवं होतं?
सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा यात बराच फरक असतो. सुशिक्षित होण्याच्या मार्गावर सुसंस्कृतपणा कुठेतरी हरवून बसतात हे लोक. अर्थात मुळात तो असला तर.

मेडिकल टूरिझ्म

माणसाने प्रत्येक गोष्टीचा गैरफायदाच घ्यायचा असे ठरवलेय काय???? विज्ञानाने पोटात असतानाच गर्भाचे आरोग्य कसे चेक करायचे याचा मार्ग खुला केला, माणसाने तो मार्ग वापरुन निसर्गावरच हल्ला चढवला.

कधीकधी मला विज्ञानाचा राग येतो ते या गोष्टीसाठीच. जे जे काही विज्ञानाने माणसाला उपलब्ध करुन दिले त्याचा वापर निसर्गाविरुद्ध केला गेला (मोठे उदाहरण अणुबाँब, आणि त्याहुनही मोठे फक्त मुलाचाच गर्भ पाहिजे असा हट्ट धरणे Sad )

मामी- हे जरी खरे असले तरी याचीही दुसरी बाजूही फार भयानक आहे.
ज्या प्रमाणात बाळ मुलगी असले तर तिला टाकुन देण्यात येते, त्या प्रमाणात मुलगे असले तर त्यांना टाकण्यात येत नाही या देशात.
त्यामुळे adoption संस्थांमध्ये मुलीच जास्त दिसुन येतात. Sad

Pages