शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारातले 'बटर' व घरचे 'लोणी' हे वेगळे पदार्थ आहेत.
जर आपल्याला 'लोणी' हा शब्द इन्ग्लिश मध्ये सांगायचा असेल तर काय म्हणावे ?
.....home made butter ?

ऐरण म्हणजे काय? >> मराठीत त्याला Anvil म्हणतात.

https://www.youtube.com/watch?v=8aTGUrolfBE ह्या गाण्यात जयश्री गडकर भाता चालवते आहे. चंद्र्कांतसमोर जे उपकरण आहे (भट्टी नाही) त्याला ऐरण म्हणतात. ज्या वस्तूला आकार द्यायचा असेल ती ऐरणीवर ठेवून लोहार घाव घालतो.
म्हणून एखादा प्रश्न सोडवण्याची वेळ आली की प्रश्न "ऐरणीवर आला" असा वाकप्रचार रूढ आहे (होता).

परवलीला मराठीत पासवर्ड किंवा कोडवर्ड म्हणतात. तिळा तिळा दार उघड हा परवलीचा शब्द होता.
(परवली बहुतेक वेळा एकवचनीच वाचले आहे. तिळा.. हे ४ शब्द असले तरी त्याला परवलीचा शब्द असेच ऐकले आहे.)

सीमंतिनी, ते सूर्यकांत असणार, चंद्रकांत नव्हे.

<वाकप्रचार रूढ आहे (होता)> तुम्ही इथली प्रसारमाध्यमे वाचली/पाहिली, तर ऐरणींची फॅक्टरी टाकाल.

Happy यू म्हणिंग राईट भरत. ऐरणीच्या देवा= सूर्यकांत. बुगडी माझी=चंद्रकांत. (का परत चुकले??)

ऐरणींची फॅक्टरी टाकाल. >>:खोखो: सारखे प्रश्न ऐरणीवर येतात का??

घसरगुंडी वा घाबरगुंडी ह्यातल्या गुंडी ह्या प्रत्ययाचा अर्थ काय? सदर्याला लावण्याची गुंडी अभिप्रेत नसावी.
कानडीतून गुंडी हा शब्द आयात झाला आहे काय?
असे आणखी शब्द आहेत का?

हो, आणि ज्याच्याकडे मागितली त्याला ती देणं कुवतीबाहेरचं वाटणार नाही. मेक्स सेन्स.
मला वाटतं चाणक्याने आदर्श करा (टॅक्स)बद्दल हे उदाहरण दिलं होतं.

धन्यवाद, मैत्रेयी. Happy

सध्या ' POS' यंत्रांची चलती आहे.
POS = Point of Sale
याच्याशी साम्य असणारा वैद्यकीय विश्वातील एक शब्द सांगावासा वाटतो :
'POC ' = Point of Care
मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण ' Glucometer' ( रक्तातील ग्लुकोज घरबसल्या मोजण्याचे यंत्र ) शी परिचित असतील.
तर काय, '' point of '' म्हणजे 'च्या जवळ'. POS हे ग्राहकाच्या जवळ आणले जाते , तर POC हे रुग्णाच्या जवळ.
आपल्या रक्ताच्या बर्‍याच तपासण्या आता रक्तनमुना प्रयोगशाळेत न पाठवता रुग्णाजवळ बसूनच करता येतात.त्याला म्हणतात ' POC testing'.

'melodrama' = क्षोभनाट्य असे एका लेखात वाचले.
'भावोत्कट नाट्य' असा मी एक शब्द सुचवतो.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

नाट्यातली भावोत्कटता अत्यंत संयतपणे पण दाखवता येते आणि अशा वेळेस त्याला melodrama म्हणता नाही येत. त्यामुळे 'भावोत्कट नाट्य' हा शब्दप्रयोग बरोबर नाही होणार.

मी एक फोटो काढला त्यात मला आकाशाची निळाई अधोरेखीत करायची आहे त्यामुळे मी तशी सेटींग्ज केली. त्याने दोन गोष्टी घडल्या. १. आकाश खूप निळे आले फोटोत - इतके, की तेवढे निळे ते प्रत्यक्षात पण दिसत नाही. २. फोटोतल्या इतर रंगांना (विशेषतः विरुद्ध रंगांना) त्या निळ्या रंगाने झाकोळून टाकले. त्यामुळे फोटो काहीसा एकसुरी झाला.

हेच जेंव्हा नाट्याबाबतीत घडते तेंव्हा त्याला melodrama म्हणतात. 'अतिरंजीत नाट्य' म्हणणे जास्त बरोबर होईल - एखादी घटना , भाव काहीसा बटबटीतपणे दाखवणे.

माधव, धन्स. छान समजावलेत तुम्ही.
तुमचा शब्द योग्य आहे.
अजून थोडे : मूळ melodrama = melos (music) + drama असे आहे.
मग 'संगीता'चा संबंध तसा अर्थात येतच नाही.

अनेक अभंगात/पदात 'रिघाले' असा शब्द येतो.
उदा.
रामदास माउली । अनाथाची रामदास माउली ० ॥धृ०॥
सच्चित् सुख - घन वरद प्रतापी । शांतीची सावली ॥ अनाथा ० ॥१॥
अनन्य जे नर शरण रिघाले । तयालागीं पावली ॥ अना ० ॥२॥
केशवीं केशव निजसुख सेवी । आठवितांची धांवली ॥ अना ० ॥३॥

जनाबाईचा अभन्गः
जनी म्हणे देवा मी झाले वेसवा । रिघाले केशवा घर तुझे ॥

तर या शब्दाचा अर्थ काय?

मला तरी रिघणे चा अर्थ एखाद्या ठिकाणी थांबणे/आश्रय घेणे असा माहित आहे.
आमच्या गावात (रत्नागिरीत)शक्यतो कोंबडीसाठी वापरतात हा शब्द.
म्हणजे कोंबडी जेव्हा अंडं घालणार असते तेव्हा विशिष्ट आवाज काढून खुराडा/आश्रयाची जागा शोधते.
त्या प्रकाराला 'कोंबडी रिघतेय' असे म्हणतात.

गेल्या काही दिवसात 'दंगल' चित्रपटाने धमाल केली आहे. 'दंगल' चे ३ अर्थ कोशात आहेतः
१. दंगा करणार्‍यांचा जमाव
२. धांगडधिंगा
३. कुस्त्यांचा आखाडा

मराठीत आपण 'दंगल' = अर्थ क्र.१ वापरतो. तर, हिंदीत अर्थ क्र. ३.
आता मराठीतल्या ''दंगल'' ला हिंदीत काय म्हणतात ? का तिथेही तिन्ही अर्थ वापरतात ?

मुंबई में दंगे हुए ,असा वाकप्रचार असतो हिंदीत,दंगल मराठि शब्द आहे,त्याला हिंदी शब्द दंगे किंवा दंगा असा आहे.

कदमों ने उनके खांक को कुंदन बना दिया

कुंदन अर्थ काय ? संस्कृत अर्थ सोने ( गोल्ड) असा आहे. ऊर्दुतही तोच अर्थ आहे का?

नताशा या नावाचा अर्थ शोधताना नेटवर एक खुलासा असाही मिळाला की हे नाव हे रशियन 'Natalia' या नावाचा (meaning someone who is born on Christmas day) अपभ्रंश आहे.
हे वाचून जुनाच एक प्रश्न मनात पुन्हा डोकावला. ख्रिसमस या सणासाठी 'नाताळ' हा मराठमोळा शब्द ( 'ळ' आहे म्हणून मराठमोळा म्हटलेय) कसा काय जन्माला आला? त्याचा या रशियन नतालियाशी संबंध असावा असे वाटले.

गजाभाऊ नॅटस या मूळ लॅटिन शब्दा पासून नेटल ( Natal) - ऑफ ऑर रीलेटेड टू बर्थ असा अर्थ होतो इंग्रजीत.

कदाचित लॅटिन मास मधल्या शब्दांचे मराठीकरण करताना याचे भाषांतर न करता नुसते ट्रान्सलिटरेशन केले असेल कोण्या पाद्र्याने

Pages