लिव्ह इन की लीव्ह इट?

Submitted by ठमादेवी on 25 November, 2010 - 03:07

हा लेख प्रहारमध्ये प्रकाशित आहे....

‘मी लग्न करायचं म्हणून विवाहासंबंधी वेबसाइटवर माझी माहिती दिली. मला रिप्लायही आले. पण त्यातल्या 95 टक्के पुरुषांनी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल किंवा मैत्रीपूर्ण शारीरिक संबंधांबद्दल विचारणा केली होती,’ संगीता सांगत होती. संगीताचा घटस्फोट दोन वर्षापूर्वी झाला. आपल्या दुस-या लग्नासाठी तिने एका वेबसाइटवर स्वत:ची माहिती दिली आणि आलेल्या उत्तरांनी थक्कच झाली. दुसरीकडे शर्मिला हिने आता घटस्फोटानंतर पुन्हा लग्न न करता आणि कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता आवडत्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.

ही दोन उदाहरणं काय सांगतात? एकीकडे लग्नसंस्था मोडकळीला येऊ लागलीय, तरुणांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वत:चं व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं वाटू लागलंय, करिअरच्या गळेकापू स्पर्धेत प्रेम हा केवळ ‘केमिकल लोचा’ वाटतोय आणि त्यामुळे भावनिक गुंतवणुकीला स्थानच नाही. अन्न, वस्त्र, निवारा यांच्याप्रमाणेच शारीरिक संबंध हे गरज म्हणून ठेवायचे. त्यात प्रेम वगैरे भावना आणल्या आणि काही अपेक्षा आल्या की तुम्ही ‘इमोशनल फूल’ ठरता. त्याचा मनस्तापच होतो. त्यापेक्षा प्रेम आणि जबाबदारी या अपेक्षा नकोतच, असा सरळसोट व्यवहार शारीरिक संबंधांमध्येही ठेवणं तरुण पसंत करतात. पण मग हा वेश्याव्यवसाय आहे का? तर नाही. ही समजून-उमजून केलेली तडजोड आहे.

‘मी तिशी ओलांडली तरी माझं लग्नच ठरत नाहीये. पण शरीराची गरज आहेच ना. मग एका मित्राशी संबंध ठेवले तर काय हरकत आहे? त्याच्याशी मला लग्न करायचं नाहीये कारण माझ्यासाठी तो ‘हजबंड मटेरियल’ नाही. पण मला तो आवडतो. तो या गोष्टीसाठी दुसरीकडे जाणार आणि मी भलतीकडे. त्यापेक्षा किमान आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो तरी,’ स्मिता दोशी नावाची एक तरुणी सांगत होती. आता हे तरुणींच्या बाबतीतच घडतंय असं नाही. मुलंही जबाबदारी नको आहे, असंच म्हणतात. ‘मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. पण आपण एकमेकांत गुंतायचं नाही आणि आपण एकमेकांना उत्तरदायी राहणार नाही. उद्या मला दुस-या कोणाशी संबंध ठेवावेसे वाटले तर तू मला काहीही विचारायचं नाही आणि मी तुलाही विचारणार नाही. त्याला फसवणूक समजण्याचं कारण नाही. अशा ‘टर्म्स’वर मी मैत्रिणीशी संबंध ठेवले आहेत,’ असं निखिल रानडे म्हणाला. ज्या दिवशी या नात्याचं ओझं वाटू लागेल त्या दिवशी त्यातून बाहेर पडण्याची मोकळीक स्वत:लाही ठेवणारे आणि दुस-यालाही देणारे, स्वत:ला काय हवं आहे, कितपत हवं आहे हे लक्षात घेऊन शारीरिक संबंध ठेवणारे अनेक तरुण आसपास दिसू लागलेत. त्याकडे सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन ‘सामाजिक नीतिमूल्यांचा -हास होत चाललाय’ असा असला तरी त्याकडे ‘आमचं बुवा असंच आहे,’ असं सांगून दुर्लक्ष करणारेही तरुण आहेत. पण यातल्या किती तरुणांच्या कुटुंबीयांना त्यांच्या संबंधांबाबत माहिती असते, असा प्रश्नच आहे.

आपल्या आधीच्या पिढय़ा प्रेम आणि विश्वास हेच कोणत्याही नात्याचं मूलभूत तत्त्व मानत होत्या. प्रेमाची परिणती लग्नात झाली की ते यशस्वी झालं, असं वाटायचं. लग्नानंतरही दुस-या स्त्रीशी किंवा पुरुषाशी संबंध असणं हे आपल्याला धोका दिला असं वाटायचं. पण आता मात्र ही तत्त्वं बदलत चालली आहेत. पूर्वी शारीरिक संबंध, त्यातला अपुरेपणा, त्याची गरज हेही प्रेमाच्या आवरणाखाली लपून जायचं. पण आता हे आवरण फाटत चाललंय. त्याऐवजी संबंध गरज म्हणून पुढे येऊ लागलेत. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यासाठी जबाबदारी घ्यायलाच हवी असंही नाही, असं मत व्यक्त केलं जातंय. हे मुलींच्याही बाबतीत तितकंच खरं. विशेषत: घटस्फोटासारख्या घटनेतून बाहेर पडलेल्या तरुणांना तसं वाटतं. नातं तुटण्याचं दु:ख होण्यापेक्षा ते कधीतरी तुटणारच आहे याची जाणीव असणं आणि त्यासाठी मनाने न गुंतणं जास्त योग्य वाटणारेही लोक आहेत.

‘नो स्ट्रिंग्स अ‍ॅटॅच्ड’ अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवणं आणि ते कुणी कुणाशी ठेवणं, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत अशा संबंधांत असणा-यांची तयारी आहे आणि त्यातून उद्भवणा-या कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्यास ते तयार आहेत तोपर्यंत इतर कुणालाही आक्षेप असण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारचे संबंध ठेवणा-या लोकांच्या संस्कारांबद्दल चर्चाही करण्याची गरज नाही. समाजव्यवस्था, नीतिमूल्यं, विचारसरणी, माणसाच्या गरजा हे सगळं बदलत चाललंय. ते कोणत्याही प्रकारच्या संस्कृतीरक्षणाचा आव न आणता स्वीकारावंच लागेल. तुम्ही स्वीकारलं नाही तरी हे घडणार आहेच. फक्त पूर्वी ते चोरीछुपे व्हायचं, आता खुलेआम होऊ लागलंय एवढंच, सचिन देशमाने यांनी आपलं मत व्यक्त केलं.

हेच चित्र आता सिनेमांमधूनही दिसतंय. पूर्वी प्रेमभंगाने वेडापिसा होणारा नायक आता त्याला ‘इमोसनल अत्याचार’ म्हणतो. ‘आय अ‍ॅम इन रिलेशनशिप’ असं म्हटल्यावर टवकारणारे कान आणि दचकणा-या नजराही आता असं ऐकायला सरावले आहेत!

गुलमोहर: 

बाप्रे.... भयंकर आहे सगळं!!!
कोमल, तुला डिटेल प्रतिसाद नंतर देते गं!!

कोमल, हे अस्तित्वातच नव्हते हा म्हणणे वेडेपणा ठरेल. निदान आता डोळसपणे विचार तरी होतोय.
आणि हा विषय आत्ताच्या सिनेमा नाटकात नव्हे, तर आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी नाटकात होता, आणि त्याही पूर्वी संगीत संशयकल्लोळ मधे होता.

दिनेशदा, हे खरंय... नाहीतर मग द्रौपदी पाच पांडवांची पत्नी कशी झाली असती? उत्तरप्रदेशात नियोग नावाची प्रथा आहे ज्यात नवरा बाहेर असेल तर त्या स्त्रीशी घरचा कुणीतरी किंवा गावातला (बिरादरीतला) कुणीतरी संबंध ठेवतो...

हजबंड मटेरिअल कोणातच नसतं हे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला चांगलंच कळलेलं असतं.. आयुष्यभराची कमिटमेंट करण्यापेक्षा आधी ट्रायल तर घेऊन बघू असा एक ट्रेंड दिसतो जो काही वेळा पटतो आणि काही वेळा चुकीच्या मार्गाने वापर होईल अशी भिती पण वाटते.. सो, सध्या लिव्ह इन की लीव्ह इट की लीव्ह विथ इट असा प्रश्न आहे.. आत्ताच्या पिढीला ज्या बर्‍याच गोष्टी ऑब्विअस वाटतात त्या लिस्ट मधे ही गोष्ट हळूहळू वरच्या स्थानाकडे कूच करू लागली आहे.. याकडे तटस्थपणे पहावे, कान टवकारावे का दचकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आता असे संबंध कायद्याच्या चौकटीत बसवता येतील का ? त्याबाबत विचार चालू आहे. मागे जो निकाल झाला होता, तो अनेकांना पटण्यासारखा नाही.
आणि इतर कुणाला काय वाटतं, त्यापेक्षा आपल्या गरजा विचारात घेऊन, अशी नाती आता निर्माण होत आहेत.
त्यातून उद्भवणार्‍या प्रश्नांनाही सामोरे जायची, या लोकांची तयारी आहे.

कोमल छान विषय मांडला आहेस Happy , पण या विषयात विचारण्यासारखे अन न विचारण्यासारखे प्रश्नही बरेच पडतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रंगेबीरंगी फळा-फुलांच्या बागांना बाभळीच्या विषारी काट्यांचे कुंपणच म्हणावे लागेल, जे पार केलं तरी सल आहेच अन पार करून परत फिरायचं ठरवलं तरी परत तेच विषारी कुंपण. अश्या नात्यांची उडी-कोलांटीउडी कशी घ्यावी हे ज्याने त्यानेच ठरवायला हवं.

चांगला लेख !

अशाच प्रकारचा एका लेखावर मी इतरत्र जे मत मांडले होते तेच इथे मांडतोय ...

संपुर्ण समाजाच्चा विचार करता ...१)वैवाहिक संबंध ...२)विवाहपुर्व/बाह्य संबंध/ लिव्ह इन ...आणि ३)बलात्कार ...( थोडक्यात ...सर्व शारीरीक संबंध ) एका इक्वीलीब्रीयम मध्ये असतात .

कोणताही एक प्रकार कमी झाला तर तेवढ्याच प्रमाणात बाकीच्या दोन मध्ये वृध्दी होणार !

मग लिव्ह इन सारखा ...संबंधीत व्यक्तीने कंप्लीट कन्सायन्सने स्वीकारलेला... प्रकार अस्तित्वात असेल तर त्याला विरोध का करायचा ?

कोमल,
धाडशी लेख !
पण अशा मध्ये भावनिक गुंतवणूक न तयार होऊ देणं,नंतर हे थांबवायची वेळ आल्यावर खरी कसोटी आहे.
हजबंड मटेरिअल कोणातच नसतं हे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला चांगलंच कळलेलं असतं..
हे मात्र नक्की काय असतं ते नाही कळालं ?
Happy

उत्तरप्रदेशात नियोग नावाची प्रथा आहे ज्यात नवरा बाहेर असेल तर त्या स्त्रीशी घरचा कुणीतरी किंवा गावातला (बिरादरीतला) कुणीतरी संबंध ठेवतो...<<
ही महाभारतकालीन प्रथा आहे. जी उत्तरेत काही ठिकाणी उरली असावी.
याबद्दल तपशीलात इरावती कर्वेंनी आपल्या 'युगांत' मधे लिहीले आहे.

हा काळाचा प्रवाह आहे आणि त्यात हे अपरिहार्य आहे.
माझ्या मते, शारिरीक सुखाचा धिक्कार आणि त्याला कमी प्रतीचे, पाशवी भोगविलास इ.इ. ठरवणे या हिप्पोक्रसीपेक्षा, हा 'नो स्ट्रिंग्स अ‍ॅटॅच्ड' मामला परवडला. फक्त आपल्या वृत्तीला हे झेपणारे आहे का? की बाकी सगळे करत आहेत, ही 'इन थींग' आहे, म्हणून आपणही करतोय हा प्रश्न ज्याचा त्याने सोडवावा.
रच्याकने, 'व्हेन इज द राईट टाईम टू लुज व्हर्जिनिटी' हा प्रश्न इयत्ता ७-८वीत पडणारे विद्यार्थी मी दररोज पाहतो, तेंव्हा काळ बदलला आहे हे नीटच कळते!
हजबंड मटेरिअल कोणातच नसतं हे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला चांगलंच कळलेलं असतं..>>> Lol

माणसाने लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप चा ऑप्शन घ्यावा असे माझे वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे. ऑफकोर्स, त्यातले फायदे तोटे वेगळे असणारचेत फक्त वरती माधुरी दिक्षित ने मांडलेल्या मताशी सहमत आहे की याचा गैरवापर व्हायची भिती वाटते.
शिवाय ट्रायल रूम मधे ट्राय केलेले कपडे नंतर घरी आल्यावर कधी कधी विचित्रच वाटायला लागतात तसं लिव्ह इन रिलेशनशिप मधे ट्राय केल्यावर प्रत्यक्ष एकत्र लग्न करून रहायला लागल्यावर वेगळंच चित्र दिसायचं..

हजबंड मटेरिअल कोणातच नसतं हे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला चांगलंच कळलेलं असतं..>>> १००% अनुमोदन Happy

आगाऊ,,, करेक्ट... किमान आता ही गरज आहे आणि प्रेम बिम या गोष्टी वेगळ्या आहेत हे विचारात घेतलं जातंय... याला वाढती मॅच्युरिटी म्हणायची का?

या अशा नात्यांमधे केवळ शारिरिक गरजाच लक्षात घेतल्या जातात असे नाही. निव्वळ सोबतीची वा मैत्रीची पण गरज असू शकते. क्वचित आर्थिक गरजाही असतात.

दिनेशदा, अगदी बरोबर. निव्वळ सोबतीचा वा मैत्रीचा मुद्दा कमी जास्त प्रमाणातच पहायला मिळतो पण आर्थिक गरजांसाठी हे जास्त प्रमाणात चालतं अस माझं मत.

नाही सुकी त्या अर्थाने नाही. कधी कधी शहरात घरांचे खर्च एकट्याच्या कमाईच्या आवाक्याबाहेरचे ठरतात. त्यावेळी खर्च वाटून घेऊ, पण सोयीच्या ठिकाणी राहू, असा विचार केला जातो. (हा निष्कर्श मी साधारण ७/८ वर्षे फॅमिली कोर्टात भेटत राहिलेल्या पक्षकारांच्या बोलण्यातून काढला आहे.)

हाताची सर्व बोटे सारखी नसतात (काहींची ईंडेक्स आणि रिंग फिंगर सोडून Wink ), त्याच प्रमाणे प्रेम, लग्न किंवा लिव्ह ईन रिलेशनच आहे, ज्याला जे सोईचे वाटेल ते स्विकारावे.

हजबंड मटेरिअल कोणातच नसतं हे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला चांगलंच कळलेलं असतं<<<<<<......... Biggrin

कोमल..एकदम विचारप्रवर्तक लेख...
इथे ज्याचा त्याचा प्रश्न हे खरेच...
मुळात मनुष्य स्वभावच असा आहे की त्यावर जितकी तुम्ही बंधने घालाल तितका तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. समाजात एक निकोप वातावरण रहावे, अनाचार माजू नये यासाठी लग्नसंस्था अस्तिवात आली असावी. आपल्या जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ राहून शारिरीक सुखाला एका मर्यादेत ठेवणे त्यात अपेक्षित होते. पण तसे झाले का....
विवाहबाह्य संबंध तेव्हाही होते आणि आत्ताही आहेत आणि पुढेही राहतील...
मग लग्नसंस्थेचे काय महत्व राहीले....ज्या जोडप्याचे एकामेकांवर मनापासून प्रेम आहे त्यांना विवाहाच्या बंधनात जखडले काय किंवा नाही काय ते शेवटपर्यंत एकमेकांशी प्रामाणिक राहणारच..परदेशात अशी अनेक जोडपी आढळतील...
पण आपल्याकडे लिव्ह इनची कन्सेप्ट फार चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आली आहे. लिव्ह इन म्हणजे स्वैराचाराला मोकळीक असा काहीसा समज झाला आहे...
ज्याच्याशी पाहीजे तितका काळ संबंध ठेवायचा..कंटाळा आला तर नविन कोणीतरी....
हे असे स्वरूप फार बिभत्स आहे आणि पशुत्वाच्या पातळीवर नेणारे आहे....
कोणत्याही बंधनात न जखडताही एकमेकांबरोबर जीवन व्यतीत करणे म्हणजेच लिव्ह इन...
आणि यात सर्वात मोठा फायदा असा की दोघांमध्ये एक कंफर्ट झोन तयार होण्यास मदत होते...
एक नवरा किंवा बायको म्हणून ज्या आपोआप (नकळत) अपेक्षा आपल्या जोडीदाराकडून निर्माण होतात त्याला फाटा देऊन त्याच्या अथवा तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याला समजून घेण्याची क्षमता यातून निर्माण होते असे वाटते...

आशुचँप, आणि 'टेकन फॉर ग्रॅटेड' मोड ही कायम ऑफ राहतो अशा रिलेशनशिप मधे जो फार महत्त्वाचा आहे.

'टेकन फॉर ग्रॅटेड' मोड ही कायम ऑफ राहतो अशा रिलेशनशिप मधे <<
रहातोच असे नाही पण शक्यता असते. निदान टेकन फॉर ग्रँटेड करण्याची सोय इथे नाही हे मुळात माहीत असते.

Pages