सुचते काही

Submitted by चैतन्य दीक्षित on 13 November, 2010 - 05:00

सुचते काही, अनाम दुःखाहून खोलसे,
परंतु लिहितो सगळ्यांना जे रुचते-पटते।
इमान नाही दुःखांशीही, शब्दांशीही,
इमान माझे उरले नाही माझ्याशीही ।

कुठे तळाशी मनात आता, अतीव निश्चल
सुचलेली ती अनाम दुःखे, शब्द तयांचे...
वरवर असते रिमझिम कविता, अतीव चंचल,
आवडते जी सगळ्यांना, अन् शब्द तिचेही ।

ह्यांच्या मध्ये बोथटलेली जाणिव माझी-
-गोठुन असते, युगायुगांच्या अंधारासम !
वागवते ती ओझे केवळ त्या कवितांचे,
जपते बहुदा त्या दुःखांचा अनाम ठेवा ।

कवितेइतका मीही दिसतो जगास हसरा,
आवडतो अन् तोच चेहरा हसरा त्याला...!
'अनाम दुःखे अनाम असणे हेच चांगले'
कळते आहे त्या चेहऱ्याला, अन् कवितेला...!

गुलमोहर: 

उत्तम! फार सुंदर!

(चैतन्य - शेवटच्या ओळीतल्या 'चेहर्‍याला' या शब्दाऐवजी काहीतरी परफेक्ट मिळेल का?)

ही कविता अशी मागे का पडलेली असावी दुसर्‍या पानावर?

सुंदर काव्य!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

वा!

“ह्यांच्या मध्ये ……
……. त्या दुःखांचा अनाम ठेवा ।“

विषय थोडा वेगळा आहे .....
…… आवडली
----------------------------------------------------------------------------------------------

अवांतर :
ही कविता अशी मागे का पडलेली असावी दुसर्‍या पानावर? >>>
या प्रश्नाचं एक ठराविक साच्याचं उत्तर :
लोक सर्व पानं शोधतात आणि गेल्या ७२ तासातलं लेखन/कविता वाचतात.
Lol / Sad

अप्रतिम कविता आणि आशय...

'अनाम दुःखे अनाम असणे हेच चांगले'
कळते आहे त्या चेहऱ्याला, अन् कवितेला...!>>>> ह्या ओळी प्रचंड आवडल्या.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

बेफिकीर,
चेहर्‍याला ऐवजी दुसरा शब्द तुम्हीही सुचवा. मीही बघतो काही सुचतं का ते.
(कळते आहे चेहर्‍यालाही, अन् कवितेला असा बदल खूप आधी सुचला होता.. पण त्या वेळी तसेच ठेवले.)

बाकी उल्हासकाकांचं उत्तर बरोबर आहेच कविता कोपर्‍यात जाण्याबद्दल,
पण ही कविता आधी नीट प्रकाशितच झाली नव्हती Sad
मलाही माझ्या पाउलखुणांमध्ये आजच दिसली Happy

मस्त कविता.
चेहर्‍याला- हे सुसंगत आहे.

कळते आहे मनाला आणि त्या कवितेला..
किंवा
कळते आहे दु:खाना त्या आणि कवितेला..

असेही म्हणता येईल, अभिप्रेत अर्थाला बाधा येत नसेल तर.
-सविनय.

हृदयाला हा एक शब्द बसवून पाहिला तेथे!

(अलका काटदरे - चेहर्‍याला हे सुसंगत आहे, मी फक्त मात्रांच्या दृष्टीने म्हणालो होतो, उर्वरीत सर्व ओळी समान आहेत असे वाटले म्हणून! आशयाने चेहर्‍याला हे संयुक्तिक आहेच)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!