"कायतरीच काय.... उलट मजेत दिसतेय... तुला नं खाजवून खरूज काढायची..." वर्षा म्हणाली.
मी तरीही रेटलच, "नाही गं... तिचं हसणं, जोरजोरात बोलणं-बिलणं... मलातरी दाखवायला वाटतं. तिची स्टाईल नाही ती. मुद्दाम दाखवण्यासाठी आनंद वाटतो... तिच्या डोळ्यांत बघ म्हणजे..."
वर्षाही माझ्या बोलण्यात काही तथ्यं आहे अशा अर्थाचं बघायला लागली.
"... ए, गपे.. उगीच काय? डोळ्यांत बघ, कानात बघ, नाकात बघ. सगळं छान आहे. एक मूल आहे, नवरा, घर, नोकरी आहे... हातात पैसे", वृंदा वैतागून म्हणाली. ,"... अजून काय हवं? माझी आजी म्हणायची ना..... तसं... सुख दुखतंय न काय"
मी भुवया उंचावल्या आणि काही बोलायला जाणार तोच वृंदा नाक फेंदारून म्हणाली, ".... आता ते काढू नकोस. गाणं गाणं काय? मुलाला शिकव म्हणावं. नाही सासरच्यांना आवडत, तर काय करणार? आणि ऐकायला कुणी बंदी घातलीये... मला तरी कार्यक्रमाला जाण्यापेक्षा सीडी आणून ऐकायला जास्तं आवडतं.... परवडतं म्हण. तुम्हा कलाकारांचे नखरे नाही सहन करावे लागत...."
मी त्या नखर्यांवरून हमरी तुमरीवर येणार तोच वर्षाने तिचीच री ओढली, "खरच. सगळच कसं मिळेल. काहीतरी मिळवायला काहीतरी सोडावं लागतच. ऍडजस्टमेंट आहेच... सगळीकडेच आहे. आशूलाही करावी लागतेय. आम्ही नाही केली?....
इराक-इराण मधल्या बायकांकडे बघा म्हणावं.... म्हणजे कळेल, आपलं आयुष्यं कोणत्या मापात मोजायचं ते. इराक-इराण कशाला, भारतातल्या किती बायका भरडल्या जातायत.... गाण्याची हौस काय.... चार पैशाची रिबिन घ्यायची तर दहा वेळा विचार करावाल लागतोय... असली परिस्थिती..."
"हो... म्हणजे माझं पोट भरलेलं असलं, तर मला कला, संस्कृती ह्यातल्या कशाहीवरून तक्रार करण्याची मुभा नाही. एक बेसिक गरजा भागल्या की पुढच्या कशासाठीही तोंड उघडणं म्हणजे गुन्हाच म्हणणार की तुम्ही...." मी तणतणलेच.
"...आणि ह्याचा ती बाई आहे ह्याच्याशी काही संबंध नाही.... आधीच सांगतेय.... तुझं तुणतुणं लावू नकोस..... सुख पुरुषांनाही दुखंतंच असेल... हो की नाही वृंदे?" वर्षाने कधी नव्हे ती एक काडी घातली.
"म्हणजे तक्रार करायची कधी? आशूच्या सासूबाईंचं सोड... आईच म्हणते. चांगलं घर-दार आहे, मुलगा आहे, नोकरी आहे... तर म्हणे हिला गाणं करता येत नाही हाच काय तो सल आहे. हिच्या बहिणी तितक्या चांगल्या घरात नाही पडल्यात. म्हणजे कंपॅरिझन मधे ही सरस..... म्हणजे काय? आ?
दारू पिऊन मारहाण करणार्या नवर्यांपेक्षा माझा नवरा चांगला कारण तो..... दारू पिऊन तर्र होऊन येतो, पण मारहाण करत नाही... म्हणून?" माझा आवाज वाढला असणार.
"ए, शहाण्यांनो, कॉफी घ्या आधी.... थंड होतेय... मग निवांत भांडूया", वृंदाच नेहमी आमच्या सगळ्या वादांवर आवश्यक ते तेल-पाणी ओतत असते.
आमचं ठरल्याप्रमाणेच चालं होतं. जमेल तितक्यांनी भेटायचं, न आलेल्यांबद्दल चौकशी, काळजी इ. इ. आणि एकमेकींना कशानाकशावर तरी झापून झालं की, एकमेकींना गप्पं करीत नेहमीची कॉफी, केक संपवायची. पोरांच्या अन नवर्यांच्या तक्रारी, ऑफिसातली वैतागवाडी, जुन्या आठवणींना उजाळा, पुस्तकांची देवाण-घेवाण, एखाद्या चांगल्या सिनेमाची सुचवणुक इ. इ. सगळं सगळं अगदी साग्रसंगीत.
आशू कधी येते, कधी नाही. पण आली की खूप हसते, हसवते.... आवर्जून चौकशी करते, भरभरून बोलते.....
मला माहितीये अन जाणवतही की वृंदासारखं तोंडावर शिव्या घालण्यापुरतही ती गाणं, गायक, वादक ह्यांच्याविषयीच्या गप्पांमधे ऍक्टिव्हली नसते. उलट विषय बदलते.
एकेकाळी फक्तं गाण्यावर बोलणारी, जगणारी ही मुलगी आमुलाग्रं बदललीये. घरात गाण्याचं वातावरण नाही इतकच नाही, तर हीनं गाणं शिकणं, शिकवणं, कार्यक्रम करणं ह्याला घरून विरोधच आहे.
पूर्वी आम्ही आग्रह करायचो तिला, गायचा. अगदी पहिल्या उच्चारापासून सूर लागायचा. कुणाच्या आग्रहावरून एखादं हिंदी गाणं, गजल, भजन, भावगीत गाऊन झालं की, तिनं त्याच रागातली, किंवा जवळपास जाईल अशा रागातली बंदिश गायली नाही असं कधी झालच नाही. अगदी तल्लीन होऊन तिचं रागदारी गाणं असायचं. आणि अगदी खरं सांगायचं तर, शास्त्रीय संगीत न कळणार्यालाही आपल्या सोबत सुरांच्या गावी घेऊन जाईल असंच गायची.
आधी आधी आठवणीने आपल्याकडलं चांगलं ऐकायला घेऊन यायची, आमच्याकडलं घेऊन जायची. तिच्याकडून यूट्यूबच्या लिन्क्स यायच्या... कुठल्या कुठल्या जुन्या जुन्या गायकांच्या न ऐकलेल्या अनवट रागांच्या वगैरे. पहिल्या पगारात कॅसेट्स वरून सिडीमधे रूपांतर करणारं मशीन घेऊन आली होती वेडी. "सगळ्या जुन्या जुन्या कॅसेट्स आता सिडीजमधे करून ठेवणारय....." तिचं स्वत:चं, कुठल्या कुठल्या गायकांच्या अविस्मरणीय मैफिलींचं....
आधीच लुकलुकणारे काळेभोर डोळे गाण्याबद्दल बोलताना, चमकायचे. ऐकताना, सगळ्या चेहर्यावर एक समाधानी हसू असायचं. अनेकदा तिच्यासोबत मैफिलीत वगैरे काही ऐकण्याबरोबरच तिच्या मग्नतेचं कौतुक असायचं, मला... तिला असं विभोर होताना बघणं हाही एक आनंद होता.
हळू हळू, अमचं एकत्रं कार्यक्रमांना जाणं कमी होऊ लागलं. मध्यंतरी शास्त्रीय रागांवर आधारित सिनेमाच्या गाण्यांवर बोलायला, गायला एक ग्रूप जमायला लागला. चार-आठ आठवड्यांनी ते बंदही झालं. आशू असती तर किती मजा आली असती आणि तिनं हे बंद पडू दिलंच नसतं सहजासहजी... हेच बोलत राहिलो सगळे.
आमच्या दोघींच्या गप्पांमधे, गाणं हाच एक वाहता धागा असायचा. किती लंचटाइम्स, किती फोन कॉल्स, किती भेटी ह्यात विणल्यात... गणती नाही.
कुणाच्या घरी सहकुटूंब भेटलो की गाण्याचा आग्रह व्हायचा आशूला. पूर्वी हरखुन जाऊन एखादं तरी म्हणणारी आमची ही सखी आता कारणं द्यायला लागली. आवाज बसलाय, आठवत नाही, बरं नाहीये, मूड नाही... अतीच आग्रहं झाला तर मुलाला झोप येतेय वगैरेचं निमित्तं करून पळूनही जाऊ लागली.
पूर्वी नेमाने येणारी तिची गाण्यांवरली इमेल्स अनियमित होऊ लागली. हल्ली कुणाचंतरी इमेल फ़ॉर्वर्ड करण्यापलिकडे तिचं स्वत:चं इमेल नाही. मुलाला गिटारच्या क्लासला कुठेतरी घातल्याचं तिच्या नवर्याकडूनच ऐकलं. त्याचबरोबर "नाहीतरी त्यालाही भारतीय संगीताची तितकीशी आवड नसल्याचंही" त्याने जाता जाता सांगितलं.
एकदा ठरवून खोदून खोदून विचारलंच, मी.
"नाही गं. शेवटी आनंद मानण्यात आहे, नाही का? एखाद्या गोष्टीत आनंद आहे किंवा त्याच गोष्टीत आहे असं मानत रहाणं मूर्खपणाचच.... काय कमी आहे मला?... नाही केलं गाणं तरी इतर इतकं करण्यासारखं आहे ना... आणि तसाही मला वेळ नसतोच.... आणि यापुढेही नसणारय. राहुलचं सगळं बघण्यातच सगळा वेळ जातो. त्याचं, घरचं बाजूला सारून कुठे गाणं-बिणं घेऊन बसू?...", तिचं स्वत:च... ते आतल्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा फुंकर घालीत विझवणं मलाच असह्य झालं.
मीच पुन्हा छेडलं नाही.... तिच्याशी गाण्याच्या सोडून इतर गप्पा करते, ठरवून. पण चुकुन गाण्याचा विषय निघाला ना, की एखाद्या ढगाची, विमानाची सावली लख्खं उन्हाला डागाळत जाते ना, तसा तिच्या एरवी लकाकणार्या डोळ्यांना काळोख शिवतो... क्षणिक का असेना.
सगळ्यांच्याच मते..... अगदी तिच्या स्वत:च्यामते, सखी, सुखी आहे.....
तरीही मला प्रश्नं आहेच... खरच सुख दुखतं का?
सुख दुखतं हे खरेच.
सुख दुखतं हे खरेच.
दाद, बर्याच दिवसांनी खूप
दाद, बर्याच दिवसांनी खूप सुंदर लेखन वाचायला मिळालं. अप्रतिम लेख.
खरच सुख दुखतं कधी कधी.. !
एखाद्या ढगाची, विमानाची सावली लख्खं उन्हाला डागाळत जाते ना, तसा तिच्या एरवी लकाकणार्या डोळ्यांना काळोख शिवतो... क्षणिक का असेना. << खूप आवडलं.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
छान आहे.
छान आहे.
दाद बर्याच दिवसांनी लिहिलस.
दाद बर्याच दिवसांनी लिहिलस. आणि नेहमीप्रमाणे छानच आहे लेख.
सुख दुखतं ....? की दु:खाला
सुख दुखतं ....? की दु:खाला सुख मानून घेतो आपण ?
खरच खुप छान अन मोजकं लिहिलयस.
जग बदललय, पुढं गेलय, व्यक्तीस्वातंत्र्य आलय, स्त्री मुक्ती झालीय,..... सगळं किती वरवरचं असतं नाही ....
मनातून वाटणारं किती जणं मनापासून करू शकतात ?
अन कशासाठी काय सोडतात अन तेही आपल्या मनाची गरज की समाज, संसार, मुलं, जवळचे माणूस यासाठी सोडतात ? किती तरी अनुत्तरित प्रश्न ....
हे गं काय चांगले सुख मानून जगत होते, लावलीस ना सुई फुग्याला
खुप छान लिहिलयस , अगदी मनातलं, मनापासून, मनापर्यंत पोचणारं.... धन्स गं.....................
अमृताप्रीतम ना चौथा कमरा
अमृताप्रीतम ना चौथा कमरा लिहून झाली किती वर्ष? पण भारतीय समाज काही ते कालबाह्य होऊ देत नाही.
गाणंच कशाला, अशा कितीतरी गोष्टी. भारतीय स्त्रियांना स्वतःचा असा वेळ, स्वत:ची अशी आवड (अक्कल आणि अस्तित्वापर्यंत नकोच जाऊयात) असणेच मुळात...
नेहमीसारखंच मस्त!
नेहमीसारखंच मस्त!
मस्तच दाद नेहमीप्रमाणे रैने
मस्तच दाद नेहमीप्रमाणे
रैने अगदी अगदी १००% अनुमोदन
दाद, छान लिहिलं आहेस. गाणचं
दाद, छान लिहिलं आहेस.
गाणचं नव्हे तर स्वतःला आवडणारी, छंद म्हणून जोपासलेली कोणतीही गोष्ट सोडून द्यावी लागली की मनातून खंत वाटणं सहाजिकच आहे.
खुपेल इतकं सुख असलं की
खुपेल इतकं सुख असलं की दुखायचंच!
चांगले लिहलेय!
छान लिहिलय...
छान लिहिलय...
मस्त लिहीलं आहेस. आवडलं.
मस्त लिहीलं आहेस. आवडलं.
दाद नेहमीप्रमाणे सुंदर
दाद नेहमीप्रमाणे सुंदर लिहिलेस.
सुंदर....... खूप खूप आवडलं
सुंदर.......
खूप खूप आवडलं आणि पटलंही........
किती नेमके लिहिलेस..
किती नेमके लिहिलेस..
काय मस्त लिहिलंयस दाद!!!!
काय मस्त लिहिलंयस दाद!!!!

"सुख मानण्यावर असतं" वगैरे म्हणतात...पण ते मानणे म्हणजे फक्त एक तडजोड असते... जे आतून वाटतं, जाणवतं, तेच सुख, नाही का?
आशुसारख्या बर्याच जणांच्या/ जणींच्या सुखाच्या कल्पना प्रत्यक्षात आणणे, त्या जोपासणे खरं म्हणजे अजिबात अवघड, अशक्य नाही... मार्ग काढता यायला हवा... हा लेख वाचून अशा बर्याच व्यक्ती सरसर डोळ्यापुढून सरकत गेल्या. वाईट वाटतंय....
नेमकं लिहीलंय.. कमी शब्दात
नेमकं लिहीलंय.. कमी शब्दात खूप काही ..
>>की एखाद्या ढगाची, विमानाची
>>की एखाद्या ढगाची, विमानाची सावली लख्खं उन्हाला डागाळत जाते ना, तसा तिच्या एरवी लकाकणार्या डोळ्यांना काळोख शिवतो
भारी, भारी आहे हे वाक्य तर. मस्तच लेख.
खूप सुंदर ! <<तिचं स्वत:च...
खूप सुंदर !
<<तिचं स्वत:च... ते आतल्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा फुंकर घालीत विझवणं मलाच असह्य झालं.>>
व्वा ! इतक्या सहजपणे कसं लिहितेस तू ?
अशा " सुख दुखणार्या "बर्याच व्यक्ती दिसतात गं आजूबाजूला.....पण त्याही आतली ज्योत विझवावी लागल्यामुळेच अशा होत असतील ना ?
दाद, मस्त लिहिलंय. आतल्या
दाद, मस्त लिहिलंय. आतल्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा फुंकर घालीत विझवणा-या स्त्रिया पाहिल्या पण त्यावर असं छान लिहायचं मला नाही सुचलं..तू खरंच ग्रेट आहेस.
वरवर किती सुखी असल्यासारखं दाखवलं तरी आयुष्याच्या कोणत्यातरी वळणावर ती आतली ज्योत प्रखर होऊन मनाला दाह करतेच.
सुख कशाचं बोचतय...दु:खी आहे
सुख कशाचं बोचतय...दु:खी आहे बिचारी
दाद, बरेचदा जाणवणारी गोष्ट
दाद, बरेचदा जाणवणारी गोष्ट "तुझ्या" शब्दात वाचून कुठेतरी मोकळं वाटलं ..
बाकी सिंड्रेलाला अनुमोदन ! स्व:ताचा एक भाग सतत नाकारत राहण्यात कसले सुख? खरं सुख (मग ते अगदी मनापासून मानलेलं) कधी बोचु शकेल?
लौकिकार्थाची सुखाची व्याख्या
लौकिकार्थाची सुखाची व्याख्या स्वतःवर लादली जावी अन मग लोकानी निष्कर्ष कढून आपल्याला सुखी/दु:खी ठरवावे यासारखी विडंबना नाही.
खूप सुरेख लिहिलय -समर्पक.elbow room प्रत्येकाला हवीच !!
नेहमीप्रमाणेच सुरेख
नेहमीप्रमाणेच सुरेख लिहिलंय..
रैना नि सिंडीला अनुमोदन
<< अगदी तिच्या स्वत:च्यामते,
<< अगदी तिच्या स्वत:च्यामते, सखी, सुखी आहे.....>>
पटलं नाही. कारण ? त्या आधीचाच पॅरा.
सूख हे शेवटी मानण्यावर असत ना गं ? बीन पुती रडते, एकपुती रडते आणि सातपुती पण रडते. त्यामुळे सुख दुखतय म्हणणं खरच.
शिवाय अस बघ, सुख जर दुखल नाही तर माणूस पुढे जाणार कसा ? शेवटी सुखापेक्षाही दु:खाचाच वाटा जास्त आहे आपल्या प्रगतीत.
आणि शेवटी सुख काय आणि दु:ख काय. भोगून संपवायच्या गोष्टी.
एखाद्या ढगाची, विमानाची सावली
एखाद्या ढगाची, विमानाची सावली लख्खं उन्हाला डागाळत जाते ना, तसा तिच्या एरवी लकाकणार्या डोळ्यांना काळोख शिवतो... क्षणिक का असेना >>
खुपच अप्रतिम लेखन आहे..
खुप छान लिहील आहे. आवडलं आणि
खुप छान लिहील आहे.
आवडलं आणि पटलंही
दाद ! खुप खुप आवडली
दाद !
खुप खुप आवडली गोष्ट.
सुखी माणसाचा सदरा कोणाकडेच नाही.
सुखी रहाणे म्हणजेच प्रयत्नपुर्वक दुख्खांना दुर सारणे.
बोच रहातेच अशी आणि नसली तर जगण्याला काय अर्थ आहे.
<<सुखी माणसाचा सदरा कोणाकडेच
<<सुखी माणसाचा सदरा कोणाकडेच ना<<>>
खरेय ...
जे हवे ते सुख मिळवण्यासाठी बहुतेकवेळा संघर्ष करावा लागतो. तिला गाणेच करायचे असेल तर घरच्यांचा विरोध पत्करुन, संघर्ष करून ती संगीत कलेची साधना करु शकेलही. पण परत तो संघर्षाचा काळ अतिशय कठीण. शिवाय आपल्याच माणसांबरोबरच्या ताणतणावांमुळे टोचणी लागुन जसा मिळायला हवा तसा निर्भेळ आनंद आवडत्या गोष्टीतही मिळेल याची खात्री नाही.
पण तरीही आपली आवडती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न व त्यासाठी वेळ पडल्यास संघर्ष ही करायला हवाच प्रत्येकाने असे मात्र मनापासुन वाटते.
Pages