रात्र सम्पूर्ण

Submitted by जया एम on 21 October, 2010 - 15:00

पान पानो-याने गच्च हिरवळून
तमोमुग्ध झालेले समोरचे झाड
त्यावर विसावलेला प्रकाशाचा एक तान्हुला तुकडा
दूरवर तेजाळ जांभया देत अफाट सारे दिवे
आणि किंचित ढगाळलेला विचारी चंद्र
हवेच्या मनातही नसताना मुळीच काही
तरंगत येतात अनाम वाद्याचे सूर
आणि दरवळते ओळखीचे एक गंधर्व गाणे सर्वदूर
रस्त्याची अर्भकी झोप चाळवणारे
एखादे चुचकारते वाहन
चुकून जागे झालेले अर्धे मुर्धे स्वप्न
आणि मनाशीच लाटा विणणारा आत्ममग्न समुद्र

या सर्वाकडे बघत अखंड एकटी मी
या सर्वात तुकडा तुकडा
विखुरले आहे माझे अस्तित्व
सुदिन सुषुम्न संपूर्ण

गुलमोहर: 

विचारी चंद्र, अर्भकी झोप

चुकून जागे झालेले अर्धे मुर्धे स्वप्न
आणि मनाशीच लाटा विणणारा आत्ममग्न समुद्र

या सर्वात तुकडा तुकडा
विखुरले आहे माझे अस्तित्व

संवेदनशील मनाचा रंग बदलला कि त्याच्याबरोबर ते आसमंतही त्या रंगात रंगवून टाकते,मनातल्या भावनांचे
रंग चराचरावर प्रतिबिंबित होतात....
वा! खूप छान कविता!
शब्दयोजना अगदी एका माळेतल्या मण्यासारखी आहे.

>>
हवेच्या मनातही नसताना मुळीच काही
तरंगत येतात अनाम वाद्याचे सूर
<<
वा!! बाकीचं सगळं वर्णन एकदम जिवंत होतं इथे या ओळींपाशी.
तुम्ही गायबच झालात!

तमोमुग्ध, अर्भकी झोप !!!
ब्रशच्या कमीत कमी फटका-यात रेखाटलेलं चित्रं.

आणि मनाशीच लाटा विणणारा आत्ममग्न समुद्र
तुमचा समुद्र पोहोचला. कविता पोहोचली. तुमच्या प्रतिमावापराच्या वाटा धुंडाळत कवितेचा शोध घ्यावासा वाटतोय. ज्या कुणी या कविता वर काढल्या त्या रसिकास धन्यवाद !