कर्जात जोवरी मृत्यू .... हे मीपण आहे केवळ

Submitted by बेफ़िकीर on 12 October, 2010 - 22:12

जीवनाकडे मृत्यूचे.... मी तारण आहे केवळ
कर्जात जोवरी मृत्यू.. हे 'मीपण' आहे केवळ

माझ्यापोटी कोणीही जन्माला आले नाही
प्रत्येक घोट मदिरेचा हे तर्पण आहे केवळ

घर वेगळेच असते हे कोणीही जाणत नाही
आजन्म गुंततो जेथे ते अंगण आहे केवळ

तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ

वाटेल करावे जे जे, ते करता येतच नाही
हे कसले जीवन आहे, हे शोषण आहे केवळ

हा भिनला माझ्यामध्ये, तो भिनला माझ्यामध्ये
माझ्यामध्ये मी नाही, ही चणचण आहे केवळ

मी तुझी कधीही नव्हते यावर विश्वास बसेना
मी तुझीच आहे वेड्या हे भाषण आहे केवळ

हे आता कोठे कळले, मी मला शोधतो आहे
मी तुला शोधतो आहे ती वणवण आहे केवळ

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ

दैवात तुझ्या जे आहे ते लागेलच भोगावे
'बेफिकीर' अपुल्या कविता हे वंगण आहे केवळ

गुलमोहर: 

फारच सुंदर गझल...

जीवनाकडे मृत्यूचे.... मी तारण आहे केवळ
कर्जात जोवरी मृत्यू.. हे 'मीपण' आहे केवळ>>> काय शेर आहे !! वा !! भिडलाच एकदम मनाला...

व्वा सुंदर व सशक्त गझल भूषण...

मतला, शोषण, चणचण, वणवण फार आवडले... बाकिचेही मस्तच आहेत... ’मिश्रण’ मला नीट कळाला नाही Sad पण चांगला वाटतोय

पुन्हा आभार Proud

कॉहावर विषय निघाला म्हणून वर आणली. सध्या आपल्याच कविता वर आणण्याची इच्छा होतीय. Proud

बेफिकीरजी,
जरुर आणा तुमच्या सार्‍या कविता,गझला वर आमच्यासारख्या नवोदीत वाचकांसाठी... तुम्ही अत्यंत सुन्दर लिहिता Happy
संपूर्ण गझल सुन्दर आहे...मतला तर एकदम कातिल...

बेफिकिर म्हणाया तुजला रे तूच शिकविले त्यांना
त्यां नसे कळे माबोचे हे "भूषण" आहे केवळ

.......................................................!!

प्रत्यक्ष ऐकलीय ही आपल्याकडून....

आज पुनः धन्य झाले वाचून...

धन्यवाद!

सुप्रिया
एक-मेकावरी आपण रोज येथे भाळतो
तू मला ओवाळ आता मी तुला ओवळतो..............
या ओळी आपल्या सारख्या (माझ्यासहित) मायबोलीकरांसाठी किती समर्पक आहेत ते वरील दोन लागोपाठच्या प्रतिसादावरून पटते ना !!

माझ्यापोटी कोणीही जन्माला आले नाही
प्रत्येक घोट मदिरेचा हे तर्पण आहे केवळ

तू बोल, नको बोलू तू, माझ्याशी... नटल्यानंतर
पण सार्‍या नटण्याचे 'मी' हे कारण आहे केवळ

मातीचे, संस्कारांचे, मोहांचे अन भोगांचे
त्या लाख लाख पितरांचे, मी मिश्रण आहे केवळ

दैवात तुझ्या जे आहे ते लागेलच भोगावे
'बेफिकीर' अपुल्या कविता हे वंगण आहे केवळ

वैभवशी सहमत. मायबोलीचे भूषण आहात.
ता.क.'' तिसरे'' लागल्याचे आत्ताच कळले. अनेक शुभेच्छा अशा कसदार लेखनासाठी.

बरीच जुनी गझल आहे...तेव्हा मी माबोकर नव्हतो.आज बेफिजींचे लिखाण चाळत असताना वाचतोय....
ही गझल म्हणजे आमच्यासाठी तर पर्वणीच!
ला...ज....वा....ब..!
उत्तम गझलेचा नमुना

Pages