गुन्हेगारीचा पाश

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. हिन्दी चित्रपटसृष्टीची राजधानी 'बॉलिवूड' इथेच आहे. तशीच मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे देशा-परदेशातल्या संघटित गुन्हेगारीचे; ‘अंडरवर्ल्ड’चे प्रमुख केंद्रही मुंबई महानगरीतच आहे.

मुंबईतल्या गुन्हेगारीलाही मोठा इतिहास आहे. देशातल्या व्यावसायिक संघटीत गुन्हेगारीची सुरुवात मुंबईपासूनंच झाली. खरंतर चंबलच्या खोर्‍यात किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या 'बापू वीरु वाटेगावकर' सारख्या 'रॉबिनहूड'च्या 'देशी' अवतारामुळे प्रसिद्ध झालेल्या सांगलीच्या वाळवा तालुक्यातली दरोडेखोरी असो; त्याचे स्वरूप तितकेसे व्यावसायिक, संघटीत असे नव्हते. सध्याच्या स्वरुपातल्या व्यावसायिक संघटीत गुन्हेगारीची जननी मुंबईच!

अगदी सुरुवातीला मुंबईतल्या गुन्हेगारीचं मुख्य केंद्र होतं ते ‘धारावी’. तेव्हाची मुंबईही आताएवढी विस्तारलेली नव्हती. धारावीमधे छोटे- मोठे दारूचे धंदे होते. त्या अनुषंगाने येणारी दादागिरी आणि इतर गुन्हेगारीही होती. पण त्याचं स्वरुप आणि आवाका मर्यादितंच होता. वाय.सी. पवार या कर्तबगार पोलिस अधिकार्‍याने धारावीची दहशत मोडून काढली.

वरदराजन मुदलियार उर्फ़ वरदादादा हा मुंबईतला पहिला मोठा ‘भाई’ असावा. त्याच्या टोळीपासून संघटित गुन्हेगारीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नसावी. मात्र ख़र्‍या अर्थाने ‘व्यावसायिक संघटित गुन्हेगारीची सुरुवात 'हाजी मस्तान' या स्मगलरने केली. त्याकाळी मुंबईतली तस्करी हा बहुचर्चित विषय होता. त्यातूनंच 'दाऊद इब्रहिम' सारखा आंतरराष्ट्रीय डॉन' जन्माला आला. त्याच्या विविध धंद्यात त्याला मदत करणारे किंवा विरोध करणारे म्हणून बाकीचे गुंड या क्षेत्रात उभे राहिले. मुंबईच्या १९९३च्या बाँबस्फ़ोटानंतर दाऊद टोळीत उभी फ़ूट पडून छोटा राजन सारखे त्याचे सहकारी त्याच्या कट्टर विरोधात जाऊन समांतर टोळी चालवू लागले. मात्र आय.एस.आय. सारख्या पाकिस्तानी गुप्तहेर आणि भारतद्वेष्ट्या संस्थेला भारतात 'लोकल स्टँडिंग' देणार्‍या दाऊदचं सामर्थ्य टोळीत फूट पडूनही कैक पटीने वाढलंच. दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांवरची प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहीलेल्या अरुण गवळीसारख्या टोळ्यांनीही मुंबईत बिल्डर्सना जमिनी खाली करून देणे, संरक्षण देणे, खंडणी असे उद्योग करंत आपले हात पाय या महानगरीत पसरले. गुन्हेगारांच्या स्थानिक वर्चस्वावरून होणारी टोळीयुद्धही इथे नवी नाहीत. मात्र या सगळ्याचा उपद्रव सर्वसामान्यांना फ़ारसा नसायचा. हल्ली मात्र बदलत्या परिस्थितीमुळे, बदलत्या जीवनशैली आणि संस्कृतीमुळे घरोघरी गुन्हेगार जन्माला येतील की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पहात आहे!

एकेकाळी मुंबईच्या अर्थकारणाचं ओझं आपल्या समर्थ खांद्यावर लीलया पेलणार्‍या कापड गिरण्यांमधे झालेला ऐतिहासिक संप कामगार नेतृत्वाचा माज आणि गिरणी मालकांचा आपमतलबीपणा यामुळे दीर्घकाळ लांबला आणि लाखो गिरणी कामगारांची कुटुंब देशोधडीला लागली. या गिरणी कामगारांच्या बायका, मुलींचा वापर करून मुंबईत ‘लेडीज सर्विस बार’ सुरू झाले. त्याचप्रमाणे या गिरणी कामगारांच्या मुलांवर कोसळलेल्या आर्थिक आपत्तीतून बनलेली त्याची अगतिकता, एकूणंच व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात उफ़ाळलेला क्रोध, बेरोजगारी, दारिद्र्याचं दारात उभं ठाकलेलं संकट या सगळ्याचा फ़ायदा ‘गँगस्टर्स’नी उठवला आणि अशा हतबल युवकांना आपल्या टोळ्यांमधे भरती करुन आपली ताकद वाढवली. अगदी नजिकच्या काळातही या ‘भाई’मंडळींनी आपल्या टोळ्या वाढवण्यासाठी अनेक कल्पना लढवल्या. मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरात ‘स्व-संरक्षणा’च्या नावाखाली ‘कराटे’चे वर्ग चालवायचे आणि त्यातला आपल्याला ‘झुंजवायला’ उपयोगी पडेल असा ‘कोंबडा’ निवडून त्याला आपल्या गुन्हेगारी टोळीच्या जाळ्यात ओढायचं; असले प्रकारही उघडकीला आले आहेत.

अगदी आत्ता-आत्तापर्यंत असं समजलं जायचं की कुणी स्वखुशीने गुन्हेगार होत नाही. ते बर्‍याच अंशी खरंही आहे. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. पूर्वी आईच्या औषधासाठी किंवा बहिणीच्या लग्नासाठी तरुण; किंबहुना नायकंच चोर्‍या करंत असल्याचं दृष्य चित्रपटात हमखास असायचं. ते त्या काळच्या समाजाचं प्रातिनिधीक चित्रण असेलही. मात्र आज मौज, मजा, मदीरा, मदिराक्षी या आवश्यक गरजा बनंत आहेत. या गरजा भागवणं सर्वसामान्यपणे चौकटीतलं काम करुन शक्य नसतं. असलं तरी तेवढं थांबायला वेळ नसतो. त्यासाठी झटपट पैसा हवा. मग त्यासाठी गुन्हेगारीएवढा दुसरा ‘शॉर्ट कट’ कुठला?

बदलत्या काळातल्या गुन्हेगारीचं स्वरूपही झपाट्याने बदलंत आहे. ‘व्हाईट कॉलर' गुन्हेगारीची ‘सायबर क्राईम' अशी नवी शाखा निर्माण झाली आहे. गुन्हेगारीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या हुशारीने गुन्हे घडवले जात आहेत. नुकताच मुंबईत एक प्रकार असा घडला;
मुंबईत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या दोघा विद्यार्थ्यांनी कुठुनसं 'मॅग्नेटिक कार्ड रीडर' पैदा केलं. एका बड्या हॉटेलमधल्या वेटरशी संधान बांधून त्याच्याकडे हे यंत्र सुपूर्त केलं. तो वेटर ग्राहकाने 'क्रेडिट कार्डा'वर बिल दिल्यावर पटकन कार्ड रीडरवर त्या कार्डावरचा ‘डेटा' उतरवून घ्यायचा. हे होऊ घातलेले अभियंते त्या माहितीच्या आधारे बनावट कार्ड तयार करायचे आणि मौजमजेसाठी ती कार्डस वापरायचे. अखेर काही काळानंतर हा प्रकार उघडकीला आला. सर्व कार्डांमधे त्या होटेलमधला व्यवहार हे समान सूत्र हाताशी धरून या प्रकाराचा छडाही लागला…

या बदलत्या संस्कृतीमुळे ढासळती मूल्य गुन्हेगारीला कसे प्रवृत्त करतात याचं प्रत्यंतर देणारी एक घटना बोरिवलीत घडून गेली. स्वतंत्रपणे एकटीच रहाणारी एक मध्यमवयीन महिला जवळच्याच दोन मुलांची शिकवणी घ्यायची. थोड्याच दिवसात आपल्या ‘टिचरच्या’ घरची सुबत्ता या ‘विद्यार्थ्यां'च्या डोळ्यावर आली. त्यांनी शिकवणीसाठी जाऊन आपल्याच शिक्षिकेचा निर्घृणपणे खून केला आणि ते पैसे ‘डान्स बार’मधे अय्याशी करण्यात उडवले! अशाच प्रकारे अय्याशीसाठी पैसे देत नाही म्हणून एका मुलाने आईचा गळा घोटल्याची घटनाही मुंबईत घडली होती.

पती-पत्नीचं नातं हे खरोखरंच अनमोल असतं. ते रक्ताचे नातेवाइक नसूनही त्यांच्यात गुंफ़ल्या जाणार्‍या धाग्यातून सृजनाचं बीज अंकुरतं. हे नातं एकमेकांनी प्राणापलिकडे जपायचं असतं. ख़धी समजुतीने, सलोख्याने. कधी मोकळ्या मनाने माफ़ी मागून; कधी मोठ्या अंत:करणाने माफ़ करून. पण नवी मुंबईतल्या एका डान्सबार मालकाला रोज एक नवी मुलगी उपभोगायला लागायची. त्याच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून त्याच्या पत्नीनेच सुपारी देऊन त्याचा खून करवला. कुठली ही संस्कृती?

याच्या अगदी उलट एक प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीला आला होता. एका बड्या व्यापार्‍याचे त्याच्या परदेश दौर्‍यात एका 'गौर-वर्णीय' कथित ‘मॉडेल’शी ‘सूर’ जुळले. त्याला ‘वन नाईट स्टँड’मधे रस होता तर ती बिचारी ‘लाँग टर्म रिलेशनशिप’च्या शोधात! त्याला तिच्या भावनांचं गांभीर्य कळलं नाही म्हणा किंवा हा तिढा आपण चुटकीसरशी सोडवू अशा भ्रामक आत्मविश्वासातून म्हणा; त्याने ते सगळं ‘कॅज्युअली’ घेतलं. आपलं काम उरकून आणि तिच्याबरोबर मजा करून भारतात परतला तो तिला नेण्यासाठी बायकोला घटस्फ़ोट देऊन परत येण्याचं आश्वासन देऊनचं! इकडे येऊन तो त्याचं 'रुटीन' आयुष्य जगायला लागला. तिचे फ़ोन यायचे. तो 'इग्नोअर' करायचा. तिने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. अखेर त्याच्या मागावर ती मुंबईत यायला निघाली. याने तिला आणायला मित्राला एअर पोर्टवर पाठवतो म्हणून सांगितलं; पण प्रत्यक्षात पाठवले भाडोत्री मारेकरी. त्यांनी तिला कारमधेच मारून तिचं प्रेत मुंबई आग्रा महामार्गावर फ़ेकून दिलं. असा प्रेमाचा आधुनिक अवतार!!!

गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण, बदलतं परिमाण हे प्रकार फक्त मुंबईतंच आहेत अस नाही. वाढत्या नागरीकरणाबरोबरंच गुन्हेगारी वाढत आहे. वाढणार आहे. मात्र बदलत्या जीवनमूल्यांचा यामागचा प्रश्न सर्वात गंभीर आहे.


खर आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे गुन्हेगारीतही व्यावसायिकता आली आहे.
गुन्हेगार नेहमीच पोलिसांपेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात.
उपभोगांच्या अमर्याद उपलब्धतेमुळे जीवनमुल्ये घातक रितीने बदलत आहेत.



टिळक,तुम्ही लिहिलेले सत्यघटनांचे लेख हादरवुन देणारे असतात्.मी तुमच्या लेखनाच्या फॅन होत चाललो आहे.



टिळक, खूप दाहक सत्य मांड्लय तुम्ही या लेखातून.... मन बधिर होतं हे असलं वाचुन...



टिळक अजुन एक सुंदर लेख... सामाजिक मानसिकता आणि त्यामागची कारण... आवडल अजुन लिहात रहा



कितीतरी दादा आले, काही संपले काही आहेत या मुंबईत. चोर्‍या, दरोडे, दहशत न संपतील इतके प्रकार आहेत गुन्हेगारीचे. लेख फारच छान लिहिलात. शिर्षक व पहिला परिच्छेद वाचुनच फार आनंद झाला, शेवटपर्यत कुतुहुल राहते वाचताना.



प्रतिक्रियेबद्दल सगळ्या मित्रांना मनापासून धन्यवाद.
किशोरजी; चोर्‍यामार्‍या, दरोडे ही सर्वसामान्य प्रकार झाले गुन्हेगारीचे. ते वर्षानुवर्ष सुरू आहेत आणि रहातीलही. या लेखाचा विषय प्रामुख्याने आहे की बदलत्या जीवनमूल्यांना सामोरे जाण्याच्या संघर्षातून निर्माण झालेली नवी गुन्हेगारी. म्हणून यात अशाच प्रातिनिधिक गुन्हेगारी घटनांचा उल्लेख केला आहे.