माझा अभ्यास हा आमच्या घरात युद्धाचा विषय असायचा. सकाळी सकाळी बाबा पळून यायचा आणि मला उठवायचा. सात ते साडेआठ ही वेळ माझ्या अभ्यासाची असायची. तसं भाषा, इतिहास-भूगोल, सामान्य विज्ञान वगैरेंशी माझं खास वैर नव्हतं. पण गणिताचं पुस्तक सकाळी सकाळी दिसलं की मी एखाद्या घोडीसारखी बिथरायचे! गणित मला यायचं नाही. पण ते येत नाही म्हणून मला त्याची जाम भीती वाटायची. शाळेत गणितात पैकीच्या पैकी मार्कं मिळणार्या मुला-मुलींचा वेगळाच तोरा असायचा. मला भाषेत नेहमी छान मार्क असायचे, पण भाषेचं कौतुक भाषा शिकवणार्या बाईंनाच असायचं फक्त. गणित आलं पाहिजे कारण गणित आल्याने आयुष्य खूप सोपं होतं, असा एक मतप्रवाह शाळेतल्या बहुतेक मुलांच्या पालकांमध्ये असायचा.
बाबाला मला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळावेत असं फार वाटायचं. पण ते त्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. निदान माझी गणिताबद्दलची भीती तरी जावी म्हणून 'हसत खेळत गणित’ सारखे खूप उपक्रम आमच्या घरात राबवण्यात आले. पण कशानेही माझ्या गणित-ग्रहणशक्तीत फरक पडला नाही. प्रत्येक इयत्तेसरशी माझं गणित अधिकच कच्चं होऊ लागलं. आणि त्याचबरोबर गणित किती महत्वाचं आहे याचे पुरावे आणखीनच बळकट होऊ लागले. आमच्या घरात दर वर्षी माझ्या गणितातील मठ्ठपणावरून बाबाच्या डोक्यात चिंता निर्माण होऊ लागल्या. आई मात्र शांत असायची. "सई, तू एकदा गणितात नापास होऊन बघ", असा सल्ला तिनी मला दिला होता. पण आई-बाबांच्या सुदैवाने ती वेळ माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली. आणि आली तेही बरं झालं.
सातवीनंतर बाबानी माझा अभ्यास घेणं बंद केलं आणि मला गणिताची गोडी लागावी म्हणून मंगलामामीकडे अभ्यासाला पाठवण्यात येऊ लागलं. मंगला नारळीकर, म्हणजे मंगलामामी माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे. तिच्याकडे मी सायकलवरून जायचे. पुणे युनिव्हर्सिटीचा तो शांत परिसर, आयुकातलं तिचं फुलांनी सजलेलं घर, तिच्या मोठ्या डायनिंग टेबलवर बसून पिवळ्या पिवळ्या कागदांवर लाल शाईनी सोडवलेली गणितं, हे सगळं माझ्या मनाच्या खाऊच्या कप्प्यात ठेवलंय मी! तिनी टाटा इनस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधून गणितात पी. एच. डी मिळवली आहे. तिची गणित शिकवण्याची पद्धत इतकी सोपी असायची की तिच्याकडे असेपर्यंत मी अजून पहिली-दुसरीचंच गणित शिकते आहे असं मला वाटायचं. दहावीत माझा भूमितीचा अभ्यास खूप छान झाला होता, कारण मंगलामामी मला सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले प्रत्यक्ष चित्र काढून समजावून सांगितले होते. कधी कधी आम्ही काढलेल्या त्रिकोणांच्या मध्यगा (मिडीयन) वापरून, एकसारखे पानभर त्रिकोण मी काढायचे आणि तेरा वर्षांच्या मुलीचा गणिताचा तास हा पाच वर्षांच्या मुलांचा चित्रकलेचा तास बनायचा. एखादा कांदा सोलत जावा तशी ती गणितं सोडवत जायची. कुठलीही एक पद्धत घोड्यासारखी न रेटता, सगळ्या रस्त्यांनी त्याच उत्तराकडे एखाद्या शूर शिपायासारखी मला न्यायची. तिची ही सवय मी गणितात नाही वापरू शकले. पण गणिताच्या परिघाच्या बाहेर, खर्या खर्या आयुष्यात ही पद्धत जास्त उपयोगी आहे हे मला आता कळू लागलं आहे.
ती दोन वर्षं माझे गणितातले मार्कं अचानक शिड्या चढू लागले. मला मंगलामामी गणित शिकवते याचा वर्गातल्या मुलांना हेवादेखील वाटू लागला. पण गणितापेक्षा खूप मोठ्या गोष्टी मी तिच्याकडून शिकले. तिचा साधेपणा, एखादी गोष्ट येत नाही याकडे बघण्याचं निखळ कुतूहल, ती का येत नाही याचा त्रागा न करता, तिच्या आजूबाजूला साठलेली भीती, आणि लाज आधी कमी करायची पद्धत, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. एका वेळी मंगलामामी साधारण पाच कामं करायची. माझ्याबरोबर तिच्या मोलकरणींच्या मुलांचाही अभ्यास एका बाजूला सुरु असायचा. मग कधी कधी तिची मोठी शिष्या म्हणून त्यांचा अभ्यास तपासायची जबाबदारी ती मला द्यायची. आम्ही सगळे आमचे आमचे अभ्यास करत असताना ती आमच्यासाठी केक बनवायची. तसंच तिचं फुलांचं वेड, जे मलाही वेड लावून गेलं. तिच्या टेबलवर नेहमी सोनटक्का, चाफा, फ्रेंच गुलाब, मोगरा, अनंत, आणि बाकी काहीच नसलं तर पारिजात तरी हमखास असायचा. आणि ती सुगंधी फुलं चहात टाकायची. मग मीपण घरी येऊन फुलांचा चहा करायचे.
तिच्या डोक्यात इतकी माहिती असूनदेखील, लिहिताना किंवा बोलताना अगदी सोपं, साधं आणि सुटसुटीत बोलायची.
तिला मी राजकारणावर वाद घालतानाही पाहिलं आहे. पण तिचा भर नेहमी मूळ अडचण काय आहे याकडेच असायचा. कुठल्याही वादामध्ये तिनी कधीही, कुठलाही एकच "वाद" पकडून ठेवला नाही. आपण काहीतरी महान बोलतो आहे, आणि आपल्या बोलण्याने ही सगळी सभा खूप प्रभावित होणार आहे असा दर्प तिच्या कुठल्याच बोलण्यात नसायचा.
तिचा तास सुरु असताना कधीच मला माझ्या पुढच्या आयुष्याची भीती वाटायची नाही. आणि तिच्यासारखी गुरु मला तेव्हा भेटली यासाठी ’नियती’बाईंचे मानावे तितके आभार कमी आहेत. पुढे वाचन वाढल्यावर लक्षात येऊ लागलं, की सोपं लिहिणं, सोपं बोलणं आणि सगळ्यांना कळेल असं बोलणं खूप अवघड आहे. खास करून जेव्हा बोलणार्या किंवा लिहिणार्या माणसाचा व्यासंग वाचकांच्या मानाने खूप मोठा असतो, तेव्हा त्यांना कळेल असं बोलणं ही विषयाशी पूर्णपणे एकरूप झाल्याची पावतीच असते.
माझी गणिताची भीती अजूनही गेली नाही. पण त्याच्याशी लढता लढता मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा लोकांमध्ये अभ्यासाच्या पलीकडची हुशारी दिसू लागली. पुस्तकं वाचून शहाणे झालेले लोक खूप बघितले होते. पण प्रवास करून शहाण्या झालेल्या लोकांशी दोस्ती झाली तेव्हा, भारतात आपण कुठल्याच साच्यात बसलो नाही याचा खूप आनंद झाला. कधी कधी आपल्या बाळाचं आयुष्य सोपं व्हावं, त्याला आपल्यासारखे कष्टं करायला लागू नयेत म्हणून आपण नकळत त्यांच्या आजूबाजूला भिंती घालतो. पण भिंत घालण्यापेक्षा, येईल त्या दु:खाच्या लाटेवर स्वार व्हायला शिकताही आलं पाहिजे. आणि भिंत नसेल तर दु:खच आणि कष्टच वाट्याला येतील असं कुठे आहे? कदाचित असेही देश दिसतील जे आपल्या त्रिज्येच्या बाहेर होते. अशी लोकं भेटतील, ज्यांचा पेहेराव, आहार, रूप-रंग सगळंच आपल्या अगदी विरुद्ध असेल. पण तरीही त्यांच्या मनात आपल्यासारखेच प्रश्न असतील. आपल्यासारखीच सुख-दु:ख असतील. आणि अभ्यास करून, यशाच्या शिड्या चढणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपल्यासारखाच आणि आपल्या अगदी विरुद्ध विचार करणारी माणसं बघणंही महत्वाचं आहे. आणि मग मंगलामामी जशी गणितं सोडवायची तशीच कुठल्याही देशातून, वेशातून पाहिलेली माणसं एकाच माणुसकीचं उत्तर देतात!
------
मूळ लेखःhttp://unhalyachisutti.blogspot.com/2010/06/blog-post_27.html
मंगला नारळीकरांकडून गणित
मंगला नारळीकरांकडून गणित शिकायला मिळाले, याबद्दल मला हेवा, असूया आणि तत्सम सगळे काही वाटतेय.
सई, परत वाचलं. मस्तच!
सई, परत वाचलं. मस्तच! (ब्लॉगवर वाचलं होतं)
तुझ्या ब्लॉगला भेट देण्याचा मोह कटाक्षाने टाळते आहे (काहीतरी दमदार वाचायची ईच्छा झाली की तुझा ब्लॉग वाचता यावा म्हणुन!)
दिनेशदा, अनुमोदन!
पुढे वाचन वाढल्यावर लक्षात
पुढे वाचन वाढल्यावर लक्षात येऊ लागलं, की सोपं लिहिणं, सोपं बोलणं आणि सगळ्यांना कळेल असं बोलणं खूप अवघड आहे. >> १००% खरे आहे.
भाग्यवान आहेस असे गुरु मिळाले. आजच्या शिक्षकदिनानिमित्त योग्य लेख.
@ दिनेशदा, धन्यवाद. @वत्सला,
@ दिनेशदा, धन्यवाद.

@वत्सला, हा हा. काय ना! दमदार कुठलं ग बाई!!
@ अनिता खरच की!! माझ्या लक्षातच आलं नाही हे. मी सहज नवीन पोस्ट टाकला!
खूप छान लिहिलं आहेस सई.....
खूप छान लिहिलं आहेस सई..... गणिताची भीती मलाही जाम वाटायची.... केवळ आणि केवळ गणित सक्तीचे होते म्हणूनच मी ते शिकले. दरवर्षी परीक्षेच्या आधी मी सर्व कोन, त्रिकोण, चौकोन पुन्हा पुन्हा शिकायचे.... सिध्दांत, प्रमेये सोडवताना नक्की कोठे थांबायचे हेच मला कळायचे नाही, त्यामुळे जी गोष्ट सिध्द करायची ती सिध्द करुन झाल्यावरही मी पुढे पायर्या मांडत बसायचे!!!!
एवढेच नव्हे तर इयत्ता सहावीत स्वतःवर खूपच भरवसा असल्याने आपला आपण गणिताचा अभ्यास करुन चाचणी परीक्षेत चक्क नापासही झाले होते. तीस पैकी फक्त सहा मार्क्स! वर्गशिक्षिकांनी सार्या वर्गासमोर ''अ'' तुकडीचा निकाल कसा खराब केला म्हणून माझी हेटाळणी केली होती ती जास्त लागली अपयशापेक्षा! त्यानंतर गणिताविषयी फार प्रेम वाटलेच नाही.... पास होण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी फक्त शिकत राहिले गणित!
आमच्या घरी माझी धाकटी बहीण अगदी माझ्याविरुध्द! गणितात प्रचंड हुशार आणि भाषांमध्ये, खास करुन मराठीत कूर्मगती! एकीकडे तिला गणिताच्या विविध परीक्षांमध्ये बक्षीसे मिळायची तर दुसरीकडे माझे निबंध, कविता नावाजल्या जायच्या! सगळीच मजा!
मंगला नारळीकरांचा तुझा अनुभव वाचून खूप छान वाटले. अशी माणसे आपल्याला आयुष्यभरासाठी पुरेल असा घवघवीत, संपन्न ठेवा देऊन जातात.....
<<<पण भाषेचं कौतुक भाषा
<<<पण भाषेचं कौतुक भाषा शिकवणार्या बाईंनाच असायचं फक्त. >>>>
हल्ली त्यांनाही ते वाटेनासे झालेय..........
मस्त लेख. नवीन लेखाच्या विनंतीचा मान लगेच राखल्याबद्दल धन्यवाद..........
मस्त लेख !
मस्त लेख !
तिचा तास सुरु असताना कधीच मला
तिचा तास सुरु असताना कधीच मला माझ्या पुढच्या आयुष्याची भीती वाटायची नाही.>>>>
सई, यू मेड माय विकेंड.
दुर्दैवाने माजं बी गनित लै भारी हाये. आता जे मुळातच मला येत नाही त्याची गोडी मी लेकीला काय लावणार कप्पाळ ? तो जरा भंपकपणा झाला. आत्तापात्तुर हसत खेळत गणित छाप ८ पुस्तकं आणलीत. पण वाचायचाच कंटाळ येतो.

ती थोडी मोठी झाली की एकदा लेकीला स्वच्छ सांगीन म्हणते, की आजपर्यंत मला काही हा विषय समजला नाही, पण यात लोकांना विश्वाचे वगैरे रहस्य आकळुन येते, तर तुला तरी याची गोडी लागो माय.
माझंही गणित भयानक आहे.
माझंही गणित भयानक आहे. लहानपणी खूप मार खाल्लाय त्यावरुन. गणितात कधी नापास न होता शाळा संपली हे नशिबच म्हणायचं.
सई, मी ही हे ब्लॉग वर वाचलंय. छान लिहिलं आहेस. तुझ्या गुरुंसारख्या गुरु मिळाल्या असत्या तर कदाचित गणिताची गोडी लागलीही असती. कोण जाणे!!!
रैना,
९०% विद्यार्थ्यांना गणिताची
९०% विद्यार्थ्यांना गणिताची भिती वाटते याचे एक कारण म्हणजे तो विषय समजून घ्यावा लागतो. इतर विषयांप्रमाणे कळला नाही तरी नुसत्या घोकंपट्टीने पास होता येत नाही. आणि दुसरे म्हणजे इतका सोपा व मनोरंजक विषय आपल्याकडे ॠक्ष, कठीण व कंटाळवाणा करून शिकवला जातो. तसे हा विषय सोपा आणि मनोरंजक करून शिकवणारेही शिक्षक आहेत पण त्यांची संख्या एकूण तुलनेत फार कमी आहे आणि ते सर्वांच्या वाटणीला येत नाहीत. असे शिक्षक ज्यांना भेटतील ते खरेच भाग्यवान.
खुपच मस्त लिहिलयस सई !
खुपच मस्त लिहिलयस सई ! नशिबवान आहेस .
पण गणिताचं पुस्तक सकाळी सकाळी दिसलं की मी एखाद्या घोडीसारखी बिथरायचे! >>> अजुन पण बिथरतेस का ?
सई, मस्त लेख आहे. मंगला
सई, मस्त लेख आहे.
मंगला नारळीकरांकडे तुला शिकायला मिळालं ह्या तुझ्या भाग्याचा खरोखर हेवा वाटतो. त्या जयंत नारळीकरांसोबत नाशिकला व्याख्यानाच्या निमित्ताने एकदा आल्या होत्या, तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. हे दाम्पत्यच अगदी गुणी आहे म्हणायचं. जयंत नारळीकरांनी खगोलशास्त्रावर केलेलं भाषणही असंच सामान्यांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेतलं होतं...
खरंच कुठलाही विषय आवडण्या न आवडण्यात शिक्षकाचा फार मोठा भाग असतो. माझे बाबासुद्धा कॉलेजला गणिताचेच आध्यापक होते. नुकतेच रिटायर्ड झालेत. मला गणिताची जी काही थोडी फार आवड निर्माण झाली, ती माझ्या बाबामुळेच. आणि असे शिक्षक आपल्याला आपल्याच घरात लाभले हे आपले भाग्यच, नाही का?
सई, तू लेखाचा शेवट सुद्धा फार छान केलायस. त्यातून तुला आयुष्याचं गणितही बर्यापैकी समजलंय, हे लक्षात येतं
यु मेड माय विकेंड>> माझा पण
यु मेड माय विकेंड>> माझा पण
अरे वा!!! कीती नशिबवान आहेस
अरे वा!!! कीती नशिबवान आहेस तु सई ! तुला मंगला नारळीकरांकडे शिकायला मिळाले ते. आणि गणितात पी.एच.डी करुनही त्या शाळेचे गणितही सहजतेने ( कुठे ही कमीपणा मानुन न घेता ) शिकवत होत्या हे पाहुन त्यांचे ही खुप कौतुक वाटले.
बाकी लेख ही मस्तच.
प्रचंड हेवा वाटतोय तुझा सई
प्रचंड हेवा वाटतोय तुझा सई

दहावीनंतरच गणित सोडलं पण विश्वास ठेव अगदी अजूनही मला गणिताचा पेपर उद्यावर येऊन ठेपलाय आणि येत काहीच नाहीये असं भयंकर स्वप्न अधूनमधून पडतं. तुझ्यासारख्या गुरु मिळाल्या असत्या तर अवघड प्रमेयांच्या कुरणात मी अगदी निर्भयपणे बागडतेय आणि लांबवर उत्तराचा सुळका स्पष्ट दिसतोय अशी छानशी स्वप्नं पडली असती कदाचित
जोक्स अपार्ट, पण गणितातल्या मठ्ठपणाने माझ्या शालेय आयुष्यातील आठवणींना भलतंच ग्रहण लागलेलं आहे
>>यु मेड माय विकेंड>> आणि
>>यु मेड माय विकेंड>>
आणि माझी आठवड्याची सुरुवात मस्त झाली
खुपच मस्त लिहिलयस!
मस्त लिहिलय... माझा आवडता
मस्त लिहिलय... माझा आवडता विषय गणित...
मस्त लिहीलेय आणि जाम हेवा
मस्त लिहीलेय आणि जाम हेवा वाटतोय (तुमचं काय बुवा, भारी काम; असे भाव असलेली स्माईली!!!)
४-७वीच्या स्कॉलरशीपर्यंत मातोश्रींनी गणित शिकवले, त्या जोरावर दहावीपर्यंत माझी गणिताची गाडी बरी चालली होती. ११वीत अलजिब्रा नावाच्या भुताशी गाठ पडली आणि माझी दाणादाण उडाली. त्यानंतर कित्येक वर्षांनी बी.एड. करताना गणित मेथड घ्यावी लागली पण सुदैवाने मोकाशी नावाचे जबरदस्त शिक्षक मिळाले. तू लिहिले आहेस तशीच त्यांची पद्धत होती. मॅथ्स मेथडमधे मी आमच्या कॉलेजात पहिला आलो हा अजूनही आमच्या घरातला प्रचंड आश्चर्याचा विषय आहे
तुला तर फक्त गणितच येत
तुला तर फक्त गणितच येत नव्हतं.. मला बरच काही.
काय मस्त लिहिलेय.. अग्दी
काय मस्त लिहिलेय.. अग्दी बालपणीची आठवण झाली.
माझ्या नशिबाने मला ब-यापैकी येणा-या विषयात गणिताचा नंबर वरचा होता. मला अजिबात न येणा-या विषयात पहिला नंबर इतिहासाचा. मला सनावळ्या कधीच लक्षात राहिल्या नाहीत.
आवडीचा विषय भुगोल... कॉलेजमध्ये कमर्शियल जीओग्राफी होता, तोही जाम आवडायचा.... अॅटलस उघडुन कुठला देश कुठे आणि त्यात अजुन काय काय हे शोधत बसणे हा अगदी आवडीचा टिपी.... नशिबाने अजुनही अॅटलसच उघडुन इतर देश बघतेय...
>>भिंत घालण्यापेक्षा, येईल
>>भिंत घालण्यापेक्षा, येईल त्या दु:खाच्या लाटेवर स्वार व्हायला शिकताही आलं पाहिजे. आणि भिंत नसेल तर दु:खच आणि कष्टच वाट्याला येतील असं कुठे आहे?
एकदम बरोबर. १००% पटलं. मला बीजगणित छान जमायचं पण भूमिती फार जमलं नाही आणि कधी आवडलंही नाही. छान लेख सई!
खुप छान लिहिलयस सई
खुप छान लिहिलयस सई
छान लिहिलय सई.
छान लिहिलय सई.
>>माझंही गणित भयानक
>>माझंही गणित भयानक आहे
पण सई, तु खरच खूप नशिबवान आहेस !! आयुष्याच्या घडणीच्या वर्षांमधे मंगला नारळीकरांसार्ख्या गुरु मिळणं हि खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे!!
माझही!!
>>भिंत घालण्यापेक्षा, येईल त्या दु:खाच्या लाटेवर स्वार व्हायला शिकताही आलं पाहिजे. आणि भिंत नसेल तर दु:खच आणि कष्टच वाट्याला येतील असं कुठे आहे?
अगदि खरं!! पटलं एकदम!!
छान लिहीतेस तु!! अशीच लिहीत रहा!!
छान लेख!
छान लेख!
छानच लिहीलयं.. मनाचा खाउचा
छानच लिहीलयं..
मनाचा खाउचा कप्पा.. झकास
खूप मस्त लिहिलयस सई... निवडक
खूप मस्त लिहिलयस सई... निवडक १० त जाणार.
>>पण प्रवास करून शहाण्या झालेल्या लोकांशी दोस्ती झाली तेव्हा, भारतात आपण कुठल्याच साच्यात बसलो नाही याचा खूप आनंद झा>>मलाही साचेबद्ध आयुष्य नाही आवडत्.त्यामुळेही हे जास्त भावले असावे.
वॉव.. प्रचंड हेवा.. एक म्हणजे
वॉव.. प्रचंड हेवा..
एक म्हणजे मंगला नारळीकरांकडे गणित शिकणे.. तसंच आयुष्यही शिकणे..
आणि त्याहून वरताण हे इतकं छान लिहून व्यक्त करणे!! अवघड काम आहे सई... मंगला नारळीकरांकडून तू हे नक्कीच शिकली आहेस, सहज सोपं तरीही अर्थवाही लिहीणे..
वा. हे त्यादिवशीच वाचलेलं पण
वा. हे त्यादिवशीच वाचलेलं पण फोनवरुन प्रतिक्रिया देता आली नव्हती.

खुप छान लिहिल आहेस.
बस्के ला हजारदा अनुमोदन.
माझं बीजगणित एवढ चांगलं नव्हत पण भुमिती जाम आवडायचं. पण शिक्षणात बीजगणितच जास्त वापरायला लागायचं.
तुझ्यासारख शिकायला नक्कीच आवडलं असतं !
परत वाचलं. मस्तच! (ब्लॉगवर
परत वाचलं. मस्तच! (ब्लॉगवर वाचलं होतं)
Pages