खिडकीबाहेर कोसळणारा वळीवाचा पाऊस. एक कंटाळलेली दुपार आळोखेपिळोखे देत जागी होतेय. चहाच्या गरम घोटागणिक आळसाचा एकेक वेढा गळून पडत होता. शॉपिंग, ट्रेकींग, पार्ट्या, पिकनिक, भेटीगाठी, सिनेमे, नाटक, भेळ, आईस्क्रीम, मस्तानी सगळ्यांनी ओसंडून वाहिलेली दोन महिन्यांची सुटी आता संपत आली होती. पुढच्या आठवड्यात कॉलेज सुरु होतंय. खरंतर कॅलेंडरवरची दोनच महिने पण परीक्षेच्या आधीपासून घेतलेल्या 'प्रीपरेशन लीव्ह' मुळे चांगली चार महिने अक्राळविक्राळ पसरलेल्या सुटीचाही वीट आलाय आता. कॉलेजमध्ये जाण्याचा उत्साहही नाही. आता काय करायचंय तिथे जाऊन? ज्या ओढीनं एकही दिवस दांडी न मारता दोन वर्षं कॉलेज गाठत राहिले तिथे आता अचानक सगळं निरर्थक वाटायला लागलंय. हे असं होणार याची कल्पना दोन तीन महिन्यांपूर्वी २५ मार्चला फेअरवेल पार्टी झाली तेव्हाच आली होती. आता मात्र खरंच जीवावर आलं होतं. जय काय करत असेल आता? तो ही पहात असेल का हा पाऊस? की तो जिथे असेल तिथे पाऊसच नसेल? फक्त ऊन?
अन कपातला चहा संपल्याचं लक्षात आलं. उगाचच एकवार उदासपणे त्या आतून चहाने माखलेल्या चिकट कपाकडे पाहून, जयच्या वह्या बघाव्यात का पुन्हा एकदा असा विचार मनात आला. घरात कुणीच नव्हतं. ही मै और मेरी तनहाई प्रचंड हवीहवीशी, अगदी बच्चन आवडतो तितकी. फक्त आम्ही दोघी 'अक्सर' बाते करतोच असं नाही. तिला कळतं. आपोआप.
जयच्या वह्या. अभ्यासाच्या कपाटात सर्वात खालच्या कप्प्यात माझ्या वह्यांच्या मध्ये मध्ये खुपसून ठेवलेल्या जयच्या वह्या. आपल्या वह्यात कित्येक ठिकाणी खराखरा पेनानं केलेल्या गिरमीटाच्या खाली लिहीलेलं त्याचं नाव. पेपर मध्ये कॉलेजला अमूक स्पर्धेत बक्षीस मिळाल्याच्या बातमीत त्याचं नाव, फोटो असेल तर ते कात्रण जपून ठेवलेलं. त्याच्या नावाभोवती स्पार्कल पेनने डेकोरेट करुन. हे असले येडचापपणे आपण करतो हे दुसर्या कुणाला कळालं तर आपली 'स्कॉलर' इमेज एका क्षणात खलास. वहीवर पहिल्या पानावर समासाच्या वर उजव्या कोपर्यात सुंदर अक्षरात मराठीत नाव 'जन्मेजय प्रभुदेसाई'. बाकी संपूर्ण वही इंग्रजी रनिंग लिपीत पळणारी. पहिलं आणि त्याच्या मागचं पान कोरं सोडणं वगैरे भानगड नाहीच. तिथूनच तारखेसकट पहिलं लेक्चर सुरु. आपल्या वह्यांसारखे कुठेही वर्गात बोअर होत असताना पानांच्या सांदीकोपर्यातून काढलेली तीच ती फुलं, पानं नाहीत, मेंदीची अर्धवट कधी पूर्ण डिझाईन्स नाहीत की कुठेतरी मूर्खासारखं 'कानातले बघ' असं शेजारच्या मैत्रिणीला सांगता न आल्यानं लिहून दाखवलेलं नाही.इथे मात्र फक्त नोटस. कडक आकृत्या. अधला मधला राहिलेला मुद्दा नंतर तडक तर कधी वळणदार बाणांनी जोडलेला. पण खरी मजा तर मागच्या दोन पानांवर असायची. कधी संपूर्ण कविता, कधी एखादा शेर त्यांच्या कवी, शायरांच्या नावांसकट तर कधी एखाद्या गाण्याच्या मधल्याच दोन ओळी, तर कधी 'सचिन द ग्रेट.' एवढंच. आणि सिलॅबस बाहेरच्या रेफरन्स बुक्सची यादीही तिथे ठाण मांडून असायची. खरंतर जयच्या कोणत्याही वहीतल्या शेवटच्या पानाचा मान तिचाच पण ही बाकीची मंडळी पोटभाडेकरुंसारखी जागा मिळेल तिथे स्वतःला घुसवत रहायची.'
इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतली तेव्हा ओळख परेडमध्ये वर्गातली सर्वात जास्त टक्के असलेली हुशार मुलगी असं विशेषण चिकटलं होतं. त्याचवेळी परंपरेनुसार सिनियर्सना शोधून त्यांची जर्नल्स, नोटस मिळवण्याची घाई उडाली. जयची आणि आपली पहिली भेट तिथेच. जयबद्दल बरंच ऐकून झालं होतं एव्हाना. टॉपर, शिक्षक, विद्यार्थ्यांपासून विजयकाकांपर्यंत सर्वांचा लाडका, गॅदरिंग, स्पोर्टसमध्ये आपल्या डिपार्टमेंटच्या तंबूला तोलून धरणारा एकमेव खांब आणि तरीही डाऊन टू अर्थ. या वर्णनावरुन एखादा चष्मेवाला, तेल लावून भांग पाडलेला, चौकट्यांचा शर्ट घातलेला, शिक्षकांसमोर मान डोलावणारा असा 'गोपाळ' तिच्या डोळ्यासमोर आला होता. लॅबमध्ये देशपांडे मॅडमने जेव्हा त्याला हाक मारली तेव्हा समोर येणारा सहा फूट उंच, आखूड पण दाट केस, गोर्या चेहर्यावर पुरुषी ठसा उमटवणार्या तरीही आपल्याच नादात शेवटी किंचित वळत गेलेल्या ठसठशीत लांब काळ्याभोर भुवया, शांत स्निग्ध डोळे, नाक तर पट्टीने काढल्यासारखं कठडेवजा. रुंद ताठ खांद्यावर काठोकाठ पोचणार्या लाल काळ्या टी शर्टची आढी, दमदार हातातलं शोभून दिसणारं जाडजूड बेल्टचं स्पोर्टी घड्याळ त्याची जिमखान्यावरची प्रॅक्टिस दाखवत होती. देशपांडे मॅडमशी बोलताना त्याच्या भरदार आवाजापेक्षा त्याचा जबाबदारपणा, विनय अधिक खुलून दिसत होता. 'जन्मेजय' हे फक्त याचंच नाव असू शकतं! असा विचार मनात येत असतानाच एकदम आपल्याकडे वळून तो म्हणाला, "तुला उद्या दिल्या तर चालतील ना नोटस?" स्वतःला सावरत हो म्हणस्तोवर किंचितसं स्मित करुन तो पुढे निघूनही गेला.
आणि सुरु झालं एक नवीन सत्र. जयच्या या वह्या खरोखर जपून ठेवाव्यात अशा. हाच आपल्यातला पहिला आणि कदाचित शेवटचा पूल. फक्त त्यावरुन कधी निरोपांची, भावनांची ये जा झाली नाही एवढंच. नदी आणि पूल.एकमेकांशी संलग्न तरीही अलग. एकाशिवाय दुसर्याला अर्थ नाही. त्या जीवनदायिनीनं विलग केलेले दोन किनारे सांधून देतो तो पूलच. नदीशिवाय पूलाच्या अस्तित्वाचंच कारण नाही. एकमेकांचं स्थान ओळखून असले तरी आपल्याच माजात असतात दोघं. तो उतरवायला हवा एक जोरदार पाऊस. नदीनं उफाळून वर यावं आणि पूलानंही तो माथ्यावरचा जलसंभार तोलत किंचित खाली झुकल्यासारखं भासवावं!सगळ्या ओल्या आसमंतात हे एकच मीलन तग धरुन रहावं. काठच्या झाडांनाही ही ओली गुंगी यावी, काळ्या निळ्या मेघांनाही याची भुरळ पडावी. त्या परमोच्च क्षणाला बेभान होऊन नदीनं सैरावैरा दौडत सुटावं. पुलानं तितकंच कणखर राहून तिला कवेत घेऊन हलके हलके शांत करावं! साक्षीला सोनेरी उन्हानंही यावं अन या मांडवावर सप्तरंगाचं तोरण बांधावं. पण यासाठी हवा निदान एक तरी वळीव!
कॉलेजमध्ये या ना त्या कारणानं जयशी बोलता बोलता मैत्रीची वीण आपोआप पडत गेली. त्याचं सतत गाईड करणं चालू असायचं. ऑगस्ट संपला, आता गणपतीतून बाहेर या सेमिस्टर तोंडावर येईल. हे प्रॅक्टिकल नीट कर, १००% येतं परीक्षेला, हा टॉपिक असेल तर लेक्चर बंक करु नको एक ना दोन. हे सारं तो इतकं पोटतिडकीनं सांगायचा की त्यातला मतितार्थ केव्हाच समजून झाला असला तरी आपल्याशी बोलताना त्याच्या चेहर्यावरची हलणारी रेष न रेष टिपत रहायची. पण सगळ्यांचा ताईत असलेल्या जयशी बोलत असताना आपल्याबद्दल कधीच कुणा मुलीच्या डोळ्यात असूया दिसली नाही की कुणा मैत्रीणीनं गंमतीतसुध्द्दा चिडवलं नाही. कारण हे दोन स्कॉलर बोलून बोलून काय बोलत असणार! म्हणूनच तर ते टॉपर असणं, सतत 'तुमचं काय बै!' ऐकून घेणं कंटाळवाणं झालं होतं. ही अशी 'ब्रिलियंट' मुलं मुली 'नॉर्मल' नसतात का? ज्या तारा हृदयात झंकार उमटवतात त्यांना मी स्पर्शच करु नये का? मातीच्या ओढीनं बेभान होऊन कड्याकपारींवरुन कोसळणार्या पांढर्या फेसाकडे पाहताना ते तुषार मला चिंब करत नाहीत का? पहिल्या पावसानंतरचा आसमंतात भरुन राहिलेला मृद् गंध मलाही हळूवार करतोच की. हे कित्येक वेळा ओरडून सांगावंसं वाटलं पण जिथं काही सांगायची वेळ येते तिथं न बोलणंच उत्तम. जयच्या बाबतीतही हेच झालंय की! त्याच्यापर्यंत जर पोचतच नसेल आपला आवाज तर साद देऊन तरी काय साध्य होईल?
गॅदरिंगच्या वेळेस रात्री १० वाजेपर्यंत प्रॅक्टिस करवून घेऊन, जबाबदारीनं मुलींची घरी जायची व्यवस्था करणारा, त्यांना "आठवणीनं निदान घरी पोचल्यावर मिस कॉल तरी द्या रे" असं गाडीवरुन दिसेनासं होताना हात हलवून सांगणारा जय, नाटकाच्या वेळेस या विंगेतून त्या विंगेत सगळं नीट सेट आहे ना पाहत धावपळ करणारा जय, घाबरलेल्या नवशिक्यांना बकप करणारा जय, आणि नाटक दणदणीत जल्लोषात संपल तरी हिप हिप हुर्रे नंतर जमिनीवर येऊन हॉटेलमधल्या श्रमपरिहाराच्या वेळी काय चुकलं, काय जमलं याचा न कंटाळता पडताळा करणारा जय! त्याच्या वर्गावरुन जाताना सहज जरी आत पाहिलं तरी संपूर्ण लक्ष देऊन नोट्स काढणारा जय आठवला. या क्षणी याला नाटक, बास्केटबॉल काही काही आठवत नसेल का? अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसतो तसं तुझं असतं का रे? असं एकदा त्याला विचारल्याचही आठवतं. तेव्हा नेहमीच्याच सहजतेनं डोक्यावर टप्पल देऊन दिलखुलास हसला होता. जयची प्रत्येक गोष्टच भावत होती की ती जयची होती म्हणून आवडत होती कळेनासं झालं होतं. आता त्याच्याशी बोलतानाही प्रचंड दडपण यायला लागलं. काही नीट सहज बोलताच येईना. नुसती घालमेल. चुकून हे कबूल न केलेलं गुपित बंडखोरी करुन ओठावर आलं म्हणजे? त्याला वाट नाही दिली तर अवखळ पोरासारखं ते निदान डोळ्यात डोकावून जाणारचं! तेवढ्यासाठी वॅलेंटाईन्स डे ला चक्क घरात बसून राहिलो. त्याचाही एक फोन नाही की एसेमेस नाही. जयसाठी सुंदर दिसणं, इतर पोरींसारखं ग्राऊंडवर जाऊन मॅचेसच्या वेळी चिअर अप करणं वगैरे जमण्यातलं नव्हतं. त्याच्या नजरेत चांगलं रहायचं असेल तर बेदम अभ्यास आणि बेफाट मार्क एवढंच गणित सुटण्यासारखं होतं. पूर्वीपेक्षा दुप्पट वेळ, जास्त लक्षपूर्वक अभ्यास सुरु झाला. लोक प्रेमात नापास होतात आपलं मात्र भलतंच काहीतरी नेहमी. पण निदान त्या निमित्तानं जयशी बोलता यायचं, परीक्षेच्या आधी मनापासून ऑल द बेस्ट करताना आपल्या हाताची थरथर जाणवली असेल का त्याला...? त्याचाही अभ्यास जोरात चालू होता. कॉलेजमध्ये शुकशुकाट. मार्च एप्रिलच्या रखरखीत उन्हात तिकडे कुणी फिरकतही नव्हतं. अधूनमधून एखादा फोन, एसेमेस. रात्री जागताना, पहाटे लवकर उठल्यावर कित्येकदा समोर पुस्तक ठेवून जयच्या आठवणीत रमून गेल्याचं आठवतं.
परीक्षा आल्या. इतकी जबरदस्त तयारी झाल्यावर नेहमीसारखेच सोपे पेपर गेले. जयची तर ही कॉलेजची शेवटची परीक्षा. परीक्षेनंतर आठवणीनं सगळ्या सरांना, मॅडमना भेटणं, वाकून नमस्कार करणं, फेसबुक, ओर्कुट, ईमेल्स मोबाईल हे सगळं नंतरही चालूच राहणार असलं तरी आपल्या जिवंत अस्तित्वाच्या पाऊलखुणा आता इथे उमटणार नाहीत ही हुरहुर प्रत्येकालाच होती. नंतर कदाचित उरेल तो अटळपणे कोरडा झालेला टच! 'कीप इन टच' म्हणतानाच जो व्यावहारिक रुक्षपणा चिकटवून येतो तो. सततच्या सोबतीची, एकत्र वेळ व्यतीत करण्याची ओल त्याच्यात कुठून येणार? ही जाणीव आणखीच कातर करुन जात होती. मित्रांसोबत आख्खं कॉलेज फिरुन ते डोळ्यांच्या कॅमेर्यात साठवून घेणं.अँफी थिएटर, लायब्ररी, लॅब , जिमखाना,कँटीनमध्ये चक्कर मारणं. सुट्ट्यांचे प्लॅन्स करणं, भविष्याची स्वप्नं रंगवणं, मित्राच्या आवडत्या बाईकवरुन एक शेवटची राईड मारणं, पप्याच्या टपरीवर जाऊन कटिंग घेणं असं सगळं साग्रसंगीत होऊन शेवटी संध्याकाळी सात वाजता कॉलेजमधून निघताना त्याचे डोळे पाणावलेले होते. निरोप घेताना वाटलं होतं निदान आता तरी...! पण ते डोळ्यातलं भरुन आलेलं मार्दव लपवण्यासाठी तो झटकन निघून गेला. आणि मी क्षणभर तशीच उभी आहे कॉलेजच्या गेटमध्ये. एकटीच. सगळ्यांमध्ये असूनही. जसं आता हे पुढचं सबंध वर्ष असणार आहे.. जयशिवाय.
या क्षणापर्यंत आपण नाही बोलू शकलो. एका अर्थानं बरंच झालं. जयला तसं काहीच वाटत नसेल तर उगाचच एक अवघडलेपण दोघांची मजा बघत ठाण मांडून बसलं असतं मध्ये. पण हे असं आठवणीनं कातर होणंही काही खरं नाही. अशा वह्या, अक्षर पाहून जर जय भेटत असता तर आणखी काय हवं होतं? प्रचंड कासावीशी. उलघाल. आज महिना झाला त्याला सोलापूरच्या घरी जाऊन एक फोन नाही. नुसते काहीतरी सँटाचे पीजे किंवा शायरीचे एसेमेस. पहिली शायरी वाचून तर क्षणभर ठोकाच चुकला होता. जयलाही..?
पण आता पुन्हा वाहावत जायचं नाही ठरवलं होतं. पुढचं वर्षं आ वासून ठाकलंय. एकटीसाठी.
इतक्यात फोन वाजला. जय?? कसं शक्य आहे?
"हाय आदिती!"
"हॅलो! आज आली वाटतं आठवण?"
"...कुठे आहेस?"
"घरीच."
"कॉलेजवर यायला जमेल?"
"आत्ता?"
"हो मी तिथेच आहे.. डिपार्टमेंटला. ये ना. खूप बोलायचंय. इतक्या दिवसांचं..."
"आले १० मिनिटात."
हे भास आहे की स्वप्न उमजत नव्हतं. पण जे होतंय ते खूप गोड आहे हे आतून जाणवत होतं. इतक्या दोन तीन वर्षात जय एकदाच पटकन 'हा ड्रेस छान दिसतो तुला' असं म्हणून गेल्याचा मनावर शिलालेख कोरला गेला होता. तोच आकाशी रंगाचा ड्रेस आणि त्यावर किंचितसं मॅचिंग आवरुन पटकन कॉलेजवर निघाले. रोज इतक्या झटकन संपणारा रस्ता आज फारच लांब वाटत होता. हृदयातली धडधड स्पष्ट जाणवत होती. पावसातही कानशिलं किंचित तापली होती. नुकत्याच पडून गेलेल्या पावसानं वातावरणात एक सुखद गारवा आला होता. कॉलेजमधल्या वाटांच्या दुतर्फा वाढलेली झाडं न्हाऊन निघाल्यानं तजेलदार दिसत होती. निसर्गानं रखरखीत कात टाकली होती. एक नवा अध्याय सुरु होत होता. अन या क्षणांचे साक्षीदार आता तरी आपण आणि जय! एरवी असं अवेळी कॉलेजला कधीच आलं नसल्यानं नेहमीच्याच जागा, कोपरे काही वेगळेच भासत होते. तिची, या क्षणाची केव्हाची वाट पहात असल्यासारखे अवघडून आलेले. खूप काही बोलायचं असतानाही मूक अनुभूतीचं महत्त्व जाणून असल्यासारखे. या आधी का नाही पाहिलं आपण कॉलेज असं कधी? का आजच ते इतकं वेगळं वाटतंय? जयनं तरी काय मुहूर्त शोधलाय..! पण काय सांगायचं असेल त्याला? जे व्यक्त व्हायला सतत उचंबळून येतंय तेच की ... नको. आता आणखी तर्क नकोत. शांत रहा. स्वीकारायची तयारी ... काहीही ऐकावं लागलं तरी. त्याच अवस्थेत कशीबशी डिपार्टमेंटला पोचले. जय तिथे उभा होता. लांबूनच आपल्याला येताना पाहत असावा हाताची घडी घालून उभा राहून.
"आदिती.."
"इथे कसा काय अचानक?"
"तुझी आठवण आली, असं म्हटलो तर चालेल?"
"!!!"
"आदिती, I really missed you in these days. I am sorry Aditi.. मी खूप त्रास दिला ना तुला?"
"No Jay! असं म्हणू नकोस प्लीज.."
"आदिती, असं वेड घेऊन पेडगावला जाण्यासाठी खूप हुशार असावं लागतही असेल, पण त्याहीपेक्षा लागतो तो भयंकर पेशन्स! ही परीक्षा, हे सारे मला फार जीवावर गेले. कारण तुझ्यासारखी हुशार मुलगी माझ्या प्रेमात आहे ही जाणीवच किती सुखद आणि अनावर करणारी आहे याची तुला कल्पनाच नाही येणार! त्या अवतीभवती पिंगा घालणार्या बाहुल्यांमध्ये तुझी हुशारी, सिन्सियर असणं, मॅच्युरिटी मला नेहमीच भावून जायची. I feel honoured! चूक की बरोबर- ते मला सांगता यायचं नाही, पण मला तुझा परीक्षेचा महत्वाचा वेळ वाया घालवायचा नव्हता. त्याआधीही तुला का सांगू शकलो नाही, हेही नाही सांगता यायचं. पण मला हे आणखी नाही लपवता येणार.. I love you Aditi.. I really love you!"
"जय...!! एकदा तरी का नाही ...? तू खूप दुष्ट आहेस."
"अंहं! हुशार!!"
....पुन्हा एकवार जोरदार वळीवाची सर आली चिंब करत... माती आनंदून हसली.
छान लिहिलीये. पण शेवट थोडा
छान लिहिलीये. पण शेवट थोडा उरकल्यासारखा वाटला.
अरुंधतीला अनुमोदन .. मला कथा
अरुंधतीला अनुमोदन .. मला कथा आवडली !
छान, आवडली.
छान, आवडली.
शब्दबंबाळ असली तरीही वाचायला
शब्दबंबाळ असली तरीही वाचायला आवडली .. पण सारखं too good to be true असं च वाटत राहीलं ..
कसली गोडू आहे कथा!! सरळ साधी
कसली गोडू आहे कथा!!
सरळ साधी सिंपल व क्युट कथा वाचायला जाम मजा आली!!
आणि कथा साधी वाटली तरी आदितीची ती तळमळ शब्दांतून पोचवणं हे अवघड काम,मस्त पार पाडलेस!!
भारी ! :खरं: जय थोडा जास्तच
भारी !
:खरं: जय थोडा जास्तच केपेबल दाखवलाय असं वाटलं... अभ्यास, स्पोर्ट्स, वै, वै.. :खरं:
- माझ्या ओळखीचं आहे असं एक जोडपं. फुल्ल स्कॉल. परीक्षा झाल्यावर प्रेमाचा तास सुरु झाला..
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
जुन्या आठवणी ताजा झाल्या
जुन्या आठवणी ताजा झाल्या .......मस्तच लिहिलय ग......
मला फार
मला फार आवडली................
पण अस खरंच होत.............मला अनुभव आहे............
गोड आहे प्रेमकथा. शैली भारी
गोड आहे प्रेमकथा.
शैली भारी आहे तुझी खरंच. दोन स्कॉलरांची प्रेमकथा असल्याने मनोव्यापार दाखवायला हवे होते तशा भाषेत दाखवले आहेत- असं मला वाटलं. त्यामुळे शब्दबंबाळ वगैरे नाही वाटले.
शेवट थोडा अचानक आल्यागत वाटलं खरं, पण वळीव असाच येतो ना!
गोड शेवट.....छान
गोड शेवट.....छान मांडणी..
सावरी
कथा आवडली.
कथा आवडली.
गोष्ट आवडली.
गोष्ट आवडली.
छान लिहीलं आहेस. पण शेवट जरा
छान लिहीलं आहेस. पण शेवट जरा घाईघाईतच केल्यासारखा वाटला. शब्दबंबाळ नाही वाटली.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
धन्यवाद सर्वांना! सरळ साधी
धन्यवाद सर्वांना!
सरळ साधी सिंपल कथाच लिहायचा छोटासा प्रयत्न केला होता.विषयही फार सरळसोट होता, तरीही स्कॉलर्सची प्रेमकथा हे मला थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं म्हणून लिहायला घेतली. १००% जमणार नाही याची कल्पना होतीच. शब्दबंबाळ झाली किंवा नाही मलाही नाही येणार सांगता परंतु शेवटाला पूर्ण न्याय देऊ शकले नाही हे मान्य. त्याबद्दल क्षमस्व.
काय आवडलं, काय नाही, हे प्रामाणिकपणे सांगितल्याबद्दल पुन्हा एकदा आभार सर्वांचे.
फारच छान आहे... मोजकी अनि
फारच छान आहे... मोजकी अनि सुन्दर!!!
पु. ले. शु.
-आनन्दा
छान......
छान......
माझे सीओईपी चे दिवस
माझे सीओईपी चे दिवस आठवले.
शेवट थोडासा उरकल्यासारखा वाटला खरा पण सुखांत झाल्यामुळे बरे वाटले.
ओवरॉल... छान कथा आहे. पुलेशु.
कसलं भारी नावे जन्मेजय लै
कसलं भारी नावे जन्मेजय
लै भारीअफाटमहान लिहिलस. आवडलं 
स्वीट
स्वीट
खुप खुप गोड , सुंदर....
खुप खुप गोड , सुंदर....
आवडल
वाचताना डोळ्यांसमोर चित्र उभ रहात होत...
त्याचा फोन आल्यावर ती ज्या आतुरतेने, उत्साहाने जात असते त्यामानाने शेवट लगेचच आटोपात घेतलात...
पण शेवट अगदी मस्तच गोड केला...
कथा खुप आवडली!
कथा खुप आवडली!
सहीच!
सहीच!
आवडली
आवडली
छान आहे !!!!!
छान आहे !!!!!
आशूडी, किती गोड लिहिलं आहेस.
आशूडी, किती गोड लिहिलं आहेस. खूप आवडली कथा
तू म्हटलीस तसं सरळसोट विषयावरची कथा आहे हे कथेवरुन पहिली नजर फिरवल्यावरच लक्षात आलं पण तरीही वाचतच राहावं असं वाटलं ह्यातच तुझ्या शैलीचं यश आहे. अपेक्षित शेवट वळवाच्या पावसासारखा पटकन आला ते आवडलं. जास्त ताणली असती तर कदाचित कंटाळवाणी झाली असती.
सुंदर रंगलिये कथा आवडली.
सुंदर रंगलिये कथा
आवडली.
आशूडी, वहीच्या वर्णनाचा
आशूडी, वहीच्या वर्णनाचा परिच्छेद मस्त जमलाय. बाकी कथा मात्र - फारशी आवडली नाही म्हणण्यापेक्षा अशा सेटअप मधेसुद्धा काहीतरी वेगळे वाचायला मिळेल या अपेक्षेने वाचल्याने असेल पण साचेबंद वाटली.
पठ्ठ्याचा कॉन्फिडन्स भयंकर
पठ्ठ्याचा कॉन्फिडन्स भयंकर आहे !

आणि हो ... "साखर्या (बरोबर शब्द) जरा जास्त झाला !!"
Pages