'१ मे' :असून अडचण नसून खोळंबा!

Submitted by nikhilmkhaire on 30 April, 2008 - 04:14

नमस्कार,

उद्या '१ मे'.

सार्वजनिक, खाजगी, वैयक्तिक अशी सर्व प्रकारची सुट्टी.
प्लॅनिंग करुन झालं का सुट्टीचं?
कसं होणार, या वेळेस १ मे नेमका गुरुवारी आला आहे. शनिवारी किंवा सोमवारी आला असता तर किती बरं झालं असतं ना! जोडून सुट्टी मिळाली असती आणि मस्त प्लॅनिंग करता आलं असतं सुट्टीचं! पण नाही ना, लोक आनंदी झाल्याचं सरकारला कसं आवडेल! खरं तर संपच करायला हवा '१ मे'ची सुट्टी 'मे'च्या पहिल्या आठवड्यात रविवारला जोडून द्यावी' म्हणून. आणि संपही शनिवारी करायचा म्हणजे मग आणखी एक जोडून सुट्टी, मस्त प्लॅनिंग करता येईल सुट्टीचं! मग आणखी मजा.

पण काही लोक विचित्र असतात. माझा एक मित्र आहे, वेळगावचा. (हो, ते 'तिकडे' आहे तेच!) हा दरवर्षी '१मे'ला वेळवागावात सकाळी सकाळी मराठी गाणी वाजवतो. मागच्या वर्षी '१ मे'च्या दिवशी काही लोकांनी त्याला बेदम मारला! (बरोबरच आहे, '१ मे' असेल महाराष्ट्राचा, म्हणून काय यानं 'तिकडे' मराठी गाणी वाजवायची, ती ही सकाळी सकाळी आणि मोठ्याने! महाराष्ट्रात तरी ऐकतं का कोणी मराठी गाणी!) त्यावर कडी म्हणजे हे सगळे उद्योग तो '१ मे'ला कॅज्यूअल लिव्ह टाकून करतो. कारण 'तिकडे' '१ मे'ची सुट्टी नसते.

(मी वर संपाचं म्हणालो ना, त्यात या राज्यालाही सामिल करता येईल. म्हणजे मग त्यांनाही '१ मे'ची सुट्टी मिळेल, मग हळुहळू सार्‍या देशात हे लोण पसरेल, देशव्यापी संप होईल, मग सार्‍या देशाला '१ मे'ची सुट्टी, मजा येईल ना!

पण सकाळी सकाळी मराठी गाणी वाजवायची आणि ती ही 'तिकडे'! हे नाही म्हंटलं तरी चुकलंच त्याचं, मी आधीच सांगीतलं होतं त्याला 'बाबा रे, डोण्ट डू सच ब्यॅकवर्ड थिंग्ज'
पण पटेल तर शप्पथ.
पडले फटके, डोकं फूटलं, कोमात गेला, जन्मभरासाठी अपंग झाला. काही गरज होती का असले उद्योग करायची? तरीही यावर्षीही काहीतरी करायचं म्हणत होता.
कॅज्यूअल लिव्ह अशा वाया घालवून काय मिळणार आहे त्याला, काय माहित!

ते जाऊ दे, महत्वाचं म्हणजे या वर्षी गुरुवारी आलेला '१ मे', गुरुवारी आला त्यामुळे आधीच गुरुवारी सुट्टी असते अशा लोकांची सुट्टी वाया गेली आणि आपल्याला जोडून मिळाली नाही त्यामुळे काही उपयोग नाही.

थोडक्यात काय तर '१ मे'चा 'असून अडचण आणि नसून खोळंबा' झाला आहे.
नाही का?

(वरीलपैकी बहूतांश भाग हा काल्पनिक सत्य असून उरलेला '१ मे', जो 'महाराष्ट्र दिन' म्हणून ओळखला न जाता '१ मे'ची सुट्टी म्हणून ओळखला जातो, तो 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा'विषयी आपली अनास्था व कृतघ्नता दाखविणारं पूर्ण सत्य आहे)
धन्यवाद!

nikhil_0_0.jpg

गुलमोहर: 

जय महाराष्ट्र.

बरोबर्.जय महाराष्ट्र!!!!!

!!!