वहिनी

समारंभाला जायची वेळ होत आलीय. नेसलेली जरीची साडी, दागिने अन पदराशी खेळणारी मुलं या सार्‍यासकट मी आरशात एक ओझरता दृष्टीक्षेप टाकते. जिन्यातून नवर्‍याची घाई सुरू असते. पायात कशाबशा चपला अडकवणार तोच आतल्या खोलीतल्या पलंगावरून हाक येते..
'फ्रीजमधे मोगर्‍याचा गजरा आहे ग.. विसरू नकोस. अन मुलांबरोबर तूही खाल्लंस की नाही? तिथे किती वाजतील जेवायला कोणास ठाऊक..'
मी जिना उतरेपर्यंत हे सुरूच असतं, 'बांगड्या घातल्यास न काल आणलेल्या? वाकू नकोस तिथे फार..पाठीचा त्रास होतो ना मग?'
ह्या कोण ते कोणी अंदाज करायच्या आधीच सांगते... माझी आई, सासू, आजी यापैकी कोणीच नाही. ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई...

गेली नऊ वर्ष संधीवातानं अंथरुणाला खिळलेल्या...

लहानपणापासून ते समज येईपर्यंत जाऊ या नात्याबद्दल आजूबाजूच्या लोकांकडून, कथा कादंबर्‍यांमधून फारसं गोड काही ऐकलेलं नसतंच.. उलट सासूसारखाच हा एक शत्रुपक्ष अशीच समजूत बहुतेकींची असते.
शाब्दिक चिमटे काढणे, सतत बरोबरी करणे, दुसरीचं माहेर कसं तुच्छ आहे नि आपलं कसं छान आहे याचा गर्व बाळगणे हे अनेक गुण असलेल्या कित्येक 'जेठानींबद्दल ' मैत्रिणींकडूनही ऐकलेलं असतंच. फार काय चित्रपटांमधली जाऊ देखिल 'हुक्म चलाऊंगी मै, आंख दिखाऊंगी मै' अशीच सर्वसाधारणपणे रंगवलेली असते. या सार्‍याच्या अगदी विरुद्ध चित्र मला लग्न झाल्यावर बघायला मिळालं..
माझे सासूसासरे माझ्या नवर्‍याच्या लहानपणीच निवर्तले होते. तेव्हा 'बघण्याच्या' कार्यक्रमाला नवर्‍याबरोबर भाऊजी नि वहिनी आले होते.

अगदी सडपातळ बांधा, गहूवर्ण ,डोळ्याला जुन्या चित्रपटातल्या नायिकेसारखा चष्मा नि एकदम हसतमुख चेहरा या त्यांच्या दर्शनानं मनातल्या 'इमेज' ला नाही म्हटलं तरी जरा धक्काच बसला. नंतर रीतसर 'होकार' वगैरे आला. नवरा तेव्हा मुंबईला नोकरी करत असल्याने 'गावातलं सासर' म्हणून जाऊबाईंच्या घरी बरंच जाणंयेणं होई. सणा समारंभांना, वाढदिवसांना त्या आवर्जून बोलावीत. तेव्हा त्यांच्या चटपटीत काम करण्याचं, माणसं जोडण्याच्या हातोटीचं, सुगरणपणाचं कौतुक जरी वाटलं, तरी एक प्रकारचा ताण मनावर आल्याशिवाय रहात नसे. हे सगळं आपल्याला कसं जमेल हे नक्कीच मनात यायचं.
सगळ्यात मला आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे सर्वांच्या अगदी लहानसहान आवडीनिवडी त्यांच्या नेमक्या लक्षात रहात.

माझ्या जाऊबाई तशा वेशभूषेच्या बाबतीत अजिबात मॉडर्न नाहीत. टिपिकल साडी नि ब्लाऊज या पठडीतल्या. घरी नणंदा पण साडीतच. मला तर नेहमी सलवार कमीजची सवय.

असंच लग्न ठरल्यावर एक दिवस त्यांचा फोन आला. 'ये आज घरी गप्पा मारायला..'
मी गेले. खाणंपिणं, आईस्क्रीम सारं झालं नि मी निघाले. तोच त्यांनी जिन्यातून मला हाक मारून बोलावलं. नजर माझ्या ड्रेसकडे होती.
'आता बहुतेक 'आपल्या घरी हे चालत नाही 'वगैरे ऐकावं लागणार' अशी माझी समजूत झाली. (नागपूरकडे अशी घरं आहेत बरं अजून)
तोच त्या हलकेच म्हणाल्या, 'अग, तुझा ड्रेस खूप सुरेख दिसतोय. अन हो, काळे हॉल मधे प्रदर्शन भरलंय सलवार कमीजचं.. जरूर जाऊन ये...'

नवीन, आधुनिक गोष्ट मोकळ्या मनाने पटकन स्वीकारायची ही त्यांची सवय इतकी वर्षं अजून तश्शीच कायम आहे.

लग्नानंतर काही दिवसातच मी त्यांच्या लाघवी नि गोड स्वभावाच्या प्रेमातच पडले. मोठी जाऊ होण्याऐवजी त्या माझी मोठी बहीणच झाल्या. कुठलीही गोष्ट मोकळ्या मनाने त्यांच्याजवळ सांगावी, त्यांनीही मायेनं सल्ला द्यावा.. पण तसंच करावं हा आग्रह त्या कधीच धरत नसत. कधीही खोचून बोलणं नाही, स्वभावात कुठेच वाकडेपणा नाही. माझ्या आईलाही त्या आईच म्हणतात.

त्या नेहमी म्हणायच्या, 'अग, नवीन मुलगी सासरी येते, तेव्हा तिच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. तसं वागायचा आपणही प्रयत्न करावा. नुसत्याच तिच्याकडून अपेक्षा ठेवून कसं चालेल बरं?'

आम्ही दोघं अमेरिकेला गेलो नि एक वर्षातच त्या आजारी पडल्या. एक दिवस सकाळी उठल्या ते अंथरुणातून उठताच येत नाहीय हे लक्षात आलं. तपासण्या, डॉक्टर्स सारं झालं नि rhematoid arthritis चं निदान झालं.

त्या गंभीर नि वेदनादायक आजारानं फक्त त्यांचं शरीरच पराजित केलं. त्यांच्या हसर्‍या, आशावादी स्वभावाला धक्काही लावायची त्याची हिंमत झाली नाही. खळखळून हसणं, मोकळ्या गप्पा मारणं, सारं पूर्वीसारखंच चालू राहिलं.
आता घराची जबाबदारी भाऊजी, मुलं यांच्याकडे आली. त्यांनीही ती इतकी समर्थपणे पेलली की घरात जावं तर या घरावर बाईचा हात फिरत नाही हे कुणा बाहेरच्याला कळतही नाही. अजूनही मी सासरी गेले की त्यांची गडबड सुरु होते.

'अहो, आज करवंदं आणा बरं.. तिला खूप आवडतात.. '
'आज पुरण घालायचं लक्षात आहे ना हो? त्याला(माझ्या नवर्‍याला) खूप आवडते पुरणपोळी..'

पलंगावर बसल्या बसल्या त्या जमेल तशी मदत करतच असतात. भाज्या निवडणे, हार करणे, कपड्यांच्या घड्या करणे.. हे सारं सुरूच असतं. चेहर्‍यावर दुख: येतं ते फक्त वेदना असह्य झाल्या की.. एरवी कमालीचा हसरा चेहरा..

लहान वयात आलेलं इतकं गंभीर अन असहाय करून टाकणारं दुखणंही त्यांनी इतकं सहजतेनं स्वीकारलंय की पाहणारा थक्क होऊन जावा. चाकाच्या खुर्चीत बसून त्यांना आंघोळीला जावं लागतं. माझी मुलं अगदी लहान असल्याने त्यांना काही वेगळं वाटू नये म्हणून ते दोघं बघत असले की ' चला, चला, काकूची गाडी निघाली..' असं खेळकरपणे म्हणतात. काठीला धरून चालायचा प्रयत्न करताना 'अग, मी लहानपणी हळूहळू पावलं नसतील टाकली.. ती आता टाकून बघतेय..' असं म्हणत स्मितहास्य करतात. अशा एक ना अनेक गोष्टी.. सांगितल्या तर जागा पुरणार नाही. त्यांच्या नि भाऊजींच्या पहाडाएवढ्या धैर्याची नेहमीच आम्हा दोघांना कमाल वाटते.

साधा ऑफिसला उशीर झाला, एखादं एक्झिट चुकलं, प्रोजेक्ट लांबणीवर पडला या कारणानं वैतागणारे लोक आपण. अशा त्रासदायक परिस्थितीतूनही मनातलं चांदणं सतत बहरलेलं ठेवणार्‍या लोकांच्या आशावादाला, हिंमतीला खरंच दाद द्यावीशी वाटते.

त्यांना हा आजार व्हायच्या आधी कितीतरी क्षण आम्ही दोघींनी आनंदाने बरोबर घालवले आहेत. सणा समारंभांना बरोबर जाणे, साडी खरेदी, रात्री सगळे झोपले की तीन तीन वाजेपर्यंत रंगणार्‍या गप्पा.. सगळ्याच्या आठवणी मनात अजूनही ताज्या आहेत..

मी वाट बघतेय त्या दिवसाची.. जेव्हा आम्ही सगळे दारात उभे असू नि आधीसारख्या त्या तबक घेऊन लगबगीनं ओवाळायला येतील.

त्या चालायला लागल्या की त्यांना घेऊन देवीच्या देवळात जायचं नि ओटी भरायची हे नक्की मनात ठरवलंय मी...

बघू या.. त्या देवीला या चालत्याबोलत्या देवीची दया कधी येतेय ती....

-समाप्त.


मला अजून नवीन मायबोलीतल्या बर्‍याच गोष्टी समजत नाहीयेत.
हे लेखन आधी अर्धवटच लिहिलेलं पोस्ट झालं होतं का?



सुमॉ, तुमच्या जाऊबाईंना लवकर बरं वाटू दे. छान वाटलं वाचून. तुमचंपण कौतुक वाटलं. किती कुणी चांगलं असलं तरी शिणुमे पाहून आलेली इमेज सहजासहजी जात नाही मनातून. स्मित
मी तरी समाप्तीचा बोर्ड लावल्यावर पाहिल्ये.



देव करो आणि त्या देवीला या चालत्याबोलत्या देवीची दया लवकर येवो.
तुमच्या-आमच्या शुभेच्छा लवकरच फळाला येतील सुमॉ, काळजी करु नका.



नक्की जाल देवळात चालत, लवकरच स्मित
मनापासून शुभेच्छा!



सुमा,
तुमच्या जाउबाईना लवकरच चालता येवो हिच ईश्वराचरणी प्रार्थना!!!
चान्गल्या लोकान्चि देव परीक्षा घेतो, पण त्यात Distinction ने पासही करतो. तेव्हा काळजी नका करु.



सुमॉ, सुंदर व्यक्तीचित्रण. (खूप दिवसांनी उगवलीयेस)
तुझ्या जाऊबाईंना लवकर बरं वाटू दे, बाई.
हा लेख मी तरी आत्ताच पाहिला (शेवटच्या समाप्त सकट). तेव्हा तू विचारतेयस तसा, अर्धवट अवस्थेत प्रकाशित झाला नव्हता. लेख अपूर्ण अवस्थेत असताना फक्तं लेखकालाच दिसतो (आणि ऍडमिन्स ना दिसत असावा, त्यांना तिसरा डोळा असातो स्मित).



अगदी निर्मळ निर्व्याज लिहिल आहेस. अशी व्यक्तीमत्व फार विरळा असतात.
नशीबवान आहेस. लवकर बर्‍या होतील त्या. दोघी जाऊन देवीची ओटी भरून याल.



सुमॉ, तू तुझ्या गोष्टींमधून नाती अगदी सुरेख उलगडतेस.. हे तर खरंखुरं नातं... अगदी सुरेख लिहिलंयस. तुझ्या जाऊबाईंना लवकर बरं वाटू दे.....



सुमॉ , खुप छान लिहिलय तुम्ही ..



अगदी लवकर बरं वाटू देत तुमच्या जाऊबाईंना...



तुमच्या जाऊबाईंना लवकरच बरं वाटेल व त्या चालायलाही लागतील.



या आजारातून नक्कीच बर्‍या होतील वहिनी. मनाने उभारी धरली कि अर्धा आजार दूर होतो, त्या तर तश्या आहेतच.



सुमॉ, पाणी काढलंत डोळ्यांतुन. त्या देवीला नाकी दया येइल आणि सगळं परत छान होइल.



सुमॉ, सुंदरपणे सा.न्गितल आहे-- तुमच्या भावना सरळ आहेत, दयेची, जराही झलक त्या वाचणार्याच्या मनात निर्माण करत नाहीत. तुम्हाला शुभेछा. तुमची ईच्छा लवकर पुर्ण होवो.
अनघा