रिचर्ड फाइनमन

Submitted by चिमण on 23 August, 2010 - 13:46

"मी घरी जातोय!" आपल्या ऑफिसमधून बाहेर डोकावून फाइनमनने आपल्या सेक्रेटरीला, हेलन टक ला, सांगीतलं. पण घरी जाण्यासाठी ऑफिसातून बाहेर पडायच्या ऐवजी शर्ट काढत काढत स्वारी परत ऑफिसात गेली. हेलन चक्रावली. थोड्या वेळाने दबकत दबकत तिनं त्याच्या ऑफिसात डोकावलं तर स्वारी शांतपणे कोचावर पहुडली होती. गेले काही दिवस त्याचं हे असं वेड्यासारखं चाललं होतं.. कधी तो लेक्चरला जायचं विसरायचा, तर कधी त्याला आपली पार्किंगमधे ठेवलेली गाडी सापडायची नाही!

हे सगळं तो एकदा घरा शेजारच्या फुटपाथला अडखळून डोक्यावर पडल्यामुळे आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालं होतं. डोक्याच्या आत थोडा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आजुबाजुची किंवा स्थलकालाची जाणीव राहिली नव्हती आणि आपण काय करतोय हेही त्याला उमगत नव्हतं. शेवटी त्याला डॉक्टरकडे नेल्यावर हे सगळं बाहेर आलं आणि त्याच्यासकट इतरांनाही समजलं.

"मला का नाही कुणी सांगीतलं?".. फाइनमनने त्याच्या एका जवळच्या मित्राकडे त्याबद्दल विचारणा केली. मित्र म्हणाला - "ओ कमॉन! तुला कोण सांगणार? तू बर्‍याच वेळेला असं वेड्यासारखं करतोस! तसं बघायला गेलं तर अफाट बुध्दिमत्ता आणि वेड यातला फरक जरा सूक्ष्मच असतो."

"हे बघ! पुढच्या वेळेला मी असलं काही करायला लागलो तर ताबडतोब मला सांगायचं".. फाइनमनने त्याला खडसावून प्रकरण तिथे संपवलं.

बाकी अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञांबद्दल आपला असा समज असतो की ते आपल्याच तंद्रीत असतात.. त्यांना आजुबाजूला काय चाललंय याची जाणीव नसते.. ते स्वतःशीच बोलतात.. अत्यंत विसराळू असतात.. काहीही कपडे घालतात.. इ. इ. मात्र, वरचा किस्सा वगळता, फाइनमन यातल्या बर्‍याच गोष्टींना अपवाद होता.

फाइनमनला १९६५ सालचा पदार्थविज्ञान शास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. त्यावेळचा पुरस्कार टोमोनागा, श्विंगर आणि फाइनमन या ३ शास्त्रज्ञांमधे विभागला होता. तिघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉन, प्रोटॉन असे विद्युत भारित कण आणि फोटॉन हे एकमेकांच्या संपर्कात आल्यावर काय काय होऊ शकेल ही एकच मूलभूत समस्या (क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स) सोडविण्याचं शास्त्र निर्माण केलं होतं. अशा समस्या अनेक ठिकाणी निर्माण होतात. उदा. एखाद्या वायूवर एक्स-रेज पडले तर काय काय होईल? अशी एखादी विशिष्ट समस्या तिघांच्या पद्धतीने हाताळली तरीही एकच उत्तर येतं म्हणून तर तो पुरस्कार तिघांना विभागून मिळाला. यात अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची अनेक इंटिग्रल्स येतात. पण फाइनमनचे वैशिष्ट्य असं की त्याने, प्रत्येक इंटिग्रल प्रत्यक्षात कणांची काय घडामोड दाखवतेय हे आकृतीने कसे दर्शविता येईल हे सुचवले. किचकट इंटिग्रल्सपेक्षा त्या आकृत्या काढणं, त्यावर चर्चा करणं आणि नंतर त्यावरून गरज पडेल तेव्हा प्रत्यक्ष इंटिग्रल लिहीणं हे फार सोप्प झालं.. त्यामुळेच त्या आकृत्यांना सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. त्या आकृत्या फाइनमन डायग्रॅम्स म्हणून प्रसिद्ध आहेत.. इतक्या की नंतर जेव्हा फाइनमनच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट काढलं तेव्हा पोस्टाला सुद्धा ते त्या आकृत्यां शिवाय अपूर्ण वाटलं.

ज्यांना फाइनमन ऐकूनही माहीत नाही ते म्हणतील फाइनमनमधे विशेष असं काय आहे? इतर अनेक नोबेल विजेत्यांसारखा हा अजून एक! हे खरं असलं तरी त्याचं कर्तृत्व इथेच संपत नाही. तो प्रथम एक प्रामाणिक, निर्भीड, हसतमुख, आनंदी, कलंदर, मिष्कील, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा, दुसर्‍यांना मदत करणारा, चतुरस्त्र, गप्पिष्ट आणि चौकस असा एक दुर्मिळ माणूस होता.. आणि या सगळ्या नंतर एक नोबेल विजेता होता. त्याच कारणामुळे त्याच्यावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं, अजूनही करतात.. त्याला वाहिलेली साईट पाहिली तर ते लगेच पटेल (साईटचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे(४)).

त्याच्या अनौपचारिक गप्पांच्या ध्वनीफितीवरून 'शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फाइनमन' आणि 'व्हॉट डू यू केअर व्हॉट अदर पीपल थिंक?' ही पुस्तकं लिहीली गेली. त्यातलं 'शुअर्ली..' हे पुस्तक खूप गाजलं आणि आत्तापर्यंत त्याच्या ५ लाखांवर प्रती खपल्या आहेत. त्या पुस्तकाच्या पीडीएफचा दुवा लेखाच्या शेवटी दिला आहे(३). दुर्देवाने या पीडीएफ मधे काही टायपो आहेत.. बर्‍याच ठिकाणी 'b' ऐवजी 'h' पडलं आहे त्याचा वाचताना फार त्रास होतो. पण एक साधासुधा मध्यमवर्गीय माणूस आपल्याशी हास्यविनोद करत गप्पा मारतोय असं वाटावं इतकी सहज आणि अनौपचारिक शैली या पुस्तकाची आहे. काही प्रकरणांमधे थोडी फार पदार्थविज्ञानासंबंधी चर्चा येते, ती काही जणांना समजणार नाही कदाचित! पण तो भाग सोडून पुढे वाचत राहीलं तरी मजा कमी होत नाही.

फाइनमनचा जन्म १९१८ मधे झाला. १९३५ ते १९३९ एम आय टी मधे शिकल्यावर तो प्रिन्स्टन मधे १९४३ पर्यंत पुढील शिक्षणासाठी प्रो. व्हीलर बरोबर काम करत होता. एक दिवस व्हीलरने फाइनमनला त्या कामाबद्दल सेमिनार घ्यायला सांगीतलं. ते त्याचं पहिलं वहिलं सेमिनार! जाहीर झाल्यावर खुद्द आइन्स्टाईनने ते ऐकायला येणार असल्याचं कळवलं. ते ऐकल्यावर मात्र त्याचं जे धाबं दणाणायला सुरूवात झाली ते सेमिनार संपेपर्यंत कसं दणाणत राहीलं त्याचं एक मस्त वर्णन 'शुअर्ली..' मधे आहे. त्यानंतर १९४६ पर्यंत तो अ‍ॅटमबाँब बनविण्याच्या कामात गुंतला. बाँब बनविल्यानंतर तो कॉर्नेल मधे प्रोफेसर म्हणून रुजू झाला. मग १९५१ पासून तो कॅल्टेकमधे त्याच्या मृत्युपर्यंत, १९८८ पर्यंत, राहीला! २८ जानेवारी १९८६ ला चॅलेंजर हे अवकाश यान उड्डाणाच्या वेळेस जळून भस्मसात झाले.. आतल्या सर्व अंतराळवीरांसकट! प्रेसिडेंटने नेमलेल्या या अपघाताच्या चौकशी समितीत फाइनमन होता. सत्यपरिस्थिती समजण्यासाठी तो सरळ ज्यांचा यान बांधण्यात प्रत्यक्ष हात होता त्यांच्याकडे गेला.. तसे न करण्याबद्दल दिलेले नासाचे सर्व संकेत धुडकावून! शेवटी तो नासाने यानाच्या सुरक्षिततेमधे केलेली तडजोड कशी अपघातास कारणीभूत झाली ते सिद्ध करण्यात यशस्वी झाला.

त्यानं अनेक पुस्तकं लिहीली आणि त्याच्यावरही अनेक पुस्तकं लिहीली गेली. कितीही किचकट विषय अगदी सोप्पा करून शिकविण्यात त्याचा हातखंडा होता. १९६० च्या सुमारास, कॅल्टेक मधे, पदार्थविज्ञानाचा अभ्यासक्रम बदलायला हवा असा एक विचार प्रवाह सुरू झाला.. पदवी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम मागासलेला आहे.. त्यात नवीन संशोधनाबद्दल काहीच माहिती नाही.. असं सर्वसामान्य मत होतं. नवीन अभ्यासक्रम तयार करणे आणि त्याप्रमाणे शिकविणे ही जबाबदारी फाइनमन वर सोपविण्यात आली. त्याच्या मदतीला दिलेल्या कॅल्टेकच्या शिक्षकांनी त्याची सर्व लेक्चर्स रेकॉर्ड करून नंतर 'फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स' या नावाचे ३ ग्रंथ छापले. ते प्रचंड गाजले. अजूनही ते छापले जातात. आत्तापर्यंत त्या ग्रंथांच्या फक्त इंग्रजीतल्या १० लाखांवर प्रती खपल्या आहेत. त्यांची इतर भाषातही भाषांतरे झाली आहेत.

प्रथम अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा हवी आहे असं वाटणं आणि नंतर फाइनमन सारख्या एका ख्यातनाम शास्त्रज्ञाकडून नुसता अभ्यासक्रमच नाही तर लेक्चर्ससुद्धा घेण्याची कल्पना येणं हे फक्त शिक्षणाबद्दल प्रचंड तळमळ असणार्‍यांनाच सुचू शकतं. हे सगळं वाचल्यावर, निदान मला तरी, त्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो आणि मग प्रश्न पडतो की.. भारतातली विद्यापीठं कधी जागी होणार?

त्याला शिकविण्यात विलक्षण रस होता. ब्राझिलमधेही त्यानं एक वर्ष शिकवलं. तिथे शिकविताना त्याला जाणवलं की त्या पोरांकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे.. ते त्यांना व्यवहारातले प्रश्न सोडवायला वापरता येत नाहीये.. अगदी भारतातल्या शिक्षणासारखंच! पोरं वर्गात प्रश्न विचारत नसत.. इतर पोरं नाव ठेवतील म्हणून. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत फाइनमनने अभ्यासक्रम पूर्ण केला. वर्षाच्या शेवटी पोरांनी फाइनमनला त्याला तिथे आलेल्या अनुभवाबद्दल भाषण देण्याची विनंती केली. त्या भाषणाला ब्राझिलच्या सरकारातले शिक्षण तज्ज्ञ आणि कॉलेज मधले शिक्षक पण हजर होते.. अगदी टेक्स्टबुकं लिहीणारे देखील. त्या भाषणात त्यानं ब्राझिलमधल्या अभ्यासक्रमात शास्त्र विषयाचा कसा अभाव आहे हे सोदाहरण स्पष्ट केलं.

त्याच्यापेक्षा सुमारे ९ वर्षांनी लहान असलेली त्याची बहीण जोअ‍ॅन ही पुढे नासाच्या जेट प्रपल्शन लॅबमधे शास्त्रज्ञ झाली. तिच्या आठवणीतली एक गोष्ट फार मजेशीर आहे.. 'रिचर्ड माझा पहिला शिक्षक होता आणि मी त्याची पहिली विद्यार्थिनी! आमच्या घरी एक कुत्रा होता. त्याला आम्ही काही गमती जमती करायला शिकवीत असू. त्याचं शिकणं बघून रिचर्डला वाटलं की मीही काही तरी शिकवायच्या लायकीची आहे. तेव्हा मी तीन एक वर्षांची असेन. तो मला अगदी सोप्प्या बेरजा वजाबाक्या करायला शिकवायचा.. आणि बरोबर उत्तर आलं की बक्षीस म्हणून मला त्याचे केस ओढू द्यायचा.'

लॉस अ‍ॅलामॉस मधे ज्या ठिकाणी बाँब बनविण्याचं काम चालू होतं त्याच्या आजुबाजूला काहीच नव्हतं.. ते मनुष्य वस्तीपासून शक्य तितकं लांब होतं.. ते लोकांपासून गुप्त तर ठेवलं होतंच शिवाय तिथली सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडक होती. तिथे करमणुकीची साधनं फारशी नव्हती. त्या काळात फाइनमनच्या हातात एक बोंगो पडला आणि मग तो बडविण्यात त्याला अपार आनंद मिळायला लागला. हळूहळू त्याला त्याची चटक लागली आणि पुढे लॉस अ‍ॅलामॉस सुटल्यावर देखील त्याचा तो छंद चालू राहीला. ब्राझिल मधे त्यानं त्यांच वाद्य(टँबोरिन) शिकण्यासाठी अपार मेहनतही केली. त्या नंतर, आपल्याकडे कशा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी असतात तशा प्रकारच्या, ब्राझिल मधल्या जत्रेमधे त्यानं ते वाजवलं.

वेगवेगळ्या प्रकारची कुलुपं उघडण्याची कलाही त्यानं लॉस अ‍ॅलामॉस मधे असतानाच आत्मसात केली. त्याचा उपयोग मुख्यत्वेकरून लोकांची मदत करण्यासाठी तो करायचा. पण एखाद्या कडक इस्त्रीतल्या जनरलला, तिथल्या सुरक्षेला काही अर्थ कसा नाहीये ते पटविण्यासाठी, त्याच्यासमोर त्याचीच तिजोरी उघडून त्याची झोप उडविण्यासाठीही करायचा.

त्याची चौकस बुद्धी त्याला कधी स्वस्थ बसू द्यायची नाही. प्रिन्स्टनला असताना त्याला मुंग्याबद्दल कुतुहल निर्माण झालं.. त्यांचं अन्न त्या कशा शोधतात? त्यांना अन्नासाठी कुठे जायला पाहीजे हे कसं समजतं? इ. इ. त्यासाठी मग त्याचे त्याच्या खोलीत येणार्‍या मुंग्यांवर प्रयोग सुरू झाले. त्यातून त्याने काही निष्कर्ष काढले.. मुंग्या चालताना रस्त्यात एक प्रकारचा द्रव सोडतात ज्याचा वास मुंग्यांना येतो आणि त्यामुळे इतर मुंग्यांना तोच रस्ता चोखाळता येतो. हा द्रव वाळायला सुमारे अर्धा तास लागतो.. त्यानंतर मुंग्यांना तो रस्ता परत पकडता येत नाही. खाद्याकडून आपण वारुळाकडे चाललो आहोत की वारुळाकडून खाद्याकडे हे मुंग्यांना कळतं का? याच्या उत्तरासाठी फाइनमननं एक मस्त प्रयोग केला. तो चालणार्‍या मुंगीला कागदात उचलून गोल गोल फिरवून, ती ज्या दिशेला चालली असेल, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला किंवा कधी त्याच दिशेला ठेवायचा.. मग ती मुंगी कुठे जातेय ते बघायचा.. ती मुंगी सरळ तिचं तोंड ज्या बाजूला असेल तिकडे चालती व्हायची. पुढे ब्राझिलमधे दिसलेल्या मुंग्यावर त्यानं हाच प्रयोग केला तर त्याच्या लक्षात आलं की त्या मुंग्यांना दोन चार पावलं टाकताच कळतंय की आपण विरुद्ध दिशेला चाललो आहोत.

तो एक द्रष्टाही होता.. १९५९ साली "देअर इज प्लेन्टी ऑफ रूम अ‍ॅट द बॉटम" या भाषणात त्यानं भविष्यात एकेक अणू आपल्याला पाहीजे तिथे ठेऊन काय काय होतं ते पहाणं शक्य होईल असं विधान केलं. पुढे १९८० च्या दशकात ते शक्य झालं आणि त्या तंत्रज्ञानाला नॅनोटेक्नॉलॉजी हे नाव मिळालं.

इतकी अफाट बुद्धिमत्ता आणि भरपूर सारासार विवेक बुद्धी असलेल्या माणसाला देखील एकदा नैराश्याने ग्रासले होते. हे ऐकल्यावर तो एक दैवी चमत्कार नसून आपल्यासारखाच एक साधासुधा माणूस आहे हे जाणवतं.. मग तो जवळचा वाटायला लागतो.. सामान्य माणसांसारखाच ताणतणावामुळे कोलमडू शकणारा, असा! बाँबचं काम संपल्यावर तो कॉर्नेल मधे प्रोफेसर म्हणून लागला. पण त्याची अशी एक भावना झाली होती की तो बौद्धिक दृष्ट्या संपला आहे.. त्याच्यात काही करायची कुवत राहिलेली नाही.. हे विद्यापीठ आपल्यावर इतके पैसे खर्च करतंय खरं पण त्यांना माहित नाहीये की आपल्याला काही जमणं शक्य नाहीये.. इ. इ. तो चक्क पदार्थविज्ञान सोडून अरेबियन नाईट्स सारखी पुस्तकं वाचायला लागला. इतरांच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत अशी कल्पना करून घेऊन त्या दबावाने तो पार नैराश्याच्या खाईत बुडाला. पण मग हळूहळू तो स्वतःशी विचार करायला लागला की.. 'जरी हल्ली पदार्थविज्ञानाचा मला तिटकारा वाटत असला तरी एके काळी मला ते आवडायचं. का बरं आवडायचं? कारण मी त्याच्याशी खेळत असे. तेव्हा असा विचार करत नसे की हे जे काही मी करतोय त्याने काही नवीन संशोधन होणार आहे की नाही ते! मला ते करायला आवडतंय इतकं कारण मला पुरेसं होतं.' त्यानंतर त्यानं हाच दृष्टीकोन ठेवायला सुरुवात केली.. जे आवडतंय ते करायचं, बस्स! मग एक दिवस कॉर्नेलच्या कँटिनमधे एकाने एक थाळी वर फेकली. वर जाताना ती डचमळत होती आणि त्यावरचं पदकाचं चित्र फिरत होतं. फाइनमनच्या मनात विचार आला की त्या पदकाची हालचाल सांगणारं सूत्र काय असेल? मग तो त्याच्या मागे लागला. ते सूत्र शोधून काढता काढता त्याला पदार्थविज्ञानाची गोडी परत कशी लागली ते कळलं नाही. आणि मग एक दिवस त्याला नोबेल मिळवून देणारं संशोधन त्याच्या हातून झालं.

त्याच्या वडिलांमुळेच त्याला शास्त्राची गोडी लागली. त्याच्या वडिलांनी त्याला कधी तू शास्त्रज्ञ हो म्हणून सांगीतलं नाही आणि स्वतः त्याचे वडीलही शास्त्रज्ञ नव्हते.. ते एक सेल्स मॅनेजर होते. मग हे कसं घडलं? याचं उत्तर फाइनमनने स्वतःच नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन समोर केलेल्या भाषणात दिलं आहे (खाली ५ क्रमांकाचा दुवा पहा). त्यातलं मला आवडलेलं एक उदाहरण देतो.

त्याचे वडील त्याला दर सप्ताहाच्या शेवटी जंगलात फिरायला घेऊन जात असत. एकदा त्यांनी त्याला एक पक्षी दाखवून सांगीतलं - 'तो पक्षी बघितलास? त्याचं नाव ब्राऊन-थ्रोटेड थ्रश. त्याला जर्मनीत हाल्सेनफ्लुगेल आणि चिनी भाषेत चुंग लिंग म्हणतात. पण जरी तू त्याची वेगवेगळ्या भाषेतली नावं लक्षात ठेवलीस तरी तुला त्या पक्षाबद्दल काहीच माहिती नसणार आहे. त्यामुळे तुला फक्त वेगवेगळ्या देशातले लोक त्याला काय म्हणतात एव्हढेच कळेल. तो गातो कसा? त्याच्या पिल्लांना उडायला कसा शिकवतो? उन्हाळ्यात किती तरी मैल प्रवास करून कुठे जातो आणि तिथून परतीचा रस्ता कसा शोधतो इ. इ. ही खरी त्या पक्षाबद्दलची माहिती. ती मिळवण्याच्या प्रयत्नात रहा!'

मला तरी मुलातून एक नोबेल पारितोषिक विजेता निर्माण करणार्‍या त्याच्या वडिलांचं जास्त कौतुक वाटतं!

====== समाप्त======

छायाचित्रांचे आणि इतर माहितीचे स्त्रोत ::

१. पोस्टाचं तिकीट - http://shallwemeanderon.blogspot.com/2009/05/forever-meandering.html
२. बोंगो वाजविताना - http://kempton.wordpress.com/2006/11/26/richard-feynman-great-minds-of-o...
३. शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फाइनमन(पीडीएफ)- http://tenniselbow.org/scott/feyn_surely.pdf
४. फाइनमनला वाहिलेली साईट -- http://www.feynman.com
५. नॅशनल सायन्स टीचर्स असोसिएशन समोर केलेले भाषण, व्हॉट इज सायन्स - http://www.fotuva.org/feynman/what_is_science.html

गुलमोहर: 

सुंदर लेख चिमण Happy

तेव्हा मी तीन एक वर्षांची असेन. तो मला अगदी सोप्प्या बेरजा वजाबाक्या करायला शिकवायचा.. आणि बरोबर उत्तर आलं की बक्षीस म्हणून मला त्याचे केस ओढू द्यायचा.' >>>> हे बक्षिस सही आहे Happy

चिमण,
मस्त लेख. Happy

There is plenty of room at the bottom हे भाषण या दुव्यावर वाचता येईल - http://www.zyvex.com/nanotech/feynman.html ... नॅनोतंत्रज्ञानावरचं कोणतंही भाषण आज फाइनमनच्या उल्लेखाशिवाय पुरं होत नाही. Happy

फाइनमनची Lectures on Physics ही तीन भागांची मालिका सुंदर आहे. भौतिकशास्त्राशी फटकून असणार्‍यांनासुद्धा ही पुस्तकं वेड लावतात.

मस्त लेख. Happy
आजपर्यंत 'रिचर्ड फाईनमन एक (बहुतेक फिजिक्सचा) शास्त्रज्ञ होता' - इतपतच माहिती होती त्याच्याबद्दल.

खूप छान लेख चिमण. काही वर्षांपूर्वी रिडर्स डायजेस्ट मधे फाइनमन वर एक लेख वाचला होता...त्यात वर्णिलेला एक प्रसंग आठवतोय....त्याची पत्नी इस्पितळात मृत्यूशय्येवर होती....तिने शेवटचा श्वास घेतला त्याच वेळी त्या खोलीतल्या टेबलावरले घड्याळ बंद पडले. कुणी यातून कसले कसले संकेत शोधले असते. त्याने याचे पण तर्कदृष्ट्या योग्य कारण शोधून काढले!
(मी हे नाव इतके दिवस फेनमन असे वाचायचो...इंग्लिश टेनिसपटू टिम हेनमनसारखे फेनमन!)

खूप छान लेख ...सहसा अशा लोकां बद्दल लिहिलं जात नाही ...आपण फारच मस्त लेखन केलं आहे !!१

आता भौतिक शात्राशी संबन्धीत २ माणसांवर
१) फर्मी
२) नॉयमन काही माहीती असल्यास टाकाल का ???

विशेशतः

नॉयमन ला the last great mathematician , par-excellence म्हणतात म्हणे..त्याच्याविशयी जाणुन घ्यायची फार उत्सुकता आहे !

धन्यवाद लोकहो! नुसता माहितीपूर्ण लेख, तोही एका शास्त्रज्ञाबद्दलचा, फार कुणी वाचेल असं वाटलं नव्हतं.

मला वाटलं होतं की 'फाइनमन हा एक शास्त्रज्ञ होता' इतपत माहिती देखील फार लोकांना नसेल म्हणून त्याची थोडी फार ओळख करून देण्याचा प्रपंच केला.

भरत, त्या प्रसंगाचं वर्णन 'शुअर्ली..' मधे आहे.

'फाइनमन हा एक शास्त्रज्ञ होता' इतपत माहिती देखील फार लोकांना नसेल>>> या माहित नसण्यार्‍या लोकांत मी होते पण आता नाहिये Happy

मस्तच रे,
'शुअरली..' एक मस्ट रीड पुस्तक आहे यात शंकाच नाही.
शेवटी लिहिलेला त्याच्या वडिलांचा किस्सा तर कुठल्याही पातळीवर काहीही शिकवणार्‍या आणि शिकणार्‍या सर्वांनीच कायम लक्षात ठेवावा असा आहे

Pages