इशारा

Submitted by जया एम on 16 August, 2010 - 06:53

डोंगराच्या मागे गाभुळली राई
हिरवी सावली जांभळीशी होई
सांज म्हणे माझे सुटले माहेर
ढगातून येई चांदवा बाहेर

अंधाराला लागे हलकी चाहूल
चांदणी बुडवी पाण्यात पाऊल
उतावळा चंद्र राउळाच्या पाठी
जरतारी रात्र उभी नदीकाठी

पुन्हा आसक्तीचा बरसला घनु
मोगरा श्वासात लागे पुन्हा भिनु
मोहाचा उंबरा, शपथेचे माप
ओलांडता पुन्हा भरे आपोआप

मधाळ तंद्रीत झिंगलेला वारा
चंद्राला सांगतो, नीट वाग जरा
रात्रीचा पदर ढळला ढळला
ज्याचा जो इशारा त्याला तो कळला

गुलमोहर: 

!!!!!