ऐन प्रवाही

Submitted by जया एम on 8 August, 2010 - 10:58

नदीच्या थोर पाण्याने
रीत सोडून वागावे
तृणाशी बोलण्यासाठी
जरा काठावरी यावे

नाच-या पायवाटेला
मुलींनी खेळ खेळावे
सांज दाटून येताना
फूल केसात माळावे

प्रवाहाच्या मनापाशी
कुजबुजे जाणते झाड
चंद्र पाण्यात निजलेला
की आहे फांदीच्या आड

पाकळीच्या ओंजळीत
मधाचे कोवळे श्वास
घटांच्या आतबाहेरी
ओळखीचा पुन्हा भास

पाणी काठावरी थोडे
आणि डोळ्यात साठवते
तुझ्या मातीत जेव्हा मी
शब्द रुजण्यास पाठवते

पाणी काठावरी, पाणी
नदीच्या वाटेने जाते
कुणाला काय सांगावे
फुलांशी कोणते नाते

गुलमोहर: 

चक्कर आली...
अफाट कल्पना..

पाणी काठावरी थोडे
आणि डोळ्यात साठवते
तुझ्या मातीत जेव्हा मी
शब्द रुजण्यास पाठवते
>>
हे तर भन्नाटंच! खूपच भावलं!
जीयो!!!!!!!

OMG!!, कविता प्रचंड आवडली...
पूर्ण कळली की नाही ते माहीत नाही, पण आतून आलेलं लिहिलंय असं वाटतं!...
अभिनंदन!

काय एकेक शब्द लिहिलेस जया!सुंदर मोत्यांची माळ ओवावी ना तशी आहे तुझी कविता! खुप सुंदर!

पूर्ण कळली की नाही ते माहीत नाही, पण आतून आलेलं लिहिलंय असं वाटतं!...>>>

माझंही असंच काहिसं झालं होतं कविता वाचुन...
मग वाचत गेलो.. वाचत गेलो.. ती लय भिनत गेली हळुहळू.. मग कळली असे वाटले!
खरेय भरतजींचे, चेटूक..! अगदी अगदी!
सलाम!!