उर्वशी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

रंभा, मेनका, उर्वशी या सगळ्या अप्सरा, म्हणजे सौंदर्याच्या पुतळ्याच असणार नाही का ? एकमेव, बनवणार्‍याने एकदा वापरून साचे, जणु फ़ेकुनच दिले असावेत.

urvashi.jpg

हो फ़ुलांच्या बाबतीतही एक उर्वशी आहे. रुपाने अत्यंत देखणी आणि एकमेवही. शास्त्रीय नाव Amherstia nobilis . या झाडाचे मूळस्थान म्यानमार. म्हणुन प्राईड ऑफ़ बर्मा, असेहि नाव आहे याला. पण तिथेहि हा वृक्ष नैसर्गिकरित्या क्वचितच दिसतो. याची लागवड मात्र आवर्जून केली जाते.
याच्या फ़ुलाचे वर्णन करणे जरा कठिणच आहे. पण बघतो प्रयत्न करुन. या फ़ुलांचा रंग क्रिमसन रेड. या छटेला नेमका मराठी शब्द मला माहित नाही, पण गडद गुलाबी आणि केशरी यांच्या मधली हि छटा. हि फ़ुले येतात गुच्छाने. हे गुच्छ झाडाला जणु उलटे टांगलेले असतात. हा सगळा गुच्छच या अनोख्या रंगाचा असतो.
या कळीचा आकारच खुप अनोखा असतो. साधारण सहासात सेमीचा देठ असतो. मग टोकाच्या दोन पाकळ्या अलगद बाजुला होवून आतली कळी बाहेर येते.
फ़ूल उमलले कि पाच पाकळ्या वेगळ्या होतात. दोन पकळ्या अगदीच छोट्या. त्यापेक्षा दोन जरा मोठ्या. सर्वात मोठी पाकळी मात्र खुपच मोठी. साडेसात सेमी लांबीची. तिच्या टोकाशी किंचीत महिरप आणि हळदीच्या रंगाचा टिळा. शिवाय वक्राकार पुंकेसर असतातच.
एका गुच्छात फ़ुलांच्या या सर्व अवस्था असतात. हि अशी नाजुक झुंबरं झाडाला जागोजागी लटकत असतात. या सौंदर्याने खरेच मंत्रमुग्ध व्हायला होते.
माझ्या पाहण्यात मुंबईत केवळ तीन झाडे आहेत. एक आहे बॉंबे युनिव्हर्सिटीच्या फ़ोर्टातल्या शाखेत. तिची जी बाजू ओव्हल मैदानाकडे येते तिथे. त्या बाजुला माझे काहि वर्षांपूर्वी नियमित जाणे व्हायचे, पण गेल्या अनेक वर्षात मी तो फ़ुलोरा बघितलेला नाही. बाकिची दोन राणीच्या बागेत. पण त्यापैकी एक आहे तिथल्या बंगल्याच्या आवारात, आणि तिथे कुणी सरकारी अधिकारी रहात असेल, तर तो लांबूनच बघावा लागतो. दूसरा जरा मोकळ्या जागी आहे, पण तो अजून पूर्ण वाढलेला नसल्याने, भरभरुन फ़ूलत नाही.

uravshi_sheng.jpg

याची शेंगहि खुप देखणी असते. दोन सेमी रुंद आणि आठ दहा सेमी लांब. किंचीत बाकदार आणि टोकाशी पोपटी टिळा. कपड्यात अशी रंगसंगती भडक दिसेल, पण निसर्गात काहिच अशोभनीय नसते.
तो फ़ोर्टमधला वृक्ष मी अलिकडे बघितलेला नाही, पण जर मुंबईत असाल तर लवकरात लवकर, या उर्वशीला बघून घ्या. फ़ुलायला सुरवात झाली आहे.
वरचा फोटो बघून गुच्छाची नीट कल्पना येणार नाही, तर हे बघा. एरवी या झाडाची ओळख पटणे कठिण.

ur3.jpg

विषय: 
प्रकार: 

खूप सुन्दर! यालाच छाया प्रकाशाचा अद्भुत खेळ म्हणतात नाही का? रम्भा मेनका उर्वशी तुमच्या फोटोग्राफीच्या कौशल्यामुळे आणखीनच सौन्दर्यवती दिसताहेत. एक शेन्ग किती सुन्दर दिसू शकते!!!!!!!!!!!!

मी आपल्या पोस्ट्स खूप वेळा वाचल्या आहेत. मला बहावा / अमलताश बद्द्ल माहिती हवी आहे. हे झाड घरासमोर बागेत लावता येते का? किती जागा लागेल. गच्चीत लावता येईल का? धन्यवाद.

आभार mmm या शेंगेचे तर नेटवरही फोटो दिसले नाहीत मला.
जांभु़ळ, अमलताश बद्दल मी लिहीले होते. हे झाड अंगणात सहज लावता येईल. हे झाड साधारण तीन चार मीटर वाढेल. पण याची पाने खुपच चवदार असल्याने, जनावरे ती खाऊन टाकतात, म्हणुन संरक्षण द्यावे लागेल. या झाडाच्या बिया सहज रुजतात. गच्चीत मात्र ते नाही वाढू शकणार. घराजवळ लावण्यापेक्षा थोडे दूर लावले तर चांगले फोफावते.