आठवण - कृष्णा नदीवरच्या पोहोण्याची!!

Submitted by मानुषी on 12 April, 2008 - 03:35

उन्हाळ्याच्या सुट्टीचे वारे वाहू लागले की मला प्रथम आठवते ते कृष्णा नदीतले पोहोणे! ती सुट्टीत नदीवर केलेली धमाल!
शाळेला सुट्ट्या लागल्या की आम्हा तीघा भावंडांना घेऊन वडील नेमाने कृष्णा नदीवर जात. आमच्याबरोबर आमचे मित्र मंडळही असे. त्या काळी हल्लीसारखी शिबिरे वगैरे नसत. पण घरीच इतके जबरदस्त कार्यक्रम चालत की सुट्टी कधी संपली कळतही नसे.
आदल्या वर्षी नीट ठेवलेले घरातल्या माळ्यावरचे पत्र्याचे डबे खाली काढून त्यांना हवाबन्द करून आणणे ही या पोहोण्याच्या कार्यक्रमाची नांदी असे. खाली काढलेले डबे घरातल्या हौदातल्या पाण्यात एकदा बुडवून पहायचे. जर बुडबुडा वगैरे आला तर तो डबा कन्डम. तरी पण एक दोन तरी डब्यांना डाग लावण्याचे काम असायचेच. कारण दर वर्षी आमच्या चमूमध्ये कोणी ना कोणी नवीन ऍडिशन असायचीच. मग आमची वरात वडिलांच्या मागोमाग ताम्बट गल्लीत जायची. आमचा दर वर्षीचा ठरलेला एक जण डब्याला डाग लावून द्यायचा. तो डब्याला चांगले घट्ट झाकण लाऊन तिथे डाग लावायचा आणि डब्याच्या दोन्ही बाजूंना डाग लावून लोखंडी कड्या बसवून द्यायचा. या लोखंडी कड्यातून एक भरभक्कम दोर ओवला जायचा.
या सर्व कार्यक्रमात आम्हा वानरसेनेचा अगदी अथ पासून इति पर्यंत सहभाग असायचा. त्यामुळे हे नदीवरची पोहोणे हा एक मस्तपैकी धमाल असा टीम इव्हेंट बनून जायचा!!
प्रत्यक्ष पाण्यात पडण्यापूर्वी नदीच्या घाटावर सर्व शिकाऊ मेंबर्सना डबा बांधण्यासाठी ओळीत उभे केले जायचे. सकाळची वेळ असायची....... खरं म्हणजे पहाटेचीच!! आम्ही साधारण साडेपाच सहालाच घरातून निघायचो. तर काही शिकाऊ मेंबर्स त्या पहाटेच्या थंड हवेत दोन्ही हात छातीजवळ मुडपून, मुठी घट्ट आवळून, काकडून ,थरथरत असत . त्यात थंडीचा भाग कमी असे पण ही थरथर मुख्यत्वेकरून नंतरच्या संकटाच्या जाणिवेने असे. कारण नाही म्हटले तरी एकदा पाण्यात पडेपर्यंत मनात पाण्याची भीतीच असते. तर पाण्यात पडण्यापूर्वी हे हवाबन्द केलेले डबे पाठीवर ठेवून दोन्ही बाजूच्या लोखंडी कड्यांमधून ओवलेला दोर पोटावर करकचून आवळण्याचा एक अत्यंत यातनामय कार्यक्रम असायचा. वाटायचे जणु कुणी प्राणच आवळताहेत.........पण नंतर प्रत्यक्ष पाण्यात याच डब्यामुळे पाण्यावर आपोआप तरंगण्याचा दैवी आनन्द व साक्षात्कार होत असे, त्यापुढे डबा आवळण्याच्या यातनांचे काहीच वाटत नसे.
अर्थातच डबा बांधूनही पाण्यात पडल्यापासून आरडा ओरडा करून स्वतःच्या माता पित्यांना साद घालणाराही एकादा भित्रा भिडू असायचाच ग्रूपमध्ये!! खरं म्हणजे तो मस्तपैकी तरंगत असायचा... अर्थातच डब्यामुळे.... पण पाण्याचा तो थंड गार स्पर्श, नदीच्या वाहत्या प्रवाहामुळे सतत येणारे ते हालण्याचे फीलिन्ग, तो पात्राचा विशाल विस्तार या सगळ्यामुळे नवीन शिकणारा भयभीत झालेला असतो. यातच तो आपले नाक पाण्यात घालतो (म्हणजेच त्याच्या नाकातोंडात पाणी जाते.) हळूहळू तो रडारड सुरु करतो......पण माझे वडील किंवा त्यांच्याबरोबरचे आणखी दोघे त्यांचे मित्र, कोणीच या नवशिक्याला दाद देत नसत. ते लांबूनच ठणकावून पण शान्तपणे सांगत, "डबा बांधलेला असताना कोणीही बुडू शकत नाही. आता तू नाकच पाण्यात घातलेस तर नाकात पाणी जाणारच. मान वर ठेव..........काही बुडत नाहीस तू!"
बाकीचे जे आता पोहोण्यात तरबेज झालेत त्यांच्यात खसखस पिके.
नदीच्या घाटावर सुंदर सुबक देवळे आहेत. त्यातल्याच एका देवळात आम्ही मुली कपडे बदलत असू. बाकी या पोहोण्यासाठी कोणत्याही प्रकारचा स्पेशल स्विमिंग ड्रेस नसायचा. साधारणपणे लहान मुली जो काही पेटिकोट, फ्रॉक असेल त्यावर , थोड्या मोठ्या मुली हाफ पॅन्ट व शर्टवर व मुले पुरुष घरातल्या कोणत्याही .....अगदी कोणत्याही .... हाफ पॅन्टवर पोहत .
आमच्या गावात कृष्णा नदीवर आयर्विन पूल आहे. सांगलीहून या पुलावरून पुण्याच्या दिशेने रस्ता जातो. या पुलावरून सांगलीहून पुण्याला निघालो की पुलाच्या उजव्या बाजूला कृष्णा नदीवर माई घाट व डाव्या बाजूला आधी सरकारी घाट व नंतर विष्णू घाट असे तीन सुन्दर सुबक मोठ्या मोठ्या पायर्‍यांचे तीन घाट आहेत. बर्‍याच वेळा आम्ही प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असू. मग आम्ही माई घाटावर पाण्यात पडायचो व आयर्विन पुलाखालून सरकारी घाट क्रॉस करून विष्णू घाटावर निघायचो व तिथेच कपडे बदलायचो. तिथे त्या दिवशीच्या प्लॅनिंग प्रमाणे आधीच कपडे नेऊन ठेवलेले असत.
काही वेळेला आम्हाला आमच्या जीपमधून नदीच्या पलिकडील तीरावर नेऊन सोडले जायचे. अर्थातच हा कार्यक्रम फक्त एक्स्पर्ट पोहोणार्‍यांसाठीच असे. त्या दिवशी संपूर्ण पात्र क्रॉस करून विष्णू घाटापर्यंत जाण्याचा प्लॅन असायचा. प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे हे लक्षात घेऊन जिथे पोचायचे तिथून बरेच तिरके पाण्यात पडावे लागे. नाहीतर विष्णू घाटापर्यंत न पोचता बरेच पुढे वहात जाण्याची शक्याता असते.
उन्हाळ्यात सुरु केलेले पोहोणे चांगले ऑगस्टपर्यंत चालायचे. कारण पावसाळ्यात पुराच्या पाण्यात पोहायची मजा काही औरच!! उन्हाळ्यात घाटावरून खाली उतरून घोट्याइतक्या चिखलातून चालत जाऊन मग पाण्यात पडता येई. पण पावसाळ्यात मात्र नदीचे पात्र मोठे व्हायचे त्यामुळे डायरेक्ट घाटावरूनच पाण्यात जाता यायचे.
पावसाळ्यात नदीत खूप मासे असायचे. अस्मादिकांना मैदानी खेळांची ओढ अंमळ जास्तीच असल्यामुळे कायमच कोपरे ढोपरे फुटलेली!!!! नेहेमीच वुन्डेड सोल्जर......पोहोताना मासे सर्व जखमा चाटून, चावून साफ करून टाकायचे.
तो स्पर्श खूप गंमतशीर असायचा. ते अगदी व्यवस्थित कळायचे. खूप गंमत वाटायची. वर जखमाही लवकर बर्‍या व्हायच्या.
एके वर्षी आम्ही नेहेमीप्रमाणे पोहत होतो. पलिकडच्या विष्णू घाटावरून आरडा ओरडा ऐकू आला........तिथे काही स्त्रीया पोहायला शिकत होत्या. आपल्या आपणच! त्यांना शिकविणारे कोणी नव्हते. पावसाळा असल्यामुळे पाण्याला प्रचन्ड फोर्स होता. घाटाच्या पायर्‍या वेढून थोडे वळण घेऊन पाणी रोरावत पुढे प्रचंड वेगात चालले होते. त्या स्त्रीयांपैकी एक स्त्री त्या धारेला लागली. तेव्हा माझे वडील आणि त्यांचे दोन मित्र श्री. सदुभाउ महाबळ(हाडवैद्य) व श्री. भाऊराव पडसलगीकर (बुद्धिबळ महर्षी) यांनी पटापट पाण्यात उड्या मारल्या. अक्षरशः जिवाच्या आकान्ताने झपाझप पाणी कापत त्यानी तेवढे अंतर कापून त्या स्त्रीस वाचवले. त्या दिवसापासून त्या दोघी आमच्या बरोबरच पोहायला यायला लागल्या.
तेव्हा सांगलीसारख्या छोट्या गावात जलतरण तलाव नसायचे. पण जे लोक थोडे प्रगत विचाराचे होते ते आपल्या मुलांना नदीवरच पोहायला शिकवत. त्या वेळी आमच्या त्या भागात मूल साधारण ५/७ वर्षाचे झाले की त्याला नदीच्या पाण्यात ढकलले जायचे. आधी काही दिवस डबा बांधून शिकवले जायचे व नंतर एक दिवस त्याचा डबा काढला जायचा. मूल पोहू लागायचे. बहुतेक जण याच पद्ध्तीने पोहोणे शिकत. रोज हे वर उल्लेख केलेले मोठे तीघेजण्(आमचे कोच)आणि १५/२० वेगवेगळ्या वयाची मुले मुली. मुलींचे प्रमाण खूपच कमी असायचे. पण त्या कमी मुलींमध्ये मी होते हे माझे भाग्य आणि श्रेय माझ्या वडिलांचे!!!
एकदा असाच पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आला होता. या आमच्या तीघा कोच मंडळींनी एक थोडा धाडसी बेत आखला. व यशस्वी करून दाखवला. आम्ही १५/२० मुले मुली(अर्थातच मुली खूपच कमी), आणि आमचे हे तीन कोच सांगली ते हरीपूर हे पाण्यातले अंतर अन्दाजे ७/८ किलो मीटर पोहून गेलो. काही थोड्या लिम्बूटिम्बूंना सेफ्टीसाठी डबे बांधले होते. अजूनही माझ्या डोळ्यापुढे तो चहाच्या रंगाचा रोरावत जाणारा प्रवाह स्पष्ट दिसतो आहे. त्या वेगात वहाणार्‍या प्रवाहात काय वाट्टेल ते वहात चाललेले होते. कचरा, कडबा, मेलेले प्राणी .......काहीही! पाण्याला मध्येच वळणे होती, प्रचंड मोठे भोवरे होते. पण आमचे कोच आम्हा सर्वांना खूप संभाळून मार्गदर्शन करीत पुढे पुढे नेत होते. खूप दमछाक होत होती पण खूप मजा वाटत होती. आम्ही सगळे प्रवाहाच्या दिशेनेच पोहत होतो त्यामुळे पाण्यावर तरंगत वहात जाण्याची गंमत अनुभवत होतो आणि निसर्गाच्या रौद्र रूपाची थोडी भीतीही वाटत होती. मन निसर्गाच्या रौद्र रूपापुढे नतमस्तक झाले होते. आम्ही सगळे अगदी तल्लीन होऊन पोहत होतो.
मला वाटतं तास दीड तास तरी आम्ही पोहत होतो. नंतर हरिपूरला पोचलो. तिथे कृष्णा वारणेचा संगम आहे. खूप विलोभनीय दृश्य होते. पण निसर्ग वगैरे काही पहाण्याची ताकद उरली नव्हती. एका ओळखीच्या घरात कपडे बदलण्याची सोय केलेली होती. कपडे काढण्यासाठी हात वर करण्याची सुद्धा शक्ती उरली नव्हती. तिथेच थोडे खायला काही तरी चाउ म्याऊ आणलेले होते. खूप दमछाक झालेली होती. पण आतून काही तरी वेगळेच वाटत होते. मनातून एक मोहीम यशस्वीपणे फत्ते केल्याची खुषी होती.
आता वाटते, तेव्हा आत्तासारखी प्रसारमाध्यमे नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमाला कुठेही प्रसिद्धी मिळाली नाही. कुठेच बातमी सुद्धा नाही...... फोटो बिटो लांबची गोष्ट!! अर्थातच प्रसिद्धीसाठी काहीच केलेले नव्ह्ते. त्यामुळे काहीच वाटले नाही. उलट मनात खूप समाधान होते.
आता माझी मुले त्याच्या डिजिटल कॅमेर्‍यात, सेल फोनमध्ये पुटूपुटू ज्याच्या त्याच्या व्हिडिओ क्लिप्स घेतात आणि लगेच कॉम्प्यूटरवर अपलोड करतात किंवा ऑर्कुट सारख्या संकेत स्थळावरून जगभरातल्या त्यांच्या मित्र मंडळींना पाठवतात.
त्यानंतर आम्ही मुली थोड्या मोठ्या झाल्यावर जेव्हा देवळात कपडे बदलायची लाज वाटू लागली तेव्हा नदीवरचे पोहोणे हळू हळू बंदच झाले. त्यानंतर मग सुट्टीत कधी तरी पुण्याला आत्याकडे जायचो तेव्हा मात्र मी एस्.पी. कॉलेजच्या टँकवर अगदी न चुकता जायची.
असो, नंतर माझ्या मुलांना मी आमच्या गावातल्या जलतरण तलावात पोहायला शिकवून माझी दुधाची तहान ताकावर भागवली. कारण नदीच्या वाहत्या पाण्याची सर पूल मधल्या पाण्याला कशी येणार?

गुलमोहर: 

छान लिहिलंय. डोळ्यासमोर उभे केलेत प्रसंग. पुरात पोहायचं म्हणजे केव्हडं धाडस!
-मृण्मयी

छान लिहीले आहे.. सुंदर.. तसे तुम्ही सांगलीची लोकं नदीत पोहण्यात तरबेज असताच.. माझे गावभाग, विष्णुघाट वगैरे वर राहणारे मित्र सगळे नदीत पोहण्यात बाँड.. आम्ही मिरजेची मंडळी मात्र विहिरीत पोहणारी.. एकतर नदीवर जायचे म्हणजे ७-८ किमी सायकल हाणा त्या घाणेरड्या रस्त्यावरुन.. पण विहिरीत पोहण्याचा फायदा म्हणजे उड्या मारता येतात चिक्कार.. आणि पोहुन झाल्यावर जी भयानक भूक लागते.. अरे बापरे..

तुमचा आयर्विन पूल ते हरिपूर उपक्रम फारच धाडसी होता.. मला वाडीच्या देवळासमोर नदीचे पात्र ओलांडताना फेस यायचा तोंडाला..

जलतरण तलावात पोहण्याला काहीच मजा नाही हे खरे..

छान लिहिलंय तुम्ही... हा लेख वाचून 'श्यामची आई' तल्या 'पोहणे' प्रकरणाची आठवण झाली. त्यातही असंच डबे,विहीरीत ढकलून देणं वगैरे लिहिलंय...

मस्तच लिहिलय. मलाही त्या चमूत सामील झाल्यासारखे वाटले.

१दम झकास !!!
त्या माईघाटावर मला शिकवण्याचा एवढ्या लोकांनी प्रयत्न केला पण मी कोणाचाच प्रयत्न यशस्वी होउ दिला नाही ..
तिकडे न्या नाहीतर विश्रामबागेतल्या कुठल्या विहीरीवर न्या .. नाही म्हणजे नाही .. पाण्यापाशी जाइपर्यंत सगळा जोष.
शेवटी माझं मी १टाच शिकलो. बाबा सांगतात ते सांगली डोळ्यासमोर आलं .. बलभीम व्यायामशाळा .. माई घाट.. पुरात पुलावरुन उड्या मारणे .. रात्री च्या वेळी पुरात उड्या मारणे वगैरे काय काय ..

थँक्यू!
परवा खूप जुन्या मैत्रिणी भेटल्या. तेव्हा सहज आठवण निघाली नदीवरच्या पोहोण्याची. आणि मी एवढ्यातच मायबोली वर बागडायला सुरवात केली होती, तर विचार आला यावरच लिहावं. पण प्रतिसाद वाचून आणखी लिहायला हुरूप आला.

लम्पन, मंजूडी, तन्याबेडेकर, मृण्मयी, दिनेशदा, सर्वानी प्रतिसाद दिला खूप छान वाटले.
लम्पन ,
सांगलीच्या पुलावरून( खरं म्हणजे पुलाखाली छज्जे होते त्यात उतरून मग तिथून उडी मारायची.) ज्या उड्या मारत त्या उड्याना गठठा मारणे म्हणत. उडी मारली की हवेतच मान्डी घालायची आणी मांडी घालूनच पाण्यावर आदळायचे!!!! या प्रकारे आवाज ही खूप येतो आणी पाणीही खूप उडते.
आणि हो १टा का होईना तू पोहायला शिकलास हे छान झाले.

छान हो ममम३३३

छान वाटले वाचताना Happy तुमचे हे लिखाण वाचताना जशी मला पोहणे शिकतानाचे आठवले, तसेच सगळ्या पोहोणार्‍या मंडळींना पण नक्कीच आठवेल अन् एक सुखद आठवणींचा आनंद मिळेल Happy

आपला मंदार @};-

छान आहे तुमचा अनुभव. मला स्वतःला नीट पोहता येत नाही त्यामुळे मला पोहता येणार्‍यांचा खुप हेवा वाटतो :).
लहानपणी पाण्याच्या भिती मुळे शिकले नाही. आता परत एकदा प्रयत्न करुन बघायला हरकत नाही.

आभारी आहे रूपाली प्रतिसादाबद्दल .
चांगला विचार आहे पोहोणे शिकण्याचा.

वा माधुरी छान लिहीलस
मी पण लहानपणात पोचलो अन वर्धा नदिच्या पात्रात डुंबुन आलो Happy

मस्तच लिहिलेत अनुभव. सांगली ते हरीपूर - पुराच्या पाण्यात! वा!
माझा सांगलीचा मावसभाऊ पत्रात (जुन्याकाळी!) तो कसा दरवर्षी पुरात पोहतो, कुठून कुठून उड्या मारतो ते लिहीत असे. तेव्हा मलाही पोहायला शिकायचा उत्साह येई. आणि पाण्याजवळ पोचल्यावर तो लगेच ओसरे. शेवटी आता पोहायला शिकते आहे.

मस्त लेखन. आम्ही ही आमच्या काकांबरोबर ( श्री भालबा केळकर) माई घाट ते विष्णू घाट अनेक वेळा पोहत गेलो आहे. जादूई दिवस होते ते. धमाल मजा यायची पोहायला. आपल्या या लेखाने सर्व आठवणी परत जाग्या झाल्या. धन्यवाद

अमोल केळकर
( सांगलीकर)
------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

मानुषी,
माझं आजोळ गावभागातलं(खाडिलकर गल्ली) त्यामुळे आईकडून अशा पोहायच्या कथा खूप ऐकलेल्या लहानपणी. मस्त लिहिलय तुम्ही.

मी नुकतीच सांगलीतल्या चुलतभावाकडून या सगळ्या कथा ऐकून आले. त्याची ७ वीतली मुलगी पण मस्त पोहते नदीत.
असा हेवा वाटला ना..

अरे व्वा व्वा खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... मी अगदी विश्राम्बागेतुन रोज पोहायला जात होतो. पुराच्या पाण्यात पुलावरुन उड्या मारायचा पण कार्य्क्रम पण करुन झालाय तेंव्हा .... मध्ये एकदा त्या डोहात मगर दिसल्याची बातमी आल्यावर पोहणे बरेच दिवस बंद होते... पण परत चालु झाले. नदीवर अंघोळ मग गणपती मग रुमवर परत.... Happy अजुन एक पलिकडे तीरावर लोक जाउन तिथल्या मातीचा चिखल करुन अंगावर फासुन लोक बसायचे...

मानुषी,
वाह ! म्हणुनच "सांगली आमची चांगली "
तुमचे अनुभव अनुभव छान आहेत (आणि हे वाचुन माझ्याही आठवणी डोळ्यांसमोर येऊन गेल्या)
मीही असाच याच जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पाणी जोरात वाढत होतं,त्यात मजा म्हणुन मुलांच्या बरोबर आत जायचा मोह आवरत नव्हता,इकडे आई मात्र कपडे धुताना इतकी जाऊ नको म्हणुन ओरडत होती,त्या धारेत काही सेंकदात सारा जीव एकवटुन, धडपडत,नशीबाने मी परत काठावर येऊ शकलो, आज वाटतं, त्यावेळी आई नदीकाठावर जवळच होती म्हणुनच मी वाचलो !
Happy

मस्तच लिहिलेत अनुभव. पोहणं शिकायचं राहून गेलं. पण आता वाटतंय की एकदा तरी पंचगंगेत डबे वगैरे बांधून झोकून द्यायला पाहिजे होतं Sad

पोहायला शिकतानाच्या गमती आठवल्या. मी पण कृष्णाकाठचाच. आमच्या गावावरूनच पाणी सांगलीला येते. मस्त लिहीलय.

मस्त लिहिलंयत. आजकाल मुंबईत थोड्याश्या पावसाने येणारा महापूर पाहून पोहायला शिकलं पाहिजे असं वाटू लागलंय Happy

मानुषी, हे सगळं तुमच्या तोंडून ऐकलंय. ऐकताना जी मजा अनुभवली तिच वाचतानापण.
मस्त लिहलंय.

Pages