अनुबंद, आय मीन, अनुबंध ही झी मराठीवरची (रोज संध्याकाळ ८:३० वाजता) मालिका संपणार हे शुभवर्तमान कानी पडल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाहिये. ह्याच आनंदाप्रित्यर्थ मालिकेच्या उरलेल्या एपिसोडसची ही एक झलक.....
मंगळवार:
शुंभूचा मित्र आशूकडे बाळ डिमान्ड करायला जाईल, तिथे त्याच्यात आणि समीर मधे घमासान शाब्दिक युध्द होईल. शेवटी तो मित्र समीरला त्याची नोक॑री काढून घेण्याची धमकी देईल.
"अरे जा रे, असल्या शंभर नोकर्या मिळवेन" टाटा-बिर्ला, अंबानींची दोन्ही मुलं वगैरे मंडळी गल्लीत आपल्याबरोबर क्रिकेट खेळायला होती अश्या थाटात समीर. पहिली नोकरी मिळायला झालेला त्रास तोही विसरलाय आणि प्रेक्षकही. प्रेक्षक झाले म्हणून काय झालं त्यांनी तरी काय काय लक्षात ठेवायचं, नाही का?
Active प्रेक्षक (मालिका आवडीने पहाणारे) (उघडपणे) - बिच्चारा, कित्ती करतोय त्या मित्रासाठी. आजकाल कोण करतंय एव्हढं?
passive प्रेक्षक (आ़जूबाजूला म्हणजेच wrong place, wrong time असलेले मानव) (शूंभूच्या मित्राला उद्देशून पण पुटपुटत) - अरे, स्वतःच्या मुलीकडे पण कधीतरी लक्ष दे की रे जरा.
रिकाम्या हाताने मित्र परत जातो. प्रधानांकडे सगळे परत कपाळाला हात लावून बसतात.
बुधवार:
डॉक्टरीण बाई आशूकडे येतात. स्वर समजावणीचा. एका आईचं एका आईकडे तिसर्या आईसाठी गार्हाणं. घरोघरीच्या बाया बादलीभर रडणार. (आधीच पावसामुळे पाणी तुंबलंय सगळीकडे, त्यात ही भर). आसपास मुलं असतील तर त्यांना "बघा बघा जरा" वगैरे ऐकवणार. "आईचं ह्रदय" वगैरे ड्वायलॉगांची आतषबाजी. घरोघरीच्या मुलांना आपण आपल्या कातड्याचे जोडे आईला कधी करून द्यायचे हा प्रश्न पडणार. (परत ते पावसाळ्यात टिकतील का हा उपप्रश्न).
काही उपयोग नाही. डॉक्टरीण बाई बाळाशिवाय परत जाईल.
गुरुवार:
आत्या स्वाभिमान गिळून आशूकडे येणार. दरवाजा समीरची आई उघडणार. तिला घरात घ्यायला नकार देणार. आत्याचा आकार पहाता तिला खिडकीतून आत जाणं कठिण. दार तोडून जायचा ती विचार करणार एव्हढ्यात आशू आणि बाळ बाहेरून येणार. आत्याला घरात नेणार, चहा-कॉफी, भजी विचारणार. भज्याचं नाव काढताच आत्या हो म्हणणार. मग एक्दम तिला आपण कशासाठी आलोय त्याची आठवण होणार. आशू बाळ द्यायला नकार देणार. मग "महानंदा" "महाकाली" चा अवतार धारण करणार. "कसं देत नाहिस तेच पहाते, आमचं आहे ते बाळ. पोलिसांना आणून घेउन जाते की नाही बघ". समीरची आई रुद्रावतार धारण करणार. आत्याला ओढत बाहेर काढणार आणि उरलेला दिवस हाताला आयोडेक्स लावणार प्रेक्षक (Active, passive दोन्ही) शनिवारची आतुरतेने वाट पहाणार.
शुक्रवार:
शुंभूची आई आणि डॉ़क्टरीण (ही परत कशाला ह्या प्रश्नाचं उत्तर २ ओळीत मिळेल!) "ज्युनियर शुंभू" ला आणायला आशूकडे. पदर पसरून तिच्याकडे भीक मागणार सुनेच्या आणि मुलाच्या आयुष्याची. आशूचा निर्धार ढास़ळतोय. ती काही बोलणार एव्हढ्यात तिला मळमळणार. ती धावत आत जाणार. लगेहात डॉ़क्टरीण बाई तिला तपासून ती आई होणार असल्याचं सांगणार. मग लगेच मा शुंभांनंद तिला ह्या शुभप्रसंगी एक चांगला निर्णय घ्यायचा सल्ला देणार. समीर आतल्या खोलीत आपल्याला एव्हढ्यात २ कार्टयांना पोसायला जमणार नाही ह्या निष्कर्शाप्रत येणार. समीरची आई दोन बाळांना संभाळायला लागणार म्हणून धास्तावून जालन्याचं नेक्स्ट टिकिट कधी काढायला मिळतंय ह्या विचारात. तमाम Active प्रेक्षक सस्पेन्समध्ये. passive प्रेक्षक हे दळण संपून आपल्याला कधी गिळायला मिळतंय ह्या विवंचनेत. एपिसोड संपतो.
दिवसः शनिवार
स्थळ: समिरचं घर
एपिसोड सुरू होतो तेव्हा समीर पेपर वाचतोय. एव्हढ्यात एक ७-८ वर्षांचा मुलगा "डॅडी, डॅडी" करत येतो. समीर त्याच्याशी खेळत असताना आतून उपमा आणि चहा घेऊन आशू येते. तिच्याबरोबर एक मुलगी असते. प्रेक्षक बाया हळहळतात - अरेरे! शुंभूला मुलगा आणि समीरला मुलगी का. त्या बायांच्या मुली एपिसोड पहात असतील तर रागाने आईकडे पहातात. बायांचे मुलगे तिथे असतील तर शोलेच्या गब्बरच्या चालीवर "बहोत नाइन्साफी है" म्हणतात. बाया मग त्यांना "ए गप बसा रे, ऐकू द्यात" असं सुनावतात.
आशू समीरपुढे चहा, उपमा ठेवते. ह्या गोष्टी आदळण्याची स्टेज त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अजून आलेली नसते. मग एकदम प्रेक्षकांकडे वळून बघते आणि म्हणते "७-८ वर्श कशी गेली कळलंच नाही". इथे काही passive प्रेक्षक "आम्हालाही" असं दबक्या आवाजात म्हणतात. आशू म्हणते "हे आमचं कुटूंब, मी, समीर, माझा मुलगा अश्विन आणि मुलगी समीरा." "च्यायला, नावं पण वेगळी सुचली नाहीत ह्यांना" इति passive प्रेक्षक. Active प्रेक्षक विचारात - मुलाचं नाव कसं बदललं.
आशू: "एव्हढे कनप्युज नका होऊत"
passive प्रेक्षक: तू सिरियलभर कनप्युज होतीस, आम्हाला एका एपिसोडमध्ये पण कनप्यूज व्हायचा हक्क नाहीये? अमिरोंका खून खून, गरिबोंका खून पानी?
आशू: हा माझा आणि समीरचा मुलगा. आणि ही आमची मुलगी.
मग ती एका भिंतीकडे येते. तिथे समीरची आई मारक्या म्हशीसारखी फोटोतून पहात असते. "आई २ वर्षांपूर्वी गेल्या" आशू सांगते.
passive प्रेक्षक: "अरे वा! सुभान अल्ला!"
एव्ह्ढ्यात समीरचा फोन वाजतो. आशू कौतुकाने त्याच्याकडे पहात म्हणते "जर्रा म्हणून उसंत नाही. सिइओ झालाय ना".
passive प्रेक्षक (दात ओठ खाऊन) : मायक्रोसॉफ्टचा का एसएपीचा रे? अरे त्याला सिइओ चा फुल फॉर्म माहित आहे का विचारा रे कोणीतरी.
मग बेल वाजते. दारात शुंभू, नमू, आय मीन नमिता, एक मुलगा आणि मा शुंभानंद. "आज अश्विनचा हॅपी बर्थडे ना. म्हणून ही गिफट" नमिता म्हणते. मग नमिता प्रेक्षकांकडे बघून बोलायला लागते.
नमिता: किती वेड्यासारखी वागले ना मी? पण काय करू? बाळ हवं होतं ना मला
घरोघरीच्या बाया: "कशाला? त्यांच्या खस्ता काढायला?". मुलांकडे पाहून डोळे वटारतात. मग काही टोणगी मुलं "आम्ही आलो नव्हतो जन्म द्या म्हणून जोगवा मागायला तुझ्याकडे आणि बाबांकडे" असं ऐकवतात. "एव्हढा एपिसोड संपू देत मग बघते तुमच्याकडे". असं आया ऐकवतात.
इथे नमिता बोलतेच आहे. कोणी ऐको वा न ऐको, बोलत रहायची तिची सवय अजून गेलेली नसते.
नमिता: आई होणं म्हणजे स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता. "आई" ही हाक ऐकली की कसं भरल्यासारखं होतं.
इथे बाया डोळ्याला पदर लावतात आणि एपिसोड संपला की स्वतःच्या आईला फोन करायचा असं ठरवतात. त्यांचे नवरे सासूबाई आता मुक्कामाला येतात की काय ह्या भीतिने गळाठतात.
नमिता: पण जेव्हा मला कळ्लं की मी आई होणार नाही तेव्हा मला वेड लागायचंच बाकी होतं.
passive प्रेक्षक - बाकी होतं? हो, हो, बाकी असेलच. आम्हालाच वेड लागलं होतं म्हणून तुम्ही वेड्या वाटायच्या आम्हाला.
Active प्रेक्षक - बिच्चारी. बाईचं दु:ख बाईलाच कळायचं हो.
नमिता: पण शुभूने, आईंनी, तुम्हा सगळ्यांनी मला समजून घेतलंत.
passive प्रेक्षक - न घेऊन सांगतो कोणाच्या बापाला.
नमिता: पण आशू देवासारखी धावून आली. मी तिला माणुसकी सोडून वागवलं होतं पण ते मनात न ठेवता तिने बाळ माझ्या ओटीत घातलं. मला पुन्हा एकदा जीवन दिलं. तिचे हे उपकार मी....
आशू (तिचं बोलणं तोडत) - हे काय बोलताय तुम्ही? असं नका ना बोलू.
शुंभानंद (बोलण्याची संधी मिळाल्याने खूश होत): खरंच बोलयेत मिता. तू आम्हाला नवजीवन दिलंस.
passive प्रेक्षक - आवरा लवकर. आमचा भूकबळी जाईल नाहीतर इथे.
मा शुंभानंद "गंगर ऑप्टिशियन"ची जाहिरात करायला लावलेला चष्मा काढून डोळे पुसतात.
पुन्हा एकदा बेल वाजते. आता दारात शुंभूचा मित्र आणि समीरची बॉस उभे असतात. शुंभूचा मित्र समीरच्या हातात गिफ्ट देतो. समीरची बॉस आपल्याकडे पाहून हसते. "अहो, बघताय काय असे? आम्ही दोघांनी लग्न केलंय आता."
passive प्रेक्षक - आम्ही काय आज मालिका पहातोय होय? तुम्ही मी किटीशी लग्न केलंय असं म्हटलं असतं तरी आम्हाला शॉ़क नसता बसला.
सीन चेंज. आता एक हॉस्पिटल दिसतं. त्यात डॉक्टरीण बाई बसलेल्या असतात. त्यांना एक फोन येतो. "अरे हो, पोचते मी पलाश. एव्हढी पण नकोय बायकोची काळजी करायला". मग फोन ठेवून आपल्याकडे हसून बघत म्हणतात "कसे आहात?"
passive प्रेक्षक - अजून जिवंत आहोत ही देवाची क्रृपा. नाहीतर तुमच्याच हॉस्पिटलात यावं लागलं असतं - डेलिव्हरीची केस नसतानाही.
डॉक्टरीण बाई - हो, हो, मीही मजेतच आहे. पहाताच आहात तुम्ही की मी आणि पलाश पुन्हा एकत्र आलोय. त्याला आप्ली चूक कळलीय. हिंदी पिक्चरमध्ये म्हणतात तसं - सुबह का भूला शाम को घर आया तो उसे भूला नही कहते
passive प्रेक्षक - तुम्ही संध्याकाळी घरी यायची सोय ठेवली आहे काय आम्हाला?
डॉक्टरीण बाई - आता आमची हॉस्पिटल्स देशाच्या अनेक राज्यात आहेत. तुमच्या घरी कोणी छोटा पाहुणा येणार असेल तर त्याला घेऊन यायची संधी देणार ना आम्हाला? (तोंडभरून हसतात).
passive प्रेक्षक - आम्हाला कुत्रा चावला तर नक्की देऊ.
डॉक्टरीण बाईच्या केबिनच्या दारावर टकटक होते. किटीचा बॉफ्रे असतो. त्या आणखी हसतात.
डॉक्टरीण बाई - काय म्हणताहेत किटी मॅडम?
किटीचा बॉफ्रे - मजेत आहे अगदी.
मग आपल्याकडे वळून म्हणतो. "तुम्हाला बोलावलं होतं ना लग्नात. का नाही आलात? मी आणि किटी रागावलोत तुमच्यावर. कित्ती वाट पाहिली आम्ही"
passive प्रेक्षक - का नाही आलात? तुम्ही विकडेला ठेवलं असेल लग्न. सगळ्या बाया बसल्या असतील झी मराठी लावून. आम्ची बरी आठवण झाली. प्रेशर कुकर मिळालेले दिसत नाहीत गिफ्ट म्हणून.
किटीचा बॉफ्रे - बरं ते जाऊ द्यात. आता आमच्या मुलाच्या बारश्याला यायचं बरं का.
passive प्रेक्षक - तरी बरंय आधी लग्न आणि मग मूल. आम्हाला वाटलं वरातीमागून घोडं असेल.
किटीचा बॉफ्रे - असं काय करताय? हे आमचं तिसरं बाळ. किटी आधी लग्नाला सुध्दा तयार नव्हती. पण आशू आणि नमिताकडे पाहून तिला पत्नी आणि आई ह्या दोन्ही भूमिकांचं महत्त्व कळलं.
passive प्रेक्षक - आणि तू काय त्या भूमिकांचं स्क्रिप्ट लिहितोयस काय रे ठोंब्या? (घड्याळाचा काटा नवाकडे जात असल्यामुळे भुकेचा कडाका वाढलेला असतो)
सीन पुन्हा चेंज होऊन आशूच्या घरात. सगळे वाढदिवस साजरा करण्यात दंग आहेत.
मा शुंभांनंद आपल्याकडे पाहून हसतात. "पाहिलंत? शेवट कसा गोड झाला ते. आता प्रधान आणि देशमुख दोन वेगळी कुटुंबं नाहितच मुळी. झालं गेलं गंगेला मिळालं"
passive प्रेक्षक - अहो, ती बिचारी आधीच प्रदूषित आहे. आणखी घाण कशाला टाकताय तिथे?
मा शुंभांनंद - मग या असेच कधीतरी पुन्हा भेटायला. मी असेल किंवा नसेन. पण हे सगळे असतील ना. आपले अनुबंधच जुळलेत तसे. खरं ना?
इथे एपिसोड संपतो. मालिकेचं शीर्षकगीत पुन्हा लागतं. Active प्रेक्षक डोळे पुसत उठू लागतात. passive प्रेक्षक आनंदाच्या उकळ्या दडवायचा यत्न करत असतात. एव्ह्ढ्यात मोठ्ठं कुंकू लावून नीना कुलकर्णी पडद्यावर अव्तीर्ण होते. Active प्रेक्षक थबकतात.
नीना कुलकर्णी म्हणते - मी येतेय तुम्हाला भेटायला, सोमवारपासून. बघणार ना माझी वाट?
टीव्हीवर नव्या मालिकेचं शीर्षक येतं - लज्जा.
मस्त स्वप्ना >>मा शुंभानंद
मस्त स्वप्ना

>>मा शुंभानंद "गंगर ऑप्टिशियन"ची जाहिरात करायला लावलेला चष्मा काढून डोळे पुसतात.
आइला... लैइ भार्री!!!!!!!!!
आइला... लैइ भार्री!!!!!!!!!
passive प्रेक्षक आनंदाच्या
passive प्रेक्षक आनंदाच्या उकळ्या दडवायचा यत्न करत असतात. >

आणि स्वप्ना शुंभांनंद नव्हे गं. शुभंकर
महान ! निंबूडा , अगं ते
महान !
निंबूडा , अगं ते स्वप्ना ने दिलेले स्पेशल नांव आहे .
निंबूडा , अगं ते स्वप्ना ने
निंबूडा , अगं ते स्वप्ना ने दिलेले स्पेशल नांव आहे . >>> असंय होय!!! आम्हा पामराला माहितच नव्हतं ब्वा!
पन झकास जमलंय हे लिखाण
संचायामा मध्ये वाचलं होतं. आता सगळ्या पोस्ट्स एकत्र करून भट्टी छान जमून आलीये
लय भारी
लय भारी
मा शुंभानंद "गंगर
मा शुंभानंद "गंगर ऑप्टिशियन"ची जाहिरात करायला लावलेला चष्मा काढून डोळे पुसतात" सही आहे एकदम. हहपु
अनुबंद बंद होतेय
अनुबंद बंद होतेय हो.......>>>>>>>होऊदे मरु दे .....फुकटची डोके दुखी.... (आम्हाला मॅचही बघता येत नाही)
अनुबंद बंद होतेय? हो का हो
अनुबंद बंद होतेय? हो का हो खरंच? खरंच बोलताय का? मला हर्षवायू होणार बहुतेक...
स्वप्ना, प्रचंड हसलो. नवीन आहे ह्या हापिसात म्हणून कंट्रोल केलं नाहीतर...असो
नीना कुलकर्णी नेहेमी असं दम द्यायच्या टोन मध्ये का बोलते ?
मंजिरी,स्वाती, निंबुडा,
मंजिरी,स्वाती, निंबुडा, संपदा, कविता, मुग्धानन्द, vaibhavayare123, मंदार_जोशी, सगळ्यांना धन्यवाद!
मंदार, खरंच ही मालिका संपतेय.
आणि १२ तारखेपासून नवं दळण लागतंय. 
अनुबंध म्हणजे आशुतोश कुलकर्णी
अनुबंध म्हणजे आशुतोश कुलकर्णी आहे तीच सीरीयल ना
अनुबंध मधल्या आशुतोश कुलकर्णीं चे अन आमचे काही विशेष 'अनुबंध' आहेत
त्या मुळे कधीही न पाहिलेली ही सिरीयल बंद पडल्याचा विशेश आनंद !!
य्ये आधी खात्री करुन घे खरंच
य्ये आधी खात्री करुन घे खरंच बंद पडलीये का ती
स्वप्ना मी नाही बघत अनुबंध,
स्वप्ना
मी नाही बघत अनुबंध, तरीही जाम मजा आली वाचायला.
>>जर्रा म्हणून उसंत नाही.
>>जर्रा म्हणून उसंत नाही. सिइओ झालाय ना".


passive प्रेक्षक (दात ओठ खाऊन) : मायक्रोसॉफ्टचा का एसएपीचा रे? अरे त्याला सिइओ चा फुल फॉर्म माहित आहे का विचारा रे कोणीतरी>>
>>आशू (तिचं बोलणं तोडत) - हे काय बोलताय तुम्ही? असं नका ना बोलू.> अगदी अगदी
स्वप्ना धन्य आहे तुझी
>>>मा शुंभानंद "गंगर
>>>मा शुंभानंद "गंगर ऑप्टिशियन"ची जाहिरात करायला लावलेला चष्मा काढून डोळे पुसतात"
आशू (तिचं बोलणं तोडत) - हे काय बोलताय तुम्ही? असं नका ना बोलू<<<
स्वप्ना खरच आता साष्टांग दंडवत बाई तुला ----------०----->
खरच तू मनावर घे स्क्रिप लिहायचं.
मस्त ! मस्त !! मस्त !!!
सोल्लिड...
सोल्लिड...
"कसौटी जिंदगी की" ही महाभयानक
"कसौटी जिंदगी की" ही महाभयानक (रामसे बंधू प्रॉडक्शनपेक्षाही) सीरियल ज्यावेळी (अखेरीस) बंद झाली त्यावेळी झालेल्या आनंदापेक्षा "अनुबंध" बंदचा आनंद दसपट वाटत आहे. (पण "लज्जा" ची धमकी पुढे आहेच.)
लज्जा>>> अरे देवा मला वाटलं
लज्जा>>> अरे देवा मला वाटलं होतं... वाटलं की पुरूषांवर होणारे अत्याचार बघून केकता कपूर काहीतरी नवं लोकांसमोर आणेल पण...
स्वप्ना, बंध बंद झालं की लज्जा बंध आवळणार का ?
सॉल्लीड लिहिलंय. सगळ्यांना
सॉल्लीड लिहिलंय. सगळ्यांना हतबुद्ध करणारं निर्बुद्ध लिहायला पण किती सर्जनशीलता लागते..बापरे!!:स्मित:
हरे राम!!
हरे राम!!
सहिच!
सहिच!
स्वप्ना...सह्हीच गं..
स्वप्ना...सह्हीच गं..
जबरी.........................
जबरी..........................
सही!
सही!
स्वप्ना अॅज युज्वल सहीच
स्वप्ना अॅज युज्वल सहीच

एकदमच भारी
एकदमच भारी
स्वप्ना, तू भारीच लिहीतेस गं.
स्वप्ना, तू भारीच लिहीतेस गं. हे लिहिलंयस ते पल्लवी जोशीला मेल कर नां.
स्वप्ना, अनुबंध कधी पाहिली
स्वप्ना, अनुबंध कधी पाहिली नाही.. त्यामुळे क्लूज लागले नाहीत - पण एकंदर हहपुवा..
अशक्य लिहिलयं.
अशक्य लिहिलयं.
मस्त!
मस्त!
Pages