हे व्यथे...

Submitted by ट्यागो on 29 June, 2010 - 03:42

कशी दिवेलागण करायची घरात
तू नसताना?
कुठल्या सवाष्ण तेलाने पाजळू
पांढर्‍या पायांच्या वाती?
तेवतील असंख्य समया
अन् पळेल देव्हार्‍यातला अंधार,
पण माझ्यातल्या जगण्याची ठिणगी
कुठून आणायची?

हे व्यथे, मी अपूर्णच...
कितीही नाकारलं तरीही.
ये, ये आणि पाजळव तुझी व्यथा
माझ्या व्यथेत...!
बघ दारातली तुळसही
सांडू लागेल मंजिर्‍या,
मग सुकल्या खोडाच्या जपमाळा ल्यायला
कितीसा वेळ लागेल?

गे व्यथे, ये तू,
ये आणि एकदा बघूदे तुला
निस्सीम, परिपूर्ण
ये व्यथे, कुठल्या कोन्यात दडलियेस युगानयुगे?
हे व्यथे...

मयुरेश चव्हाण, मुंबई.
२८.०६.१०, १९.४०.

गुलमोहर: 

स्त्री=व्यथा?
कि
व्यथाच?
पुन्हा असंख्य अर्थ...!!
(अरे एक कविता पचवायला चार दिवस कमि पडतात, जरा दमाने कविता पोस्टत जा!)

.

ओक्के. मित्रा, थोडा स्वीच ऑन स्वीच ऑफ करीत जा एक झाली की दुसरी कविता करतांना. म्हणजे मागील कवितेच्या वेळेच्या मनातल्या पडछाया निघून जातात. आणि मन, शब्द, भावना पुन्हा लख्ख होतात. आपल्याला घाई नाहीय.

व्वा!
छान व्यथा मांडलीत कि राव, कातरवेळेची, तिची, आणि पुढच्या आयुष्यातल्या तिचीच...

"मग सुकल्या खोडाच्या जपमाळा ल्यायला
कितीसा वेळ लागेल?"
हे भलंतच आवडलं.(डायरेक्ट सन्यास)

मि जाणलेला अर्थ, माझ्याच नजरेतूनः
हे व्यथे- जीवघेणं शिर्षक आहे, व्यथा प्रत्येकालाच असते, व्यथेवाचून जीव नै, जीवन नै!
आणी इथे कवि चक्क प्रेयसिलाच(तीलाच) व्यथा म्हणून संबोधतोय.(इथे जास्त फोड करायची गरज नाही, आपण जाणालच)
कवितेच्या वेळेवरुन हि कातरवेळेची असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात.
'कशी दिवेलागण करायची घरात
तु नसताना?
कुठल्या सवाष्ण तेलाने पाजळू
पांढर्‍या पायाच्या वाती?
तेवतील असंख्य समया
अन् पळेल देव्हार्‍यातला अंधार,
पण माझ्यातल्या जगण्याची ठिणगी
कुठून आणायची?'

इथे नायक आपली मनोव्रुत्ती/स्थीती स्पष्ट करतो, ती नाहिये, दिवेलागणेची वेळ झालिये, दिवे, समया लावून अंधार पळेलही, पण ह्रुदयातला अंधार (तीच्या नसण्यामुळे) कसा घालवायचा.
जी जगण्यातली उर्मी आहे(पुन्हा तीच्यामुळेच येणारी) कशी मिळवायची?
आणि हे स्पष्ट करताना रुपकंही छान वापरलीयेत, सवाष्ण तेल, पांढर्‍या पायांच्या वाती, ई.
इथे स्त्रीचं निव्वळ असणं, वावरणं हे त्याच्या लेखी पवित्र, ते तीच्याशीवाय कुणीच नाही करायचं,
ते पावित्र्य नसल्याने पुढच्या सार्‍या गोष्टी निरर्थक!!
इथे सलाम मयुरेश तुला!! छान रुजंवलंस!!!

हे व्यथे, मी अपुर्णच...
कितीही नाकारलं तरीही.
ये, ये आणि पाजळंव तुझी व्यथा
माझ्या व्यथेत...!
बघ दारातली तुळसही
सांडू लागेल मंजिर्‍या,
मग सुकल्या खोडाच्या जपमाळा ल्यायला
कितीसा वेळ लागेल?

इथे स्प्ष्ट जाणीव होतेय नायकाला त्याच्या अपुर्णत्वाची, खोट्या मान्यतांची, आणी
अगदी काकुळतीला येउन म्हणतोय, कि ये, आणी दोघांच्या व्यथा एक होउदेत.
यापुढे जाउन छान उदाहरण दिलेय,
बघ तु आलीस तर ती तुळसही बहरेल, आणी तिच्याच सुकल्या खोडांच्या माळा वापरायला फार वेळ नाही लागायचा. वाह! अवघ्या दोन ओळींत केवढा अर्थ... आयुष्यभराचा!

गे व्यथे, ये तु,
ये आणि एकदा बघुदे तुला
निस्सिम, परिपुर्ण.
ये व्यथे, कुठल्या कोन्यात दडलियेस युगानयुगे?
हे व्यथे...

हे गमंतीदार आणी थोडेफार दुर्बोध आहे? इथे नायक तीला ओळखतच नाहीये, असे म्हणतोय, तुला पाहुदे निस्सिम म्हणे, अन् कुठे दडलियेस तेही युगानयुगे?
कुणास जमेल तर सांगा.
धन्यवाद!
निवडक १० त नोंद केली आहे

छान रसग्रहण केलंस हो, झ्याकपैकी!!
आवडलं बुआ आपल्याला खूप!

सर्वांचा मनापासुन आभारी आहे!

कुठल्या सवाष्ण तेलाने पाजळू
पांढर्‍या पायाच्या वाती?

या ओळीवरून मीठ ओवाळून टाकावंसं वाटतंय.. सुरूवात देखील छानच. व्यथेशी चाललेलं संभाषण हा कन्सेप्टच मस्त.. तिच्याशिवाय दिवेलागण तरी कशी करायची ..वाह मयूरेश !!!

इथं जिंकलंस...

पण पुढे माझा खूप गोंधळ होतोय.. समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही समजलं.. व्यथेशी इतका यूज्ड टू झालेला नायक नंतर व्यथेला मला तुला एकदा बघायचंय असं म्हणतोय !

कि माझी आताची व्यथा जी आहे त्या ही पेक्षा पराकोटीची व्यथा या जगात आहे आणि तिचा सामना करायची शक्ती माझ्यात येऊदेत अशी ही प्रार्थना आहे ?

अनुजा,
हे व्यथे : प्रेयसील व्यथा म्हटले असते तर कवितेने जी उंची,खोली, व्यापकता इ.इ.गाठलीय ती नसती गाठता आली. हे व्यथेलाच व्यथा म्हटलंय. आपल्यातले बरेच जण आयुष्यातल्या व्यवहारांपलीकडे बहुधा विचार करू शकत नाहीत किंवा करत नाहीत (मी सुद्धा). पण काही कलावंतांना आपल्या अस्तित्वाबद्दल, आयुष्याच्या उद्देशाबद्दल प्रश्न पडत राहतात, मग सगळेच निरर्थक वाटत राहते .काहींना एक टोकाची अस्वस्थता, वेदना , दु:ख, हताशा, इ.इ. फीलिंग्जचे जणु व्यसनच लागते, त्यांच्या कविता त्या जाणिवांनाच उद्देशून असतात. मीनाकुमारीने लिहिलेय :
जैसे जागी हुई आंखों में चुभे कांच के ख्वाब
रात इस तरह दिवानों की बसर होती है |
गम ही दुश्मन मेरा गम ही को दिल ढूंढता है
एक लम्हे की जुदाई भी अगर होती है|

व्यवहारातल्या गोष्टीपेक्षा अशा लोकांना या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गोष्टींमधेच रमायला आवडते. प्रेयसीपेक्षा त्यांना कदाचित कविता जवळची भासते (त्या काही क्षणांत तरी..)
व्यथा कोण याचे इंटरप्रिटेशन सोडले तर सगळा अर्थ पटला. तुम्ही लिहिलाही तितक्याच सुंदर शब्दात.
अजूनही काही न सुटलेल्या जागा : वाती पांढर्‍या पायाच्या का? पाढरे पाय शुभ संकेत नक्कीच नाही. की 'तिच्या' 'सवाष्ण' तेलाने 'आपल्या' पांढर्‍या पायांच्या वाती पाजळू. माझ्या आयुष्यातली अशुभेही तुझा स्पर्श झाल्यावर जळतात पण प्रकाश देतात? हृदयातला अंधार पेक्षा जगण्याची ऊर्मी, कारण ही व्यथाच देते.

निस्सीम, परिपूर्ण , युगानुयुगे दडलेले हे कविमनाला पडलेल्या सनातन प्रश्नांबद्दल आहे. स्वत:च्या आयुष्याचे, विश्वाच्या अस्तित्वाचे प्रयोजन, जगण्यातली किंवा कशातलीही निरर्थकता ...किंवा तसेच काही....

अनुजा,एकाच चित्रात प्रत्येकाला वेगवेगळे आकार दिसू शकतात आणि दिसायला हवेत ना? तुम्ही दाखविलेल्या दिशेने माझी वाट सोपी झाली.

भरतजी हॅट्स ऑफ, खरच!
संधे, तुझं उत्तर मिळालेच असेल ह्या चर्चेनंतर.
अनुजा...!!
सर्वांचे मनापासुन आभार!

जबरीच आहे कविता.
भरत, खूप मस्त रे!...तुझं रसग्रहण जास्त पटलं. अनुजाचे पण मस्त....तसा अर्थही निघू शकतो.
मयुरेश, अभिनंदन एका उत्तम काव्यासाठी!

व्यथेवर कविता, हि कन्सेप्टच खुप आवडली.

पण मला वाटते पुर्ण रसग्रहण नाही तरी कवीने पुढील दोन ओळी समजवुन सांगाव्यात. I mean atleast the thought process behind it.
>>
कुठल्या सवाष्ण तेलाने पाजळू
पांढर्‍या पायांच्या वाती? >>

कुठल्या सवाष्ण तेलाने पाजळू
पांढर्‍या पायांच्या वाती?>>>

हे गद्यात कसं उतरवायचं?
हे खरेतर शक्य नसतंच, म्हणुन पद्यात आहे.
खरेतर कवितेचा अर्थ वैगेरे सांगणे मला जमत नाही, आणि मुळात आपले अर्थ आपणच घ्यावेत असा आमचा होरा!
इथे मी एवढंच सांगेन कि, मी हाकारतोय तीला(व्यथा). आमचं भेटणं/एकरूप होणं म्हणजे जळणंच समईसारखं. मग तिच्या नसण्यात मी म्हणजे वात तीही अशुभ( ती नसल्याने, तीची सवाष्ण/पवित्र छाया नसल्याने)
आणखीन बरंच काही आहे, पण जमत नाहीये नेमकेपणाने, असो, धन्स!!!!!

मयुरेश, अभिनंदन एका उत्तम काव्यासाठी!! भरतजी हॅट्स ऑफ!!!

आणखीन बरंच काही आहे, पण जमत नाहीये नेमकेपणाने, ह्म्म्म संवेदनशील व्यक्तिची व्यथा!!! व्यथेची व्यथा

हि कविता वाचताना आणि तिचा अर्थ समजल्यावर ..................

शब्द अपुरे पडतात.

वेगळ्याच विश्वाची आनि धाटणीची कविता...

अगदी अंतरंगात हळुवार उतरणारी

Pages