वस्तीस उतरले पक्षी

Submitted by जया एम on 20 June, 2010 - 11:47

वस्तीस उतरले पक्षी
फांद्या भाराने हलल्या
पानांना फुटले पंख
पंखांतून रात्री फुलल्या

वस्तीत रंगले पक्षी
झाडास सुरांचे घोस
पंखात भरारे वीज
पक्ष्यांना अडवू नकोस

वस्तीस राहिले पक्षी
रानातून हाका उठल्या
चांदण्या खुणावून म्हणती
पंखांवर रेषा कुठल्या

ते उडून गेले पक्षी
पंखातून रात्री झरल्या
मिटलेल्या चोचींमध्ये
कालच्या कहाण्या उरल्या

येतील कशाला पक्षी
झाडाला काळीज नाही
पंखांची ओली माया
पण मुळे शिंपुनी जाई

गुलमोहर: 

छान! Happy

वा!