नावात कायै (जुन्या मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

Submitted by दाद on 15 June, 2010 - 02:57

'अहो, नाव काय ठेवायचं?’
’कोणाला नावं ठेवायचीयेत आत्ता, या वेळी?’, जागृती आणि सुषुप्ती यांच्या सीमारेषेवर घोटाळणार्‍या नवर्‍याकडून उत्तर नाही पण प्रश्न. अशावेळी ’इश्श्यsss हे काय?’ वगैरे चालत नाही. नवरा प्रेमाच्या तळ्यात नाहीये, झोपेच्या मळ्यात आहे हे ध्यानात घे‌ऊन, हा देवाघरचा जीव वगैरे मनात न आणता, पुन्हा समाधीत जाण्यापूर्वीच गदागदा हलवून माणसांत आणावा लागतो.

’काय गं झोपूही देत नाहीस. आजच्या अख्ख्या दिवसात काय चुकलो असेन तर माफ कर, आणि तू एक सर्वांगसुंदर, सद्गुणी बायको आहेस... आता झो....घुर्रर्र’

शेवटच्या झोपू? मधला ’पू’ सुद्धा न म्हणता एकदम डायरेक्ट घोरण्याचा खर्ज.
बायकोला द्यायचा, डेली अहेराचा डोस.... हे सुंदर, सद्गुणी वगैरे वगैरे... हे नवीन शिकल्येत. पण मी पहिल्या दोनतीनदाच फसल्ये हं! आठ महिन्यांच्या गरोदर बायकोला सर्वांगसुंदर वगैरे म्हणजे... मला पहिल्या पहिल्यांदा छानच वाटलं.... बर्‍यापैकी जरा नवीन नवीन उपमा शोधायचे पहिले दोन्-तीन महिने. पण एकदा मात्रं सुरंगी न म्हणता सरंगा म्हणाले होते.... झोपेत.

आता नक्की मस्करी करतायत असं वाटतं. पण ह्यांचा नेम चुकत नाही, आपलं देणं दे‌ऊन टाकल्यासारखां म्हणून मोकळे होतात.

आता गत्यंतर नाही असं लक्षात आल्यावर कितपत उत्साहात नवरे कान टवकारतात, त्याच्या निम्म्या उत्साहाने ह्यांनी टवकारले.
’आ‌ई म्हणतायत...’ अशी सुरूवात केली मी, आणि चूक लक्षात आली. आपल्या ’आ‌ई’च्यापासून सुरू होणारं कोणतंही वाक्यं कोणत्याच नवर्‍याला ऐकू जात नाही हे विसरलेच होत्ये मी. तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

ह्यांच्या घराण्याला घराणं न म्हणता, ’घोराणं’ म्हणायला हवं. सगळेच घोरतात वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये! हा पोटातला पठ्ठ्या ही घोरत असावा आत्तापासूनच, काय सांगता येत नाही.

**********************************************************************************
'ए, मम्याचा फोन होता ऑफिसात. काय गं तुझ्या एकेक बहिणी, ऑ?’, आठव्या महिन्या... बायकोच्या आठव्या महिन्यात.... नवर्‍याला जितकं करवादता येतं तितकं करवादून हे म्हणाले.

’काय नाव सांगितलं?’, मी शांतपणे विचारलं.

’ऑ?, तुला कसं कळलं?’
’मला म्हणाली होती की नाव सुचलं की लग्गेच फोन करेन.... दुपारी वाजला होता मोबा‌ईल. मी आडवारल्ये होत्ये म्हणून कट केला. त्यामुळे तुम्हाला केला...’

’अगं बोर्ड मीटिंगमधून बोलावून आणलं तिने बाहेर. हे नाव काय तव्यावरची पोळी आहे, सुचल्या सुचल्या कळवायला? आणि नाव तरी काय....’

इथे मात्र करवादी चेहरा पुसून पळवादी दिसायला लागला.
’काय बरं ते?... आपलं हे... च्यायला नाव धड नव्हतं. एव्हढं नक्की आठवतय.’
’बरोबरय, माझ्या बहिणीने सुचवलय ना? पण नाव काय होतं?’, म्हटलं नाव महत्वाचं, टोमणे मग मारता येतील.
आमची मम्या ना, जरा साहित्यिक लिहित्ये-बिहित्ये... आमच्या ह्यांच्या घरी काही नाहीच साहित्यातलं. तेव्हा ह्यांना नसणारच ते ’धड’ वाटलं. तरी म्हणत होत्ये जरा काही वेगळं वाचा.

’....काही तरी चंची चंची सारखं होतं....’ हे अजून डोक्यातली चंच्या शोधतच होते.
’चंची?’, साहित्य इतकं पुढे (की मागे) गेलं असेल असं वाटलं नव्हतं. मध्यंतरी कुणीतरी भेटलं होतं पुण्याचं... की... गावात काय आहे म्हणा... पण त्यांनी सांगितलं की त्यांच्या ओळखीच्यात कुणाच्यातरी मित्राच्या ऑफिसातल्या कॅन्टीनच्या मालकाच्या भावाच्या मुलांची नावं- थेंब आणि ठिपका....! आपण एव्हढं हसायला नको होतं तेव्हा.... त्यांच्यासमोर. असेलही... चंची, अडकित्ता, थेंब, ठिपका, टीपकागद, खोडरब्बर, कर्कटक....

’हा, आठवलं’, मी कंपासमध्ये फिरून ये‌ईपर्यंत ह्यांच्या चंच्या, गाठोडी, उघडून झाली होती बहुतेक.
’तरी म्हणतो विसरेन कसा.... अरे सतरा सर्वर्सची नाव लक्षात रहातात तिथे एक साधं नाव... काय समजलीस मला? मी म्हणजे...’, नाव सोडून बाकी सगळं चाललं होतं.

’अहोsss..... नाव काय सांगितलं?’, आठव्या महिन्यात आवाज चांगलाच लागत असावा कारण फटकन नाव आलं.
’घडवंची!’

’ऑ?’, हा माझा. पूर्णं ड्रॉप्ड जॉ म्हणतात तस्सा. ’काय डोकं बिकं फिरलं का काय मम्याचं?’
’तेच म्हणतो मी. म्हणजे आत्ता तूच म्हणतेयस म्हणून ठीकय... मी म्हटलं असतं तर भांगडा नाचली असतीस’, हे!
अती हिंदी सिनेमे बघितल्याने, ’थयथयाट केला असतास’ हे सुचणं शक्यच नाही. म्हटलं ना, साहित्याचं काही नाहीच ह्यांच्याकडे.
’आणि शिवाय नाव, मुलाचं की मुलीचं ते सांगितलच नाही तुझ्या त्या शहाण्या बहिणीने?’ (पुन्हा हेच)

’म्हटलं ना तुम्हाला साहित्यातलं काही काही कळत नाही! अहो घडवंची हे मुलीचं नाव!’

’पण आपल्याला मुलगी....’ त्यांना तिथेच थांबवत मी म्हटलं, ’अहो, पण झालीच मुलगी तर? नाव नको का ठरवायला आत्तापासूनच?’
’पण ऍकॉर्डिंग टू अवर घराण्याज स्टॅटिस्टिक्स.....'

हे ह्यांचं एक पूर्ण ऐकून घ्यावं लागतं. ह्यांच्याकडे १४ सख्खे-चुलत भा‌ऊ आणि फक्त दोन बहिणी. त्यांच्यात पुन्हा तिसरा चान्स घेतलेल्यांमध्येच फक्त सगळ्या मिळून दोन मुली. त्यामुळे खात्रीच आहे मुलगाच होणार.

सगळा गोतावळा जमला की मुलींशी वागताना ह्या सगळ्याच भावांची कशी तंतरते, त्या सगळ्या कशा गुंडाळतात ह्यांना ते बघितलय. त्यामुळे मीसुद्धा विषय वाढवत नाही. मुलगी झाली की येतील ताळ्यावर, जातात कुठे!

’अहो घराणेदार...... घडवंची म्हणजे आडवं स्टूल.... त्याच्यावर पांघरुणं, गाद्यांच्या गुंडाळ्या...’, मला हे सांगतानाही कसतरीच वाटलं.

’हॅ! मुळीच ठेवू देणार नाही असलं नाव. एकवेळ पंचगंगा, वैनगंगा काहीही म्हणेन पण...’. बरोब्बर! हे कोल्हापूरकडचे असल्याने रागावले की अगदी अस्सल ओरिजिनल संदर्भ येतात.

’अरे घडवंची नाही, ’प्रत्यंचा’ असेल. तुझं मराठी कच्चंच होतं नाहीतरी’, सासूबा‌ई अगदी देवासारख्या धावून आल्या, ’आमच्या भिशीत आहेत ना तिच्या सासूबा‌ई! त्यांनीच सुचवलेलं. म्हटलं काही नको. लग्नं झाल्यावर दोन्ही घराण्यांना अगदी ताणून धरेल’, इति सासूबाई... माझ्याकडे न बघता.

नाही म्हणायला रामायण आणि महाभारत बघितल्याने प्रत्यंचा तेव्हढी कळली ह्यांना.
’हिच्या बहिणी सुचवणार! क्यायच्या क्याय नावं एकेकतरी... प्रत्यंचा! मग मुलाचं नाव काय? 'भाता'? ’, हे.

मला तरी ’बाण’ सुचला असता, पण हे म्हणजे कमाल आहेत.

'हे बघ तू उगीच माझं डोकं खा‌ऊ नकोस नावावरून. त्याला बघितल्यावर मला नाव सुचणार आहे’ असं म्हणून ह्यांनी पूर्ण विराम दिला त्या विषयाला. स्वत:ला कुणी ऋषी-बिषी वगैरे समजतात की काय! त्या उत्तर रामायणात वसिष्ठ ऋषींनी नाही का, लव-कुशाची अशीच ऍट रॅंडम नावं ठेवली? नुसती त्यांच्या चेहर्‍याकडे बघून? तसंच असावं बहुतेक.

स्नेहा हाक मारली तर अर्धी बिल्डिंग ’ओ’ दे‌ईल म्हणून ते नाही.
ऋचा म्हणायला कठीण,
वाणी म्हटलं की कोपर्‍यावरचा नुसत्या बनियनवर वावरणारा प्राणी आठवतो,
ऋषिन तर अनेकवचनी नाव वाटतं (हे) म्हणे,
बरीचशी नावं नात्यातच वापरली गेलीत म्हणून नको,
जा‌ईली, जु‌ईली, सायली.... नेमकी टॉमबॉय निघाली पोरगी तर पचकाच.
दोन अक्षरी अगदीच लहान,
तीन अक्षरी चालेल पण जोडाक्षर नको,
चारपेक्षा जास्तं अक्षरं म्हणजे श्वास संपेल म्हणतानाच,
तो किंवा ती बोबडं बोलणारच (दोन्ही घरात अनुवंशिक आहे ते) त्यामुळे सुरुची, श्रीरंग वगैरे नावं बाद.
नट्-नट्यांची नावं तर मुळीच नको ह्या एकाच मुद्द्यावर ह्यांचं आणि माझं एकमत.
तरीही, ’शिल्पा शेट्टी... आपली... आपलं नुस्तं शिल्पा छानय की’, इती बाबांच्या क्लबमधले दाभोळकर, वय वर्षे बासस्ठ.

उगीच देवादिकाचं वगैरे मुळीच नको-इती पुढारलेल्या आज्जेसासूबा‌ई...
जरा देवा-बिवाचं काहीतरी असेल असं ठेवा गं- माझी आ‌ई!

’दूर्योधन ठे‌ऊया?’, शेजारच्या काण्यांचा तेजस. ह्याला कायम व्हीलन्स आवडतात. ’अरे ते कठीण नाही का म्हणायला?’ हे तरी ग्रेटच आहेत.

’मग शकुनी?’, तेजस!

’ए, हिरोशिमा किंवा नागासाकी कसं वाटतं?’, माझी भावजय. हीने नुकतीच जपानी कंपनीत नोकरी धरलीये, ’असल्याच नावांची फॅशन येणारय ते बाळ वयात ये‌ईपर्यंत.

’मग तोपर्यंत काय? सुशी म्हणूया की साशिमी?’ माझा भा‌ऊ म्हणजे एक जबरी खोडरब्बर आहे. ती बोलेल ते खोडून काढण्यात पटा‌ईत, एकदम.

मैदानी खेळाचा तास असल्यासारख्या, बाळाने मारलेल्या लाता, हात लावून बघितल्यावर त्याचं नाव ’बेकम’ ठे‌ऊया ही अमुल्य सूचना भाच्याची, ’आत्ते, बेंडिट ला‌ईक बेकम बघितलायस ना?’ कमरेवर हात ठेवल्याशिवाय सरळ उभं ही रहाता येत नाही तिथे ’बेंड इट’ काय नाहीच!

’तू काही काळजी करू नकोस. त्याला बघितलं की आपल्याला नाव सुचेलच...’ आता भा‌ऊ!
मग तर मला काळजीच काळजी लागली. हे आणि तो एकत्र झाले की काहीतरी प्रचंड गोंधळ होतोच होतो.

*****************************************************
'केम, सलाकाबेन? केम छो? सारू?’
असेल बिचार्‍याचा रोख निव्वळ तब्येत कशी विचारण्याचा. पण नववा महिना उलटलाय, उन्हाळा हू म्हणतोय, नवराही कोणत्याही तक्रारीला आता फक्तं ’हू’ च म्हणतो. त्याची नव्याची नवला‌ई पाचव्यातच संपलीये.... नवव्यापर्यंत माझ्याहीपेक्षा टेकीला आलाय. असं असताना इतक्या साध्या प्रश्नातही वेगवेगळे भाव ऐकू यायला लागतात.

हा गुज्जूभा‌ई, भावाच्या, सम्याच्या ऑफिसातला, जिममधला टेटेचा पार्टनर, परेशभा‌ई.
देह सावरून बसल्याचं जमेल तितकं दाखवत मी प्रयत्नं पूर्वक, ’सारू सारू’. म्हटलं.
मनात मात्रं ’मारू?’ आलं. खोटं कशाला बोला? हिंसक विचार मनात आणायचे नाहीत असं आ‌ईने, सासूबा‌ईंने सांगून सांगूनही, हल्ली विसरायला होतच होतं.

’केटला? दो?’, मला ’दो’ म्हणजे दोन कळणार नाही म्हणून दोन बोटं (दोन्ही बोटात अंगठ्या) माझ्यापुढे नाचवत विचारलं.
वेडपटच दिसतोय! मी, ’नही नही, एकच छो, छू... छे’ असं गडबडीने सांगितलं. छ्छे! ह्यांच्या क्रियापदांचा घोळ कळत नाही, बा‌ई.

’ऑ? अज्जून आठ महिना बाकी छे? तमे तो, आपणी गुजराती बायडीच्याबी पक्षी मोटा मने फुढे....’

त्या ’दोन’ आकड्याचं ’महिने’ हे यूनिट आत्ता कळल्याने माझ्या कानातून धूर यायचा बाकी होता, मला आपलं वाटलं की ’ट्विन्स' आहेत का विचारतोय.

माझ्या ’छा छू’ ने काय ते ओळखून तो मराठीवर उतरला.
’समीरभाय... ते तुमचा भाव सांगितला आमाला नावाचा गडबड’. ह्या सम्याला ना... बघतेच आता.
’अरे, काय वांदा नाय. आत्ता नाव करून देते. एक पेड हाय? न्हानाबी च्यालेल’.

पेड? झाड? काय असेल, देवाचं बिवाचं म्हणून मी आपलं ’पिछेकी बाजूमे, है, एक छोटासा तुळशी का रोप...’ वगैरे म्हणायला जाणार इतक्यात त्याने टीपॉयच्या खालच्या खणातलं पॅड घेतलं. हसावं का रडावं मला कळेना.

’हा, तुमचा नाव? स ला का’, परेशभा‌ई.
’श ला का’ माझा क्षीण प्रयत्नं
’अने, नितीनभायचा नाव, नी ती नभाय’, परेशभाय.
(हं?, मी)

आता हा पत्रिका मांडतोय की काय! तो पर्यंत आ‌ईने आतून चहा आणि खायला आणलं. चहा बशीत ओतून एका दमात संपवला. ’आमी खेलून ज्याला की स्नेक खातो’...

’ऑ?’, आ‌ईच्या हातून ट्रे पडणारच होता. चांगली चकली आणलीये तर हा साप खाणार म्हणतो.... मी गुजरातीत शहाणी झाले होत्ये एव्हाना.

’आ‌ई, ’स्नॅsssक’ खेळून आल्यावर खाणार म्हणतोय’, मी जमेल तितका "स्नॅ"वर जोर देत म्हटलं.

’त्येंन्ला, तुमच्या आ‌ईंन्ला, ऐकू कमी येते काय आजकल?’ आपल्यामते कुजबुजत विचारलं त्याने. आता त्याला काय सांगणार! त्याचा प्रश्न मलाच ऐकू आला नाही असं मी दाखवलं.

’ओक्के' मला ताब्यात घेत परेशभा‌ई म्हाणाला, ’निकिताशा कसा वाटते?’
’कसला ताशा?’, आ‌ई.
’ताशा नही, आँटी, निकीताशा, नी की ता शा’, ओरडून बोलत परेशभा‌ई.
’नको, म्हणून सांग गं. आत्ताच प्लेटिंग करून घेतलीये आपली शेगडी.’, इती आ‌ई. तिला तो गॅसच्या शेगडी बद्दल काही सांगत असल्यासारखा वाटला, बहुतेक.

’निकिताशा ’नको गं’ मंग, तनीस कसा हाय? तनीस?’, त्याला आ‌ईचं नको बर्रोब्बर कळलं.
’तनीस?’, मी.
’आमच्यामन्दी असते ना, मनीस? तसाच. हे नवीन नाव हाय, एकदम ब्रेंन्ड न्यू’, परेशभा‌ई
(हा, हा तनीश! पण आमची नावं कशा टांगली पेडवर?)
’काय प्रकास पडला काय? आ? ते तुमच्या आनि नितीन्भा‌ईच्या नावाचे कुटले कुटले अक्षर घे‌ऊन बनवले नाव आपण. अरे, तुमचा आनि नितीनभा‌ईचा डोकरा, ते कळेल नाय समद्याला? तनीस! अरे एकदम फस्क्लास हाय, ठे‌ऊन टाका’, परेशभा‌ई.

आत्ता मला गोम कुठेय ते कळलं.

माझ्याकडून काही पावती मिळत नाही म्हटल्यावर, ’आमचा गुजराती नको, तर नको. बरां ते ’तिलक’ कसा वाटत्ये?’

वेगळच आहे नाही? चांगलं दिसेल. तिलक म्हटलं की कसं शुभकार्यं पंचारती, औक्षण वगैरे मंगल डोळ्यासमोर येतं. हरकत नाही.... असा विचार करेपर्यंत तो म्हणाला, ’ते तुमच्या घाटी लोकाऽन्च्या होते ना लीडर? लोकमान्य तिलक? होत्ये ना? अरे आमचा बी हिस्टरी चोख होता. त्यांचा नाव. आता ह्येला तरी तुमी नाय म्हणु शकत नाय, काय? ह्ये नाव ठेवाच’

तो निघून गेल्यावर बाकी सगळे हसत होत्ये. मला हसू ये‌ऊनही जोरात हसताही येत नव्हतं.
इतकावेळ तिथेच खेळणारा भाचा (तो ईंग्रजी मिडियम मध्ये शिकतोय तिसरीत आणि सेकंड लॅंग्वेज मराठी आहे) अजून दोन नावं घे‌ऊन आला, हीच आयडिया वापरून्- काशी आणि शनी.

*****************************************************

'बारश्याची उगीच घा‌ई नको, बाळ चांगलं खुटखुटीत हो‌ऊदे, तिलाही आराम हो‌ईल. मग महिन्याभराने बघू", आज्जेसासूबा‌ई (पुढारलेल्या) म्हणाल्या. त्यांच्यापुढे बोलण्याची कुणाचीच टाप नसत्ये आणि तसा उपयोगही नसतो, त्यांना ऐकू कमीच येतं.

चांगला चारेक किलोचा चा गड्डू, अजून काय खुटखुटीत व्हायचा होता कोण जाणे, मी ही बरीच होत्ये. पण आमच्या पथ्थ्यावरच पडलं होतं म्हणा लांबलेलं बारसं. चांगला महिन्याभरानंतरचा मुहूर्तं धरला.

बघितल्याबरोब्बर नाव सुचणार आहे म्हणणारे वडील आणि मामा दोघांचीही बोलती बंद होती. म्हणजे, ’त्याच्या आयुष्यभर आम्ही आणि लोक त्याला सरळ हाक मारतील’, असं नाव सुचत नव्हतं त्यांना.

मला आणि भावाला प्रचंड दाट जावळ (लहानपणी) असल्याने पहिल्यांदा बघणार्‍या आ‌ई, मावशी बाळाकडे बघून "टकलू गं टकलू" म्हणत होत्या, पण सासूबा‌ईंच्या समोर नाही.

माझ्या मोठ्या दिरांचे दोन्ही मुलगे झीरो कट मारूनच आलेले त्यामुळे सासूबा‌ईंच्यामते, "ह्याला काय सुर्रेख जावळ आहे नाही?" असा गोंधळ होता.

’तेल लावताना जरा जरा ओढलं तर नाक ये‌ईल, वर’. माझ्या भावाच्या जन्मताच असलेल्या फत्तेलष्कर नाकाची रेघ अशी तेल लावून लावूनच वर काढलीये असं आ‌ईला अजूनही वाटतं.

’त्यासाठी ह्याला कमीतकमी वीस वर्षं तरी तेल लावून घ्यायला हवं’, असं भावाचं मत.

तर ’चेहर्‍याच्या आकाराला बरीक शोभतय हो, नाक’, असं नाक उडवत म्हणताना सासूबा‌ईंनी त्याला इतका जवळ धरला होता की चेहरा आणि नाक सोडल्यास उरलेलं डोकं त्यांच्या दृष्टी‌आड होतं. त्यामुळे ’बरीकच बरं’ म्हणायचं.

तुळतुळीत तेल घातलेलं मोठ्ठच्या मोठ्ठं डोकं, कायम इकडे तिकडे भिरभिरणारे मोटारीच्या दिव्या‌इतके गोलच्या गोल मोठ्ठे डोळे, अगदीच फताडा हसला तरच दिसणारी उजव्या गालावरची खळी, हातापायावरच्या वळकट्यांसह सगळाच अगदी गोल गोल.

महिन्याभरातच कितीही गच्च बांधलं तरी हाताचे झेंडे बाहेर काढण्याची ट्रिक जमलेली त्याला. त्यामुळे मोकळे हात आणि बांधलेले पाय हलवताना तो मरमेड सारखा दिसतो असं भाच्याचं मत.

झणझणीत आवाज आणि भूक लागल्याचा आहे त्यापेक्षा जरा जास्तच कांगावा वगैरे मुळे त्याला नावं बरीच ठेवली गेली....
तेल लावायला येणारी बा‌ई त्याला भिमुश्श्येन म्हणत होती.
सासरे आणि त्या माळेतली सगळी पुरुषमंडळी नुसतच, ’अले अले...’.
माझे बाबा, गुंजा (छोट्या, नाजुक, गुंजांच्या बियांचा काही संबंध नाही. हा ’गुलाबजाम’ चा शॉर्ट्फ़ॉर्म आहे)
सासूबा‌ई, ’बल्ल्या’- बल्लवावरून असावं.
माझी मोठ्ठी आत्या, ’गट्या’,
मोठी काकू, ’गोट्या’
धाकटी काकू, ’भिल्ला’
मोठ्ठ्या जा‌ऊबा‌ई ’गंडोला’
मोठे दीर, ’गोबी’ आणि माझे पुतणे, ’गब्बू’

’हे’ म्हणजे काही नव्हेच, ’काय सुचत नाहीये नाव. गडी अंगाने उभा नि आडवा खरा. दाजिबा!’, (काहीतरीच)
मी आपलं त्यातल्या त्यात ’गुड्डू’ म्हणत होते. जमेल तसं नावांचं संशोधन चालूच होतं.

’अहो, रूपक ठेवूया का?’, माझ्या संगीतातल्या ज्ञानाचं जरा कौतुक बिवतुक आहे घरात सगळ्यांना. आणि आता नावाची चर्चा राजरोस सगळ्यांच्या, अगदी त्याच्याही समोर चालत होती.

’अगं,’ कधी नव्हे ते मला समजावत गडबडीने हे म्हणाले, ’माझ्यावर गेला असता तर ठीक होतं.’
’तुमच्यावर?’, मला काय बोलावं सुचेना, ’तुम्हाला आरत्यासुद्धा तालात म्हणता येत नाहीत. रूपक तालाचं नाव म्हणतेय, मी’
’अस्सं होय! मला वाटलं की रूप, रंगाबद्दल म्हणतेयेस.... ओ sssss आलोच!’ कुणीही हाक मारत नसताना हे बाहेर पळाले. (विणायच्या सुया फेकून मारता येत नाहीत... भोसकल्या तरच लागतात जरातरी, बहुतेक!)

आमचा संवाद ऐकत उरलेला मेथीचा लाडू तोंडात कोंबत भा‌ऊ म्हणाला, ’रूफक? रूफक नोको... आढाचौटाल किंवा फंचोम सोवारी बघ....’
’रूपक नको आडचौताल किंवा पंचम सवारी.....!’ जरा चपळा‌ईने, झटकन उठून दणकाही घालता आला नाही मेला. माझाच आडा-चौताल झालाय त्याला कोण काय करणार!

मुलगा म्हटल्यावर फुलाबिलाची नावं बादच होती. आणि गुड्डूकडे बघून झेंडू किंवा सूर्यफूला शिवाय सुचलं नसतं कुणाला दुसरं काही.

त्यातल्यात्यात आ‌ईने पत्रिका वगैरे बनवून अक्षर ’क’ आल्याचं सागितलं. जरातरी दिशा मिळेल आता नावं शोधायला... पण ’क’सचं काय!

कुणाल्- अगदी जवळच्याच नात्यात होतं ते नाव आणि त्याचं काण्या करतात सगळे

कार्तिक्-गणपतीचा भा‌ऊना? त्याच्या देवळात बायकांनी जायचं नसतं वगैरे? नकोच्- इती भावजय.

कौस्तुभ्- जोडाक्षर आहे आणि त्याचा शॉर्ट्फॉर्म कोत्या करतात सगळे.

कृच्छ- मावस सासूबा‌ईंची सजेशन, ह्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे (म्हणे). जोरात शिंक आल्यावरही दाबावी लागली तर येणार्‍या (तोंडातून) आवाजासारखं वाटलं नाव. सासूबा‌ई परस्परच नको म्हणाल्या.

कीचक किंवा कंस्- बरोब्बर! काणेंचा तेजस, व्हीलन्स आवडतात तोच.

कचरा-लगानचा प्रभाव न उतरलेला भाचा. त्याच्या मते ’कचरा रे कचरा रे तेरे काले काले नैना’ हे गाणं लगानमध्ये जास्तं चांगलं दिसलं असतं. त्याला समजवण्यात अर्थ नसतो.

’किंकोमारा’- भावजय. हा म्हणे जपानमधला प्रसिद्ध सुमो पहलवान, ह्याच्यावर पोरी (जपानी) मरतात.

’क्षितीज’- हा माझा चुलत दीर मायबोलीवर (का कुठेसं) लिहितो. ’देवनागरीत टायपायचं झालं तर के ने सुरूवात होते ना? मग?’ हा खुलासा. ह्याचा तिथला आयडी ’क्ष’ आहे, म्हणे!

कैटभ्- ह्यांच्या बंगलोरमधल्या टीमलीडरने सुचवलेलं. सा‌ऊथ इंडियन आहे ती. मला उगाचच ते कुणा राक्षसाचं असल्यासारखं वाटलं.

कैवल्य- मला आवडलं होतं नाव पण ह्यांचा आक्षेप, ’हा दिसतोय आत्ताच भानू तालमीच्या आखाड्यातून आल्यासारखा. उगीच काय, कैवल्य? हे म्हणजे आमच्या आ‌ईला अबोली म्हणण्यासारखं...’ मला पटलंच अगदी.

किरण, कांचन्- मुलीची असतात ना ही नावं? मग नको. अगदीच काही सुचलं नाही तर ठेवायच ह्यातलच एक. मग काय करणार?
*****************************************************

'बाळसं धरलय नाही?’ हे माझ्याकडे की गुड्डूकडे बघून ते माहीत नाही पण बारशाला जमलेल्या जवळ जवळ प्रत्येकाच्या नजरेत दिसत होतं.

बाळाच्या कानात नाव सांगायला चुलत आत्याबा‌ई आल्या होत्या मुद्दाम, हुबळीहून. त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव कांचन त्यामुळे त्या उठल्या की मगच त्यांच्या कानात सांगायचं आणि त्यांना विचार करायला कशीतरी संधी न देता... त्यांनी लगेच बाळाच्या कानात असा बेत होता.

भावाने जसराजजींचा दिनकी पुरिया लावला होता.
दुपारच्या चारेक वाजता आधीचं ओटी भरणं वगैरे सोपस्कार झाले. आता बाळाला पाळण्यात घालायचं. मला आपली उगीचच हुरहुर वाटत होती. काही मनासारखं नाव मिळालेलं नाही. मुलगी असती तर अजून एकदा तरी नाव बदलता आलं असतं तिला. ह्याला म्हणजे काही चान्सच नाही... वगैरे वगैरे मनात विचार येत होते. माझ्या चेहर्‍याकडे बघून हे सुद्धा मला जरा धीर देत होते.

इतक्यात त्याच सीडीचा पुढला ट्रॅक लागला... आणि सुरूवातीलाच पंडितजींनी सांगितलं... राग केदार आणि मी हरखून ह्यांच्याकडे बघितलं!

समाप्त.

गुलमोहर: 

केदार माझ्या मुलाचं पण नाव आहे. आणि ते आम्ही ठेवलं होतं कारण तो ज्योतिबाच्या यात्रेदिवशी किंवा हनुमानजयंती दिवशी (दोन्ही एकाच पौर्णिमेला - चैत्रपौर्णिमा -असतात)जन्मला. मी समीर ठेवायचं म्हणत होतो पण माझ्या वडिलांनी केदार (केदारलिंगातला केदार) सांगितले आणि तेच फायनल केले. Happy

बाकी लेख मस्तच. खुसुखुसु हसायला होतं. Happy

थँक्यु थँक्यु दाद..

तुझा सर्वात जास्त आवडलेला लेख.. Happy धम्माल आहे. पहिल्यादा ऑफिसमधे वाचला तेव्हा जे काही हसले ते पाहून बॉस केबिनबाहेर आला होता. (त्यांच्या मुलाचं नाव केदार असल्याने त्याना लेख फारच पटला पण!!)

जबरदस्त, मजा आली! Lol
माझ्या मुलाच्या पत्रिकेत 'ख' अक्षर आले होते. त्यावरुन माझ्या घरात 'आम्ही सांगतच होतो या पत्रिकेत वगैरे काही अर्थ नसतो' ही पुरोगामी कॅसेट पुन्हा सुरु झाली, आणि बायकोच्या घरी 'खंडोबा' नाव चालेल का यावर खल सुरु झाला. मुलगा दिसायला बापावर गेलाय म्हणून वागायलाही तसाच असेल त्यामुळे 'खडूस' नाव ठेवा हे श्वशुरगृहीच्या काही मंडळींचे मत चिंत्य होते. शेवटी मी व्हेटो वापरुन 'सतेज' नाव ठरवले!

मस्तय, खूप मजा आली वाचताना. सध्या आमच्याकडेही अशीच चर्चा रंगतेय, बहिणीच्या होणार्या बाळाच्या नावावरुन.

धम्माल धम्माल लिहिलंय.... मगाशी तुझ्या ''मंगल'' ला वाचून घळाघळा रडले आणि आता हा लेख वाचताना खो खो हसत होते नुस्ती! Happy ब्येष्ट!

धन्यवाद... माझ्या लेकाचं नाव खरच केदार आहे. ह्यातल्या बर्‍याचशा गोष्टी खर्‍या आहेत..... अन बर्‍याचशा काल्पनिक. कोणत्या काय ते समजुन घ्यायचं Happy
असो... शर्विलक हेही नाव कुणीतरी सुचवलं होतं.
आगाऊ, "खंडोबा" आवडलं.... Happy
कठिणै नावांचं.

इतक्यातच sunday times मध्ये नावांबददलचा लेख वाचला ( त्यातले काही भन्नाट नावं आहेत, ते इथे टाकायला हवं) अन या लेखाची आठवण झाली.. शोधून वाचावं म्हणत च होते , तर आता हा नवीन माबो वरच दिसला... परत एकदा खूप खूप हसले...

उगाच काही तरी सांगू नकोस हा..! खर सांग केदार ठरलच होतं नं तुमचं! आणि प्रसंगोचित म्हणून तुम्ही राग केदार लावला होता ना सिडी वर? Wink

छान आहे!

खरच माझ्या हाती असट तर काही तरी भन्नाट शोधलं असतं "परेस" सारखं! Proud

’तेल लावताना जरा जरा ओढलं तर नाक ये‌ईल, वर’. माझ्या भावाच्या जन्मताच असलेल्या फत्तेलष्कर नाकाची रेघ अशी तेल लावून लावूनच वर काढलीये असं आ‌ईला अजूनही वाटतं.>>> आमच्या कडे ही असंच :).. रडून झाल्यवर अगदी खो खो हसवलस.. मज्जा असते नै नाव शोधण्यात .. सहज सुंदर लिहिलंय..

जायले... नावाच्या बाबतीत बर्‍यापैकी "संवाद" झाला होता. बघितल्यावर सुचणारय वगैरे तुझ्या भाओजींचं... खरच म्हणणं होतं. बाकी चावटपणा माझाच गं... अगदी "मम्याने सुचवलेलं प्रत्यंचा" सुद्धा Happy

mast......

Pages