निर्धार

Submitted by नितीनचंद्र on 8 June, 2010 - 01:13

काळ्या रंगाची वायल,मॅचिंग सर्वकाही, माफक परंतु उठावदार असा मेकअप करुन रुपाली चिंचवड - पुणे मार्गाने जाणार्‍या बसेसच्या १६ नं बस स्टॉपवर उभी होती. लोक तिच्या सौंदर्याकडे तर ती लांबुन येणार्‍या बसकडे पहात होती. आपली बस तिने लांबुनच ओळखली आणि आट्यापाट्या करायला पोझिशन घेतली. बस बसस्टॉपवर थांबवायची नसते, एकतर ती खुप पुढे नाहीतर मागे थांबवयची हा पि. एम. पी. एम एल. वाल्यांचा अलिखीत नियम आता तिला पाठ झाला होता. स्टॉप वर सकाळच्यावेळी उभे राहुन लोकांना मार्गदर्शन करणे, बस योग्य जागी थांबवणे, म्हातारे, लेकुरवाळ्या बायका यांनी चढायचा आधीच बस सुरु होऊ न देणे इ. कामे सोडुन प्रवाश्यांनी बसायच्या जागेवर बसनियंत्रक मख्खपणे बसुन होता.

आट्यापाट्या करुन तीने बसमधे प्रवेश मिळवला. आज अपेक्षा अशी होती की किमान महिलासाठी राखीव असलेल्या जागांवर बसायला मिळेल. पण ही अपेक्षा फोल ठरली बहुदा या आधीची बस नेहमी प्रमाणे न आल्यामुळे आत्ताच्या बसला गर्दी होती. अनेक पुरुष उभे होते. तिच्यासारख्या नोकरी करणार्‍या स्त्रिया कोणीच उभ्या नव्हत्या. महिलांच्यासाठी राखीव जागांवर काही पुरुष बसले होते. काही वयस्कर होते त्यांना उठवणे बरोबर वाटत नव्हते. काही तरुण आपल्याला कुणी या जागेवरुन उठवेल या जाणिवेने मुद्दाम खिडकीबाहेर पहात होते.

ती जेव्हा नवीन नवीन प्रवास करु लागली तेव्हा तीला मोठे आश्चर्य वाटले होते. स्त्रिया राखीव जागेसाठी भांडत का नाहीत. तिने एकदा प्रयत्न केला तेव्हा एका पुरुष प्रवाश्याने ही भाषाच आपल्याला समजत नसल्याचा आव आणला. तिने सर्व भाषात वर लिहीलेली सुचना भाषांतर करुन दाखवली पण तो हललाच नाही. जेव्हा तो उठला तेव्हा ती बरिच पुढे सरकली होती. आता त्या जागेवर पुन्हा पुरुषच बसला होता. उतरताना त्या माणसाच्या डोळ्यातले छ्द्मी भाव तिला बरच काही सांगुन गेले.

एक महिन्यापुर्वी तिने मॉडेल कॉलनीतल्या एका उत्तम उच्चभ्रु ब्युटीपार्लर मध्ये नोकरी धरली होती. पगार फारसा नव्हता. अपेक्षा येव्हडीच होती की सहा महिने वर्षभर नोकरी केल्यानंतर या व्यवसायाच्या सगळ्या खाचाखोचा माहित व्हाव्यात. आपला स्वताचा व्यवसाय सुरु करावा. रुपालीच्या सासर्‍यांनी जाग विकत घेऊन घर बांधल होत. घराच्या पुढच्या भागात दोन दुकाने काढली होती. मागच्या बाजुला व वरती पहिल्या मजल्यावर ती, नवरा, सासु , रिटायर्ड सासरे आणि तिचा मुलगा रहात होते. नवरा एका कंपनीत सेल्स इंजिनीयर होता. साधारण महिन्यात पंधरा दिवस तो फिरतीवर असायचा. सोलापुरला तिच माहेर होत. लहानपणापासुन तिला मॅचिंग, मेकअप याची आवड असल्यामुळे बारावी नंतर तिच्या इच्छेने तीने ब्युटीशियनचा कोर्स केला. तो होताच स्थळ सांगुन आला आणि प्रॅक्टीस राहुनच गेली.

लग्न झाल्यावर सहा महिन्यातच बाळाची चाहुल लागली आणि पुढील दोन वर्ष त्याच्या येण्यात व नंतर पहिला वाढदिवसापर्यत गेली. आता तिला प्रकर्षाने आपल्या करीयरची आठ्वण होत राही. घरात सासु, सासरे, नवरा यांचा जेव्हा तिच्या कल्पनेला होकार आनंदाने मिळाल्यावर पुढचा टप्पा तिने वेगाने गाठला.

ती जेव्हा अरुणाज ब्युटीपार्लर अ‍ॅड स्कुल मधे आली तेव्हा अरुणाने तीला लगेचच निवडले. तीला जेव्हा विचारले की तु इथे का आली आहेस तीने सांगितले की तीला स्वताचे ब्युटी पार्लर सुरु करायचे आहे. तिचा आत्मविश्वास, तिचे सौंदर्य आणि तिचे विचार पाहुन अरुणा खुष झाली होती. हवे तितके दिवस तु माझ्या कडे जॉब कर मी तुला फार पगार देऊ शकणार नाही पण स्वताचे ब्युटीपार्लर सुरु करण्याचा आत्मविश्वास मी नक्की देऊ शकेन.

रुपाली एका महिन्यात रुळली. पेडिक्युअर, फेशीयल, हेअर कट, वॅक्सीग, आयब्रो बघता बघता सर्व गोष्टी तिने आत्मसात केल्या. जेवताना ती हळु हळु अरुणा यासाठी चे मटेरीयल कुठुन आणते, त्याचे भाव काय असतात. फोनवर काय विचारणा होते. अरुणा काय उत्तर देते. नववधुच्या मेकअपला आधीपासुन काय तयारी करावी लागते. नववधुचा शालु कोणत्या रंगाच असेल तर कसा मेकअप चांगला दिसतो. चेहरा गोल असताना नववधुची हेअरस्टाईल काय असावी, नेलपेंटस लिपस्टिकच्या शेड्स एक ना दोन. रोज नव शिकताना उत्साह वाढत होता.

पहिल्याच आठवड्यात अरुणाने तिला तिच्या पार्लरमध्ये साडी घालुन काम करणार का असे विचारले. त्यावर तिने लगेच रिअ‍ॅक्शन न देता घरुन चांगले ड्रेसेस पार्लरमधे आणुन ते चेंज करुन एप्रन घालुन काम सुरु करुन धक्का दिला. पण तु घरुनच का ड्रेसेस घालुन येत नाहीस या प्रश्नावर तिला उत्तर द्यावेसे वाटत नव्हते. ती गोड हसली आणी उत्तर द्यायचे टाळले. बाकी काही अडचणी नव्हत्या तरी जिन्स सोडाच पंजाबी सुट तिच्या घरी सुट होत नव्हता हे उघड सांगणे अवघड जात होते.

जेवताना अरूणा म्हणाली " रुपाली, स्वतःच पार्लर सुरु करायच म्हणतेस म्हणुन सांगते. ब्युटीशियन ही मॉडर्नच हवी अनेक स्त्री ग्राहकांचा अट्टाहास असतो. तिचे कपडे, तिची हेअर स्टाइल हेच मोठे भांडवल असते. तु हा विचार करुन ठेव. दुसर अस तुझे स्वतःचा फिटनेस, अरोग्य हे सुध्दा तितकेच मह्त्वाचे. तुझच वजन वाढल, चेहर्‍यावर डाग आले किंवा पिंपल्स दिसले तर तुझ कौशल्य कितीही चांगल असल तरी ह्या व्यवसायात त्याचे वाईट परीणाम दिसतात.

अरूणाने आंबट शौकिन पुरुषांचे फोन कसे परतावयाचे याचेही प्रशिक्षण रुपालीला दिले. फ्लॅटमधली ब्युटी पार्लर्स म्हणजे काही मसाज पार्लरस नव्हेत हे सांगताना संयम आणि स्पष्टपणाची आवश्यकता असते. हे पार्लर फक्त स्त्रीयांसाठी आहे हे सांगताना काय शब्द वापरायचे ह्याचे ही प्रशिक्षण तिला मिळाले.

स्वताचा व्यवसाय सुरु करण्याच्या दिशेने तिची वाटचाल तर योग्य चालली होती. हा प्रवास फक्त वैतागवाडी वाटायचा जाताना तेच येताना तेच. आजही तेच घडत होत. सहप्रवाश्यांच्या नुसत्या नजराच नाहीत तर सहेतुक धक्के खाताना नुसता राग राग व्हायचा. आज तिने कोंडी फोडायची म्हणुन जरा आवाज वाढवला.
" अहो उठा ही स्त्रीयांसाठीची राखीव जागा आहे. "
" बर मग " तो सहप्रवासी शांतपणे उदगारला.
" नाही उठलात तर मी तक्रार करीन"
" फक्त माझीच का ? या डाव्या बाजुला बरेच लोक बसलेत त्यांची का नाही ?" सहप्रवाश्याने प्रश्न विचारला.
" जिथे मी उभी आहे ती जागा मला हवी आहे."
तुम्ही बसमधे चढला तेव्हा का नाही हे केल ? आता माझ्या सिट्च्या जवळ येऊन भांडताय काय प्रॉब्लेम काय आहे नेमका तुमचा ? त्या सहप्रवाश्याने आणखी प्रश्न केला.
"त्या वेळेला नको होती जागा बसायला आता हवी आहे" तिनेही आडमुठेपणा केला.
हे बर आहे तुमच म्हणजे तेव्हा नको होती. ही बाई कारण नसताना माझ्याशी भांडण करते आहे.
" ओ मिस्टर कारण आहे तुम्ही उठा आणि मला बसायला द्या" कपाळावर आलेल्या बटा आणि रागाने लाल झालेल्या चेहर्‍यावरचा घाम पुसत तिने पुन्हा आवाज वाढवला.
त्याने दुर्लक्ष करत बाहेर पहायला सुरवात केली.

बाकीचे सहप्रवासी कोणाचीही बाजु न घेता गप्प होते. आज स्त्री दाक्षिण्य म्हणुन हीची बाजु घ्यावी तर तो भांडणारा प्रवासी म्हणायचा तुम्हाला येव्हडा पुळका आला असेल तर तुम्ही उठा म्हणजे आली पंचाईत. स्त्रीयांची संख्या तुरळक आणि निम्या अर्ध्या एक तर एकदम पुढे नाहीतर मागे होत्या. ती सोडता दुसरी कोणी स्त्री उभी नव्हती. कोणाला तिची व्यथा समजणार.

"कंडक्टर ओ कंडक्टर इकडे या यांना नियम समजाऊन सांगा आणि उठवा " शेवटी तिने कंडक्टरला आवाज देऊन शेवटच अस्त्र उगारले.

"मी तिकीट फाडतोय. चेकर आला आणि तिकीट फाडलेली नसली की आम्हाला मेमो मिळतो. ते पहिल करतो आणि येतो तिकडे" कंडक्टर ने साळसुदपणे सोय पाहिली.
सीटवर बसलेला सहप्रवासी कशी जिरली अश्या अविर्भावात तिच्याकडे पहात होता.

पुणे युनीव्हर्सिटी चा बसस्टॉप मागे पडला. आता बसायला भरपुर सिट रिकाम्या झाल्या. रुपाली एका रिकाम्या सिटवर बसली. आता कंड्क्टर पुढे आला. कोणाची तक्रार होती ? माहित असुन त्याने पुन्हा आव आणला.
" अहो रोजचच आहे. स्त्रिप्रवाशांसाठी राखीव जागांवर पुरुष बसतात. "

बर जाऊ दे आता झाली ना जागा बसायला आता काही तक्रार नाही ना ?"

" अहो आता उतरायची वेळ आली. तुम्ही दखल घ्यायला खुप उशीरा आलात."

" नाईलाज आहे, तिकीट फाडण हे पहिल कर्तव्य मग बाकीच."

"धन्यवाद" असा कुचकट शेरा मारुन तिने दुसरीकडे पहायला सुरवात केली.

बस मधुन उतरताना तिला मागचे संवाद ऐकु आले. " आज तर आपण ठरवुनच आलो होतो उठायचच नाही म्हणुन. ही समजते कोण स्वतला ? तिनशे रुपये दंड भरायला लागला असता तरी उठ्लो नसतो मी."

" अहो , पण हा दंड घेऊन पावती देण्याची कंड्क्टरला अधिकार नाही. त्या साठी गाडी पोलीस स्टेशनला न्यायला हवी. तिथे गेल्यावर पोलीस काय रिकामे बसलेले असतात. म्हणजे १-२ तासांचा खोळंबा. ती स्वत थांबली असती का हा उपद्याप करीत ? एकाने वकीली पॉईंट मांडला.

रुपाली बसमधुन उतरली. खरच एक दिवस हे ही करायला हव पण ह्या साठी बाकीच्या प्रवाश्यांना का त्रास द्यावा ? छे नसत्या भानगडीत पडतो आहोत आपण. अन्याय सहनही होत नाही, विरोध करुनही काही होत नाही. नेमके काय करावे हे तिला समजत नव्हते.

दिवसभर मनातल्या मनात झगडा चालु होता. दिवसाच्या शेवटी तिने ठरवले. हा प्रवास सहा महिन्यांनी संपणार आहे. आपले ध्येय आपला स्वत:चा व्यवसाय चालु करायचे आहे. सुदैवाने घरुन किंवा ज्या ठिकाणी नोकरी करत आहोत तेथे काही अडचणी नाहीत मग प्रवासात होणारा त्रास काहीच नाही. यामुळे मुळच्या निर्धाराला तडा नको जायला.

पुढचा दिवस उजाडला नेहमी प्रमाणे बसस्टॉपवरच्या आट्यापाट्या करुन ती बसमध्ये चढली. पुन्हा तोच माणुस बसमध्ये स्त्रियांच्या राखीव आसनावर बसलेला. कालच्या निर्धारानुसार तिने उघडलेल तोंड बंद केल. पण घडल भलतच.
तो माणुस म्हणाला " काल तुम्ही बोलला ते आज मला पटलय. खरा प्रश्न स्त्रियांच्या राखीव आसनांचा नसुन अपुर्‍या फेर्‍यांचा आहे. तुम्ही बसा मी उभा राहतो.

तीला शॉक होता ती त्याने खाली केलेल्या जागेवर बसली आणि मनापासुन धन्यवाद देती झाली.

" अहो मॅडम, काल मी सहज म्हणुन इंटरनेटवर चाळल तर अस लक्षात आल की पी.एम्.पी. एम. एल. ने अद्याप बसेसच टाईमटेबल प्रसिध्द केल नाही कारण अस केल तर त्यांच्या महिन्याला १२,००० ट्रीप्स रद्द होतात हे उघडकीला येईल. पी.एम्.पी. एम. एल.ला माहितीच्या अधिकाराखालील माहिती न दिल्याने दंड झालाय. एक ना दोन, अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना प्रवाश्यांनी एकमेकांशी भांडण चुकीच आहे."

तो अनेक गोष्टी सांगत होता ज्या तिला माहितच नव्हत्या. आणि आज निर्धार आणखी पक्का झाला होता.

गुलमोहर: 

पुण्यात होत असेल असं बुवा !

मुम्बैत कोण , ऑफीस अवर्स मध्ये लोकलच्या लेडीज डब्यात शिरला तर बायका काही एक विचार न करता चालत्या लोकल मधुन ढकलुन देतील !!

बाकी हा लेख स्त्रीवादी दृष्टीकोनातुन लिहिलाय असं वाटल म्हणुन २ गोष्टी सांगतो .

१) एकदा असेच बस २-४ मुले चढली, काही स्त्रीया राखीव जागा मोकळ्या सोडुन अ राखीव जागां वर बसल्या होत्या , त्या मुलानी नम्र पणे विनंती केली की " स्त्रीञां साठी राखीव जागां वर बसा " त्यांनी दुर्लक्ष केले ,

पुढच्या स्टॉप वर इतर काही बायका चढल्या , राखीव जागांवर जाउन बसल्या व त्या मगाचच्या बायकांशी गप्पा मारायला लागल्या !!!

मग त्या मुलांना त्या बायका अराखीव जागां वरुन का उठल्या नाहीत हे कळाले !!!

२) एकदा असाच एक मुलगा स्त्रीयां साठी राखीव जागेवर बसला होता , एक बाई बस मधे चढली त्या जागे पाशी जाउन त्याला फार फार बोलली " कळत नाही का , राखीव जागा आहे , लाज कशी नाही वाटत तोंड वर करुन इथे बसायला ? , सांगु का कंडक्टर ला , मग बघ कशी जिरवेल तो !! "
तो मुलगा शांत पणे उठुन उभा राहिला .
त्या गर्दीत कसा बसा उभा राहिला .
.
तेव्हा त्या बाईच्या लक्षात आले , तो मुलगा पायाने अधु होता !!

नितीन लेख मस्त...

कथेच्या सुरुवातीस वाटले आपण एक मस्त रहस्यमय कथा वाचणार आहोत... Happy पण एकदम वेगळा विषय वाचायला मिळाला.

प्रसाद गोडबोले

पुण्यात होत असेल असं बुवा !

पुण्यात पापभिरु लोकांसोबत असे घडते.

पापभिरु स्त्री असेल तर असे निर्ढावलेले पुरुष प्रवासी भेटतात.
चुकुन एखादा पापभिरु पुरुष प्रवासी स्त्रीयांच्या आसनावर बसलाच तर त्याच्या नशिबी अती जहांबाज बाई येते. त्याचा असा उद्धार करते की त्याला तेथून उठावेच लागते.

दोन्ही प्रकारांत वाहकाची मदत अर्थातच गृहित धरु नये. त्यांना ही भांड्णे सोडविण्याचा पगार मिळत नाही. Happy

नितिन छान कथा. त्या कथेवरच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि काही वर हसू आले. कथेचा धागा मुंबई पुणे इतकाच मर्यादित नसून अ‍ॅटिट्यूड वर आहे हे कोण कोणाला सांगणार? असो. फार बुद्दिवादी असू नये हे खरं.

तगमग पोचली. पण अजून चांगल्या प्रकारे हा विचार पोचवता आला असता. पु. ले. शु.

काही प्रतिक्रिया वाचून खरंच हसायला आलं. स्त्रियांसाठी राखिव असणारी आसने सोडली तर बाकीची आसने त्यांच्यासाठी 'अराखिव' असतात ही नविनच माहिती कळली. सुनिल जोग म्हणतात त्याप्रमाणे हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनातला फरक आहे. आता कोणी डोळ्यावर कातडंच ओढून घ्यायचं ठरवलं तर काय करणार....

धन्यवाद, प्रतिक्रिया फारच बोलक्या आहेत. माझा लिहिण्याचा दृष्टीकोन येव्ह्डाच होता. प्रश्नाच उत्तर वेगळच असत पण आपण आपापल्या दृष्टीने त्या प्रश्नाकडे पहातो. आपल्या सोयीच उत्तर शोधतो. यामुळे प्रश्न संपण्याऐवजी नवीनच प्रश्न निर्माण होतो.

मस्त विषय...खुप छान लिहीलंय...मंजुडीला पुर्ण अनुमोदन..साधारण जागांवर बसलेले पुरूष सहसा स्त्रीयांना अगदी लहान मूल घेऊन उभी असली तरी जागा देत नाहीत, हे मी मुंबईमधेही रोज पाहते.मग त्या मोजक्या राखीव जागांवर स्त्रीयांनी त्यांना का बसु द्यावे हा प्रश्न पडतोच.अर्थात, अपंग किंवा वयस्कर पुरूष ह्याला अपवाद आहेत.

साधारण जागांवर बसलेले पुरूष सहसा स्त्रीयांना अगदी लहान मूल घेऊन उभी असली तरी जागा देत नाहीत, हे मी मुंबईमधेही रोज पाहते.
>>>हा प्रकार अजुन तरी मला दिसलेला नाहीये , अशा वेळी मी स्वतः उठुन जागा देतो , मी उभा असल्यास एखाद्या बसलेल्या तरुणाला तसे करण्यास सुचवतो .

माझ्या प्रतिसादात मला फक्त इतकेच सुचवायचे होते की मुंबईत स्त्रीया जास्त जागरुक आहेत त्यांच्या हकांबद्दल ... अन काहीकाही वेळा 'अति'जागरुक ( उदा. वर सांगितल्एल्या २ गोष्टी )

काही प्रतिक्रिया वाचून खरंच हसायला आलं >>> मलाही Happy Proud

माझ्या सत्यकथेनंतर आज पत्रकार जागे झाले आहेत.

भांडल्याशिवाय हक्काची जागा मिळणारच नाही का?
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: pmpml, pimpri, women

ही पहा बातमी . सत्य न जाणुन घेता व प्रश्नाच्या मुळाशी न जाता लिहिलेली.

http://72.78.249.124/esakal/20100728/4951066066133704386.htm

आम्ही नाही बाबा सहन करत पुरुष प्रवाश्याला आम्ही उठ्वतोच फक्त म्हातारबा किवा लहानमुल असेल तर गोष्ट वेगळी आणि काही सज्जन लोक तर महिला प्रवासी पाहताच त्याच्या सीटवरून उठून जागा देतात

१. रुपालीच्या साडी नेसण्यामुळे अरुणाने तिला मॉडर्न राहाण्याचा उपदेश करणे, रुपालीच्या सासरी ते चालत नसणे इ. मुळे त्या विषयावर कथा जाईल असे वाटले होतं. पण कथेने वेगळंच वळण घेतलं.

२. जेवताना ती हळु हळु अरुणा यासाठी चे मटेरीयल कुठुन आणते, त्याचे भाव काय असतात. फोनवर काय विचारणा होते. अरुणा काय उत्तर देते. नववधुच्या मेकअपला आधीपासुन काय तयारी करावी लागते. नववधुचा शालु कोणत्या रंगाच असेल तर कसा मेकअप चांगला दिसतो. चेहरा गोल असताना नववधुची हेअरस्टाईल काय असावी, नेलपेंटस लिपस्टिकच्या शेड्स एक ना दोन.

>> इथे लिहिण्याच्या भरात वाक्य पुर्ण झालेलं नाहिये. जेवताना ती हळु हळु... ???

३. इंटरनेटवर वाचुन माणुस असा लगेच बसायला जागा देईल हे माझ्या तरी पचनी पडत नाहीये. हि सत्यकथा नसली तरीही.