विश्व मराठी नाट्य फड न्यू जर्सी

Submitted by परदेसाई on 1 June, 2010 - 14:08

नाट्यसम्मेलन उर्फ नाटकाचा फड पार पडला. चार दिवस काही बागराज्यकरांनी जीवाची पर्वा न करता मरोस्तोवर काम केलं आणि इतरांनी अ. भा. म. ना. सं. चा आस्वाद घेतला. कार्यक्रम इतके होते की अजून दोन दिवस त्याला मिळाले असते तरी ते कमी पडले असते.

शुक्रवार संध्याकाळी शिकागोला झालेल्या एकांकिकांचा कार्यक्रम होता. तीन, दोन, एक अश्या क्रमांकाने या एकांकिका झाल्या. त्यात नंबर तीनची एकांकिका मस्त होती ती पाहता आली. नंबर दोनच्या एकांकिकेचा पसारा की पिसारा १५/२० मिनिटे पाहूनही कळला नाही. आपल्याला झोप येत असावी म्हणून कळत नाहीय, असा समज करून घरी गेलो.

शनिवारी सकाळी पहिलं नाटक होतं 'आनंदीबाई जोशींच्या जीवनावर'. त्यानंतर भाषणं वगैरे होती. सकाळी नऊ वाजता तिथे पोहोचायचं हे काही मला पटलं नाही. त्यानंतर भाषणं ऐकायची हे अजिबातच पटलं नाही, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम चुकले. सकाळचा कार्यक्रम फारच मस्त होता, इथपासून 'भाषणं कसली, कुणी पुस्तक विकत होते' इथपर्यंत ऐकू आलं. आणि आपण नाही आलो ते बरं अशी समजूत करून घेतली. दुपारी मात्र 'U-turn' नामक नाटक होतं. गिरीश ओक आणि इला भाटे या दोनच पात्रांवर नाटक. आनंद म्हसवेकर यानी साधे पण अगदी शोभतील असे संवाद लिहीलेले, आणि काहीसा आपल्या भविष्याकडे पाहणारा विषय. पहिल्या ४/५ वाक्यात नाटकाने जी पकड घेतली, ते शेवटपर्यंत हसवत आणि विचार करायला लावणारे ठरले. मुलं मोठी होऊन इतरत्र, एकाची आई (वडिलांच्या मॄत्यू) आणि एकाचे वडील (घटस्फोट) एकटे मागे राहिलेले. नव्या पिढीला त्यांची काळजी वाटते, पण ते जेव्हा Companion होऊन एकत्र रहातात तेव्हा त्या मुलांची Reaction असा काहीसा नाविन्यपूर्ण विषय होता. हश्या आणि टाळ्या घेऊन तीन तास कधी संपले कळलं नाही. (या नाटकावर अजून एक बाफ आहे).

मग नेहमीप्रमाणे मराठी नाटकांचे होते तेच झाले. ५ चा शो सहा पर्यंत सुरू नाही. 'कलारजनी' सुरू झाला तो ८:३० ला बंद करावा लागला. जेवण संपणार म्हणून. ८:३० चा शो सुरू व्हायला ९:४५ झाले. आणि 'बुमरँग' या शिकागोच्या नाटकाने त्यादिवसाची सांगता झाली. 'कलारजनी' मधे लावण्या, तबलावादन, एकपात्री प्रयोग, स्टँड अप कॉमेडी, भरत नाट्यम असे बरेच प्रकार होते. आशालता वाबगावकरांनी 'एका रविवारची सकाळ' मधल्या कडवेकर मामी सादर केल्या.
मधूबाई कांबीकर यांनी एक लावणी साजरी केली. त्या इतक्या मस्त नाचू शकतात यावर माझा विश्वास बसला नाही. विजय कदम सुत्रधार होते. मुकूलराज देव यांचे तबलावादन, त्याबरोबर कथ्थक, 'फड सांभाळ' सारखी लावणी.. एका मागोमाग एक मेजवान्या होत्या. वेळेच्या अभावी मधुरा वेलणकर इत्यादी कलाकारांना त्यादिवशी स्टेजवर येता आलं नाही.
या कार्यक्रमात कितीतरी नवे कलाकार होते. बहुतेक कार्यक्रम हे नाच (लावणी, भरतनाट्यम, कथ्थक ) प्रकारातले असल्याने थोडं 'वसंतोत्सव' ला आल्या सारखं वाटलं (माझे आणि नाचाचे वाकडे आहे) पण कला म्हणजे फक्त नाच नव्हे असं वाटत राहिलं. भरतनाट्यम, कथ्थक इत्यादी नाच त्यात का होते हे कळले नाही. प्रदिप पटवर्धन आणि संतोष पवार यानी एक कॉमेडी सादर केली ती मस्त होती.

रविवारी सकाळीच 'बेगम बर्वे' होतं. नाटकवाला माणूस असूनही 'नाटक कळले नाही' म्हणावं लागलं. चंद्रकांत काळे यांनी म्हटलेली नाट्यगीतं, आणि सहकलाकारांनी केलेला अभिनय, आणि नाटकात असलेल्या कोट्या टाळ्या घेऊन गेल्या तरी शेवटी 'नाटक कळलं का काही?' असं बरेच लोक एकामेकाना विचारत होते. या नाटकाचे ८७ सालापासून ३० प्रयोग झाले आहेत ते का ते मात्र कळलं. डॉ. मीना नेरूरकर No risk no Glory असं म्हणाल्या पण मला मात्र ते no glue no clue असे नाटक वाटले. कोण पात्र नक्की काय होतं, आणि कधी आतल्या नाटकात होतं आणि कधी बाहेरच्या नाटकात होतं ते कळलंच नाही. उरलेला दिवस मी माझ्या नाटकामागे घालवला, त्यामुळे रात्रीचे 'कट्यार काळजात..' चुकले. फार मस्त झाल्याची वार्ता ऐकू आली.

सोमवार सकाळः भारतातल्या तीन एकांकिका. त्यातली पहिली आलेली 'दॄष्टी' पाहिली. मस्त होती, आवडली. वेळे अभावी मला इतर एकांकिका पाहता आल्या नाहीत. त्यानंतर कलारजनीचा उरलेला भाग. त्यात पुन्हा लावणी, लावणी, लावणी, लावणी, आणि मग अध्यक्ष रामदास कामत यांचे नाट्यगायन. एवढं झाल्यावर भारतातून आलेली मंडळी 'राजाराणी' ट्रॅवल तर्फे फिरायला गुल. आणि अमेरिकेतल्या कलाकारांचे कार्यक्रम तसेच मागे राहिले.

(मी सगळे कार्यक्रम पाहिले नाहीत, त्याबद्दल इतर लिहितीलच. पण ही फक्त प्रस्थावना झाली).

जाताना येताना यावर बराच विचार केला पण उत्तर सापडलं नाही. 'नाट्यसम्मेलन' इथे भरवून नक्की काय मिळवलं? भारतातून जवळपास २०० माणसं या सम्मेलनाला येणार होती. त्यात व्हिसावाल्यांच्या कॄपेने सत्तरएक व्हिसा न मिळाल्याने आलेली मंडळी जवळपास १३० लोक होते. त्यात ६०/७० कलाकार आणि त्याबरोबर ६०/७० सहाय्यक मंडळी व त्यांची कुटुंबं होती. एकादा कलाकार १८ x २ = ३६ तास प्रवास करून येतो, तो ५ मिनिटे स्टेजवर येण्यासाठी? आशालता वाबगावकर, मधुबाई कांबीकर यासारखे कलावंत, गेली तीस/चाळीस वर्ष मराठी नाट्य चित्रपटसॄष्टीत कार्यरत आहेत. उर्मिला मातोंडकर येते ५ मिनिटाच्या भाषणासाठी. या लोकांना पाच पाच मिनिटं लोकांसमोर आणून नक्की कुणाला आनंद मिळतो? कित्येक कलाकार तर, 'ते आलेत पण त्यांच्याबरोबर येणारा सहकलाकार नाही येऊ शकला' म्हणून येऊन नुसतेच फिरून गेले असतील.

यासगळ्या मागे किती तरी खर्च झालाच असेल आणि तो कुणी केला असेल? महाराष्ट्र सरकारने? की भारत सरकारने? की आपल्या सारख्या तिकीट विकत घेणार्‍यांनी? म्हणजे भारतातल्या करदात्यांनी किंवा आम्ही.

नाटक बघायला मला खूप आवडतं. ते DVD/VCD पेक्षा प्रत्यक्ष बघणं केव्हाही चांगलं. पण म्हणुन ही परेड.

बुमरँग चालू असताना एक सिनीयर नट आणि त्यांच्या पत्नी बाहेर बस ची वाट बघत उभे होते. नाटक चालले होते, पण पुढे सरकत नव्हते म्हणून मीही घरी जायला बाहेर आलो. ते सहज म्हणाले, 'स्क्रीप्ट ठिक आहे हो, पण लोक 'आवाज' 'आवाज' म्हणून ओरडताहेत, तरी स्टेजवर कसं अ‍ॅडजेस्ट व्हायचं ते कळत नाहीय या नटानां.' मी फक्त हसलो. दुसर्‍या दिवशी चंद्रकांत काळे यांचंही तेच झालं. ते मस्त गात होते, पण आवाज लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. बरेच लोक त्यांना माईकच्या दिशेने पुढे व्हायला खूणा करत होते, पण त्यांनाही ते कळत नव्हतं. थोड्या वेळाने पडदा पडल्यावर माईकची जागा बदलली गेली आणि मग गाणं ऐकू येऊ लागलं...

मला वाटलेले काही मुद्दे असे.... जे पुढच्या BMM निमित्ताने मी लिहीतोय...

१. भारंभार कलाकार बोलावून त्यांना उपयोग आपल्याबरोबर फोटो काढून घेण्याऐवजी, मोजकेच कलाकार बोलावून त्यांना स्टेजटाईम देण्यात यावा. एकतर खर्च कमी होईल आणि दुसरं म्हणजे त्या कलाकाराची कला नीट बघायला मिळेल.

२. राजकारणी मंडळी इथे येऊन आपल्याला काय उपदेश करणार, आणि त्याने आपल्याला काय फरक पडणार? तेव्हा त्यांना आणू नये. वेळ वाया जातो.
३. सिनियर नटाना इथे प्रशिक्षणासाठी आणले (म्हणजे शिक्षक म्हणून) तर निदान रंगभुमीवर असताना काय करावं आणि काय करू नये, याचे धडे आपल्याला घेता येतील. 'तुम्हाला काय येत नाही हो,' पेक्षा 'असे केलंत तर छान होईल' हे त्यांच्याकडून शिकून घेता येईल.
४. भारतातले कलाकार करतील ते सगळं उत्तम हे चूकीचं आहे. ते आल्यावर काय काय सादर करतील याचा आधी आराखडा तयार असावा. आणि त्यातले काही येऊच नाही शकले तर काय करता येणार नाही हे माहीत हवं. 'ऐनवेळी मारून नेऊ' असं बर्‍याच वेळा होतं.
५. इथले कलाकार म्हणजे, भारतातल्या कलाकाराना वेळ नसेल तेव्हा उभे करायला ठेवलेले राखीव गडी हे चुकीचं आहे. हे नेहमी घडतं. आपली कामं संभाळून इथले कलाकारही कष्टाने त्यांचा प्रयोग उभा करतात. 'आता वेळ नाही, नंतर बघू, तिकडच्या लोकांना जायची घाई आहे,' हे आपलेच आयोजक आपल्याला सांगतात.
६. आयोजनामधे वेळेचं बंधन हे पाळलंच पाहिजे. सकाळी ९ ते १२, दुपारी २-५ , आणि रात्री ७-१० अशी ठळक रुपरेषा हवी. रात्रीचा खेळ जरा जरी रेंगाळला की मंडळी उठून घरी जाते आणि प्रेक्षकागॄह रिकामे. इथे नाटक वगैरे बघायला येणार्‍यांमधे ६०/७० टक्के हे 'सिनियर्स' असतात. त्यांना जेवण, गोळ्या, आणि झोप या वेळा पाळाव्याच लागतात. उगाच भारंभार कार्यक्रम आणि मधला वेळ नाही असे केल्यास, प्रेक्षक उठून जातात हे लक्षात घ्यायलाच हवे. एका दिवशी दोन नाटकं बघणं शक्य असतं. पण ३ दिवसात १०/१२ कार्यक्रम बघायचे असले तर बुडाला मुंग्या येतात हे लक्षात ठेवायलाच हवं.
७. व्हिसाचे कागद आणि मिळाल्याचे Confirmation महिनाभर आधी व्हावं. नाट्यसम्मेलन २८ ला आणि २६ तारखेला मंडळी अमेरिकन Consulate मधे उभी, हे का होतं? मग कुणाला व्हिसा मिळतो, कुणाला नाही. कुणाला तिकीट मिळते कुणाला नाही याचा परीणाम कार्यक्रमावर होतोच.
८. नाटकाचा अनुभव नसलेल्या सिनेकलाकारांना अजिबात आणू नये. त्यांना वाक्यादोनवाक्यानंतर 'कट' ची सवय असते. बहुतेकांना स्टेजवर नीट बोलता येत नाही.

हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी कित्येक मित्रांनी गेली ३/४ महिने भरपूर कष्ट उपसले आहेत. त्यांच्याशिवाय जो कार्यक्रम झाला तो होऊ शकला नसता, याबद्दल त्यांचे आभार.....

(हे लिखाण जसं सुचेल तसं लिहील्यामुळे विस्कळीत आहे.. चू. भू. द्या. घ्या)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<तिथल्या नाट्यधंद्याला शिस्त आहे पण त्यांच्याशी तिथल्या भारतीय वंशाच्या कुणाचंच फारसं देणघेणं नाही.>
<आम्ही हौशी आणि आमचे नोकरीधंदे सांभाळून आम्ही केवढं आमच्या कल्चरसाठी करतो एवढंच आहे.>

दोन्ही विधानांना अनुमोदन.

विनयदेसाई,
मी फक्त तुम्हालाच उद्देशून लिहिले नव्हते तर तुम्हाला सुधा लिहिले होते कारण माझी कळकळ तुमच्यापर्यंत पोहोचेल असे वाटले म्हणून.

माझा मुद्दा फक्त महाराष्ट्र सरकारचे पैसे कशाला घ्यावे याबद्दल आहे. कुठले कार्यक्रम आणावे त्यातून काय साधावे याबद्दल मी बोलणे अवघड आहे. कारण जो पर्यंत कुणितरी मनोरंजन करतो आहे आणि दुसरा त्यासाठी पैसे मोजायला तयार होतो आहे त्यामधे आपण त्यांना सांगायचा अधिकार नाही असे मला तरी वाटते.

>>'उपाशी माणसाला भाकरी खायची असते,' ती कशी तयार झाली याचे तत्वज्ञान नको अस्ते.

खरे आहे. पण मला वाटते इथे थोडा वेगळा प्रश्न आहे. ह्या उपाशी माणसाकडे भरपूर पैसे आहेत. त्याला नुसती भाकरीच नाही तर पंचपक्वान्ने उपलब्ध आहेत, परवडत ही आहेत. त्या भाकरीची खरी किंमत १०० रू आहे आणि त्या उपाशी माणसाला ती सहज परवडणारी ही आहेत. असे असताना दुसर्‍या गरीब माणसाकडून ५० रु घेऊन ती भाकरी श्रीमंत उपाशी माणसाला ५० रू दिली जात आहे. आणि ते ५० रू आमच्याकडे कुणी मागितले नाही तर मी कशाला देऊ असे म्हटले जात आहे. मी त्याकडे लक्ष द्या म्हणतो आहे. आणि मी इथे लिहतो आहे कारण हे समजून घेण्याइतकी १ व्यक्ती असली तरी मी धन्य होईन. उद्या जर भाकरीची किंमत १०० असूनही जर जाहिरपणे १२० लावली आणि वरचे २० रू महाराष्ट्रातल्या नाट्यव्यवसायातल्या गरजू व्यक्तींना दिली तर कुणाचीच तक्रार नसती. उलट या कार्यक्रमातून एक चांगला पायंडा पाडला गेला असता.

काही वर्षांपूर्वी एका BMM मधे अशीच काही लाख रु देणगी महाराष्ट्र सरकारने दिली होती (अजूनही प्रत्येक अधिवेशनात कुणीतरी जाहिर करतो). पण जेंव्हा बर्‍याच लोकांनी ती परत करा असा आग्रह धरला तेंव्हा ती परत केली गेली. इथे तसे होईल अशी भाबडी आशा मला मुळीच नाही. पण पुढील कार्यक्रमात तरी आयोजकांना महाराष्ट्रातून पैसे घेऊन नका असा आग्रह धरायला काय हरकत आहे? BMM मधे जमते तर इथे का नको? अशी देणगी घेतली नाही, प्रायोजक मिळवता येत नसतील, आर्थिक गणित जमत नसेल तर नका कार्यक्रम करू.

झक्कींचे म्हणणे मला पटत नाही. लोकप्रतिनिधी चुकीचे निर्णय घेत असतील, पैशाचा दुरुपयोग करत असतील म्हणून आपण गप्प का बसायचे? ते स्वतःहून पैसे देत आहेत तर घ्यायला काय हरकत आहे असे म्हणणे तर साफ चूक आहे. हे म्हणजे मला चोरीची वस्तू माहिती आहे पण मला कुणितरी स्वस्त्तात देते आहे ना मग मी घेतली तर काय बिघडले असे म्हणण्यासारखे आहे.

यावर काय उपाय असे कुणितरी वर म्हटले आहे. अशा कार्यक्रमातला कणा म्हणजे स्वयंसेवक. आणि असे कितीतरी इथे मायबोलीवर असतील. त्यांनी आग्रह धरला तर हे भविष्यात टाळणे अजिबात अवघड नाही.

किल्लेदार अनुमोदन. तत्वतः तुमचे म्हणणे पटले, पण एकुणातच मराठी मंडळांमध्ये कशाही प्रकारच्या दर्जाचा आग्रह धरणे प्रत्यक्षात खुपच अवघड आहे. दुर्दैवाने सगळे स्वतःवर इतके खुष असतात की ....
मला तर वाटतं, आत्ता कसं विनय आणि रार यांनी परखड लिहीले आहे. तसे अनेक पडसाद उमटु देत. त्याशिवाय काही खरं नाही.
तुमचा आक्षेप देणगीवर जास्त दिसतोय आणि तो मुद्दा महत्त्वाचा आहेच.
पण देणगी घेऊन तरी असे काय दिवे लावलेत ?

नाट्यसंमेलनं वेगळी असतात असं नीधपने माझ्या विपुत लिहीले आहे. ती नक्की कशी असतात हे जाणुन घ्यायला आवडेल.

आणि हो
<तिथल्या नाट्यधंद्याला शिस्त आहे पण त्यांच्याशी तिथल्या भारतीय वंशाच्या कुणाचंच फारसं देणघेणं नाही.>
<आम्ही हौशी आणि आमचे नोकरीधंदे सांभाळून आम्ही केवढं आमच्या कल्चरसाठी करतो एवढंच आहे.>
दोन्ही मुद्यांना पूर्ण अनुमोदन. तरीही इथे भारतात, महाराष्ट्रात किती प्रेक्षक 'कल्चर'साठी एवढं तरी करतील ? आम्ही पैसे मोजलेत ना? तुमचं तुम्ही पाहुन घ्या असं स्पष्ट सांगतील.

देणगी घेणे, किंवा कोणताही खर्च महाराष्ट्रातून घेणे हे चूक आहे, हे मी माझ्या पहिल्या पोस्ट मधे लिहीले होते.
जे लोक प्रतिनिधींचे (तुम्ही काहीही केले तरी त्यांना फरक पडत नाही), तेच नाट्यपरिषदेचा संचालकांचे (यांच्यात तर निवडणूक नसते म्हणे), तेच इथल्या नेतॄत्वाचे.... त्यांना कळावे म्हणूनच हा उपद्व्याप केला आहे. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल तेव्हा पडेल.

'मराठी नाटक' या उपासाचे कारण आहे. येणारी सिनीयर मंडळी, दरवर्षी भारतात जातील असे नाही. प्रकॄतीमुळे १८ तासांचा प्रवास त्यांना झेपेलच असे नाही. तेव्हा इथे येईल तेव्हाच त्यांना नाटक मिळणार.

मराठी नाट्यपरिषदसुध्दा रंगकर्मींना मदत करते. पण जमणारी रक्कम आणि त्यातून होणारी मदत याचे प्रमाण यात बरीच फारकत आहे...

यापुढे नाट्यसम्मेलन, साहित्य सम्मेलन इत्यादी प्रकार इथे किंव कुठेही परदेशात होऊ नयेत, हे माझेही मत आहे.... Happy

मला देसाई ह्यांचे मुळ लिखान पटले. Happy तसे किल्लेदार ह्यांचा दोन्ही पोस्ट.
विजय कुळकर्णींनी अगदी योग्य मांडले आहे.

विनय / किल्लेदार अगदी ह्याच न्यायाने मी शिकागोस्थित असूनही येत्या बिएमेमला डोनेशन दिले नाही ! बहुतेक कार्यकर्त्यांनी $१००० दिलेत पण मी त्याला नाही म्हणालो. $१००० देणे काहीच अवघड नाही, प्रश्न पैश्यांचा नाही तर ते कोणासाठी खर्च होतात (तुलनेने श्रिमंत असणारे व येथे मनोरंजन करु इच्छिनारे ) ह्याचा आहे. इथे राहणार्‍या श्रिमंत लोकांसाठी मी परत $१००० देणगी का देऊ? त्यापेक्षा मी सुपंथ साठी तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे. इथे मनोरंजन हवे असेल तर तेवढे पैसे मोजा व करुन घ्या. मग तिकिट भलेही प्रत्येकी $८०० होओ.

बिएमेम वगैरे कलेची सेवा बिवा काही नाही असे मला वाटते. केवळ अमेरिकेत राहतो, पैसे खर्च करण्याची ऐपत व तयारी ठेवतो, जेष्ठ कलाकार येतात तर बघायची संधी का सोडा? हा दृष्टीकोण आहे म्हणून पैसे खर्च करतात. व आता ह्याला वलय प्राप्त झाले आहे.

एकही भारतीय जेष्ठ कलाकार आणला नाही तर असे अनेक कार्यक्रम (बिएमेम सहीत) तेवढे हाउसफुल्ल जाणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे भारतीय कलाकार आणावे लागतात. तिकीट बारीवर जर फक्त लोकल हौशी अमेरिकेन कलाकार असतील तर अश्या कार्यक्रमांना ४०००-४५०० लोक येतील का?
आणि इथे तर मेरा बिएमेम तेरेसे छोटा क्युं? अशी काहीतरी मनोवृत्ती आहे, त्यामुळे सर्व कसे भव्य दिव्य हवे.

>>इथे राहणार्‍या श्रिमंत लोकांसाठी मी परत $१००० देणगी का देऊ? त्यापेक्षा मी सुपंथ साठी तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे.
क्या बात है!
तरीही बी एम एम बद्दल मला अजिबात राग येत नाही कारण ते महाराष्ट्र सरकार कडून अनुदान घेत नाहीत.

किल्लेदार,
मला बरेच आक्षेप आहेत तुमच्या विचारसरणीवर.
भारतीय करदात्यांचे पैसे आहेत हे मान्य आहे. तो काही चोरीचा माल नव्हे. तेंव्हा तसे म्हणू नका.
आता तुम्हाला असे का वाटते की भारतीय करदात्यांनी भारताबाहेर कुणि भारतीय सांस्कृतिक काम करत असेल तर त्यांना मदत देऊ नये?? भारतात नाट्यफड केला असता तर दिलेच असते ना पैसे, मग अमेरिकेत झाला म्हणून काय झाले? पैसे सांस्कृतिक कामावरच खर्च झाले ना! त्यात इतरांप्रमाणेच पैसे देऊन भाग घेऊ नये!

आम्ही श्रीमंत आहोत अशी एक चुकीची समजूत आहे, पण ते खरे मानून उगाच मत्सर करता का?

आणि काहो, आम्ही ऐकतो की भारताने खूप प्रगति केली आहे, जगात एक आर्थिक शक्ति म्हणून त्यांचे स्थान आहे. मी स्वतः भारतात येऊन तिथली वाढती समृद्धि अनुभवली आहे, तुमचे एकेक प्रकल्प हजारो कोटींचे असतात. आमची तर बुवा छातीच धडधडते असले आकडे ऐकून. मग ही कंजुषी का? मनाची??
एव्हढे पैसे आहेत म्हणून देताहेत, असे मानून घेतले तर काय बिघडले?

आता तुमचा विरोध असेल नाट्यफडाला. हा फड काही लपून छपून केला नव्हता. वर्षभर जाहिरात होती त्याची. त्याला काही आक्षेप असतील, तर ते पटवून देता आले नसते का, सरकारला? इतर भाग घेणार्‍या भारतीयांना? तुमचे आवडते नट तुमच्या सारख्या रसिकांच्या, चाहत्यांच्या इच्छेला डावलून गेले असते का अमेरिकेला?

मग ते आले, त्यांनी पैसे दिले, आम्ही घेतले, जमेल तसा सोहळा केला, बर्‍याच लोकांना बरेच काही काही आवडले. मजा आली!! भारताशी संबंध आहेत हे पाहून बरे वाटले.

तुम्ही आपले असे लिहिता की जणू सगळा खर्च भारतीय करदात्यांनी केला! अहो, त्यांनी किती पैसे दिले नि इथे किती जमवले याची काही कल्पना आहे का?

खरे तर बर्‍याच गोष्टी तुमच्या सारख्या भारतीयांच्याच हातात आहेत, उगाच बारीक सारीक गोष्टींवरून आम्हाला दोष देऊन आमच्या आनंदावर पाणी ओतता!!

आता आधीच सांगून ठेवतो आहे, पुढल्या वर्षी शिकॅगो ला बीएमेमचे संमेलन आहे, पुनः भारतीय येतील, सरकार देणगी देऊ करेल. या वेळी कदाचित् घेऊ पण. कारण तुम्ही एव्हढे श्रीमंत, उदार होऊन देताहात!

तर त्याला काही आक्षेप असतील तर आत्तापासून कामाला लागा. तुमच्या प्रतिनिधींना आधीच कळवा, की भारताबाहेर पैसे देऊ नका! तुमच्या प्रिय कलाकारांना सांगा अहो हे चूक आहे, तुम्ही जाऊ नका, नाहीतर आम्हाला आवडणार नाही. त्याउप्पर तुमच्या सारख्या रसिक, चाहत्या लोकांची विनंति ठोकरून ते आलेच तर कशाला बोलावले म्हणून आम्हाला दोष देऊ नका!

आळशी , कामचुकार लोक. आधी स्वतः काही काम करायचे नाही. मागून दुसर्‍याला दोष द्यायला तावातावाने पुढे!!

>>तुम्ही आपले असे लिहिता की जणू सगळा खर्च भारतीय करदात्यांनी केला! अहो, त्यांनी किती पैसे दिले नि इथे किती जमवले याची काही कल्पना आहे का?

कशी कल्पना येणार, हिशेबच जाहीर झालेले नाहीत ना. झाकली मूठ सवा लाखाची. आणी समृद्धी वगैरे फक्त पुण्या मुम्बईकडे.

>भारतात नाट्यफड केला असता तर दिलेच असते ना पैसे,

भारतातील करदात्यांनी भारतात होणार्‍या फडाला मदत करणे गैर नाही. इथल्या नाट्यफडाला उपस्थीत बरेच लोक अमेरिकन नागरीक होते ना? उद्या यदाकदाचीत भारत-अमेरिका युद्ध झाले तर अमेरिकेच्या बाजूने शस्त्रे उचलू अशी प्रतिज्ञा केल्या शिवाय अमेरिकन नागरिकत्व मिळत नाही ना?

अहो झक्की,
मी अमेरीकेतच राहतो गेली कित्येक वर्षे आणि तिथूनच लिहतोय. आता तरीही मला मत्सर वाटतो म्हणणार असाल तर म्हणा बापडे.
आता आपल्या इथेही काही वर्षांपूर्वी पेंटॅगॉन मधे ५०० डॉ. चे अ‍ॅशट्रे आणि ५००० डॉ चे संडास विकत घेतले होते. आणि निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी ते मंजूर केले होते. तुमचं म्हणणं ते पण बरोबर का? का तो जॅक अब्राहम मला घरी आणून फु़कट फर्निचर देत होता म्हणून मी घेतले, मी काही चोरी केली नाही बुवा असं एखादा सिनेटर म्हणत असेल तर तुम्हाला चालत असेल बुवा, पण मला तरी पटत नाही.

>भारतात नाट्यफड केला असता तर दिलेच असते ना पैसे
हो पण मग अमेरिकेच्या तिकिटावर ते पैसे खर्च झाले नसते ना? का विमानकंपन्याना काही पैसे दिले तरच नाट्यव्यवसायाचे भले होणार आहे?

जर काही लपून छपून करत नाही तर सगळा ताळेबंद करा ना जाहिर दोन्ही कडे भारतातला आणि इथलाही. हे जाऊ दे, गेल्या वर्षीचे BMM झाले. एक वर्ष झाले कुणाला माहिती आहे काय हिशोब आहे?एकीकडे NOn Profit म्हणायचे आणि दुसरीकडे कुठलिही पारदर्शकता ठेवायची नाही. मग सरळ For Profit Organization म्हणा म्हणजे कुणी काही विचारायचा प्रश्नच नाही.

आणि म्हणूनच मी कामाला लागतोय. तुम्ही स्वयंसेवक म्हणून कुठेही काम करण्याअगोदर सगळे पारदर्शक आहे याची खात्री करा असे लिहतोय. मी काम करणे तुम्हाला अपेक्षित असेल तर सगळा हिशेब मधून मधून (फक्त शेवटी नाही) जाहिर करा अशी संयोजकांकडे मागणी करा. या आधी कितितरी अधिवेशने झाली बोस्टन, अटलांटा, कॅलिगरी त्यात कधी अशी मागणी नाही झाली कारण पारदर्शकता होती (आणि जिथे पारदर्शकपणा नव्हता त्या सगळ्या अधिवेशनात तीच बोंब. आज कितीतरी वर्षे झाली तरी काही अधिवेशनाचा हिशेब जाहिर झालेला नाही) आता कार्यक्रमाचा दर्जा चांगला का वाईट, जेवण कसे होते हे नेहमीचेच व्यक्तीसापेक्ष आहे. त्याबद्दल मी काही बोलत नाही. पण पैशाचे व्यवहार का नाही पारदर्शक ठेवत?

हा आता मला आळशी आणि कामचुकार म्हणत असाल, तर ते मात्र एकदम खरे आहे. पूर्ण सहमत. म्हणूनच तर इथे टिकून आहे. नाहीतर केंव्हाच भारतात गेलो असतो कामं करायला. पण कधितरी थोडा आळस झटकून इथे लोकांना ब्रम्हज्ञान सांगायला मला आवडतं बुवा.

केदार,
शिकागो मधे जर जाहिरपणे देणगी घेतली असे तर मला ते योग्यच वाटतंय. इथे कार्यक्रम आहे, तो यशस्वी करण्यासाठी देणगी हवी आहे ज्यांना योग्य वाटेल त्यांनी द्या ज्यांना नको त्यांची नको.
महाराष्ट्र सरकारकडून घेण्यापेक्षा हे केंव्हाही चांगले. आशा आहे की त्यांनी ती किती जमा झाली याचा काहीतरी पारदर्शकपणा दाखवला असेल.

<हो पण मग अमेरिकेच्या तिकिटावर ते पैसे खर्च झाले नसते ना? का विमानकंपन्याना काही पैसे दिले तरच नाट्यव्यवसायाचे भले होणार आहे?>

असे सगळे तुम्हाला वाटते.
विमानकंपन्यांना पैसे देणे हे नैमित्तिक खर्च आहेत, कलेसाठी, संस्कृतीसाठी जे कलाकार भारतातून इथे येणार, त्यांचे कला व संस्कृति वर्धनाचे कार्य बहुमोल आहे. (या दोन्ही गोष्टी काय आहेत हे मला स्वत:ला कळत नाही) असे नाट्यफड करणार्‍यांना वाटते.

ज्यांनी हा नाट्यफड आयोजित केला, जे भारतातून सहभागी झाले त्यांना फक्त नाट्यफड करायचा होता, त्यात त्यांना कला, संस्कृति वगैरे काही काही दिसले. महाराष्ट्र सरकारलाहि ते पटले. त्यांना हे सगळे योग्यच वाटले. त्यापुढे पैसे कुठून आले याचा त्यांना विचार नव्हता. भारतात कमालीच्या बाहेर श्रीमंती आहे हो! हजारो कोटीचे प्रकल्प बघता बघता मंजूर होतात. त्या लोकांना एव्हढ्याश्या खर्चाचे काही वाटत नाही. म्हणून मलाहि त्यात काही गैर दिसत नाही.

लोक कशाकशावर पैसे खर्च करतात, कुणाला ते पटते, कुणाला नाही. तर काही पैसे अमेरिकन नागरिकांना, मराठी कला, संस्कृति अमेरिकेत जागी ठेवण्याबद्दल. उद्या कुणा अमेरिकन माणसाला (म्हणजे भारतातून आलेले, अमेरिकेच्या बाजूने लढण्याची शपथ घेतलेले) महाराष्ट्रीय संस्कृति (किंवा कला!) आवडली नि त्याने उदार होऊन भारतातील मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्यपरिषद यांना घसघशीत देणग्या दिल्या तर बरेच ना! भीक मागण्यापेक्षा हा मार्ग चांगला.

तसे पाहिले तर अमेरिकन करदात्यांच्या पैशातून व खाजगी अमेरिकन नागरिकांकडून पूर्वी भारतीय नागरिकांना बरीच मदत दिलेली आहे. तशी भारतानेहि इतर देशांना बरीच मदत केली आहे. मग आत्ताच एव्हढा आरडा ओरडा का? अमेरिकेचा राग? की नाट्यफडाचा राग?

तेंव्हा आपले विचार वेगळे! हा वाद इथेच संपावा ही इच्छा.

विनय,
डॉ. मीना नेरुरकरांनी लोकसत्ता मधे लिहिले आहे. तू न बघितलेले कार्यक्रम बरे होते म्हणायचे !!
असो .
उर्मिलाला का आणले होते ? आता ती मोकळी आहे म्हणून ? कुठल्या नाटकात काम केले होते तिने ? त्यापेक्षा अश्विनी भावेलाच आणायचे, तिथेच तर असते. शिवाय काहि नाटकात (लग्नाची बेडी)कामही केले आहे तिने.
आशालता आता खुप वृद्ध झाल्या आहेत. मधु कांबीकरानी नाटकात कामे केली आहेत (पुत्रकामेष्टी, चंद्र जिथे उगवत नाही वगैरे ) तसेच त्या पेशवाई कालीन लावण्यांवर उत्तम कार्यक्रम सादर करत असत. तिथे त्यानी कुठली लावणी सादर केली माहीत नाही, पण त्या नेसली पितांबर जरी, हि लावणी उत्तम सादर करतात.
बेगम बर्वे, ज्या काळात चालत होते, त्या काळात त्याचे खुप कौतूक झाले होते, दूरदर्शनवर झलक दाखवली होती, पण तू म्हणतोस त्याप्रमाणे तेव्हाही ते फारसे चालले नव्हते. काळे काही पट्टीचे नाट्यगीत गायक नाहीत.
यू टर्न पण फार काहि ग्रेट नाही, (कारण ते दोघे यू टर्न घेतात म्हणून.)
केवळ एका व्यक्तीने या सर्व नाटकांची निवड करावी हेच अयोग्य होते. आणि त्यांच्याच एका जून्या पुस्तकाची टिमकी वाजवावी हे ही गैर आहे.
तूम्ही लोकांनीच जर ही नाटके सादर केली असती, तर जास्त चांगले झाले असते. फारतर मार्गदर्शनासाठी एखाद्या जाणत्या कलाकाराला बोलवायला हवे होते.

अहो दिनेशदा, डॉ. मीना नेरुरकरांनी लोकसत्ता मधे लिहिले आहे:
<या विश्व नाटय़ संमेलनाची मी प्रमुख असल्याने गेली अनेक वर्षे अमेरिकेतच राहात असल्याने आणि त्यात सतत नाटके करीत असल्याने मला अमेरिकेच्या प्रेक्षकांची नस माहीत होती. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच मी भारतात जाऊन, अनेक नाटकांचे प्रयोग बघून कोणती नाटके माझ्या प्रेक्षकांना आवडतील हे ठरवून टाकले होते. >

माझ्या माहितीप्रमाणे नि अनुभवावरून डॉ. नेरुरकरांचे बहुतेक सर्व नृत्य, नाट्य, संगीत प्रयोग अमेरिकेत नक्कीच अतिशय लोकप्रिय होतात. तेंव्हा उगाच ज्यांना अमेरिकेत काय चालेल हे माहित नाही त्यांचे ऐकण्यापेक्षा, डॉ. नेरुरकरांनीच ठरवलेलेच बरे, असे मला वाटते.

डॉ. नेरुरकरांचा लेख वाचला नि तिथेच लोकमानस मधे दुसरा लेख वाचला:
<त्यातच अमेरिकेच्या मुजोर दुतावासामध्ये जाऊन याचकासारखे खालमानेने उभे राहायचे. अमेरिका काय मोठी अप्सरांची आणि कलाकामिनींची स्वर्गनगरी लागून राहिली आहे की जिच्यासाठी एव्हढा जीव टाकावा? आणि इतके करूनही विश्वसंमेलन हे जर केवळ शॉपिंग व शासनाच्या खर्चाने (म्हणजे आपल्या) साइटसीइंगसाठीच होणार असेल तर अशी संमेलने बंदच करायला हवीत. त्यामुळे मराठी संस्कृतीचे जराही नुकसान होणार नाही.
संदीप राऊत, वसई
कोषाध्यक्ष, अ. भा. म. ना. परिषद, वसई शाखा >

कदाचित श्री. राउतांना बोलावले असते, तर कोषाध्यक्ष असल्याने तिथले पैसे घेऊन, ते पण दुतावासामध्ये जाऊन याचकासारखे खालमानेने उभे राहिले असते, नि इथे आल्यावर शॉपिंग व अ. भा. म. ना. परिषदच्या खर्चाने (म्हणजे आपल्या) साइटसीइंग करत बसले असते! असा एक कुजकट कयास आहे.

इथल्याहि काही मान्यवर, नि ज्यांचा जवळचा संबंध अश्या कार्यक्रमात असतो अश्या, लोकांचे मत आहे की भारतातून मदत किंवा माणसे आणू नये.

पण ते होणे नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे कार्यक्रम अमेरिकेत होणार नाहीत, किंवा कलाकार किंवा कुणीहि अमेरिकेत यायचे नाकारतील असे वाटत नाही. उलट दिवसेंदिवस दोन्ही देश कलेसाठी, संस्कृतीसाठी जास्तच जवळ येतील.
मला आशा आहे की इथल्या भारतीय दूतावासतले लोक मुजोर नसून अत्यंत मदतगार असतील व तिथे ताठ मानेने उभे रहायला मिळेल. त्यामुळे भारताचा व्हिसा मिळणे सोपे जाईल. फार तर ४७५ डॉ. त्या पासपोर्टच्या भानगडीसाठी भरावे लागतील. व कदाचित् आणखीहि थोडे पैसे योग्य व्यक्तिला गुपचूप दिले तर व्हिसा लवकर व नक्की मिळेल. अमेरिकन दूतावासात ही सोय असल्याचे ऐकले नाही.

फक्त काही लोकच उगाचच अमेरिकेचा द्वेष करतात. हजारो,लाखो कोट्यवधी रुपये भारतात खर्च होत असले तरी अमेरिकेला मात्र पैसे देऊ नका अशी त्यांची कंजुषी वृत्ति आहे. शिवाय त्यांनी स्वतः जर पैसे दिले असतील तर त्याचा हिशेब ज्यांना दिले त्यांना मागा. उगाचच सगळ्या लोकांना कशाला त्या हिशेबाची उठाठेव? असतील करदात्यांचे पैसे, पण ते दिले कुणी? तुमच्या प्रतिनिधींनीच नं? मग त्यांना सांगा हिशेब मागायला, त्यांना मिळेल. तुम्हाला वैयक्तिक कोण सांगेल?

जेंव्हा कलेवरील प्रेमामुळे लोक इकडून तिकडे जातात येतात तेंव्हा पैशाचा नि कष्टाचा हिशेब कुणि ठेवत नाही. नाहीतर इथल्या लोकांनी काय कमी पैसे नि कष्ट खर्च केले आहेत का?

काळे काही पट्टीचे नाट्यगीत गायक नाहीत. >> निषेध. काळ्यांच्या सांगितिक करियरबद्दल न बोललेलेच बरे.

तूम्ही लोकांनीच जर ही नाटके सादर केली असती, तर जास्त चांगले झाले असते. फारतर मार्गदर्शनासाठी एखाद्या जाणत्या कलाकाराला बोलवायला हवे होते.>> हो ना. नाहीतरी कसलेल्या कलाकारांना उगीच भाव मिळतो. उभी हयात प्रायोगीक/व्यावसायिक रंगभूमीवर घालवली यात नवल ते काय? त्यांच्याकडुन शिकण्यासारखे असतेच काय ? नाटकात काम करायला काय लागते विशेष?
(ही वाक्य उपरोधिक आहेत. धन्यवाद.)

>>कदाचित श्री. राउतांना बोलावले असते, तर कोषाध्यक्ष असल्याने तिथले पैसे घेऊन, ते पण दुतावासामध्ये जाऊन याचकासारखे खालमानेने उभे राहिले असते, नि इथे आल्यावर शॉपिंग व अ. भा. म. ना. परिषदच्या खर्चाने (म्हणजे आपल्या) साइटसीइंग करत बसले असते! असा एक कुजकट कयास आहे.

हे म्हणजे अण्णा हजारेंना पैसे खायला मिळत नाहीत म्हणून ते आंदोलने करतात असे म्हणन्यासरखे आहे.

रैना, निषेध करण्यापेक्षा, काळ्यांच्या गायकीबद्दल, त्यांनी केलेल्या इतर संगीत नाटकातील भुमिकांबद्दल,त्यांच्या नाट्यगीतांच्या सिडीजबद्दल, लिहिले असते तर म्या पामराला, त्यांची काहि नाट्यगीते, ऐकता आली असती !!

पुढच्या ओळी उपरोधिक आहेत हे मुद्दाम लिहिले ते छानच झाले.

कलाकाराबद्दल माझे काहि म्हणणे नाही, (मराठी नाटक हा माझाही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे ) पण त्यांना तिथे येण्यात येणार्‍या अडचणी, आयोजनातला भोंगळपणा याबाबत हा बीबी होता. त्याला मी पर्याय सुचवला होता. त्यांची नाटके भारतात बघतोच की आपण.

आणि हि वाक्ये अजिबात उपरोधिक नाहीत.

विनयभाऊ,

वरील नाट्यसम्मेलन्/फड पाहिला नाही तरी तुझी मते पटली.. कारण याआधी अमेरिकेत पाहिलेली अशी सम्मेलने वगैरे यातील बर्‍याचश्या गोष्टी अशाच असतात. (अगदीच नाही तर चार शहरातील म..म. च्या कार्यकारीणीवर कामाच्या अनुभवातून अन असे छोटे मोठे कार्यक्रम संयोजनाच्या अनुभवातून माझेही निरीक्षण्/मत तुझ्यासारखेच आहे.) शिवाय तुला स्वताला असे कार्यक्रम्/नाटके बसवून (स्थानिक अमेरिकन वा भारतातील कलाकारांकडून) त्याच्या ऊभारणीपासून ते सादरीकरणापर्यंत अनुभव असल्याने तुझ्या मताला निव्वळ प्रेक्षक म्हणून नव्हे तर जागरूक कलाकार्/स्वयंसेवक/जाणकार म्हणून अधिक महत्व आहे यात मला तिळमात्र शंका नाही.

होतय काय की कला,सेवा,प्रयत्न ई. गोष्टींना "हौसेला मोल नसते" या सदरात घालून त्यातील तृटी एकवेळ नजरेआड करता येतील पण जेव्हा ईतक्या मोठ्या स्तरावर वेळ, मेहेनत, पैसा, अन अनुशासन(?) खर्ची पडते तेव्हा किमान पैशाचे व्यवहार पारदर्शक ठेवणे हे अशा कार्यक्रमांच्या आयोजक/संयोजकांवर सक्तीचे करायला हवे. ते गणित एकदा मंडले की नेमके कशाचे मूल्य अधिक आहे आणी कुठल्या गोष्टीच्या खर्चावर अधिक प्राधान्य द्यावे हे स्पष्ट होईल- जसे ईतके कलाकार्/सह कलाकार यांचा विमान खर्च, जेवण/रहाणे/स्थानिक वा नैमित्तिक खर्च्/मानधन वगैरे.

मूळ कार्यक्रमातील content quality मुद्दा वगळता आयोजक्/संयोजक, कलाकार, प्रेक्षक यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने तोच कार्यक्रम काहींना आवडतो, काहींना अजीबातच नाही, तर तुझ्या सारख्या काहींना ज्यांन्ना वरील सर्व गोष्टींची कळकळ आहे त्यांन्ना मनाला कुठेतरी चुटपूट लागून रहाते कारण वरील व्यावसायिक्/आर्थिक गणित अन झालेला कार्यक्रम यात ताळमेळ नसतो.
मला असे वाटते की या अशा कार्यक्रमांत प्रामाणिक हेतू (काही स्वार्थी लोकांचे अपवाद वगळता) अन "साध्य" हे चांगलेच्/सकारात्मक असते पण असे मोठे कार्यक्रम नेमके कसे, काय स्वरूपाचे असावेत, त्यांची व्याप्ती, कारभार वगैरे कसा असावा याचे नियम्/किमान पक्षी मार्गदर्शक तत्वे ठरवणारी एखादी regulatory body नसल्याने मग "ज्याच्या मनाला जसे योग्य वाटेल तसे" हा दृष्टीकोन महत्वाचा ठरतो.
तेव्हा bmm/maharashtra mandals यांनी एकत्र येवून किमान अशी मार्गदर्शक तत्वे अन कार्यकारीणीचे (आर्थिक्/व्यावसायिक्/अनुशासक) नियम घालून दिले तर बर्‍याच प्रमाणात हे गणित सोपे होईल असे वाटते. ईतके करूनही, शेवटी अशा सर्व कार्यक्रमांचा जमा-खर्च काही ठराविक कालावधित जाहीर न केल्यास त्या त्या मंडळ वा संस्थेचे सभासदत्व/रजीस्ट्रेशन रद्द करायची तरतूद अशा regulatory body ने केली तर अधिक कटाक्षाने हे नियम पाळले जातील. माझ्या अनुभवानुसार, non profit org ला सुध्धा वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर करणे कायद्याने सक्तीचे आहे, न केल्यास संस्थेचे सभासद्त्व/नोंदणी रद्द कली जावू शकते. किंबहुना अमेरिकेत, अशा संस्थेच्या एखाद्या सभासदाने तक्रार केली तर स्थानिक सरकारी वित्त्-अधिकारी त्याची चौकशी करून योग्य कारवाई करू शकतात. आर्थिक बाबतीत ईतका काटेकोरपणा (आयोजक व सभासद) दोघांनी दाखवल्याशिवाय हा सावळा गोंधळ थांबणार नाही.

निव्वळ कार्यकम्, दर्जा, आखणी या गोष्टी सापेक्ष असल्याने त्याबाबत मतांतरे असू शकतात.

बाकी कलाकाराचा आवाज ऐ़कू न येणे वगैरे या "तांत्रिक बाबी" बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतात. बरेच वेळा अशा तांत्रिक बाबींचा मंडळातील कार्यकारिणीतील व्यक्तींना योग्य अनुभव नसल्याने व बहुतांशी वेळी अशा तांत्रिक बाबींसाठी बाहेरील तज्ञ किंव्वा कामगारांवर अन योग्य ऑडीटोरियम वगैरे गोष्टींसाठी पैसा खर्च करण्याची तयारी नसल्याने अशा तांत्रीक अडचणींमूळे एखाद्या सुंदर कार्यक्रमाचाही बट्ट्याबोळ होतो.. काही वेळा अगदी जाणकार्/अनुभवी कलाकार सुध्धा तांत्रिक बाबतीत स्टेजवर आयत्या वेळी गडबडलेले पाहीले आहेत (पण तो अपवाद म्हणता येईल).
पुन्हा एकदा, वर म्हटले तसे नेमके पैसे कुठे खर्च करणे गरजेचे आहे याकडे दुर्लक्ष केल्याने असे अनुभव येतात. तेव्हा असे आंतरराष्ट्रीय समारंभ आयोजित करताना, policy/goals, planning, ground management, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे accountability या गोष्टींचे पालन केले तर मला वाटतं बर्‍याच प्रमाणात समाधानकारक अन दर्जेदार कार्यक्रम अनुभवास येतील.

बाकी अमेरीकेतलं आम्हाला अधिक कळतं किंव्वा भारतातील नाट्यसम्मेलनाबाबत आम्हाला अधिक ज्ञान आहे या वैयक्तिक वादांना फारसा अर्थ नाही.

<माझ्या अनुभवानुसार, non profit org ला सुध्धा वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर करणे कायद्याने सक्तीचे आहे, न केल्यास संस्थेचे सभासद्त्व/नोंदणी रद्द कली जावू शकते. किंबहुना अमेरिकेत, अशा संस्थेच्या एखाद्या सभासदाने तक्रार केली तर स्थानिक सरकारी वित्त्-अधिकारी त्याची चौकशी करून योग्य कारवाई करू शकतात.>
बरोबर लिहीलेत. मला हे आधीच लिहायचे होते, पण मी उगाचच रागावून, चिडून वाट्टेल ते लिहून बसलो.

<पुन्हा एकदा, वर म्हटले तसे नेमके पैसे कुठे खर्च करणे गरजेचे आहे याकडे दुर्लक्ष केल्याने असे अनुभव येतात. तेव्हा असे आंतरराष्ट्रीय समारंभ आयोजित करताना, policy/goals, planning, ground management, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे accountability या गोष्टींचे पालन केले तर मला वाटतं बर्‍याच प्रमाणात समाधानकारक अन दर्जेदार कार्यक्रम अनुभवास येतील.>

खरे तर मोठ्या कं. त तरी अनेक मॅनेजरांना हे सर्व करायचा अनुभव आहे, पण इतके सगळे शिस्तशीर पणे करण्यापेक्षा 'आम्ही कलाकार, आम्ही स्वच्छंद वृत्तीचे, आमची हौस, काय झाले थोडे बिघडले तर?, आम्ही एव्हढे करतो, तर तुम्ही नावेच ठेवता!' हेच जास्त!

एका बी एमेमला म्हणे भारताचा झेंडा भर स्टेजवर उलटाच टांगला होता. "आमच्या मुलाने हौसेने केले हो, उत्साहाच्या भरात झाली असेल चूक, पण नंतर तर दुरुस्त केली ना!'

मागच्या बीएमेमला खूप आधी पैसे भरूनहि पुढच्या जागा मिळाल्याच नाहीत! वर कार्यकर्ती म्हणते, अहो, दिसत नाही का आम्ही कित्ती कामे करतो, हौसेने, आम्हाला काही पैसे मिळत नाहीत, मग झाली थोडी गैरसोय तर लगेच नावे का ठेवता?

कुणीहि चूक झाली हे कबूल करायला तयार नाही. अकरा बी एमेम झाली, अजून गोंधळ आहेच!

इथे एवढी चर्चा होउनही यंदाच्या विश्व साहित्य संमेलनात (ते होण्याआधीच) गोंधळ व्हायचा तो झालाच !
(चर्चा वाचून तो झाला नसता असे नाही, पण इथल्या वादातून काही चांगल्या गोष्टीदेखिल बाहेर पडल्यात. त्या परदेशात असे कार्यक्रम करणार्‍या संयोजकांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या असे वाटले.)

ते संमेलन 'साहित्य' आणि हे 'नाट्य' म्हणून भेद असला तरी झालेला गोंधळ काही बाबतीत सारखाच आहे.

टोरांटोच्या संयोजकांपैकी कुणी माबोकर नाहीएत का?
असले असते तर इथली चर्चा वाचून काही गोष्टी नक्कीच टळू शकल्या असत्या.

आयबीएन लोकमतवर या विषयावरील कार्यक्रमात वादविवाद ऐकताना वाईट मात्र जरूर वाटले.
असो.

मान, सन्मान, हार तुरे मिळवण्याच्या नादात नियोजन मागे पडते..
नियोजन नुसतेच मागे पडत नाही, तर मुळातच नसल्याची शंका येते.
ते, मान सन्मान हार तुरे मिळवण्याच्या नादात होते असे मला वाटत नाही. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर समारंभ करायचे तर त्याला तितकेच व्यावसायिक लोक असावे लागतात. नुसत्या हौशीने करून होत नाही.
या देशात लग्न असले तरी wedding planners मिळतात. मग एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करायचा तर नुसती हौस आहे, शिकलेले लोक आहेत, करतील नीट असे म्हणून चालत नाही. कुणि व्यावसायिक लोकांना पैसे देऊन ही कामे का करून घेत नाहीत? नाहीतरी कार्यक्रमांची वर्गणी, जाणे येणे रहाणे यांचा खर्च काही कमी नसतो, तरी लोक येतातच, मग थोडे शुल्क वाढवले तर ते येणार नाहीत असे होणार नाही!

मग असल्या क्षुल्लक तक्रारी केल्या की 'यांना एकदा Broadway शो दाखवा रे... नाही मुळव्याध लागली...'तर असं रावसाहेबांसारखं म्हणतोही.

त्याला खाडकन प्रत्युत्तर देता येईल - ब्रॉडवे शोला करतात तेव्हढी तयारी केली होती का तुम्ही कार्यक्रम सादर करण्यापूर्वी?
आणि हो फणकार्‍याची/ हेटाळणीची/सतत कुचेष्टेची फोडणी अमेरिकेतली लोकंही देतातच बर्‍याचदा.

जेंव्हा मराठी लोक एकमेकांशी मराठीतून चर्चा करतात तेंव्हा ते फक्त 'मराठी' असतात. अमेरिकन भारतीय असे काही नसते. आता पुण्यात राहिलेले की इतर ठिकाणी राहिलेले यामुळे त्यांच्या शैलीत फरक पडू शकतो. कुणाला आवडत नसेलहि, पण त्याचा संबंध अमेरिका पुणे इ. शी नसून वैयक्तिक आवडीनिवडीशी आहे.

Pages