तुझ्या रूपातले राग

Submitted by क्रांति on 26 May, 2010 - 04:39

काही तालात, सुरात, काही लयीत चुकले
तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले

रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात
आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले

काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास
तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास
सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले

मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात,
आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात
तुला भूपात गाताना मीच मला हरवले

अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख
ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक
दयाघना, भेट आता; आळवून मी थकले

गुलमोहर: 

क्रांति

कविता आवडली. मला रागदारी बद्दल जास्त माहीती नाही... पण एकेका रागातून तू तो तो मूड उलगडून सांगितला आहेस असं वाटतं.

मालकंस - प्रणयासाठी आहे का ?

शेवटचं कडवं भैरवीकडं झुकणारं...खूप परिणामकारक !!

( बरंच शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून )