अंगावरती पाजेचिना....!!

Submitted by अभय आर्वीकर on 16 May, 2010 - 01:02

अंगावरती पाजेचिना....!!

इभ्रतीला झाकेचिना, तिला चोळी का म्हणावे?
भुकेल्याला लाभेचिना, तिला पोळी का म्हणावे?

वास्तवाला चितारेना, तिला शाई का म्हणावे?
अंगावरती पाजेचिना, तिला आई का म्हणावे?

श्रमाविना पैदासते, तिला वृद्धी का म्हणावे?
पीडितांना कुस्कारते, तिला बुद्धी का म्हणावे?

अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे?
बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?

विवेकाला स्मरेचिना, तिला सुज्ञ का म्हणावे?
तारतम्य हुंगेचिना, तिला तज्ज्ञ का म्हणावे?

अभयाने बोलेचिना, तिला वाणी का म्हणावे?
अंतरात्मा हालेचिना, तिला ज्ञानी का म्हणावे?

गंगाधर मुटे

गुलमोहर: 

अंगावरती पाजेचिना, तिला आई का म्हणावे?>>>>>>>>>>> तिला "आया" म्हणावे!
जन्मताच मुलांना फॉर्म्युला देणार्‍या आयांना आता "आई" म्हणता येणार नाही........ हुकमावरुन!

<< जन्मताच मुलांना फॉर्म्युला देणार्‍या आयांना आता "आई" म्हणता येणार नाही........ हुकमावरुन! >>

हा हूकूम वैद्यबुवांचा बर का! Happy

आता मी तरी काय म्हणावे??????????

ग्रेट.........ग्रेट..........ग्रेट!!!!!!!!!!

वा! सुंदर कविता Happy
आवडलेल्या शब्दांना, पंक्तींना अवतरण चिन्हांनी कोट करुन इथे लिहिणार होते, पण मग लक्षात आलं, अख्खी कविताचं परत लिहिली जातेय, आणि तो विचार रद्द केला.... इतके अप्रतिम लिहिलेय तुम्ही... Happy

हा हूकूम वैद्यबुवांचा बर का! >>>> वैद्यांचे दिवस गेले हो, आजकाल शिंक आली तरी डाक्तर लागतो.

बाकी गंगाधरदादा, कविता छानच... अंतर्मुख करुन सोडते, अर्थात तुमच्या सगळ्याच कविता अशा असतात म्हणा.

भुकेल्याला लाभेचिना, तिला पोळी का म्हणावे?
वास्तवाला चितारेना, तिला शाई का म्हणावे

हे आवडले.
बहिणाबाईंची अशी एक रचना आहे ना?त्यात कशाला काय म्हणू नाही...ते सांगितलेय. या कवितेतही तीच तळमळ जाणवते.

कविता उद्बोधक आहे यात शंका नाही. पण, असं वाटलं की तुम्ही सर्व 'ती' टाईप गोष्टींना लक्ष केले आहे.
<<<विवेकाला स्मरेचिना, तिला सुज्ञ का म्हणावे?>>> मला असं क्षणभर वाटून गेलं की फक्त 'स्त्री'ला उद्देशून ही कविता लिहिलीय ("अंगावर पाजेचिना..."). पण मग इथे 'व्यक्ती' असं घेतलं तर समाधान होतं. बहिणाबाईंची कविता व्यक्ती-समष्टींना उद्देशून आहे, त्यामुळे मी तरी लगेच त्यांच्याशी तुलना नाही केली. बाकी तुमच्या कविता आवडतातच. फक्त याबद्दल लिहावसं वाटलं म्हणून Happy