उच्चारकल्लोळ

Submitted by चिमण on 26 April, 2010 - 04:30

कुणी मला सांगीतलं की "मी माझं नाव लिहीतो 'खरे' पण म्हणतो 'खोटे'", तर मी म्हणेन खर्‍याची दुनिया नाही राहिली राव! हो, मग दुसरं काय म्हणणार? उच्चार जर 'खोटे' करायचाय तर 'खरे' लिहायचंच कशाला? 'खोटे' च लिहीना लेका! हे असं मला तरी वाटतं, तुम्हालाही तसंच वाटेल कदाचित! कारण, आपल्या देवनागरी लिपीत अक्षराप्रमाणे आणि अक्षराला लावलेल्या काना, मात्रा वेलांटी इ. इ. प्रमाणे नेमका उच्चार सूचित होतो. काही शब्दं हुलकावणी देऊन जातात, नाही असं नाही.. उदा. तज्ञ हा शब्द तज्ज्ञ असा लिहीला जातो, तर सिंह चा उच्चार सिंव्ह असा होतो... पण बहुतांशी उच्चार नीट करायला जमतात.

देवनागरी लिपीत अक्षरांचे उच्चार जमले की बहुतेक शब्दांचे उच्चार जमतात.. अर्थात, थोड्या गोच्या वगळता. मराठीतल्या 'च' चा उच्चार काही शब्दांमधे 'च्य' असा होतो, उदा. चप्पल.. उच्चार च्यप्पल न करता चप्पल असा केला तर चांगलं गाणं ऐकताना मधेच जबरी खरखर आल्यासारखं वाटतं. 'ज' चं पण तसंच आहे. 'लक्ष्य' चित्रपटात अमिताभने एका मराठी माणसाची भूमिका केली आहे.. कॅप्टन दामले त्याचं नाव.. त्यात एकदा तो एक मराठी म्हण म्हणतो.. कुठली ते आता आठवत नाही.. त्यात तो नको तिथे 'च' चा उच्चार 'च्य' असा करून तिडिक आणतो. 'चुकार चंदूने चरखा चालवता चालवता चारोळीयुक्त चमचम चोरून चाखली' हे वाक्य 'च्युकार चंदूने च्यरखा च्यालवता च्यालवता च्यारोळीयुक्त च्यमच्यम च्योरून च्याखली' असं वाचणार्‍याच्या असतील नसतील त्या सर्व पिढ्यांचा उध्दार करावासा वाटेल की नाही? तसंच. अशी घोडचूक अमिताभसारख्या नटानं केल्याबद्दल त्याला योग्य शासन काय करावे याचा मी बरेच दिवस विचार करीत होतो. पण परवा कुणी तरी हा प्रश्ण परस्पर सोडवला.. क्वालालंपूर विमानतळावर त्याने अमिताभला शाहरुख खान अशी हाक मारून योग्य ती जागा दाखवली.

अक्षरांच्या उच्चारां इतकच महत्व शब्दांतल्या अक्षरांवरील आघाताला (अ‍ॅक्सेंट) आहे! शब्दांच्या अक्षरांवरील आघातात थोडा जरी बदल केला तरी कीर्तनाला जाऊन रॅप संगीत ऐकल्यासारखं होतं. उदाहरणार्थ, निवडणूक हा शब्द म्हणताना आपण तो निवड-णूक असा तोडतो. याचे निव-डणूक असे तुकडे केले किंवा कणकवलीचे तुकडे कणक-वली असे केले तर तो शब्द पटकन कळतच नाही. तसंच 'याला काही अर्थ आहे का?' या वाक्यातल्या 'अर्थ' या शब्दाचा उच्चार इंग्रजी Earth ( अsर्थ् ) सारखा केला तर कानाची आग मस्तकात जाते.

मी उच्चारग्रस्त व्हायला माझ्या आयुष्यात आलेले बहुतेक सगळे कारणीभूत आहेत.. जास्त करून मास्तर आणि मित्रमंडळी. एकीकडे, मराठी हिंदी सारख्या विषयांचे मास्तर स्पष्ट उच्चार करा म्हणून डोकंफोड करायचे. आणि इंग्रजी मधे, शब्दोच्चाराबद्दल 'स्पष्ट न बोललेलेच बरे' असा सूर असायचा. कधी इंग्रजी शब्दातल्या अक्षरांचे उच्चार करायचे नसतात तर कधी नसलेल्या अक्षरांचे उच्चार करायचे असतात. हे गौडबंगाल मला अजूनही कळालेलं नाही. त्यामुळे काही अक्षरांचे उच्चार नको तेव्हा केल्या / न केल्याने मी लोकांची खूप करमणूक केली आहे. इंग्रजीत R चा उच्चार न करायची एक प्रथा आहे. काय अघोरी प्रथा आहे! मराठीत नाही आहे ते किती बरं आहे ना? नाही तर 'नदीला पूss आला' म्हणावं लागलं असतं.

मराठी शाळेत इंग्रजी शिकण्याचा प्रमुख तोटा बरोबर उच्चार ऐकायला न मिळणे हा एक आहे. J चा उच्चार ज्ये करायचा असतो हे कळण्यासाठी मला बरीच उमेदीची वर्ष खर्च करायला लागली. Deaf चा उच्चार डेफ, डीफ नाही.. त्याचा उच्चार Leaf सारखा करायचा नसतो.. Oven चा आव्हन, Computer चा कंप्युटर, Sarah चा सेरा आणि Diana चा डायाना अशा अनेक उच्चारांची मौलिक भर माझ्या हितचिंतकानी कॉलेजात आणि नंतरच्या आयुष्यात घातली.

मात्र अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर माझ्या बर्‍याच उच्चारांचं पानिपत झालं. अमेरिकन लोकं O चा उच्चार बर्‍याच शब्दात 'आ' असा करतात.. उदा. Project चा प्राजेक्ट व Honest चा आनेस्ट. तसंच ते 'I' चा उच्चार काही शब्दात 'इ' ऐवजी 'आय' करतात.. उदा. Vitamin चा व्हायटामिन किंवा Carolina चा कॅरोलायना. आपल्याकडच्या सुनीता (Sunita) या नावाचा उच्चार अमेरिकेत सनायटा होण्याची खूप शक्यता आहे. ज्या शब्दांचा शेवट tory ने होतो अशा काही शब्दांच्या अमेरिकन उच्चारात शेवटी टोरी येतो, उदा. Observatory आब्झर्व्हेटोरी, Inventory इन्व्हेटोरी. पण Laboratory चा उच्चार लॅब्रेटोरी कसा काय होतो ते ब्लडी अमेरिकनच जाणे! अजून काही उल्लेखनीय अमेरिकन उच्चार असे आहेत.. Niagara नायाग्गरा, Z चा झी, Connecticut कनेटिकट, Newark नुवर्क, Illinois इलिनॉय, Mature मॅटुअर, Tuition ट्युईशन, Coupon क्युपॉन.

अमेरिकेत असताना Schedule ला शेड्युल ऐवजी स्केड्युल म्हणायचं वळण जिभेला महत्प्रयासानं लावलं होतं. आता इंग्लंडात आल्यावर ते वळण परत सरळ करायचा आटोकाट प्रयत्न चाललाय. एकदा, Garage या शब्दाचा नेमका उच्चार काय हे माहीत नसल्यामुळे मी नेटवरच्या एका स्थळाची मदत घेऊन तो ऐकला. त्यानं मला गराज असा उच्चार सांगीतला. नंतर माझ्या गाडीचा इन्श्युरन्स काढायच्या वेळेला मला 'रात्री गाडी कुठे ठेवणार?' हा प्रश्ण टाकताच, मी ऐटीने 'गराज' असं सांगीतलं. त्यावर २/३ मिनीटं विचार करून त्यांनं मला 'म्हणजे गॅरेज का?' असा प्रतिप्रश्ण करताच माझा बँड वाजला. तिकडे त्याच्या चेहर्‍यावरचे 'न जाने कहाँ कहाँसे चले आते हैं' असे भाव मला फोन मधून स्पष्ट दिसले.

इंग्लंडमधेही मला सर्व सामान्य तर्काला तोंडघशी पाडणारे खूप उच्चार ऐकायला मिळाले. Edinburgh हे वाचल्यावर मी त्याचा पीटसबर्ग सारखा एडिन्बर्ग असा उच्चार केला. त्याचा खरा उच्चार एडिन्बरा ऐकल्यावर मात्र कानात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सूर घुमायला लागले. Gloucester, Bicester, Leicester, Worcester या गावांचे उच्चार अनुक्रमे ग्लोस्टर, बिस्टर, लेस्टर, वूस्टर असे होतात. त्यांच्या स्पेलिंग मधल्या ce या अक्षरांना उच्चारात काडीची किंमत नाही. पण Cirencester याचा उच्चार मात्र सायरनसेस्टर असा व्यवस्थित स्पेलिंगप्रमाणे होतो. 'H' चा उच्चार काही लोक 'हेच्य' असा करतात. हा उच्चार मी ऑस्ट्रेलियन आणि काही तमिळ लोकांकडूनही ऐकला आहे. Norwich चा नॉर्विच नसून नॉरिच, Greenwich ग्रिनिच आणि Derby चा डर्बी नसून डार्बी आहे. Plymouth Portsmouth चे उच्चार प्रथम दर्शनी प्लायमाउथ पोर्टस्माउथ असे वाटतील, प्रत्यक्षात ते प्लिमथ पोर्टस्मथ असे होतात. काही उल्लेखनीय उच्चार - Magdalen मॉडलेन, Tortoise टॉटस, Caius कीज.

शब्दांच्या शेवटी ham येत असेल तर त्याचा हंबरल्यासारखा 'हम' असा उच्चार होतो. उदा. Birmingham बर्मिंगहम, Fareham फेर्‍हम. याच नियमाने Cheltenham चा चेल्टन्हम असा व्हायला पाहीजे. निदान, माय फेअर लेडी मधे रेक्स हॅरिसन तरी तसा करतो. पण त्याचा सर्रास चॉल्टन्हम असा थोडा विचित्र उच्चार होतो. जॉर्ज बर्नार्ड शॉला असले उच्चार ऐकून किती हताश व्हायला झालं असेल याची आता मला थोडी फार कल्पना यायला लागली आहे. इंग्लंड मधे उत्तरेला न्यू कॅसल गावाच्या आजुबाजूला इंग्रजी या नावाखाली जे काही उच्चारतात ते इथल्या भल्याभल्यांना देखील पहिल्या फटक्यात कळत नाही. त्या उच्चार पध्दतीला जॉर्डी म्हणतात. त्यात dead डेडे, cow कू, house हूस, strong स्ट्रांग, out ऊट असे भयानक उच्चार होतात. याच्याही उत्तरेकडचे स्कॉटिश लोकांचे काही उच्चार असे आहेत.. Earth एर्थ, Pound पौंड, Time टैम.

रोमन लिपी बर्‍याच युरोपियन भाषेतले लिखाण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे या लिपीतल्या काही अक्षरांचा उच्चार भाषेप्रमाणे वेगवेगळा होतो. माझ्या मते 'J' हे अक्षर सगळ्यात जास्त प्रदूषित आहे. त्याचा स्पॅनिश भाषेत 'ह' असा उच्चार होतो. उदा. San Jose सॅन होजे, Jalapeno हालापेनो, Natasja नताशा. जर्मन भाषेत 'J' चा उच्चार 'य' असा होतो. उदा. Ja या, Jung युंग, Jogurt योगर्ट. एका भाषेत, बहुतेक स्विडीश, भाषेत 'J' चा उच्चार 'इ' असा होतो. उदा. Fjord फिओर्ड, Bjorn बिऑन. तसंच 'V' चा उच्चार जर्मन भाषेत काही वेळा 'फ' असा होतो. उदा. Volkswagon फोक्सवॅगन, Von Neumann फोन नॉयमन.

इंग्रजी भाषेत इतर भाषांमधले भरपूर शब्द घुसले आहेत आणि त्यांचा जमेल तसा उच्चार केला जातो. Avatar या चित्रपटाच्या नावाचा अ‍ॅवॅटार असा प्रचंड विनोदी उच्चार केला जातो. Memoir मेम्वा, Paris पारी, Artois आर्त्वा, envelope आँव्हलोप, Peugeot पेजो, Renault रनॉ, Louis लुई असे काही फ्रेंच शब्दांचे उच्चार आहेत. यांचे भलतेच इंग्रजी उच्चार ऐकून फ्रेंचांचीही बहुधा करमणूक होत असेल, कारण माय फेअर लेडी च्या 'व्हाय कान्ट द इंग्लिश लर्न टू स्पीक' या गाण्यात म्हंटल्याप्रमाणे ते कडवे उच्चारवादी लोक आहेत..

Why can't the English
Teach their children how to speak
Norwegians learn Norwegian
The Greeks are taught their Greek
In France every Frenchman
Knows his language from A to Zed
The French don't care what they do actually
As long as they pronounce it properly

इतकी वर्ष इतका शब्दच्छळ करून, ऐसे उच्चार मेळवून मी एवढंच तात्पर्य माझ्यापुरतं काढलंय की कुणीही उच्चाराबद्दल काहीही सांगीतलं तरी फारसं मनावर घ्यायचं नाही.

(टीप :- हा सर्व लेख ऐकीव माहितीवर आधारित आहे. )

====== समाप्त======

गुलमोहर: 

मस्त लेख Happy

'य' आणि 'ज'ची मजा आपल्याकडेही आहेच. यशपाल - जसपाल, यशलोक - जसलोक..
बाकी, Renaultचा उच्चार रनॉ असा आहे आणि envelope - आँव्हलोप, Artois - आर्त्वा

>>त्याचा खरा उच्चार एडिन्बरा ऐकल्यावर मात्र कानात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सूर घुमायला लागल
मस्त खुसखुशीत लिहिले आहे Lol
>>कधी इंग्रजी शब्दातल्या अक्षरांचे उच्चार करायचे नसतात तर कधी नसलेल्या अक्षरांचे उच्चार करायचे असतात. हे गौडबंगाल मला अजूनही कळालेलं नाही.
मला तर अजुन इंग्रजीत उच्चाराचा उच्चार काय आहे हे पण कळाले नाहि.. Rofl

मस्त लेख चिमण नेहमी प्रमाणे .
आमच्या ऑफिसात ला किस्सा knoor bremse चा उच्चार कोणी तरी मिटींग मधे नूरब्रेमसे (नॉरब्रेमसे च्या ऐवजी केला होता) जाम हसलो होतो सगळे
इंग्रजीत R चा उच्चार न करायची एक प्रथा आहे. काय अघोरी प्रथा आहे >>> अगदी अगदी, ह्या बाबतीत मुल नेमकी आपल्याला कोंडीत पकडतात. Proud

मस्तच Lol उच्चारांच्या विविध पध्दती वाचताना मी फिदीफिदी हसत होते.... आपले मायदेशी खणखणीत उच्चार इतके अंग(सॉरी! जीभ)वळणी पडलेले असतात की परदेशी बोबड्या बोलांचे अर्थ (अsर्थ नव्हे!) लावण्यातच मेंदूचा भुगा होऊन जातो. गण्या म्हणतो सर्वांनी एस्पेरान्तो भाषा शिकून त्यातच संवाद साधावा!! Wink

त्याचा खरा उच्चार एडिन्बरा ऐकल्यावर मात्र कानात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सूर घुमायला लागले!
Lol
छॅन ल्येख च्यिमण Proud

धन्यवाद सगळ्यांना!

चिनूक्स, तुझ्या सांगण्याप्रमाणे लेख बदलला आहे.. कुणीही उच्चाराबद्दल काहीही सांगीतलं तरी फारसं मनावर घ्यायचं नाही हे माझं धोरण असलं तरीही.

धमाल लेख!!
>> उच्चाराबद्दल काहीही सांगीतलं तरी फारसं मनावर घ्यायचं नाही.
अगदी बरोबर!
पहिल्यांदाच फ्रांसला जाउन आल्यावर मित्राच्या बोलण्यात Peugeot चा उच्चार पिउजिओट् असा काहितरी ऐकल्यावर मी मारे त्याला खरा उच्चार 'पजो' सांगितला... तो सरळ म्हणाला, तो फ्रांन्समधला उच्चार, भारतात तसा उच्चार करत नाहीत!! तेंव्हाच मला साक्षात्कार झाला की उच्चार महत्वाचे नाहीत (कॉलसेंटरची नोकरी नसेल तर!)

मस्त लेख! काही उच्चार नव्यानं समजले. Happy

स्पॅनिश भाषा बोलणारे लोक मंजुषाचं 'मॅनहुसा' करतात तेव्हा अतीव दु:ख होतं. Proud

खूप सही लेख! उच्चार हा प्रांत फार त्रासदायक आहे.. काही अ‍ॅक्सेंट तर जमतच नाहीत आपल्या शुद्ध मराठी वळणाच्या जीभेला!

लेख सही झालाय.
इंग्लंडातला अजून एक उच्चार म्हणजे सदम्प्टन (Southampton). अमेरिकन लोक एकीकडे अगदी स्पेलिंगला धरून इंटरमिडिएट, अ/इम्मिडिएट, ल्युटेनंट (नशीब कल्नल नाही म्हणत) वगैरे म्हणतात आणि दुसरीकडे अर्कान्सा म्हणतात. शिवाय तुम्ही म्हणता तसे 'आय'चे खूळ असल्यामुळे आयरॅक, आयरॅन असे म्हणतात (त्यांना युटाहची सवय आहे). इराकी-इराणी लोक फार हताश होतात (हा हताशपणा ऐकला आहे).
फ्रेंचांचे तर भलतेच असते. त्यांचे एक माजी अध्यक्ष Francois Mitterrand फ्रांकॉइस मिट्टरँड नव्हते तर फ्रान्स्वा मित्तराँ होते. ते एकवेळ बरे. माझे Sauvignon Blanc सुविन्याँ ब्लाँ, Merlot मर्लो, Bordeaux बोर्-डॉक्स (आरोपी) बोर्-डो (संशयित) बोदोऽ (बाइज्जत बरी), Chenin Blanc शेनॉ ब्लाँ, Cabernet कॅबर्ने, Chablis शॉब्ली वगैरे वाइन्सचे उच्चार दुकानदाराने दुरूस्त केले आहेत. अडाणीपणाचा टेंभा तरी किती मिरवायचा! फिजिक्समध्ये शास्त्रज्ञांच्या नावांमध्ये धमाल येते. (di Broglie) डिब्रॉग्ली नाही, डिब्रॉय. (Fresnel) फ्रेस्नेल नाही, फ्रेनेल. l'Hospital या गणितज्ञाचे नाव इस्पितळाच्या जवळ नसून लॉपिताल आहे इ. इ.

छान लिहिलं आहे रे चिमण.. अशा प्रकारचे अनुभव असल्यामुळे वाचायला मजा आली.

अरभाट, ते डिब्रॉय आहे हे मला आत्ता कळले. इतकी वर्षं मी डिब्रूग्ली म्हणायचो.

अमेरिकन लोकांनी 'बरोबर उच्चार हा आहे' असं सांगितलं की मी त्यांना दरवेळी सुनावतो.. 'काय तुमची लिपी.. आमच्याकडच्या लिपी पहा, जे लिहिलंय ते एकाच पध्दतीने वाचता येतं' वगैरे.

:

Pages