LEST WE FORGET! - the ANZACs - एक शौर्य गाथा

Submitted by लाजो on 22 April, 2010 - 23:23

LEST WE FORGET!

२५ एप्रिल १९१५:
गलिपोलीचा अनोळखी समुद्र किनारा, काळी कभिन्न रात्र, हाडं गोठवणारी थंडी, पुढे उभा ठाकलेला खडकाळ डोंगरप्रदेश आणि या सर्वांवर मात करत, कधी लपत, कधी लढत, पुढे सरकणारे ऑस्ट्रेलिअन आणि न्युझिलंड आर्मी चे सैनिक....

२५ एप्रिल २०१०:
कॅनबरातील ऑस्ट्रेलिअन वॉर मेमोरिअल, पहाटेचे ०५.३० वाजलेले, हाडं गोठवणारी थंडी, थोडा वारा, भुरुभुरु पाऊस आणि या सगळ्यांवर मात करत स्तब्ध उभा जनसमुदाय, वातावरणात गुढ शांतता आणि तेव्हढ्यात काळजाला चिरून जाणारा बिगुलाचा आवाज... एक क्षण छातीत धडधड वाढते आणि मग थंडी, वारा, पहाटे ४.०० वाजता उठणे हे सगळ विसरुन आपण समोर होणार्‍या ANZAC Day च्या 'डॉन सर्विस (dawn service)' मधे समरस होऊन जातो....

dawn 1.jpg

---------------------
The ANZACs:

ही गोष्ट आहे १९१४ मधे सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धाच्या वेळची. जर्मनी विरुद्ध ब्रिटन, फ्रान्स आणि रशियन अलायन्सेस यांच्यातिल युद्धाची. ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड ब्रिटीश अधिपत्याच्या दबावामुळे या युद्धात समिल झालेले. युद्ध सुरु होणार ही कुणकुण लागताच ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमधे सैनिकी प्रशिक्षण आणि सैन्य भरती सुरू झालेली. कित्येक तरुण मुलं आपणहुन सैन्यात भरती झाली. काही तर युद्धाची एक्साइटमेंट आणि ब्रिटनशी असलेले आपले नाते यासाठी आपण वयाने पात्र आहोत असे खोटे दाखले देऊन सैन्यात भरती झाले.

युद्धाला सुरुवात होताच सुमारे ३०,००० सैनिकांचा ताफा ऑक्टोबर १९१४ मधे युरोपला जायला रवाना झाला. ऑस्ट्रेलियन आणि न्युझिलंडच्या या सैनिकी तुकडीला नाव मिळाले... the ANZACs - Australian and Newzealand Army Corps.

हे युरोपकडे निघालेले ANZACs फ्रान्स पर्यंत पोचलेच नहित. वाटेतच त्याना टर्कीमधे उतरवले गेले, तुर्की सैन्याशी युद्ध करण्यासाठी. रशियन्स जे जर्मनीच्या पुर्व किनार्‍यावर लढत होते त्यांनी ब्रिटीश आणि फ्रेंच दलांवर टर्कीशी सामना करायचा दबाव आणला. कारण टर्की सुलतानाने जर्मनी बरोबर हात मिळवणी केली होती. ANZACs ना तिथे उतरवण्याचा मुळ उद्देश होता टर्कीची राजधानी कॉन्स्टांटिनोपल (आताचे इस्तांबुल) काबिज करणे आणि टर्कीवर कब्जा करणे, कारण त्यामुळे मुळे अलाईड दलांना (ब्रिटेश, फ्रेंच) रशियाकडे जाणारा समुद्री मार्ग (ब्लॅक सी मधुन) मोकळा होणार होता.

ANZCoveBig.jpg

गलिपोली - ANZAC Cove

ब्रिटीश दलाने टर्कीतिल एकाकी गलिपोली पेनिन्सुला (इतिहास प्रसिद्ध ट्रॉय सिटी च्या जवळ) वरुन चढाई करायचे ठरवले आणि ANZACs ना त्या दिशेने कुच करायला लावली. त्यानुसार २५ एप्रिल १९१५ च्या काळ्या रात्री ANZACs गलिपोली च्या किनार्‍यावर उतरले. अश्या अपेक्षेने की तुर्की दळ जास्त प्रतिकार करु शकणार नाही कारण त्यांची संख्या खुप कमी आहे. परंतु, त्यांच्या नशिबी काहितरी दुसरेच लिहीले होते.

गलिपोलीच्या भुमीवर पाय ठेवताच त्याना असंख्य संकटांना सामोरे जावे लागले. भयंकर थंडी, अनोळखी प्रदेश, खडकाळ खडे डोंगर आणि लढायला सज्ज असलेली तुर्की सेना. या सेनेचा कमांडर होता मुस्ताफा कमाल (पुढे तो आतातुर्क - Ataturk म्हनुन प्रसिद्धीस आला). ANZACs ने शर्थीने लढण्याचा प्रयत्न आला पण परिस्थितीशी सामना करताना त्याना नाकी दम आला. कित्येक ANZAC धारातिर्थी पडले, कित्येक जखमी झाले. थंडी मुळे आजारी पडले. पुढचे आठ महिने हे.ANZACs तिथे अडकुन पडले होते. शेवटी २० डिसेंबर १९१५ या दिवशी त्यांची तिथुन सुटका झाली. परंतु ह्या आठ महिन्यात या सैनिकांनी खुप हालापेष्टा सोसल्या. या अपयशी युद्धात ८००० च्या वर ऑस्ट्रेलियन आणि न्युझिलंड सैनिकांचा बळी गेला, १८,००० च्या वर जखमी झाले. या युद्धात बळी गेलेल्यांपैकी अनेक १६ ते २५ वयोगटातले होते. सगळेच सैनिक व्हॉलेंटीर्स होते...

ANZACs चे हे समर्पण ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड यांच्यासाठी एक ओळख 'लेगसी' सोडुन गेले. या युद्धात सामिल झालेल्या आणि धारतिर्थी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणुन २५ एप्रिल हा दिवस ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमधे 'ANZAC Day' म्हणुन साजरा केला जातो.

----------------

The Dawn Service:

दर २५ एप्रिल ला सुर्योदयापुर्वी सैन्यदलातिल अधिकारी, आजी-माजी सैनिक त्यांची कुटुंबे तसेच खुप सामान्य नागरिक एकत्र येतात आणि दिवंगत सैनिकांना श्रद्धांजली वहातात. पहाटे ठीक ५.३० वाजता सुरु होणार्‍या या सर्विस मधे सहा महिन्याच्या बाळांपासुन ते ९० वर्षंच्या आजोबा-आजींपर्यंत सगळे सामिल होतात. बर्‍याच जणांच्या हातात पेटलेल्या मेणबत्त्या असतात. पॉपीची लाल फुले असतात.

candle4_0.jpg

सर्विस च्या वेळी युनिफॉर्म घातलेले सैनिक शिस्तबद्ध उभे असतात. काही सामान्य आपल्या आजोबा, वडिल यांना मिळालेली शौर्यपदके छातीवर लावुन उभे असतात. डॉन सर्व्हिसची सुरुवात काही प्रार्थना म्हनुन होते मग मिनीटाची शांतता. त्यानंतर बिगुल वाजतो. समोर असलेल्या शौर्यस्स्मारकावर वीरचक्र (रीथ), फुले वाहिली जातात आणि श्रद्धांजली पर काही प्रार्थना म्हंटल्या जातात. त्यानंतर परत बिगुल वाजतो आणि ही डॉन सर्व्हिस संपते. ही सर्विस फक्त अर्धा तास चालते.

wreath2.jpgmemorial.jpg

या सर्विस चे वातावरण इतके भारलेले असते की नकळत आपणही नतमस्तक होतो, डोळ्यांच्या कडा पाणावतात. या सैनिकांच्या बलिदानाने मन हेलावुन जाते. त्यावेळचे मनातले भाव हे वर्णन करणे केवळ अशक्य. पुढील ओळी कदाचित काही सांगुन जातिल...

They shall not grow old,
As we that are left grow old.
Age shall not weary them,
Nor the years condemn.

At the going down of the sun,
And in the morning,
We will remember them.
We will remember them.

Lest we forget...

The ANZAC Dedication:
For the Fallen
by Laurence Binyon

anzac-07.jpg

डॉन सर्विस नंतर वॉर मेमोरियल मधे असलेल्या 'tomb of unknown soldire' या स्मारकाजवळ श्रद्धांजली वाहिली जाते.

wm  inside.jpg

----------------

ANZAC Day मेन सेरेमनी:

सकाळी बरोबर १०.१५ वाजता वॉर मेमोरियल समोर असलेल्या परेड ग्राऊंडवर मेन सेरेमनी सुरु होते. यात जवांनानां श्रद्धांजली, विमानांची सलामी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, सैन्यदलांचे प्रमुख इत्यादींचे देशाला उद्देशुन भाषणे होतात. वॉर मेमोरियल समोर असलेल्या 'ANZAC PARADE' रस्त्यावर परेड असते. यात सैन्य दलातिल जवान, अधिकारी, दुसर्‍या महायुद्धात लढलेले अजुन हयात असलेले आजोबा/पणजोबा आपल्या मुलांबरोबर, नातवांबरोबर सामिल होतात. इतर युद्धात सामिल झालेले सैनिक, लषकरातिल डॉक्टर, नर्सेस ही सामिल होतात. काही अधिकारी घोड्यांवर स्वार असतात. सगळ एकदम शिस्तबद्ध असत.

air show.jpgWWII veteran.jpgWWII veteran2.jpghorses.jpgmarch.jpgmarch_building.jpg

मेन सेरेमनी दीड तास चालते. त्यानंतर दिवसभर अनेक कार्यक्रम असतात. लष्करी हेलिकॉप्टर्स, वहाने पटांगणात आणुन ठेवतात. सामान्य नागरिकांना ही जवळुन बघता येतात, जवानांशी गप्पा मारता येतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्र्म असतात. वॉर मेमोरियल म्युझियम सर्वांसाठी खुले असते.

अत्तापर्यंतच्या ज्या ज्या युद्धात ऑस्ट्रेलियाने भाग घेतला आहे आणि जे जवान धारातिर्थी पडले आहेत त्यांची नावे वॉर मेमोरियलच्या भिंतीवर कोरली आहेत. जवांनांचे नातेवाईक त्यांच्या नावांपुढे पॉपी चे फुल लावतात.

poppy.jpg

२५ एप्रिलचा दिवस हा खास सैनिकांचा दिवस असतो. त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. त्यांच्यासाठी अनेक हॉटेल्स, क्लब्ज मधे सवलती असतात. 'टु अप' हा खास खेळही खेळला जातो. अख्खा दिवस हा ANZAC spirit ने - courage, mateship and sacrifice - साहस, बंधुत्व आणि बलीदान - याने भारावलेला असतो.

---------------

आमच्यासारख्या सामान्यांना एक आणखिन सुट्टी मिळते म्हणुन आम्हीही खुष असतो. ANZAC बिस्किटे खातो. शॉपिंगला जातो. दोस्तांबरोबर पिकनीक करतो. मजा करतो. दिवस कसा पटकन संपतो. पण पहाटे डॉन सर्व्हिसला अनुभवलेले ते मंत्रमुग्ध करणारे काहीच क्षण मनात घर करुन रहातात ते कायमचेच.

LEST WE FORGET!

---------------

अधिक नोंदी:

- ANZAC Day हा ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड या दोन्ही देशात साजरा केला जातो.
- सगळ्या शहरांमधे डॉन सर्विस आणि परेड ऑर्गनाईज केल्या जातात. कॅनबरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी असल्यामुळे इथले कार्यक्रम जास्त मोठ्या प्रमाणात असतात.
- यंदाच्या डॉन सर्विस ला २०,००० लोक कॅनबरातिल वॉर मेमोरियल ला उपस्थित होते.
- गलिपोली येथे ANZAC स्मारक उभारले आहे. येथेही डॉन सर्विस केली जाते. अनेक ऑस्ट्रेलियन आणि न्युझिलंड नागरिक या सर्विस ला उपस्थित रहाण्यासाठी खास गलिपोलीला जातात.
- गलिपोली हुन सुटका झाल्यावर हे ANZACs पुढे फ्रान्सला गेले. कित्येक या महायुद्धात धारातिर्थी पडले. फ्रान्स मधे देखिल ANZAC स्नारक आहे आणि तिथेही डॉन सर्विस केली जाते.
- ANZAC बिस्किटे ही युद्धावर जाणार्‍या सैनिकांना बरोबर देण्यासाठी काहितरी टिकाऊ पदार्थ हवा म्हणुन खास बनवण्यात आली. ही बिस्किटे ओट्स, खोबरे, मैदा इ. घालुन बनवलेली असतात. ही बिस्किटे खुप पौष्टिक असतात.

गुलमोहर: 

मस्त वर्णन. माहितीपुर्ण आणि डोळ्यापुढे चित्र उभ करणार Happy
कालच्या पेपर मधल्या होलोकॉस्ट स्मारक बद्दलच्या लेखाची आठवण झाली

LEST WE FORGET!
>>
हे तु मुद्दाम लिहीलयस का तसंच आहे ते?? LETS असं असायला हवं ना??

नाही यो.. ते LEST च आहे...

हे पहा-

Main Entry: lest
Pronunciation: \ˈlest\
Function: conjunction
Etymology: Middle English les the, leste, from Old English thȳ lǣs the, from thȳ (instrumental of thæt that) + lǣs + the, relative particle
Date: before 12th century

: for fear that —often used after an expression denoting fear or apprehension e.g 'worried lest she should be late' 'hesitant to speak out lest he be fired'

दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती...

छान वाटलं. त्या वीरांच्या बलिदानाची आजही दखल घेतली जाते हे पाहून. आपल्याकडे कुणालाच सैनिकांच्या हौतात्म्याशी देणॆ घेणे नसते Sad

माहिती आणि हा लेख आवर्जुन लिहील्याबद्दल खुप ख्प आभार. Happy

अप्रतिम... लाजो खरंच खुप खुप सुंदर, भावनांना हात घालणारा, माहीतीपर लेख आहे हा....

छान वाटलं. त्या वीरांच्या बलिदानाची आजही दखल घेतली जाते हे पाहून. आपल्याकडे कुणालाच सैनिकांच्या हौतात्म्याशी देणॆ घेणे नसते ....>>>> अगदी अगदी.... अनुमोदन... आपल्याकडे त्यांच्या बलिदानामध्येदेखिल भ्रष्टाचार करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जातो....

छान लिहिलयस. Happy
परत एकदा ईतिहासात डोकावून आणलस.
त्या वीरांच्या बलिदानाची आजही दखल घेतली जाते हे पाहून. आपल्याकडे कुणालाच सैनिकांच्या हौतात्म्याशी देणॆ घेणे नसते<<<<<<<<अनुमोदन. शिवाय प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याच्या अट्टाहासापायी त्या दिनाचं गांभीर्य घालवल्याचं दु:ख जास्त.

झकास हां. ते ट्रॉयजवळ उतरले थंडीत ते आणि दे शॅल नॉट ग्रो ओल्ड वाचुन शहारे!! लय अभ्यासपुर्‍ण!! अ‍ॅनझॅक्स!!

Pages