भाषेच्या गमतीजमती-भाग-२

Submitted by अभय आर्वीकर on 19 March, 2010 - 13:04

भाषेच्या गमतीजमती-भाग-२

आमच्याकडे बोलतांना-लिहितांना “मला जाग आला” असे म्हणतात.
मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा मी सुरेश भटांचे “पहाटे पहाटे मला जाग आली” हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा ”जाग” हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला “चेव” हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे “मला चेव आला” हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.
पण जसजसा अशिक्षित समाज शिक्षितांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
“मला चेव आला” हे वाक्य फक्त शब्दबदल करून “मला जाग आला” असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
मी पण तसेच म्हणतोय. काय करणार? माझ्या सभोवताल सगळेच “जाग आला” असे म्हणत असतांना मी एकट्यानेच “जाग आली”
असे म्हणायचे ठरवले तर माझीच मुर्खात गणना व्हायची. Happy

गंगाधर मुटे
.................................................
भाषेच्या गमतीजमती-भाग-१
.................................................

गुलमोहर: 

मुळ पोष्टवर नानबा यांचा प्रतिसाद

आमच्याकडे चेव हा शब्द स्फुरण ह्या अर्थी वापरतात..
उदा:
एकदम चेव चढला मला... आता करुन बघुयातच ठरवलं मी
वक्ता असा गडबडलेला बघून आधीच हुल्लड करणार्‍या श्रोत्यांना आणखीनच चेव चढला!

आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
>> आधी मलाही असं वाटायचं की न आणि ण चा फरक झाला, असं काही वेगळं बोललं की अशुद्ध!
पण नंतर कळलं.. की ह्यातही गम्मत आहे. इतर भाषांचे इन्फ्लुएन्स होऊन मुळ भाषा कशी बदलते.. एखादा विशिष्ट भाग एखादा शब्द वेगळा का आणि कसा बोलतो वगैरे..
आणि मुळात कसं आहे, हे नियम लिहून ठेवायचं काम सुशिक्षित वर्गानं केलं, त्यामुळे त्यांनी त्यांना योग्य वाटणार्‍या गोष्टींना तसं नियमबद्ध केलं (म्हणजे तेच बरोबर असं कसं म्हणणार? विशेषतः गोष्टीचं लिंग वगैरे ठरवताना /दुसर्‍या भाषेतून काही बदल करून शब्द मराठीत आला असेल तेव्हा वगैरे)
तरिही वेळप्रसंगी मी पण कचाकचा भांडतेच ह्यावरून Wink

<< तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.>>

आवडलं. सचेतचं चेता झालं असावं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांत मराठीतील एकाच अर्थाचे पण भिन्न शब्द, आणि एकच शब्द पण त्याचे भिन्न अर्थ पाहिले की मजा वाटते!

आमच्याकडे लाईट आली असे म्हणतात
मला वाटत ते "वीज आली /गेली ", यावरुन सुरु झाल असेल..:)
अजुन एक, जेवत जेवत बोलायच कि बोलत बोलत जेवायच?