जडशीळ

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 March, 2010 - 13:55

"अनाकलनीय ?
साधा, सरळ शास्त्रीय नियम आहे हा.
...
....
तू म्हणाली होतीस एकदा,
'बोलल्याने मन मोकळं होतं. दु:ख हलकं होतं'
...
.....
पण रित्या पोकळ्या पुन्हा भरायला वेळ लागत नाही.
मग असं मोकळं होण्यापेक्षा मन कायम तुडूंब, शिगोशिग
भरलेलं असलं तर..
एक म्हणजे, नवीन काही भर पडलीच तर ती जाणवणार नाही किंवा
उतू तरी जाईल,
शिवाय जे आहे ते न हिंदकळवता वावरण्याची सवयही लागेल.
दुसरं म्हणजे, हलक्या वस्तू पृष्ठभागावर तरंगतात.
त्यापेक्षा त्यांना जडशीळ करून तळाशी एकजीव केलं तर....... ?
...
......
मौनामुळे जगणं जास्त सोपं होईल, अस नाही वाटत तुला ?
.......... "

गुलमोहर: 

गुरुवर्य, थोडासा हरवलोय खरा... पण आहे अजून इथेच. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार.

एक म्हणजे, नवीन काही भर पडलीच तर ती जाणवणार नाही किंवा
उतू तरी जाईल,
शिवाय जे आहे ते न हिंदकळवता वावरण्याची सवयही लागेल.
दुसरं म्हणजे, हलक्या वस्तू पृष्ठभागावर तरंगतात.
त्यापेक्षा त्यांना जडशीळ करून तळाशी एकजीव केलं तर....... ?>>>>>>>>

हि अवस्था किती छान असेल ना. असं जर का होवू शकलं तर ......
किती विवंचना, किती समस्या आपोआपच मुळापासुन उखडल्या जातील. पण जर त्यांना तळाशी एकजीव केलं तर कालांतराने सगळंच बोथट होवून जाण्याचा एक धोकाही संभवतो त्याचं काय?

आयला कौत्या.. तू भलत्याच विचारात पाडलंस राव. Happy

शाळेतलं फीजिक्स जर असं आयुष्याला लावता आलं तर किती सोप्पं होईल ना सगळं....मस्त कल्पना...खुप छान मांडलंय Happy

विशाल, नाण्याला दोन बाजू असतातच. पण काट्यापेक्षा छापाला जास्त महत्व आहे जगात. सर्वसाधारण प्रवृत्ती. पण हा विचार आयुष्यात खरचं लागू करता येईल असं मला वाटतं. वेदना, विवंचना नाहीत असा कोणी नाहीच. पण अनेकांना त्यांच्या जाहीरातीची सवय झालेली असते. सहानुभूतीच्या लाटेवर जगण्याचा अनोखा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न. जे फार जव़ळ आहेत त्यांना आपलं दु:ख सांगावं लागत नाही, ते समजून घेतात. जे जवळ नाहीत, त्यांचा तर प्रश्नच नाही. दु:खाना तळाशी एकजीव केलं तर तेच आपल्या अस्तित्वाचा पाया बनू शकतात. बघ विचार करून.

दु:खाना तळाशी एकजीव केलं तर तेच आपल्या अस्तित्वाचा पाया बनू शकतात>>>>>>>>>>>
अरे पण सुखाच्या ओघात दु:ख विरून गेली तर पाया कसा राहील टिकून? कल्पनाच जरा जडशीळ..... म्हणजे भारी आहे. अस्मादिकांच्या अल्पमतीचा परीणाम. नंतर समजावून सांग बाबा!

कविता सुंदर.. कौतुक स्टाईल !!
जे फार जव़ळ आहेत त्यांना आपलं दु:ख सांगावं लागत नाही, ते समजून घेतात. जे जवळ नाहीत, त्यांचा तर प्रश्नच नाही. >>> ज्यांना जवळ कोणी नसेल समजुन घेणारे त्यांचं काय? अशाना नाईलाजाने त्रयस्थ किन्वा मानसोपचार तज्ञा कडे मन मोकळ कराव लागत.. कारण कवितेतल्या तिने म्हटल्या प्रमाणे.. बोलणं ही नैसर्गिक गरज असते.

आणि जर असे जडशिळ करता आले..मौन स्विकारले.. तरी
कालांतराने सगळंच बोथट होवून जाण्याचा एक धोकाही संभवतो >>> विशाल चे म्हणणे पटते. जगण्यातली उस्फुर्तताच हरवुन जाईल ना???
. आणी भावना दु:ख दाबुन जडशिळ केली तर ती दुसर्या मार्गाने बाहेर पडतात.. मनोकायिक आजारांच्या रुपात..
त्यामुळे ही दु:ख फेस केली अन त्याना हद्दपार केलं तर... त्यातुन तावुन सुलाखुन निघालेल मन जास्त कणखर अस्तित्वाचा पाया बनेल ना?
अर्थात हे माझ मत.. विचारात पाडल तुझ्या कवितेन म्हणुन हे विचार आले मनात..

कौतुक अरे जबरीच आहे ही कविता. कल्पनापण सॉलीड आहे.

बोलल्याने मन मोकळं होतं. दु:ख हलकं होतं
हे जास्त बरोबरे पण. (असं मला वाटतं)

अरे पण सुखाच्या ओघात दु:ख विरून गेली तर पाया कसा राहील टिकून? <<<< उमेश, इतकी सु़खे कुणाच्या कधी पदरात पडलीत का, की त्याने दु:ख विरून जातील ? मला तरी अजून कोणी असा भेटला नाही ज्याचे सल क्षणिक सुखाचे मलम चोपडून बरे झालेत.
ज्यांना जवळ कोणी नसेल समजुन घेणारे त्यांचं काय? <<< चेतना, कुणीही कुणाचं नसतं. रक्ताच्या नात्यांनाही हा नियम लागू. आपला तोच ज्याला मन आपलं मानतं. जवळ त्याच्याच कोणी नसतं जो स्वतःच कुणाच्या जवळ जात नाही. कोणी म्हणून गेलाय ना, 'तुम बेसहारा हो तो, किसीका सहारा बनो.'दु:ख फेस केली अन त्याना हद्दपार केलं तर... त्यातुन तावुन सुलाखुन निघालेल मन जास्त कणखर अस्तित्वाचा पाया बनेल ना?<<<<< दु:खाना जडशीळ करणं म्हणजेच त्यांना तोंड देणं आलचं. पण ते एकट्याने.. त्यांची जाहीरात न करता. मन त्यानेच तर कणखर बनतं. शेवटी मग कोणत्याही दु:खांचा त्याच्यावर काही परिणाम होतच नाही अशी परिस्थिती प्राप्त होते.
श्रुती, खरचं बोलल्याने दु:ख हलकं होतं ? मला तरी वाटतं, बोलल्याने दु:खाची उजळणी होते, आठवणीची आळवणी होते आणि पुन्हा नव्याने मनातल्या भावनांची पिळवणूक होते. असं मला वाटते.