खाया उठली महागाई : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 13 March, 2010 - 22:38

खाया उठली महागाई : नागपुरी तडका

नाकी तोंडी पाणी घुसले, जीव झकोले खाई
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

आवतन नव्हते दिले तरी, वाजत-गाजत आली
एक तारखेस खिसा भरला, पाच तारखेस खाली
देवदर्शन दुर्लभ झाले, आता पायी पंढरीवारी
गहाळ झाल्या सोई-सुविधा, परी कर वाढतो भारी
धान्यामधी खडे मिसळती, शासक टूकटूक पाही
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

तेलामध्ये भेसळ होते, मिरची मध्ये गेरू
पाचक रसा दुर्बल करते, व्याधी पाहाते घेरू
दवादारू महाग झाली,आतून काळीज पिरडी
गरिबाघरी कँसर आला, बांधून ठेवा तिरडी
मुक्ती मागे रोगी सत्वर,अन यमास नसते घाई
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

नाही आवर महागाईला, मग कशास शासनकर्ते?
इच्छाशक्ती मरून जाता, औचित्य काय ते उरते?
लाल दिव्याचा हव्यास केवळ, केवळ सत्तापिपासा
घाऊकतेने भरडून खाती, हीन-दीनांच्या आशा
आमजनांना "अभय" दाता, ’विचार’ उरला नाही
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!

गंगाधर मुटे
---------------------------------------------------
ढोबळमानाने शब्दार्थ.
झकोले = हेलकावे
आवतन = आमंत्रण
पिरडी = पिरडणे = पिरगाळणे
---------------------------------------------------

गुलमोहर: 

नाही आवर महागाईला, मग कशास शासनकर्ते?
इच्छाशक्ती मरून जाता, औचित्य काय ते उरते?
लाल दिव्याचा हव्यास केवळ, केवळ सत्तापिपासा

मुटे जी , सत्य कविता आहे ...आवडली !
(पण ..आता शासन तुम्ही कोणत्यातरी पक्षाच्या आडुन तुम्ही इतकी टोकाची टिका (आणि तेही विनाकारण) करताय (सत्य मांडताय म्हणुन ?) ते तपासुन पाहेल किंवा तुम्हाला कुणीतरी पाठींबा दिला आहे हे त्वरित हुड्कुन काढेल आणि तुमच्यावर काहीतरी कारवाई नक्किच होइल ..जमलं तर गर्दीत सापडलात तर लाठीमार करेल ...त्यामुळे काळजी घ्या...मला वाटतं यापुढे अशा प्रकारच्या "कविता" करणार्यानां यापुढे काहीतरी शिक्षेची तरतुद सुद्धा करेल ...! )

आपण घरात बसुन काय होणार ? फालक्या राज्यकर्त्यांना ( यात विरोधी पक्ष पण आलेच ) रस्त्यावर येऊन जनतेचा आवाज दाखवला पाहिजे.

<<...त्यामुळे काळजी घ्या..>>

कशाला घ्यायची काळजी ?
मेल्या कोंबड्याने विस्तवाला का घाबरायचं ?? Happy

कवितेचा आशय छान आहे.... आजच जीव वर्तमानपत्रातील वाढत्या महागाईची बातमी वाचून होरपळलाय. आता बाजारात गेलं की 'हाय हाय' करतच घरी यावे लागणार! तुमचा नागपुरी तडका पण थोडा फिक्का पडलाय काय महागाईच्या चिंतेनं? Happy

एकदम झकास कविता....

आणि हो अगदी बरोबर आहे तुमचं, कशाला घ्यायची काळजी?

तिरडीवर पडलेल्या मनाला काळजी कशाचीच नसते,
आज नाहि तर उद्या त्याला चितेत जळायचेच असते.

वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!----- मस्तच गंगाधरराव Happy
ही कविता आपल्या देशात कुठल्याही कालखंडात रेलेव्हंट राहील....

कविता सयुक्तीक आहे, वास्तव तेव्हड्याच प्रभावीपणे मांडलय.
सुरेख कविता.

<<नितीनचिंचवड>> यांच्याशी सहमत. आपलाच निष्क्रीयपणा हे ह्याचे एक मुख्य कारण आहे.