तू आलास की मन कसं......

तू आलास की मन कसं अगदी शहारून जातं
श्रावणातल्या पहिल्या सरीत चिंब झाल्यासारखं होतं

तुझा नुसता भास होतो नि मी माझ्याशीच हसते
फुलून आलेल्या रजनीच्या कानी हळूच काही कुजबुजते
रातराणीला अन् त्या चाफ्याला नकळत काही खुणावते
गंधीत झालेल्या वार्‍याबरोबर, स्वप्नांची एक मैफल सजवते
तू आलास की मन कसं......

तुझ्या भेटीतला प्रत्येक क्षण आठवून कणाकणानं मोहरते
तुझे बोलणे आठवून मनातले एक गाणे गुणगुणते
स्पर्श तुझा आठवून हातांचे हळूच एक चुंबन घेते
चोरून पाहणार्‍या चांदण्याला मग वेडावून दाखवते
तू आलास की मन कसं......

खरं सांगू, डोळे भरून आले की तुझ्या खांद्यावर डोकं ठेवावसं वाटतं
मिटल्या पापण्यांनी आकांताला अविरतपणे पाझरू द्यावंसं वाटतं
तुझ्या मिठीतल्या विश्वासानं बावरलेलं मन माझं शांत शांत व्हावं
तू हातांनी अश्रू पुसल्यावर गाली एक हसू फुलावं

तू आलास की मन कसं अगदी शहारून जातं
श्रावणातल्या पहिल्या सरीत चिंब झाल्यासारखं होतं

Submit to kanokani.com

छान लिहीली आहेस. आवडली. स्मित

सुरेख, हळुवार कविता. खूप आवडली.

कविता छान आहे; पण शहारणे हा शब्दप्रयोग मला खटकतो आहे. इथे रोमांचित होणे अपेक्षित आहे ना?
शहारा येणे हा शब्दप्रयोग थोडासा 'नकोशा' वाटण्यार्‍या गोष्टींसाठी आपण वापरतो, नाही का?
-सविनय.

'शहारणे' हा शब्दप्रयोग केवळ नकोश्या गोष्टींसाठीच वापरला जातो असे नाही.
श्रावणातल्या पहिल्या सरीने मन आनंदाने शहारून जाते, नाही का? आवडत्या व्यक्तीच्या स्पर्शानेही मन शहारते. इथे 'शहारणे' हा शब्द 'अंगावर रोमांच उठणे' या अर्थाने वापरला आहे.
धन्यवाद. स्मित

छान आहे. काव्य सचित्र आहे.

आवड्ली

आवडली!
येती कसे फुलुनी अंगावरी शहारे
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे...गंगाधर महांबरे
कवितेतल्या भावना, जाणिवा खूप उत्कट, पराकोटीच्या नाहीत ,तर तरल आहेत.
श्रावणातल्या रिमझिम पावसासारख्या. त्यात खटकणार्‍या या काही जागा..
श्रावणातल्या सरीत चिंब नाही हलकेच भिजायला होईल.
मिटल्या पापण्यांचा 'आकांत' का?
'फुलून आलेल्या रजनीच्या' म्हणजे रात्रीच्या का?
नेहमी चंद्र चोरून पाहात असतो..इथे चांदण्या पाहताहेत्..चालेल की.

लई भारी !!

सुंदर.