रानबाचा वारस

Submitted by नितीनचंद्र on 12 February, 2010 - 23:16

मी सांगीतलेले काम करायला रानबा पुढे कामाला लागेल असे वाटले किंबहुना बिघडेल हे मनात आलेच नव्ह्ते. रानबाचा रोजचा परिपाठ बिनातक्रार काम पुर्ण करण्याचा होता. दिलेले काम काळजीपुर्वक करुन त्याचा रिपोर्ट दिल्याशिवाय रानबा घरी जात नव्ह्ता. मी त्ये करनार नाय हा त्याचा आजचा पवित्रा मला अगदी नवीन होता. माझ्या सवयीप्रमाणे मी दबाव टाकताच रानबा "तुमी मला वंगाळ काम देता म्हणुन माझ वाटुळ झाल" म्हणुन धाय मोकलुन रडु लागला. खाजगी उद्योगात सुपरवायझरची आज्ञा टाळणे म्हणजे त्याचा घोर अपमान. त्यातुन रानबा साधा हेल्पर. हा माझ्या आदेशाची वासलात लावत असेल तर उद्या माझे कोण ऐकणार याविचाराने मी संतापलो होतो. माझ्या डोळ्यातल्या ठिणग्या व रानबाची अगतीकता पाहुन मामा पुढे आला. " साहेब हे काम या आठवड्यात पुर्ण करण्याची जबाबदारी माझी. उद्या शांताराम आला म्हणजे मी त्याला घेऊन हे काम पुर्ण करेन. आज मला आणि रानबाला दुसरे काम द्या." मामा आमच्या मेन्टेनंस विभागातला सर्वात जुना कामगार त्यातुन सुरवातीच्या काळात मला कामाचे प्रशिक्षण दिलेले या नात्याने मी त्याचे ऐकत असे. तोही हा अधिकार योग्य वेळीच वापरे. मी शांत झालो पाहुन मामा व रानबा ते काम टाळुन पुढच्या कामाला लागले.

मामा व रानबा सहीत १२ कामगार माझ्या मेन्टेनंस विभागात होते. साधारण ३०० लहान मोठ्या मशीन्सचे बिघाड दुरुस्त करणे तसेच या सर्व मशीन्सचा विद्युत पुरवठा अखंडीत ठेवणे हे माझ्या विभागाचे काम होते. मशीन्सचा बिघाड कमीत कमी वेळात दुरुस्त करुन उत्पादन अखंडीत ठेवणे ही सुपरवायझर म्हणुन माझी जबाबदारी होती. अश्या वेळी विद्युत पुरवठा करणार्‍या उपकरणातला बिघाड हा मोठाच बिघाड असे कारण यामुळे एखाद दुसरे मशिन बंद न राहता मशिनची रांगच बंद पडुन उत्पादनाचे मोठेच नुकसान होई. गेल्या काही दिवसात या प्रकाराने दोन वेळा उत्पादन बंद पडले त्यामुळे मी त्याच्या मुळाशी जाऊन उपाय योजला. आमच्या शॉप मधले विद्युत वाह्क बसबार्स व त्याला जोड्लेले पण सध्या वापरात नसणारे फ्युजबॉक्स यात चिमण्या घरटी बनवत. फ्युजबॉक्समधील केबल काढ्लेली असल्यामुळे यात शिरण्यासाठी चिमण्यांना मार्ग मिळे. धातुने बनविलेल्या या फ्युजबॉक्समध्ये घरटे बनवणे चिमण्यांना सुरक्षित वाटे.या घरट्यातली पिल्ले मोठी होई पर्यत घरट्यातच घाण करीत. यामुळे ही घाण बसबार्स च्या मुख्य भागात पोचुन त्यात शॉर्ट सर्किट होउन विद्युत पुरवठा करणार्‍या उपकरणात बिघाड झाल्याचे दिसले. हा प्रकार पुन्हा होउ नये यासाठी सर्व वापरात नसलेले फ्युजबॉक्स पुर्णतहा बंद करण्याचे मी ठरवले जेणेकरुन चिमण्याना नवीन घरटी बनवण्यास जागा मिळु नये . त्याच बरोबर जेथे घरटी होती ती काढुन टाकणेही तितकेच आवश्यक होते.

मी जरी पुढ्च्या कामाला लागलो तरी हे काम रानबा व मामाला सांगण्यात आपले काय चुकले हा विचार चालुच होता. आपले चुकले असेल तर आपल्या हाताखालील लोकांची माफी मागुन व्यावसायिक संबंध उत्तम ठेवणे हा परीपाठ आमच्या उद्योगात पाळला जाई. यामुळे आपले काय चुकले हा विचार चालुच होता.
आमचे जरी कामगार व सुपरवायझर असे व्यावसायिक संबंध होते तरी जेवायच्या सुट्टीत वा इतर काम नसताना आम्ही एकमेकांशी ह्सुन खेळुन होते. जेवायला आम्ही एकत्र बसायचो. जेवणाची वेळ झाली. रानबाचा उपास असल्यामुळे तो थांबला नव्ह्ता. बाकीचे पहिल्या शिफ्ट्ला आलेले कामगार जेऊन परत त्यांच्या कामाला लागले होते.मला जेवायला आज उशीर झाला होता. मामा मात्र मी जेवायला येण्याची वाट पहात थांबला होता.

मी जेवायच्या जागी आलो. न बोलता आम्ही जेवायला सुरवात केली. मामाच्या डब्यात आज माझ्या आवडीच्या सुरळीच्या वड्यापाहुन मी काहीच प्रतिक्रीया दिली नाही यावरुन मी अद्याप सकाळची घटना विसरलो नाही हे मामने ताडले. "आता लग्न करा म्हणजे सुरळीच्या वड्याच काय काय पाहिजे ते मिळेल "हा मामाचा हुकमी रिमार्क मामाला गिळावा लागला. संवादाला तोंड फुटावे यासाठी मामा वाट पहात राहीला. मग मीच विषय काढला. " काय सकाळी चुकल हो माझं मामा?" मी मामाला विचारले ?
माझ्याकडे पहात मामा म्हणाला " तुमच काहीच नाही चुकलं पण रानबाची मानसीक स्थिती नाजुक आहे."
मला काहीच न समजल्याने मी चेहेरा प्रश्नार्थक केला. मामा पुढे म्हणाला " साहेब तुम्हाला रानबातला बद्ल नाही का समजला ?" मी नकारार्थ मान हलवली. मागच्या आठवड्यात आपण त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा तुम्हाला काय बदल दिसला ? "देवघरात मागच्यावेळे पाहिलेल्या पेक्षा देव व देवांच्या फोटोंची संख्या वाढीव आहे." कुस्ती, तमाशा आणि सिनेमा यात रंगणारा रानबा आताश्या पंढरीची वारी, नामस्मरण,भजन, धार्मिक ग्रंथ वाचन यात जास्त वेळ घालवतो. एका वेळी अर्धी कोंबडी संपवणारा रानबा आताशा वशाटाकडे पहातपण नाही." मामा म्हणाला. " हो हो मामा हा बदल आहे खरा पण त्याचा आजच्या गोष्टीशी काय संबंध ?" मी विचारले. पण एका क्षणात मोजक्या शब्दात उत्तर देईल तो मामा कसला? मामाने आणखी कोड्यात टाकणारे प्रश्न विचारणे सुरु केले. "रानबाने कधी मुलांची शाळेतली प्रगती तुम्हाला सांगितली ? रानबाने कधी आपल्या सोसायटीमधुन मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले? " कसा काढणार ? त्याला मुलबाळच नाही. शेवटी मामानेच उत्तर दिले. पण मामा त्याचा आजच्या गोष्टीशी काय संबंध ? मी परत न राहवुन विचारले.
रिकामा जेवणाचा डबा मामाने डब्याच्या पिशवीत ठेवत मामाने सुस्कारा सोडला. पानाची चंची सोडुन मामाने पान निवडले. मामाचे शांत रहाणे मला असह्य झाले. मी काहीतरी बोलणार तेव्हड्यात मामाने पानाचे डेख उडवत पुढे सुरू केले. "रानबाची पत्नी आजपर्यत सहा वेळा गर्भवती झाली पण प्रत्येक वेळेस गर्भपात झाला. असे तीन वेळा झाल्यानंतर मग नवीन डॉक्टर, नवीन देवाला नवस रानबाने केला. पण काही उपयोग झाला नाही. यातुनच नवी व्रते त्यात एक हिंसा न करण्याच". "ह......" मी उदगारलो. मला हळु हळु लिंक लागु लागली होती. "रानबा बोलतो मामा तुमच्याशी हे सर्व ? "मी विचार्ले. "सर्वच नाही, पण जे बोलतो त्यातुन उलगड होतो सर्व गोष्टीचा." मामा म्हणाला. "आताची सातवी वेळ. या वेळेला हातुन हिंसा होउ नये यासाठी तो काळजी करतो आहे. घरटी काढायची म्हणजे एकतरी पिल्लु किंवा चिमणीच अंड वरुन खाली पडणार."

दोन मिनीटे मी गप्प राहीलो. काय प्रतिक्रीया द्यावी यासाठी शब्द जुळवु लागलो. "मामा परमेश्वर करो आणि रानबाला वारस मिळो. पण जर याही पुढे असेच घड्ले तर हो काय ? त्या पेक्षा रानबाने मुल दत्तक घ्यावे." मी म्हणालो. " हा फुकाचा सल्ला कोण देणार ? मामा म्हणाला "त्यातुन गर्भराहतो आहे म्हणल्यानंतर हा सल्ला काय कामाचा ?" "मामा रानबाची प्रॉपर्टी किती असेल ?" मी विचारले. मामा म्हणाला " मांजराची किती असते प्रॉपर्टी ? पण वंश सुरक्षित रहावा म्हणुन मांजर सात घर फिरवतेना पिल्लांना. माणस तर प्राण्यापेक्षा विचारी त्यामुळे वंशसातत्याची इच्छा प्राण्यापेक्षा जास्तच असणार नाहीका?

लंचटाईम संपला होता. मानवी प्रव्रुत्ती बाबतचा आणखी एक धडा मामाने मला जाता जाता शिकवला होता.

गुलमोहर: 

थोडक्यात कोणाच्या अंधश्रद्धांना/भावनांना हात न घालणेच चांगले.

खरंय रूनी, पण बरेचदा आपण कुणाच्या अंधश्रद्धांना हात लावलाय हेच कळलेलं नसतं. नितीनचं तसंच झालं असणार.
वंडरफुल कथा, आवडलीच. कंपनीत नव्यानेच काम करायला लागलेल्या उत्साही इंजिनियरच्या नजरेने वाचायला हवी ही.
आणि नितीन, हा अनुभव तुला खूप काही शिकवून गेला असणार. तुझ्या नव्या नव्या दिवसांतला अनुभव दिसतोय. कामापलिकडे दुसरी कसली जाणीवच नसते अशा त्या दिवसांतला. आणि तरीही कंपनीच्या धोरणामुळे किंवा तुझा मूळ स्वभावच down to earth राहाण्याचा असल्यामुळे, किंवा दोन्हींचं छान blend झाल्यामुळे, तुझे आणि कामगारांचे संबंध चांगले दिसतात. स्पष्टपणे काम नाकारण्याची तरी धिटाई रानबात आली कुठून? तू समजू शकतोस त्याला अशी आत कुठेतरी खात्री होती म्हणूनच ना?
लगे रहो!

छान Happy

छान!

छाने

नितिन,खूप आवडली कथा.. दुसर्यांच्या भावनांना हळुवार जपणे हे महत्वाचे आहे.. ते तू हळुवारपणे स्पष्ट केलयस.

छान Happy

छान Happy

Pages