माझ्या या आधीच्या पोस्ट वाचून काही जणांना शंका येईल कदचित की मी फक्त रात्रीच ट्रेक करतो की काय. पण असे काही नाही, मी दिवसासुद्धा ट्रेक करतो.
असो.
तर नेहमीप्रमाणे एका नव्या हाईकला जायला सज्ज झालो. माझ्या एका मित्राचा मित्र फर्गसनमध्ये शिकत होता योगेश म्हणून तो यायला तयार झाला. अजून एक जण तरी हवा म्हणून माझ्याच कॉलनीतल्या एकाला तयार केले. तो आधी फारसा तयार नव्हता पण त्याला ट्रेक म्हणजे कसला भारी असतो, आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव मिळतो, असे काहीबाही सांगून तयार केले.
तर आमची तिकडी निघाली ट्रेकला. आत्ता लक्षात नाही पण कोकणातला कुठला तरी गड होता ठरलेला. स्वारगेटवर पोचलो, बराच वेळ वाट पाहीली तरी एसटी काही येईना. तेवढ्यात मला साताराची एस्टी दिसली.
मी प्रश्नार्थक नजरेने योगेश कडे पाहीले. तो माझीया जातीचा असल्याने त्याला कळले मला काय म्हणायचे आहे ते.
"सातार्यापासून वासोटा जवळ आहे,"
"देअर यु आर."
आणि पाहता पाहता गाडीत जाऊन बसलो ही. अन्याची बडबड सुरू झाली. "अरे पण आपण त्या ट्रेकला जाणार होतो ना. आता वासोटा कुठुन आला मध्येच. मी घरी वेगळाच किल्ला सांगितला आहे."
आम्ही दोघांनीही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
सातार्याला गाडी पोचली तेव्हा दुपार टळून चालली होती. तरीही ऊन रणरणत होतेच.
"बामणोलीला जायची गाडी कुठे लागेल हो" अदी अस्मादिक.
"ती तिकडं ४ नंबरला, आत्ता दहा मिनिटात येईल." टिपीकल अधिकारी उत्तर
त्या फलाटाला बसून राहीलो. इकडे-तिकडे टाळ्या-माळ्या करून झाल्या, पण दहा मिनिटात येणारी गाडी तासभर झाला तरी उगवली नाही. आमच्या बाजूलाच एक मुंडासेवाले आजोबा आणि त्यांची मुलगी आणि नात असे बसलेले होते. शेवटी त्यांचाही पेशन्स संपला.
"बाबा, चला काळी-पिवळीनंच जाऊ," ती मुलगी म्हणाली.
ते आजोबा आमच्या कडे वळले,
"पोरानों, यायला का आमच्यासंग, दहा रूपाय जादीच पडंल."
"ठिकाय" म्हणत सॅक उचलल्या आणि त्यांच्या मागे निघालो.
स्थानकच्या बाहेर पिवळ्या जीपची गर्दी होती आणि त्यांचे ड्रायवर गिर्हाईक पटवण्यात दंग होती.
आम्हीही एका जीपमध्ये घुसाघुसी करून सीटा धरल्या. पण आधीच आत जाऊन बसल्याचा पश्चाताप झाला. कारण आमच्यानंतर माणसे येतच गेली, आणि आता बास यानंतर जागा उरणार नाही असे वाटत असतानाही दोन-तीन टाळकी जीपला चिकटलीच. असे ठाकून ठोकून बसवल्यानंतर कोणाची बिशाद होती खाली उतरायची. आमच्या सॅकपण कशातरी टपावर सामावल्या होत्या. वरतीही काही माणसे बसली होती. मला फेविकॉलची जाहीरात आठवली.
तर अशा खच्चून भरलेल्या जीपने प्रवास करणे हा एक अत्यंत विलक्षण अनुभव होता. बीडी, तंबाखूच्या वासाने वातावरण घमघमत होते. त्यातच दमट गर्दीचे आणि घामाजलेल्या गावकर्यांचे वास मिसळत होते.मला सुदैवाने गाडी कधी लागत नाही. पण विचार आला आज बहुदा रेकॉर्ड तुटणार. अन्याकडे पाहीले, त्याची अवस्था माझ्याही वरताण होती.
सुदैवाने काही ना होता बामणोलीला पोचलो. तिथे गेल्या गेल्या सुवार्ता कळली. जिल्हा परिषदेची लॉँच गेली आहे त्यांमुळे आता एक दिवस वाया गेल्यात जमा होता. कारण त्याव्यतिरिक्त कसे जायचे हे कोणालाच माहिती नव्हते. तिथल्या खासगी बोटक्लब मध्ये चौकशी केली पण त्यांचे रेट पाहून अंधारी आली डोळ्यासमोर.
बराच वेळ नुसतेच बसून राहीलो. शेवटी त्या बोटवाल्यालाच दया आली. तो म्हणाला, "आमची एक बोट उद्या एका ग्रुपला आणायला चालली आहे त्यातून जा. आम्ही निम्म्या पैशात नेऊ."
होय नाही करता करता ३०० रुपयांवर सौदा ठरला. खेरीज त्या भल्या माणसाने त्याच्या ऑफिसमध्ये रात्रीचा मुक्काम करायची सवलत दिली. ऑफिस म्हणजे एक सिमेंटची खोली होती, वर पत्रा घातलेला आणि दोन मोठाल्या खिडक्या.
आम्ही म्हणालो चालेल. मग संध्याकाळी गावात भटकत वेळ काढला, रात्री थोडेफार च्याऊम्याऊ पोटात ढकलून झोपलो.
दुसरे दिवशी पहाटे त्या बोटवाल्याचा मुलगा आला तेव्हाच डोळे उघडले. भराभरा आवरून बोटीत बसलो. बोट एकदम मस्त होती, त्या विस्तिर्ण जलाशयाचा पुरेपुर आनंद घेत छान डुलत डुलत चालली होती.
साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही किनार्याला लागलो. त्या बोटवाल्याच्या पोराने, संतोष त्याचे नाव आम्हाला थोडे आतवर नेऊन वाट दाखवली आणि दिलेले पैसे कडोसरीला लाऊन तो माघारी वळला. थोडे पुढे जातोच तो माघारी येणारा ग्रुप दिसला. मुंबईची मंडळी होती. त्यांच्याकडून वाटेची खात्री करून घेतली आणि पुढे निघालो. जाता जाता एकाने सावधगिरीचा सल्ला दिला.
"मागच्या आठवड्यात एक ग्रुप गव्यांच्या कळपात सापडला होता म्हणे. ३-४ जण जखमी झाले. तुम्ही तिघेच चालले आहात, जरा काळजी घ्या."
तो बिचारा आम्हाला सावध करायला गेला, पण त्याचा परिणाम एकदम उलटाच झाला. अन्याचे धैर्य खचलेच.
"मी येणारच नव्हतो तुमच्या बरोबर. मला म्हणलात एक आणि आणलेत वेगळ्याच किल्ल्यावर. अशा जंगलात मी नाही येणार."
आता आमचेही धाबे दणाणले. हे धाडस अंगाशी आले तर बहुदा आता भटकंती कायमची बंद होणार असा विचार आला. दोघेच असतो तर कसेही गेलो असतो. पण आता याला आणलय तर खर.
तिथेच थांबलो, सॅकमधून बिस्किटांचा पुडा काढला आणि खात बसलो. बराच वेळ झाला आम्ही काहीच बोलत नाही, काही करत पण नाही म्हणल्यावर अन्याचा नाईलाज झाला. मुकाट्याने त्याने सॅक उचलली आणि चालायच्या तयारीने निघाला.
आम्हीपण भराभरा उरलेला पुडा रिकामा केला आणि एकही शब्द न बोलता चालू पडलो.
वासोट्याला हनुमान मंदिरावरून जाणारी वाट मोठी सुरेख आहे. अप्रतिम जंगल, फुलपाखरे, पक्षी आणि बरेच काही. सुदैवाने अन्यादेखील एन्जॉय करत होता. वासोट्याच्या शेवटच्या टप्प्यात बर्यापैकी चढ आहे. तिथे मात्र वाट लागली.
तिघांची हवा गेली होती. पण आता माघारी फिरणे नाही या निश्चयाने पावले टाकत राहीलो. थोडे वरती जाताच विस्तिर्ण कोयना जलाशयाचे विलोभनीय दर्शन झाले. गडावर पाहण्यासारखे काही नाही. तिथल्या मंदिराजवळ सॅक ठेऊन चक्कर मारली आणि नागेश्वरकडे निघालो.
बरोबर आम्ही सांगाती सह्याद्रीचा हे यंग झिंगारे ट्रेकर्सचे एक फार अप्रतिम पुस्तक घेतले होते. त्यामुळे वाट चुकायची फारशी भिती नव्हती. पुस्तकात दिलेल्या खुणांनुसार चालत सुटलो.
वाट एकदम निरुंद आणि एका बाजूला खोल दरी. १०-१५ मिनिटे चाललो नसू तेवढ्यातच झाडीत खसफस ऐकली.
मनात धस्स झाले. ब्रेक लावल्यासारखे जागीच थांबलो. आमच्या पुढे बर्याच अंतरावर झाडीत हलल्यासारखे वाटले. (मला जे लोक नजरेने अंतर सांगतात, माझ्यापासून सुमारे २५ यार्डावर अथवा फुटावर इ. इ. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आयुष्यात न जमलेल्या गोष्टींपैकी ही एक) त्या झाडीत नक्कीच कोणतरी प्राणी होता. आमच्या तिघांचेही एकमत झाले की तो गवा आहे.
झाले. आता काय करायचे. मागे जायचे तर आवाज होण्याची शक्यता, आणि कळप असला तर आणि तो अंगावर आला तर?
मग आहोत तिथेच आवाज न करता खाली बसलो. माझा प्रयत्न होता की हवा कोणाकडून कोणाकडे वाहत आहे हे माहीती करून घेण्याची. आमचा वास गव्याकडे जात नसला म्हणजे मिळवली. (जीम कॉर्बेट, केनेथ अँडरसन वाचल्याचा परिणाम, दुसरे काही नाही).
पण बोंबलायला ते कळणार कसे. तोंडात बोट घालून ते ओले केले आणि हवेवर धरले, तरीपण डोक्यात प्रकाश नाहीच.
शेवटी नाद सोडला आणि निवांत बसून राहीलो. बर्याच वेळाने खसफस कमी झाली तेव्हा हलके हलके पुढे जाऊन पाहीले. ऑल क्लिअर.
मग रपारप चालत नागेश्वरची गुहा गाठली. गव्याच्या भितीने असेल कदाचित पण अन्या आमच्यापेक्षा भराभर चालत होता.
गुहेपाशी पोचलो तोपर्यंत उन्हे कलायला लागली होती. आता आख्खा डोंगर उतरून कोकणात चोरवणेला जायचे होते. सकाळपासून बरीच दमणूक झाली होती तेव्हा नागेश्वरच्या गुहेत मुक्काम करायचा विचार मनात डोकावून गेला. पण आजूबाजूला चिखलात उमटलेल्या खुरांच्या खुणा आणि अन्याचा चेहरा पाहून विचार बाहेर काढला.
उतरायला सुरूवात करतो ना करतो तोच एका दगडाला ठेचकाळलो आणि आपटलो. घोट्याला आणि गुढग्याला चांगलाच मार लागला होता. पण आता अजून उशीर करणे शक्य नव्हते. दिवसा-उजेडीच गावात पोहचणे भाग होते. मग पाठीवरचे वजन कमी केले (बाकी दोघांकडचे वाढवून)आणि गुढग्याला एक पट्टी आणि घोट्याला एक रूमाल अशा थाटात चालायला सुरुवात केली.
वासोट्याहून कोकणात उतरणारी वाट अतिशय वेळखाऊ आणि दमछाक करणारी आहे. पायाच्या वेदनेमुळे ती अधिकच वाटत होती. कितीही भराभरा चालायला प्रयत्न केला तरी आमच्या अंदाजाप्रमाणे सूर्यास्ताच्या आत काही गावात पोचू शकलो नाही. अंधार पडायला लागला तशी जीवाची तगमग झाली. कधी येणार हे गाव छे वैताग.
अंधारात कसेबसे ठेचकाळत, मिणमिणत्या बॅटरीच्या उजेडात चालत राहीलो. गाव जवळ आल्याची जाणीव आजूबाजूच्या कमी होत चाललेल्या झाडीमुळे होत होती पण वाट संपता संपत नव्हती.
शेवटी दुरून गावकर्यांचे आवाज येऊ लागले. बहुदा भजनी-मंडळी होती. जीवात जीव आला. आणि थोडक्या वेळेत गावात येऊन पोहोचलो देखील.
खरोखरच भजन-किर्तन चालले होते देवळात.
आहाहा, काय बरे वाटले एवढ्या वेळेनंतर माणसाचा आवाज ऐकून. खरे तर माणसांच्या कोलाहालाला कंटाळून ट्रेक करतो आपण, पण अशा वेळी तोच आवाज किती हवाहवासा वाटतो.
असो.
थोडी विश्रांती घेऊन, थंडगार पाणी-बिणी पिऊन अन्याचा जोर वाढला आणि त्याने तोंडाचा पट्टा सोडला.
"मुर्ख आहे मी, तुमच्याबरोबर ट्रेकला आलो ते. तुम्हाला मरायचे होते तर तुम्ही जायचे ना. साला मला का घेऊन आला. (या बाबतीत मी त्याच्याशी सहमत होतो). असल्या मरणाच्या जंगलात घेऊन येता. एकतर काही बोलत नाही. मी काही बोललो तर बिस्किट खात बसता. तो रेडा आला असता म्हणजे अंगावर (बाय द वे, तो गवा होता) तुम्ही होपलेस आहात (हे बाकी खरं. आमच्या घरच्याचंही हेच मत आहे). "
आमच्या सुदैवाने बाजूच्या घरातून पेलेभरुन चहा आला म्हणूनच त्याची टकळी थांबली.
मलाही त्याची दया आली, मी त्याच्या जागी असतो तर एवढा वेळही तग धरला नसता.
विचार करा, आयुष्यातला पहिलाच ट्रेक, तोही वासोटा. आणि बरोबर आमच्यासारखे नग. कोणाचेही टाळके सरकेल.
असो.
पण बिचार्याला माहीती नव्हते त्याच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यात संपले नव्हते. घरी जाईपर्यंत बरेच काही त्याच्या (आणि आमच्याही) नशिबी होते.
(क्रमश)
admin, हा लेख नविन लेखन मध्ये
admin, हा लेख नविन लेखन मध्ये दिसत नाहिये बहुदा. काय करू?
दिसतोय की लेख ! छान वर्णन,
दिसतोय की लेख !
छान वर्णन, लवकर पुरं करा आणि फोटोही टाका
त्या अन्याच्या रिअॅक्शन्सनी हसू आले आणि बिच्चारा असेही वाटले.
आशुचॅम्प, अहो तुमच्या लेखाची
आशुचॅम्प, अहो तुमच्या लेखाची तारीख बघा, मग कळेल तो नवीन लेखन मध्ये का दिसत नाही ते. असो, छान वर्णन.
(मला जे लोक नजरेने अंतर सांगतात, माझ्यापासून सुमारे २५ यार्डावर अथवा फुटावर इ. इ. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आयुष्यात न जमलेल्या गोष्टींपैकी ही एक)>>>>अगदी अगदी. मलाही.
मी ही ४-५ वर्षांपूर्वी गेले होते. तिथे राहायला परवानगी नाही. पण आम्ही तिथेच राहायचं ठरवलं होतं. कधी कधी फॉरेस्ट वाले येऊन चेकिंग करतात असं ऐकलं होतं, त्यामुळे आम्ही सारखं लक्ष ठेऊन होतो. आमच्यातले काका रात्रभर सगळ्यांना उठवून उठवून चहा पाजत होते. नागेश्वरहून कोकणात उतरणारी वाट खरंच खूप वेळखाऊ आणि दमछाक करणारी आहे. आम्ही उतरण्याच्या थोडं आधीच तिथल्याच दोन स्थानिक मुलांनी येऊन वणवा पेटवून दिला. परतीच्या वाटेवरची आमची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी होती. एस्टीमधून सरळ उतरताही येत नव्हतं. उतरताना वळून उतरावं लागत होतं.
मस्तच वर्णन!
मस्तच वर्णन!
फारच छान लिहिलयं... उत्तम...
फारच छान लिहिलयं... उत्तम...
उतरण्याच्या थोडं आधीच
उतरण्याच्या थोडं आधीच तिथल्याच दोन स्थानिक मुलांनी येऊन वणवा पेटवून दिला.
>> बापरे!
चांगलं लिहिलयस रे आशु..
छान! रात्री जा नाहीतर दिवसा..
छान! रात्री जा नाहीतर दिवसा.. काहीतरी गोंधळ घालायलाच पाहिजे.. नाहीतर ट्रेक लक्षात कसा राहणार?!
सही लिहिलय , वासोट्याविषयी
सही लिहिलय , वासोट्याविषयी अजुन थोडी माहीती दिली असती तर बरं झालं असतं , जास्त माहीती नसल्यामुळे अचानक बोटीचा उल्लेख आल्यामुळे थोडं गोंधळायला झालं .
श्री, वासोटा हा किल्ला सातारा
श्री, वासोटा हा किल्ला सातारा जिल्ह्यात येतो. हा परिसर कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात (Backwaters) येतो. या किल्ल्याला 'व्याघ्रगड' असेही नाव आहे. शिवाजी महाराजांनी पकडलेल्या काही इंग्रज कैद्यांना या किल्ल्यावर ठेवले होते.
हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा आहे. तसा वासोट्याचा 'बाबूकडा' आहे. आम्ही गेलो होतो त्यावेळेस बाबूकड्यावर क्लायम्बिग चाललं होतं.
सातारामार्गे यायचं असेल तर बामणोलीहून लाँचने पायथ्याशी पोचावं लागतं. हा प्रवास साधारण तासा-दीडतासाचा आहे. पण एकदम मस्त आहे.
थँक्स आऊटडोअर्स , आत्ता
थँक्स आऊटडोअर्स , आत्ता प्रकाश पडला ! नाही तर आधी कळलचं नव्हतं किल्यावरुन एकदम बोटीत कसा घुसला !
श्री - लेख अनुभवाबद्दल
श्री - लेख अनुभवाबद्दल असल्यामुळे मला वाटले किल्ल्याबाबत माहिती देत बसलो तर भरकटेल. पण आता लक्षात आले, माहिती नाही दिली तर लिंक लागत नाही. पुढच्या लेखाच्या वेळी लक्षात ठेवीन. धन्यवाद.
सॅम - अगदी बरोबर, खरोखर नाहीतर साधेसुध्या ट्रेकचे तपशील लक्षात रहात नाहीत एवढे.
आऊटडोअर्स - माहीती पुरवल्याबद्दल धन्यवाद. ...परतीच्या वाटेवरची आमची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी होती. ---- हा हा हा.
अश्विनी - त्यावेळी माझ्याकडे रोलचा कॅमेरा होता. आता त्यातले एखाद दोन स्कॅन करून टाकतो. डिजीटलने आता सगळे ईतके सोपे करून टाकले आहे पण रोलच्या कॅमेरात जी गंमत होती, फोटो डेव्हलप होईपर्यंतची जी उत्सुकता होती ती आता राहीली नाही. असो.
बाकी सर्वांना धन्यवाद. लवकरच पुढचा भाग पोस्टतो.
(No subject)