वास्तु

Submitted by भाऊ नमसकर on 7 February, 2010 - 08:36

परिमल पारिजाताचा उगीचच असा रेंगाळतोय
आठव नाजूक ओंजळींचा,सलतोय जरी जिव्हारीं
दारींचा चांफा पिवळा,जास्वंदीला विचारतोय
फुलतोच कां ग आपण,जर पूजणंच नाही देव्हारीं

सारवणं तर होतं रोजचं, म्हणेल कोण कसं खरं
भेगाळून धरतंय बुरशी, तुळशीचं हक्काचं खळं
साडेचार पिढ्यांची, कर करून पाठराखण
कण्हतंय आतां करकरून, घर हें असं खिळखिळं

आटलेल्या ओढीनं, साचलेल्या आबाळीनं
एका महाकाय मायेचं, झालंय कसं मातेरं
वास्तुच्या वात्सल्याचं,वास्तव्याच्या मांगल्याचं
भिंतींच्या भावबंधाचं, लटकतंय एक पोतेरं

वटसावित्रीचं अधिष्ठान, वटवाघळांचं झालयं बस्तान
कलंडल्या माडीला, लोम्बकळतोय या घराचा प्राण
त्यांतल्या मणसांमुळेच येतं , घराला म्हणे त्याचं घरपण
कां बरं न दिलं माणसाना, घरानेही आपलं माणूसपण.

गुलमोहर: 

व्वा

त्यांतल्या मणसांमुळेच येतं , घराला म्हणे त्याचं घरपण
कां बरं न दिलं माणसाना, घरानेही आपलं माणूसपण.

खुपच छान Happy

कां बरं न दिलं माणसाना, घरानेही आपलं माणूसपण.>>>>>सगळीच कविता मनाला खोल भिडणारी पण शेवटची ओळ खल्लास! भाऊ अप्रतीम लिहीलय.

ए१

धन्यवाद.
छान, टुमदार, निसर्गाशी सुसंवाद साधणारीं व आधुनिक सोयीनी सुसज्ज अशीं बरीच नवीं घरं आतां पहायला मिळतात कोकणात. खूप बरंही वाटतं. पण तिथंही फक्त सणासुदीला किंवा सुट्टीच्या दिवसांतच वर्दळ दिसते. सदा भरलेलीं व निर्व्याज मायेने ओथंबलेलीं जुनीं घरं आठवून अजूनही मग 'नोस्टॅल्जिक' तर होणारच ना आमच्यासारखे !!