मायबोलीवरचा नळ..

Submitted by नानबा on 21 January, 2010 - 12:52

'मायबोलीवरचा नळ' ह्या लेखाची सुरुवात http://www.maayboli.com/node/13117?page=10 इथे झाली..
सहज म्हणून मांडलेली नळाची कल्पना काही लोकांनी उचलून धरली म्हणता माझा मुंगेरीलाल झाला.

मुंगेरीलाल झाले असतानाची माझी दिवास्वप्नं खालीलप्रमाणे:
मायबोलीवर खरच नळ सुरू झालाय. ह्या नळाला पाणी येणं वगैरे काही अपेक्षित नाहिये.. पण लोकांना भांडणासाठी एक छानसा प्लॅटफॉर्म मिळालाय. लोक ह्या विचारानंच सुरुवातीला एकदम खूष आहेत. त्यामुळे ते काही काळ येतात आणि 'नळ सुरु करणे हा किती छान विचार आहे' ह्या विषयावर गोडुल्या गप्पा मारताहेत फक्त.
पहिला गट येतोय तो 'परतोनि पाहे' मधल्या अशा लोकांचा ज्यांनी नळाची कल्पना जरा उचलून धरलेली.
'हूड आणि झक्की इथे मुक्कामालाच येतील' असं अमृता नानबाला सांगतच असते, तेवढ्यात झक्की "कुठे आहे ती नानबा.. ठोकतोच तिला" अश्या आविर्भावात घागर उचलून इकडे तिकडे बघताहेत. नानबा कधी नव्हे ते हुशारी दाखवून योग्य वेळी गायब होते आणि झक्कींनी उचललेली घागर मधल्या मधे हूड ला लागते. आता हूड पेटतो .. हूड आणि झक्कीचे प्रेमसंवाद चाललेले असतानाच श्री, माधव, वर्षू_नीलू, रुनी, सायो, अगो, वत्सला, सुनीधी, छाया अशा शांतता प्रिय व्यक्ती 'कसे काय भांडतात बुवा लोक' अशा आविर्भावात डोकावून बघत असतात.
नळावर न भांडणार्‍यांच्यात बायकांची संख्या जास्त हे बघून जामोप्या आणि अतुलसारखी मंडळी योग्य ती काडी टाकतात आणि आता बाई-पुरुष वाद सुरू झालेले बघून निधपा आणि मगाशी पळून गेलेली नानबा दोघीही जणी पिटात येतात. मग हूड आणि झक्की वादांची पॉप्युलॅरिटी मागं पडून बाई आणि पुरुष ह्याविषयावर भांडणं सुरु. तसा प्रयोग समजावणीच्या सुरात योग्य मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो. पण समजावून घेणं - हे भांडणाइतकं मजेशीर नसल्यानं जामोप्या, अतुल विरुद्ध निधपा आणि नानबा- त्याच्याकडे लक्ष न देता निकराची लढाई चालूच ठेवतात.
हे सगळं सहन न होऊन गंगाधर मुटेंच्या मनातलं गुज ओठावर येतं "किती क्षुद्र कारणावरून लढताहेत ही माणसं. ह्या नळाला पाणी नाही. पाण्याच्या अभावी पिकं जगू शकत नाहीत - इतकच कशाला माणूस पण जगू शकत नाही. आणि नळ आहे पण पाणी नाही ह्या भ्रष्टाचारानं ह्यांचं मन व्यथित कसं होत नाही". त्यांचं बोलणं संपायच्या आतच भ्रष्टाचार हा शब्द ऐकून झक्कींचं भारत प्रेम उफाळून आलंय- मग शेती आणि भ्रष्टाचार ह्या वेगवेगळ्या विषयावर झक्की, गंगाधर, चंपक, बुवा आणि काही सुज्ञ मायबोलीकर चर्चा करताहेत.
पण नळावरच्या मायबोलीकरांची संख्या इतकी झाली आहे - गोंगाट इतका वाढला आहे की किरण काय बोलतोय हे कुणी ऐकूनच घेत नाही - ह्यामुळे किरण चिडतो. 'अरे, माझं पण ऐका' असं त्यानं म्हटल्यावर, लोकांना आणखीन एक 'बकरा' सापडला हे लक्षात येतं आणि ते त्यालाही मारामारीत खेचतात.
हे सगळं होईपर्यंत लेखक आणि कवी मंडळी जरा बाजुलाच राहिलेली असतात. (कारण ती आत्तापर्यंत त्यांच्या प्रतिभासाधनेत रमलेली असतात.) पण नळावरची गर्दी बघून ह्यातल्या काही मंडळीचं नळाकडे लक्ष जातं.
आता माणसं आणि त्यांचे वागण्याचे पॅटर्न्स, म्हणजे खर्‍या लेखक/कवीच्या लेखणीला खरे आवाहन! त्यामुळे अर्थातच प्रतिभावंतही नळावर येतात. ह्यांच्यातही वेगवेगळे शांततापूर्ण गट असतात. कथालेखक(विशाल, कौतुक, चाफा, बासुरी, सुनिल, चमन, रुयाम, टण्या आणि झालंच तर गणु_गवारी), कवी (उमेश, छाया, गिरीष.. कवींच्या नावांची एक वेगळी पुरवणी जोडावी लागणार वाटतं!) , ललित लिहिणारे (पल्ली, आशुचॅम्प, मैत्रेयी, आर्च वगैरे) विनोदी लेखक(दाद, धुंद रवी, नवीन पदार्पण करते बारिशकर वगैरे..).
(काही लोक सगळ्या गटात ओव्हरलॅप होत असले, तरिही त्यांना एकदाच काऊंट करावं ही विनंती)

नळावरच्या हाणामार्‍या बघून 'चांगलं कथानक सापडलं' म्हणून रहस्यकथा लेखक, विनोदी लेखक खूष होत असतानाच - कवी दु:खी होतात. ललित वाले विचाराक्रांत.
लेखक मंडळी वादात पडणार नसतात, पण मग कुणीतरी 'प्रस्थापित विरुद्ध नवोगत' 'मायबोलीवरील गटबाजी' असे विषय सुरु करतात आणि न रहावून हे लोकही भांडायला प्रवृत्त होतात.

मैत्रेयीला कळत नाही, आपण ऑलरेडी 'असंबद्ध गप्पांचा' बाफ सुरु केलेला असताना, लोक नळावरही तेच का करताहेत? काही शहाणी लोक इथला सगळा रागरंग बघून आधीच पळून गेली आहेत. स्वप्ना राज, साधना वगैरे मंडळींना - 'जे घरी सिरीयल मधे बघायला लागतं तेच इथे बघायला लागलं तर आपलं दु:ख सांगायचं कुणाला' असे प्रश्न पडलेत.

आता ह्या सगळ्यात अश्विनीमामी डीटॉक्स चं तत्व सांगण्याच्या प्रयत्नात. लोकांना ते पटतही. त्यामुळे "आत्ता भांडू - नंतर डिटॉक्स आहेचे भांडण विसरायला" असा विचार करून सगळेजण पुन्हा हिरिरीनं भांडायला लागतात. तेवढ्यात आपलं 'डीटॉक्स टेक्निक' वापरून कुणीतरी उद्योग सुरू केलाय आणि माहित नसल्यानं उद्योजक गटात आपणच त्याला हा व्यवसाय सुरू करायला मदत केली आहे हे मामींच्या लक्षात येतं - मग त्यांचे कॉपीराईट चे वाद सुरु होतात.

दिवस संपेपर्यंत पडलेले गट असे असतातः
१. काही बायका विरुद्ध काही पुरुष वाद
२. काही पुरुष वि. काही पुरुष वाद
३. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित वाद
४. भारतातले भारतीय विरुद्ध परदेशातले भारतीय बाद
५. परदेशातले परत येणारे विरुद्ध परत न येणारे वाद
६. भ्रष्टाचार योग्य का गरजेचा असे वाद.
७. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातले वाद
८. शहरा शहरातले वाद
९. "नळावर भांडणार्‍यांना 'एका कल्ट' चा भाग म्हणता येईल का" ह्यावरून वाद
१०. तात्विक वाद
११. वैयक्तिक वाद
१२. नसलेल्या टॉपिक वरून झालेले कोटी कोटी वाद!

ह्या सगळ्या वादांमध्ये माबोकरांचा नळावरचा पहिला दिवस संपतो. पण भारतातला दिवस संपेपर्यंत अमेरिकेतला दिवस सुरू होतोच! आणि मग हीच भांडणं कायम रहातात.
शेवटी अ‍ॅडमिनलाच सहन होत नाही, ते हा नळ काढून नेतात. लोक पांगतात पण वाद संपत नाहित. ते वेगवेगळ्या बाफ वर चालूच रहातात.

नळावरच्या हाणामारीत कुणाच्याच लक्षात न आलेली गोष्ट म्हणजे, ह्या सगळ्या गडबडीत हूड आणि झक्की 'दो दोस्त एक प्याली मे चाय पियेंगे' म्हणत मजेत कोपर्‍यात बसलेले असतात... नुसतं तेवढच नाही तर चक्क एकमेकांना डोळा मारून हसत असतात!

-----
तळटीप १: फक्त मजा म्हणून लिहिलंय. कुणालाच दुखवायचा हेतू नाहिये.
तळटीप २: तुमचं नाव फारशी ओळख नसल्यानं, स्वभावविशेष आत्तापर्यंतच्या माझ्या मायबोलीवरच्या इतक्याशा काळात जाणवला नसल्यानं, अनावधानानं, नजरचुकीनं, माझ्या लेखणीच्या मर्यादे मुळे किंवा इतर काही कारणानं राहिलं असेल तर आपले आपण इथे कमेंट्स मधे घुसा..
तळटीप३: हा नळ सार्वजनिक आहे - त्यामुळे बिनधास्त घुसा!

गुलमोहर: 

चांगला जमलाय नळ. म्हणजे.. भांडण.
नळावरच्या हाणामारीत कुणाच्याच लक्षात न आलेली गोष्ट म्हणजे, ह्या सगळ्या गडबडीत हूड आणि झक्की 'दो दोस्त एक प्याली मे चाय पियेंगे' म्हणत मजेत कोपर्‍यात बसलेले असतात >> हे मात्र अगदी खरय नानबा. Happy

नानबा, ह्या लेखावरून तुम्ही काही आठवड्यांपासूनच्या ताज्या नव्हे, तर मुरलेल्या मायबोलीकर आहात असा संशय आहे. Happy मस्त लिहिलंय.

वाSSS नानबा.... काय सुपिक डोकंय ... मस्त!!!!!!!!
पण समजावून घेणं - हे भांडणाइतकं मजेशीर नसल्यानं >>> Rofl

मजा आली हे भांडण वाचुन. Happy माबोकरांनो, आता जिथे कुठे वाद होउ लागतील ते लगेच इथे शिफ्ट करत जा.

धन्स रे सगळ्यांना..
पण नळावर कुणी भांडताना दिसलं नाही आत्तापर्यंत ते! Wink
असुदेत.. चांगलं आहे.. अ‍ॅडमिनला नळ काढून नाही न्यावा लागणार! Proud

राहुल त्या हंड्यावर ,भांडणात हंड्यावर हंडे आपटुन खड्डे पडलेत का रे ?
नानबा , इथे फक्त सोज्वळ भांडंण होणार की " झिंज्या उपटण्यापर्यंत रंगणार " . Proud

>>राहुल त्या हंड्यावर ,भांडणात हंड्यावर हंडे आपटुन खड्डे पडलेत का रे ?>>>
श्री...
ह्यावरुन दिसते की आमचा नळावरचा अनुभव किती प्रगल्भ आणि प्रगाढ आहे ते.. Happy

>>इथे फक्त सोज्वळ भांडंण होणार की " झिंज्या उपटण्यापर्यंत रंगणार " .

मी बालदिन करून आलोय ! Proud

हाहाहा.नानबा, लै भारी.. डोकेबाज आहेस बुवा,मान गये.. थॅन्क्स हां मला शांतताप्रिय जनतेत गणल्याबद्दल, हे आता बोल्ड अक्षरात करून नवर्याला दाखवले पाहिजे Wink आणी हे नळावरचं भांडण घरच्या वॉशबेसिन पर्यन्त न्यायला पाहिजे. Biggrin

अरे इथे भाण्डायचे आहे ना? मग मस्त सुरेख छान असे काय लिहिताय?
भाण्डण सुरु करा की!

रच्याकने. मी इन्ग्लिश नव्हे मराठी किरण Happy वरिजनल!! म्हणजे देवनागरी id व्ह्यायच्या आगोदर माझा kiran हाच id होता. पण आता तो दुसर्‍या किरण ने घेतला आहे.

हा मग आता मी भाण्ड्ण सुरु करु का? Happy

Pages