पाऊस म्हणजे

Submitted by दाद on 27 February, 2008 - 22:42

पाऊस म्हणजे...

पाऊस म्हणजे कोंदलेलं निळेपण
गोर्‍या विजूने भारला, घनघन श्यामघन

पाऊस म्हणजे गाली टिचकीची खूण
मग मोतिया शिंपण, हरखून हरखून

पाऊस म्हणजे ओली मेंदी, ओले मन,
अन भिजण्या, ओढून संगे नेलेला साजण

पाऊस म्हणजे भाळी थेंब थेंब लेणे
खुसू खुसू खळीतली, लाज हळूच टिपणे

पाऊस म्हणजे शब्द-सुरांचा रूजवा
आभाळातल्या गाण्यांचा रानभर शिडकावा
पालवुन ओठी यावा रानमंत्रांचा तरवा,
ऋचा कोवळ्या पोपटी, वेद हिरवा बरवा.....
-- शलाका

(सिडनीत पाऊस अगदी वेड्या वेड्यासारखा वागतोय.... अगदी याक्षणीही)

गुलमोहर: 

छान कविता.......आभाळातल्या गाण्यांचा रानभर शिडकावा...... ओळ जास्त आवडली...... कल्पना....

व्वा!
वेद आणि ऋचा पोपटी हिरवे, सुंदर कल्पना.
शल्काताई, परत एक सुचवू का? हरकून नाही बहुतेक हरखून हवे का? तुम्हाला काही सुचवितांना अगदी कोंडल्यासारखे होते, रुजवा, गोंदण कसे छान छान शब्द आणि सुरेल कल्पना असतात तुमच्या.
आणि तरवा म्हणजे काय?

चिन्नु, काय बोलतेस! कोंडल्यासारखं काय? दुरूस्तली कविता लगेच. तुझेच आभार (अगदी formal शब्द वाटतो).

आणि तरवा म्हणजे तरंग का?
तुमची ही कविता(देखिल) खूप आनंददायी आणि समृद्ध आहे.

परत परत वाचताना नवा आनंद मिळतो , दरवेळी पाउस पडताना मिळ्तो तसा.

शलाका, तुझे खुप खुप आभार या कवितेतुन मिळालेल्या आनंदासाठी.

मी आणि अनु तुझे चाहते (fans) झालोत.

अगदी सुंदर... मस्त...

पाउस म्हणजे थेंब थेंब, पाउस म्हणजे गाण
थेंबा थेंबान आभाळाच धरतीवर येण....

मोतिया शिंपण, खुसू खुसू खळीतली, शब्द-सूरांचा रूजवा, ऋचा कोवळ्या पोपटी, वेद हिरवा बरवा ... वा वा, शलाका लहान मुलाला जसे सहज हसू फुटते तसेच सहज-संदर तुला शब्द फुटतात!

केवळ अप्रतिम !!! ......

आवर्जून दाद द्यावीशी वाटली... बर्‍याच दिवसांनी छान कविता वाचायला मिळाली...
खरंतर शब्दांचे अपभ्रंशसुद्धा वाचताना गोड वाटले! म्हणून आणखी एकदा दाद!


पाऊस म्हणजे ओली मेंदी, ओले मन,
अन भिजण्या, ओढून संगे नेलेला साजण

केवळ सुंदर!

फक्त एकच... बर्‍याच ठिकाणी लघू गुरूच्या चुका आहेत त्या टाळता येतील... (कवितेत यमकपुर्ती, वृत्तपुर्ती याकरिता लघू गुरू बदल आणि शब्दांचे अपभ्रंशही चालतात, पण इथे त्यांची गरज वाटत नाही)

सगळ्यांचे आभार रे... इथे पडणार्‍या वेड्या पावसासकट सगळ्यांचे Happy
सारंगा, 'लघु-गुरू च्या चुका' - ह्याच कवितेतलं एक उदाहरण घेऊन सांग, बाबा.
मी जेव्हा ही कविता परत एकदा वाचली तेव्हा मला एका बाबतीत खटकली - पाऊस (स तोडून) न म्हणता पाऊसं (स वर टिंब ) म्हटलं तरच तिला नाद येतोय. आणि मी लिहिलय पाऊस (म्हणजे स तोडून).
ह्या साठी म्हणतोयस का? तर आता "पाऊसं" केलय. (आता म्हणून बघ)
आणि अजून एक, पालवुन (वु र्‍हस्व) .... पालवून (वू दीर्र्घ) हवय.... आणि ते दुरुस्तलय.

ह्याहून वेगळं, अधिक असल्यास, इथेच चर्चा होऊदे तुझी हरकत नसल्यास... अजून कुणाला शिकायचं असेल तर आपसुकच होईल. पण नक्की सांग, रे.

पाऊस हेच बरोबर... पाऊसं असं करायची गरज नाही

आणखी काही...

नीळेपण... नाही निळेपण हवं...

खुण... खूण हे बरोबर

हरखुन... हरखून पाहिजे... मराठीत सगळेच ऊन हून प्रत्यय दीर्घ असतात... आणि मूळ कवितेत पण त्याने उच्चारताना फारसा बदल होईल असे वाटत नाही. कारण न वर मग अतिरिक्त दाब येईल...

शब्द-सूरांचा... शब्द-सुरांचा... सूर पासून सुरांचा... बोलतानाही ते लघुच आहे...

रूजवा... रुजवा हे बरोबर

Hope this helps...

सारंग

दाद, खूप सुरेख, आणि पावसावर असल्याने मनाला एकदम भिडली !

तुझी प्रत्येक कविता कितीतरी नवीन शब्द शिकवून जाते

झक्कास्स .... Happy

सारंग,
कळलं आणि सुधारलंही. धन्यवाद (अगदिच फॉर्मल, बाई)
कवितेसाठी मुदाम केलेल्या नव्हेत रे, र्‍हस्व-दीर्घाच्या खूप बेसिक चुका आहेत ह्या... पुढल्या खेपी जास्तं लक्ष देईन....
पण तू ही जागरुक रहा रे.... माझं काही खरं नाही Happy

पाऊस म्हणजे गाली टिचकीची खूण
मग मोतिया शिंपण, हरखून हरखून
..........क्या बात है!

पाऊस म्हणजे भाळी थेंब थेंब लेणे
खुसू खुसू खळीतली, लाज हळूच टिपणे

अगं काय कहर लिहितेस गं दाद.......!!

पालवुन ओठी यावा रानमंत्रांचा तरवा,
ऋचा कोवळ्या पोपटी, वेद हिरवा बरवा.....

कल्पना, शब्द आणि संवेदना यांचा अमूर्त संगम !! मस्त !!! आजचा मुहूर्तच टॉप लागलायसा दिसतोय. मूड आणि वेळ दोन्हींसाठी. Happy

पाऊस म्हणजे धमाल नुस्ती
शिरशिर गारव्याची ओली मस्ती

पाऊस म्हणजे खंडाळा घाट
आठवात दडलेली धुंदली वाट

पाऊस म्हणजे जुनीच ओल
तिच्या घराचा रस्ताच गोल..

पाऊस म्हणजे गरम चहा
थरथर देहाचा स्पर्श हवा

पाऊस म्हणजे पाऊस म्हणजे
ओल्या दिसांचे हवेसे ओझे..

किरण

दादबाई न विचारता आगळीक केलीये लिहायची Happy

मूळ कविता मात्र सुंदर आहे खूप..

पाऊस म्हणजे ओली हुरहुर
मनाच्या गावात कवितांचा पूर

पण मूळ कविता खूपच सुंदर

शशांकचं खोदकाम.... जुनं उअकरून काढताय, शशांक.

पुन्हा एकवार सगळ्यासगळ्यांचे खूप आभार. शशांक, किरण्यके, शाम्-न्-गजल, तुमच्या कविता किती सहज आहेत...
भारतातल्या पावसानं वेडी धुन लावलीये का काय?

अजून इथं पाऊस नाही आलाय, अजून तगमगच आहे. पण आता नक्की येईल. मी एकटीच ही इतकी सुरेख पाऊसकविता वाचतेय, म्हटल्यावर त्याला माझा मत्सर वाटेल आणि तो येईलच दाद द्यायला! Happy

प्रतिसादही कवितेसारखेच चिंबचिंब! [तो धुसफुसत जमा करायला लागलाय आपली आयुधं! आता अस्सा बरसेल ना!] Happy

पाऊस म्हणजे कागदी होड्या
गढूळ पाण्यात नितळ खोड्या

पाऊस म्हणजे पाण्याचे पाट
शेवाळलेली निसरडी वाट

पाऊस म्हणजे हिरवे डोंगर
बांधावरचे विसावले नांगर

पाऊस म्हणजे धरणीचा साज
उधान दर्याची प्रेमळ गाज

पाऊस म्हणजे चारा-पाणी
चराचरातून हिरवी गाणी

पाऊस म्हणजे रानभर हर्ष
ओलेत्या पंखांचा ओलसर स्पर्श

पाऊस म्हणजे टिपटिप आत
गळकं छप्पर नि दोनच हात

Happy

Pages