माननीय मायबोलीकर मायबाप मंडळींना मानाचा मुजरा....
थांबा.... माझ्या ह्या आदरातिथ्यानं काहि बरं वाटुन घेऊ नका.... ह्यातला प्रत्येक शब्द-न-शब्द मी अतिशय रागानी लिहलेला आहे. खरं तर मी तुमच्यावर खटलाच भरायला हवाय...
गेले काही दिवस मी अत्यंत मोकळेपणानी माझं आयुष्य तुमच्या समोर उलगडुन दाखवतोय. तुम्हीही ते खुप मनापासुन ऐकता... नव्हे ऐकायचा..... ह्याचं किती बरं वाटायचं मला. पण मी तुमचं का ऐकलं असं झालय मला.... त्या रंभा घायाळकर प्रकरणात (http://www.maayboli.com/node/12770) मी सट्टुन मार खार खाल्लाय हे माहित असुनही तुमच्यातल्या काही डँबीस मंडळींनी मला तिचा तमाशा तिस-या रांगेतुन बघायचा आगाऊ सल्ला दिला...
....आणि मी तो ऐकला... !
तुम्हाला माहित होतं की मी पुन्हा मार खाणार आहे...... खाल्ला !
तुम्हाला माहित होतं की मी आयुष्यातुन उठणार आहे..... उठलो !
.....का केलंत तुम्ही असं माझ्याबरोबर ? .......काय मिळालं तुम्हाला माझं असं करुन ? .......का फसवलत मला ? .....काय फरक राहिला तुमच्यात आणि त्या ध्यानमंदिरातल्या माझ्या दुष्ट मित्रात ?
तसं तुम्हाला तरी काय दोष देणार म्हणा..... तुम्ही लाख सांगितलंत, पण माझी अक्क्ल काय तेंव्हा दारु प्यायला गेली होती का ? अर्थात तुम्ही मला हा सल्ला दिला नसता तरी मी रंभाबाईंचा तमाशा पाहायला पुन्हा जाणारच ह्याची माझ्या मित्रांना खात्री होती... माझ्या क्षेत्रातला माझा एक गुरुबंधु म्हणतो.....
दारु ढोसायची न्हाई... असं कुना पोरानी ठरवलं...
तर समजा... त्याच्या जीवाला घोर न्हाई
घुसखोरी करायची न्हाई... असं कुना चोरानी ठरवलं....
तर समजा... तो पट्टीचा चोर न्हाई
पिसारा फुलवायचा न्हाई... असं कुना मोरानी ठरवलं...
तर समजा... गावामध्ये लांडोर न्हाई
आणि....
नाद करायचा न्हाई... असं कुना थोरानी ठरवलं...
तर समजा... त्या शब्दामध्ये जोर न्हाई
मंडळी... मी थोर नाही, आपल्याला घुसखोरी वर्ज नाही, गावामध्ये लांडोर फार आहेत आणि माझ्या शब्दात जोर नाहीच....शेवटी मी रंभाबाईंच्या लोककलानाट्यमंदिराकडे गेलोच.....
.... त्या मागच्या प्रसंगातुन उठायला महिना लागला मला....
मग.. तुम्हाला काय वाटलं, पोवाडा संपेपर्यंत त्या रानगव्याच्या हातुन मार खायाचा म्हणजे ये-यागबाळ्याचं काम नाहीये... मी निदान महिन्यानी तरी उठलो काही जण तर कायमचेच उठले होते म्हणे...! माझ्या जखमा जरी ब-या झाल्या असल्या तरी वण अजुन तसेच होते... शरीरावरचे.... आणि त्याहीपेक्षा मनावरचे... मुघलांच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा संताजी-धनाजी दिसायचे म्हणे. मलाही दिसतात मोसंबी-नारंगीत शेलार-तानाजी...
मध्ये मध्ये तर एकदम भलभलती भिषण स्वप्न पडायची हो.... मान्य आहे स्वप्न खोटी असतात पण तेंव्हा नाही ना कळत ते... झोपेत कधी हार्ट फेल नको व्हायला.... तेच तेच पुन्हा पुन्हा दिसत राहायचं....
.....पुन्हा मी तमाशाला गेलो आहे. पुन्हा पहिल्याच रांगेत बसलो आहे. पुन्हा ढोलकी वाजतीये आणि पडदा वर गेलाय. आणि समोर...
नाही, शाहिर नाही... ह्यावेळेला समोर तमाशाच्या फडाऐवजी कुस्तीचा आखाडा आहे... पुन्हा तोच काळापहाड शाहिर ह्यावेळेस भरजरी कपड्यांच्या ऐवजी नुसत्या कुस्तीच्या लंगोटवर उभा आहे. ह्यावेळेस अंगाला अत्तर लावायच्या ऐवजी त्यानी आखाड्यातली माती चोपडलीये. डफ वाजवायच्या ऐवजी तो मांडीवर आणि दंडावर हात आपटुन पाशवी आवाज काढतोय. मागच्या कोरसवाल्या बायका गायब झाल्यात आणि त्याजागी प्रत्येकी सुमारे दिड-दोन क्विंटलचे कुठकुठले-केसरी मल्ल केशरी लंगोट घालुन कोरस द्यायला उभे आहेत....
माझी गंमत बघायला संताजी, धनाजी, तानाजी, शेलार मामा, शेलार मामी, थोरांताची कमळा आणि काशीनाथ घाणेकर (शूर आम्ही सरदारवाला) असे सगळे थेटरात जमलेत आणि शाहिर रागानी बघायच्या ऐवजी गालातल्या गालात हसुन बघतोय कारण आज 'अफ़जलखान वधाचा' पोवाडा आहे....
........असली काहितरी अमानुष स्वप्न पडतात हो ! मग मी दचकुन उठतो आणि पोटाच्या नगा-यावर हात मारुन तो वाजवुन बघतो की महाराजांनी फोडला तर नाही ना....
पण आता जरा बरं आहे. हळुहळु स्वप्नातली हिंसा गेल्या काही दिवसात कमी होत गेलीये.
तुम्हाला सांगतो दारुसारखंच 'काळ' हे सुद्धा सगळ्या दुःखांवरचं औषध आहे...
काळ सरत गेला तसं माझी कृष्ण-धवल स्वप्न इस्टमनकलर होत गेली.... स्वप्नांना येणारा आखाड्याच्या मातीचा वास गेला आणि मोग-याच्या कळ्यांचा गंध यायला लागला.... पोवाड्याच्या किंकाळ्या विरल्या आणि कानात घुंगराचा नाद शिरायला लागला.... (हा नाद म्हणजे नादखुळा ह्यातला नाद नसुन, आवाज ह्या अर्थाने नाद आहे.) ...आणि एक दिवस आलाच की माझ्या चतुर मनानी आणि आतुर क्षणांनी, मला थेटरावर आणुन सोडलंच. तिथं गेलो आणि सगळे जुने मित्र भेटले. झाडुन सगळे मित्र भेटण्याच्या दोनच वेळा...
गटारी आमोशा आणि रंभाचा तमाशा !
सगळ्यांनी आस्थेनी माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि आदरानी मला रांगेत पुढं पुढं जायला वाट दिली. पुन्हा तिकिट खिडकीवर पहिला मीच....
माझ्या जखमांचे वण भरले होते... बुजले नव्हते. आणि मला रांगेत पहिलं का उभं केलय हे न कळण्याइतका मी काही टुंग नव्हतो.... खिडकी उघडताच मी तिकिट मागितलं आणि 'पहिल्या दोन रांगेत नको' असं आवर्जुन सांगितलं...
"पहिल्या दोन रांगेतलं मागितलं तरी देणार नाही" असं तो तिकिटवाला म्हणाला. जसं काही त्यानी दिलं असतं तर मी घेतलंच असतं. पण ती लोकं, पहिल्या दोन रांगांची तिकिटं न विकता 'रशीकजनांची' इतकी काळजी घेतायेत हे पाहुन अगदी भरुन आलं.
आत गेलो तर पहिल्या दोन रांगा एकदम गच्च भरलेल्या... एकदम म्हणजे एकदमच... म्हणजे पहिल्या रांगेत एका खुर्चीवर तीन लोक.. दोन शेजारीशेजारी आणि एक त्यांच्या मांडीवर... दुस-या रांगेत एका खुर्चीवर दोन लोकं... खाली भक्कम व उंच माणसं आणि त्यांच्या खांद्यावर किरकोळ व बुटकी माणसं अशी सोप्पी योजना करण्यात आली होती... तिस-या रांगेपासुन पुढे लोक खुर्च्यांवर उभी होती....
मी आवाक.... 'शाहिराची कुणाला भिती कशी वाटत नाहीये' असा विचार करायला लागलो तर तो मागच्या वेळेसचा रंभाभक्त भेटला. त्याला विचारलं तर म्हणाला ,
"बाईंनी बॉयफ्रेंड बदलला. मागच्या वक्ताला तुम्हाला लई हानला तेच्या दुस-या दिवशी भारत-जपान सन्स्कृती द्येवान-घ्येवान प्रोग्राममधी एक सुम्मो पैलवान हिकडं तमाशा बघायला आलेला. तुमच्यावानी शाहिरानं तेला बी स्टेजवर वढला आणि अंगावर पाडुन घेतलं."
"मग ?" - मी.
"मग काय ? जागेवर चेंदामेंदा..... सद्ध्या बाईंच्या पिरेमाची शिकवनी एक शामळू शाळामास्तर घेतोया..."
"शाळामास्तर ?? शाळामास्तर ???" - जळुन खाक़ झालेल्या मी अतिशय रागानं, द्वेषानं, मत्सरानं, निराशेनं, हेव्यानं, कुतुहलानं आणि अविश्वासानं त्याला विचारलं. (शाळा सोडल्यानंतर शाळामास्तरांचा इतका राग कधी येईल असं मला वाटलं नव्हतं.)
माझ्या ह्या प्रश्नावर पिंज-याबाहेर फडफडणारा तो आशीक म्हणाला...
" जाब विचाराया गेला, तिने केला डाव.....
भोव-यात शृंगाराच्या सापडली नाव....
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली.... "
" कशी नशीबानी थट्टा आज मांडली... " -
त्यानी माझ्या काळजाची तार छेडली, म्हणुन हे वाक्य त्याच्या इतक्याच दुःखी आवाजात मी पुर्ण केलं आणि गपगुमान तिस-या रांगेत माझ्या जागेवर जाऊन उभं राहिलो....
एकदा पानझड सरली की आयुष्याला नविन पालवी फुटते.... (मागचा अनुभव बघता, पानझड च्या ऐवजी मारझोड असं मी म्हणायला हवय.... असो...). बघा ना... नाद नाय करायचा हि माझी प्रतिज्ञा तुटली आणि नविन पालवी फुटली... रंभाबाईंची गाठ सुटली आणी नविन पालवी फुटली... शाळामास्तरांची पाटी फुटली आणि नविन पालवी फुटली...
... निवेदकाची ती एव्हरग्रीन अनाऊंसमेंट झाली आणि पडदा वर गेला. स्वर्गाचं दार उघडलं आणि स्टेजवर.........
....काय वर्णन करु मंडळी ? अस्खलित, आरसपानी सौंदर्य.... पारणं फिटलं डोळ्याचं.... अजुनही आठवलं तरी अंगावर काटा येतोय... छे...... काटा कसला... शहारा येतोय.... शहारा ! थक्क झालो त्या सौंदर्यानी....
हजारात काय लाखात उठुन दिसेल अशी देखणी, उंच...... तब्येत अशी की, बारीक म्हणावी इतकी सुकलेली नाही आणि जाड म्हणावी इतकी सुटलेली नाही...... एकदम हिशोबात.... रंग असा की नुसता हात लागला तरी मळेल..... रेशमी केस, जीवघेणे घारे डोळे... पण नजर चावट, थरथरणारे ओठ, मखमली मान, लांबसडक पाय आणि त्यावर कहर म्हणजे........ ........................................एकदम झुपकेदार शेपटी.....!!
आजपर्यंतच्या आयुष्यात एवढी भारी घोडी मी पहिली नव्हती राव..... एकदम रुबाबदार, उमदं जनावर.....!! पण तमाशात घोडी का आणलीये असा विचार करतो-न-करतो तोच, "परवा घोडेगावच्या उरसात सवाल-जवाबाच्या बारीत रंभाबाईंना ही घोडी बक्षिस मिळालीया " - त्याच त्या.... 'रंभा घायाळकर विकीपेडीया रसिकानं' मला माहिती पुरवली. इथुन पुढे त्याला आपण "रं घा वि र" असं म्हणुया...
नुसता तमाशाच न करता, तमाशाच्या जुगलबंदीत पहिला नंबर मिळवुन ही घोडी जिकणा-या त्या रंभाबाईंविषयी मला आदर वाटायला लागला आणि कधी एकदा त्या रंभाबाईंना बघतोय असं झालं.
ढोलकी वाजवणारा तर अगदी रंगात आला होता... पठ्ठ्या थांबेचना... पुन्हा आयुष्यात कधी ढोलकी वाजवायला मिळेल का नाही, अशा आविर्भावात तो वाजवतच बसला... मी एकतर उभा त्यात 'व्याकुळ' का काय ते.... माझा विरह वाढवणा-या त्या नराधमाला ढोलकीसारखाच बडवला पाहिजे असा विचार मनात आला. पण माझ्यापेक्षा कोणाला तरी ह्या विरहाचा त्रास जास्त होत असावा, कारण एक चप्पल भिरभिरत आली आणि त्या ढोलकी वाजवणा-याच्या डोक्यावर आदळली. त्यानं ढोलकी थांबवली आणि प्रसन्न चेह-यानी ती चप्पल उचलली. आणि...... आणि काही नाही... पुन्हा वाजवायला लागला....
मग दुसरी चप्पल गळाभेटीला आली आणि त्याचा प्रसन्न चेहरा तृप्त झाला. प्रभु रामचंद्रांच्या पादुका नेताना भरत पण इतका समाधानी दिसला नसेल...
" नरसाळ्याचं चपलेचं दुकान हाये...." - इति "रं घा वि र".
आता माझे पाय जरा जरा दुखायला लागले होते. थोडा वेळ जरा खाली बसावं असा विचार करायला लागलो तर.....
".....हं...हं...हं...हं... या रावजी तुम्ही बसा भावजी...."
असा एक कर्कश्श मंजुळ आवाज विंगेतुन आला. शिट्ट्यांचा किणकिणाट झाला... फेटे उडायला लागले.... पहिल्या रांगेतली लोक विनाकारण उठुन उभी राहिली त्यामुळे त्यांच्या मांडीवरचा माणुस खाली पडला आणि छोटीशी धक्काबुक्की झाली. ह्यामुळे दुस-या रांगेतल्या खालच्या माणसांना काही दिसेना म्हणुन ते उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर बसलेले वरचे लोक अजुनच वर झाले. तिस-या रांगेतल्या आम्हाला त्या पुढच्या दहिहंडीमुळे काहि दिसेनाच....
" कशी मी तुमची राखु तुमची महरजीऽऽऽऽऽ ईऽऽऽ ईऽऽऽऽ ईऽऽऽऽ... बसा भावजी..."
तुम्हाला सांगतो त्या 'बसा भावजी' मध्ये इतकं आर्जव होत... मार्दव होतं..... इतकी लाडीक विनंती होती... कळकळ होती....तळमळ होती की...... की तिची विनंती धुडकावणं शक्यच नव्हतं.... भावजी म्हणजे अस्मादिक खाली बसले.
लोकं संधीसाठी, कधी न मिळाल्यासारखे उतावीळ का असतात कुणास ठाऊक.... मी खाली बसलो आणि लगेच ती संधी साधुन एक जण माझ्या खांद्यावर बसला... मी उंच तर नव्हतोच पण भक्कम पण नाही हो... मी भुईसपाट झालो.. तो माझ्यावर बसला आणि ती संधी साधुन त्याच्या खांद्यावर एक बसला....
" तुम्हा बघुन डावा डोळा झाकला...
पडदा लाजंचा लाजंचा फेकला "
बाई बोर्डावर चांदणं पसरत होत्या आणि मी मात्र अंधाराच्या खाईत गाडलो गेलो होतो.... माझा डावा डोळाच काय... पण दोन्ही डोळे, कान, नाक, तोंड... सर्वांग झाकलं गेलं होतं...
पण जसं बाईंनी,
" गुलहौशी तुमी मी अशी गुलछडी
तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी "
ह्या ओळी म्हंटल्या तसं त्या माझ्यासाठी खडी राहिलेल्या गुलछडीला पाहण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर एक उसळी मारली आणि त्या तिस-या रांगेच्या दहिहंडीवर सगळ्यात वर पोहचलो. पण नेमकं तेंव्हा बोर्डावर त्या नाजुक गुलाबाच्या कळीभोवती बाकिच्या मरगळलेल्या ८ पाकळ्यांनी आपापले पदर वर करुन गुलछडीला झाकुन टाकलं होतं. (ह्या साईडच्या नाच्या का घेतात कुणास ठाऊक.... तिघीतिघींना एकत्र केलं तर एक भरेल अशा ६ जणी होत्या आणि उरलेल्या दोघींचे ४-४ भाग केले तर प्रत्येक भागात एक जाड बाई उरेल अशा....) सगळ्यांच काम मात्र एकच.... त्या कळीला झाकुन टाकणे !!
पुढच्या ओळींना ते पदर खाली आले आणि ती गुलछडी दिसणार इतक्यात आमची दहिहांडी पण खाली आली. मी पुन्हा जमिनीवर आणि पुन्हा माझ्या अपरोक्ष तिनी "पडदा लाजंचा लाजंचा फेकला ".
पहिली लावणी झाली सुद्धा आणि माझ्या पदरात काही सुद्धा पडलं नव्ह्तं. जे पडलं होतं ते बरंच महाग होतं.... दोन दात आणि डोक्याला टेंगुळ....! कपडे सुद्धा फाटले होते... मी दुःखानं त्याकडे पाहत असताना पुढचं गाणं चालु झालं....
" खेळताना रंग बाई होळीचा होळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा "
मी माझे फाटलेले कपडे विसरुन पुन्हा नव्या जोमाने उभं राहायला लागलो.... बाई उसाश्यावर उसासे टाकुन गाणं म्हणत होत्या.... मला तर जाम झापाटल्यासारखं झालं. काय करावं काही सुचेना... उभं राहिलं तरी काही दिसेना, खाली बसवेना, तिथुन हलवेना.... खुप त्रास.... सगळ्यांचे शिरच्छेद करुन त्या मुंडक्यांची माळ रंभाबाईंच्या गळ्यात घालावी असं वाटायला लागलं. पण सगळ्यांची डोकी बरीच वर होती आणि तिथ पर्यंत पोहचणं जरा अवघडच होतं.... मग एक झकास आयडीया सुचली. खिशातुन शंभराची एक नोट काढुन खाली टाकली. म्हंटलं की कोणी वाकला की उडी मारुन त्याच्या पाठीवर चढुन उभं राहायचं.... बराच वेळ झाला कुणीच नाही वाकलं म्हणुन खाली पाहिलं तर शंभराची नोट नव्हतीच... पण पाचशेची होती. माझ्या बावळटपणाची कमाल झाली होती. त्या बाईला बघायच्या नादात चुकुन पाचशेची नोट टाकलेली. ती उचलायला गेलो तर दोघं जण उडी मारुन माझ्या पाठीवर उभे राहिले... (अडीचशे अडीचशे काढले असणार त्यांनी....)
भीक नको पण कुत्रा आवर आणि तमाशा नको पण ही जत्रा आवर अशी अवस्था झाली माझी.... त्यांनी पाठीवरुन उतरायचे आठशे रुपये घेतले.... मला परवडले... आठशे रुपायात पाठीचा मणका हा सौदा तसा स्वस्तातला होता....
"त्याला कोणी सांगंना
कुणाला तो लाजंना
डाव साधला ऐनवेळीचा, वेळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा "
हे स्वर कानावर पडले आणि पेटलोच.... लोकं न लाजता डाव साधताहेत आणि आपण अजुन आट्यापाट्याच खेळत बसलोय ?? मग एक दारुडा पकडला त्याला दोनशे रुपये दिले आणि म्हणालो की जोरात ओरड की " इन्स्पेक्टर साहेब आले ! इन्स्पेक्टर साहेब आले !! "
त्यानी ते घेतले आणि जीव खाऊन ओरडला... " शाळामास्तर आले ! शाळामास्तर आले !! " (एक वेळ शाहिरांवर विश्वास ठेवावा पण दारुड्यांवर कधी ठेऊ नये.) लोकांनी लहानपणी गणितात हातचा राहिल्याचा ते रंभाबाई हातातुन गेल्याचा... असा सगळा राग माझ्यावर काढला हो ! शाळामास्तर वर लोक इतके चिडुन असतील हे मला शाळेत असताना पण वाटलं नसतं. त्यांनी मला लई हाणला.... पाढे म्हणुन म्हणुन हाणला... रंभाबाईंच्या नावानी हाणला.... सगळ्या गावानी हाणला.... वाईट वेळ आलीच तर गडावरचा मुघल होईन पण फडावरचा मास्तर होणार नाही अशी मी शपथ घेतली....
तिथं स्टेजवर काय चाललं असेल ह्या कल्पनेनं ह्या विचारानी त्या यातना सुसह्य होत होत्या. काय ताकद असते पहा आपल्या विचारात ! तुम्हाला मरणाच्या दारातुन खेचुन आणतात विचार..... पुन्हा मरण्यासाठी.
मी मागची काही असंतुष्ट मंडळी गोळा करुन पुन्हा दहिहांडी करुन पाळीपाळीनं वर चढायचं ठरलं..... चांगल्या गोष्टीत आपलं नशीबच नाही बघा.... चिठ्ठ्या टाकल्या तर माझा नंबर शेवटी.... अजुन थोडा जरी फुगला तर फुटेल असा एक गरगरीत इसम माझ्या खांदयावर उभा होता... पार पार खचलो होतो मी आणि त्यात कानावर पडणारे एकेक शब्द जीव घेत होते....
"झणि पाऊल अवघडलं
आणि काळीज धडधडलं
काय सांगु मी पुढलं
क्षणातच सारं घडलं
जीव झाला घाबरा भोळीचा, भोळीचा
फाटला ग कोना माझ्या चोळीचा "
खरंच क्षणात सारं घडुन गेलं होतं कारण माझा नंबर आला तेंव्हा ती भोळी जीव घाबरा झाल्यानी गेली होती आणि स्टेजवर त्या मगाचच्याच ६ पिचका-या आणि २ बादल्या उरल्या होत्या....
"आम्ही तरण्या ग पोरी
जमलो गावा बाहेरी
सख्याची आली स्वारी
उडविली ती पिचकारी "
असं म्हणुन त्यांनी ह्या सख्याच्या अंगावर बचाकभर रंग उडवुन स्वारीला वरुन खाली पाडलं. ह्यावेळेस दहिहंडीबरोबर मडकं पण फुटलं....
त्यानंतर खुप बहारदार लावण्या झाल्या म्हणे.... माझे डोळे उघडले तेंव्हा शेवटची लावणी चालली होती. कुण्या गावाचं पाखरु आलं होतं आणि आता परत निघालंही होतं....
"मान करुन जराशी तिरकी, भान हरपुन घेतय गिरकी
किती इशारा केला तरी बी... आपल्याच तालात, न खुदूखुदू हसतंय गालात... "
मंडळी... ती मान तिरकी आणि बाईंची गिरकी जरी मला दिसली नाही तरी तिनं जाता जाता केलेला इशारा मला बरोब्बर दिसला आणि जगणं धन्य झालं माझं. बाईंचे डोळे दिसले मला फक्त, पण त्या नशील्या डोळ्यांची शपथ... जादु आहे जादु त्या डोळ्यात आणि असे जादुगार, निळेशार, बहारदार डोळे माझ्यावर खिळले होते... मला बोलावत होते....
रंभाबाईंची आज्ञा शिरसावंद्य मानुन क्षणाचाही विलंब न करता मी त्या स्टेजच्या मागे त्यांना भेटायला गेलो तर तिथं प्रचंड गर्दी.... आणि प्रत्येकाचा 'रंभाबाईंनी मलाच इशारा केलाय' हा दावा....
" बाईंच्या डोळ्यात जादु आहे " - पुन्हा एकदा "रं घा वि र".
पण 'डोळ्यात जादु' ह्याचा अर्थ ती इष्काची जादु नसुन त्या त्या कुठे पाहतात हे कळत नाही, हि जादु होती. त्यामुळे प्रत्येकाचा गैरसमज स्वाभाविक होतं.
"साहेब, हा एक दोष सोडला तर रंभाबाई म्हणजे................................................
पुढचं ऐकायला मी थांबलो नाही. पिचकलेली हाडं, फाटलेले कपडे, भंगलेले हृदय, खंगलेलं शरीर, चतुर मन, आतुर क्षण आणि चक्काचुर स्वप्नं असं सगळं गोळा करुन मी परतीच्या वाटेवर अभंग म्हणत म्हणत आलो. निदान जिवंत तरी परत चाललो होतो नाहीतर स्वर्ग तीनच पावल राहिला होता....
शेवटी सगळी माया आहे... हेच खरं !
पण खरं सांगु.......
ह्या झालेल्या प्रकारानं मी अगदी व्यथित झालो आहे... खिन्न झालो आहे... विषण्ण झालो आहे. सगळं सगळं कसं अर्थशुन्य वाटायला लागले आहे. हे सगळ विसरण्यासाठी, शहर सोडुन देऊन नविन काहितरी करण्याचा मानस आहे. तुमचा सल्ला ऐकुन मी आयुष्यातुन उठलोय आता तुम्हीच अजुन एक सल्ला द्या आणि सांगा की मी पुढे काय करु.... ?
तुमच्या सल्ल्याची वाट पाहतोय... कळवा.... तुम्हाला रंभा घायाळकरच्या डोळ्यातल्या जादुची शपथ...............
धुंद रवी.
तुमच्या सल्ल्याची वाट
तुमच्या सल्ल्याची वाट पाहतोय... कळवा.... तुम्हाला रंभा घायाळकरच्या डोळ्यातल्या जादुची शपथ...............
लय भारी... पहिल्या दोन
लय भारी... पहिल्या दोन पेक्षाही...

" बाईंच्या डोळ्यात जादु आहे
" बाईंच्या डोळ्यात जादु आहे "

६ पिचका-या आणि २ बादल्या
रवी आता रतन खत्रीच्या अड्ड्यावर जा मटका खेळायला .
सगळ्यांना मिरी खसखस आपलं मेरी ख्रिसमस .
'डोळ्यात जादु'
६ पिचका-या आणि २ बादल्या
६ पिचका-या आणि २ बादल्या उरल्या होत्या>>>>>.... काय पण एक एक वाक्य आहे
तुमच्या सल्ल्याची वाट पाहतोय... कळवा.... तुम्हाला रंभा घायाळकरच्या डोळ्यातल्या जादुची शपथ...............>>>> शहर सोडण्या आधी एक शेवटचा चान्स घ्या कि.... पुन्हा पहिल्या रांगेचा मान घ्याकी ...बाईंचा बॉयफ्रेंड कोण ह्याची चौकश करुन
(No subject)
जबरी हसवलं.. माफ करा, आमच्या
जबरी हसवलं..



माफ करा, आमच्या (आधिच्या आगावु आणि फुकटच्या) सल्ल्यामुळे तुम्हाला खूप मार बसला ना
पण तुमच नशीब किती थोर निदान तुम्हाला डोळे तरी बघायला मिळाले..
आता तुम्ही इतक्या आवर्जुन सल्ला मागतच आहात तर माझ इतकंच सांगणं आहे की, या वेळेस डोळे दिसले, परत गेलात तर कदाचीत नाक दिसेल, नंतर कान, केस, हात, पाय इ. इ. इ. दिसुन सरतेशेवटी कधी ना कधी जर तुम्ही धीर सोडला नाही तर, तुम्हाला ती रंभा घायाळकर अख्खी च्या अख्खी नक्कीच दिसेल
तेव्हा लगे रहो....
पण वेळेवेळी आम्हाला कळवायला विसरु नका, म्हणजे अजुन काही सल्ले लागले तर नक्किच देवु...
जबरी जबरी..... सकाळी सकाळी
जबरी जबरी..:D...
सकाळी सकाळी इतक हसायला मिळालं..दिवस वसुल..:)
लिहित रहा अन हसवत रहा..(म्या पामराचा इतकाच सल्ला..यात काही धोका नाहीये. नो मार..)..:)
मस्त
मस्त

जगाच्या कल्याणा संतांच्या
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती अपरम्पार..
जगाच्या विनन्तीला मान देऊन देहाला मार देण्याच्या सत्कृत्याबद्दल कौतुक. (वरील वाक्यातील संतांच्या म्हनजे सन्ताबन्ता मधले सन्ता नाहीत. )
सेहवागचे आण्खी एक शतक हे धडाकेबाज म्हनावे की ते?
आईशप्पथ कधी तमाशाला जाणार
आईशप्पथ कधी तमाशाला जाणार नाही.... हे माझं मीच ठरवतोय. रवी, दारू झाली, तमाशा झाला आता कुठला नाद राहीला ?
(No subject)
मोसंबी-नारंगीत
मोसंबी-नारंगीत शेलार-तानाजी...
खुपच विनोदी.... हसुन हसुन
खुपच विनोदी.... हसुन हसुन धुंद...
अशक्य हसतेय!
मलाही दिसतात मोसंबी-नारंगीत
मलाही दिसतात मोसंबी-नारंगीत शेलार-तानाजी...>>>
झाडुन सगळे मित्र भेटण्याच्या दोनच वेळा...

गटारी आमोशा आणि रंभाचा तमाशा ! >>>>
ह्या स्माईलींसारखीच आवस्था आहे माझी लेख वाचल्यानंतर...
मस्त
मस्त
पहिली लावणी झाली सुद्धा आणि
पहिली लावणी झाली सुद्धा आणि माझ्या पदरात काही सुद्धा पडलं नव्ह्तं. जे पडलं होतं ते बरंच महाग होतं.... दोन दात आणि डोक्याला टेंगुळ....!>>>>
स्टेजवर त्या मगाचच्याच ६ पिचका-या आणि २ बादल्या>>>

लै भारी
पोर-चोर-मोर-लांडोर-थोर
हा भाग पण लय आवडला रे भौ.
हा भाग पण लय आवडला रे भौ.
मनापासुन आभार....
मनापासुन आभार....
सॉल्लीड !!
सॉल्लीड !!

:हहगलो: !!!!!!!!!!!
रंभा घायाळकरचा एक फोटू रवी
रंभा घायाळकरचा एक फोटू रवी तुमच्यासाठी
(No subject)
रवी, लगे रहो भाई..... तुला
रवी, लगे रहो भाई.....
तुला पुढच्या खेपेसाठी शुभेच्छा !
दीपुर्झा.....
दीपुर्झा.....

(No subject)
दीपुर्झा कमीत कमी समोरुन तरी
दीपुर्झा कमीत कमी समोरुन तरी टाकायचा होता. आम्ही पण पाहीले असते " हे डोळे जुल्मी गडे "
रवी चांगला लेख पण हा जरा
रवी चांगला लेख पण हा जरा मागच्या २ लेखांपेक्षा फिका वाटला
Pages